'या 25 वर्षात मी अनेक पुतिन पाहिले', व्लादिमीर पुतिन यांच्या एकहाती सत्तेचं पाव शतक पूर्ण

व्लादिमीर पुतिन

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, स्टीव्ह रोझेनबर्ग
    • Role, बीबीसी रशिया संपादक

1999 च्या नवीन वर्षाची संध्याकाळ मी कधीही विसरणार नाही.

मी बीबीसीच्या मॉस्को ब्युरोमध्ये निर्माता म्हणून काम करत होतो. अचानक एक ब्रेकिंग न्यूज आली की, रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्तसिन यांनी राजीनामा दिला आहे.

त्याच्या निर्णयाने सर्वांना आश्चर्य वाटले. अगदी मॉस्कोमधील ब्रिटीश प्रेसमध्ये काम करणाऱ्यांनाही या निर्णयाचं आश्चर्य वाटलं.

ही बातमी आली तेव्हा कार्यालयात एकही रिपोर्टर उपस्थित नव्हता. याचा अर्थ मला बातमी तयार करायची होती. बीबीसीमधील ही माझी पहिली बातमी होती, जी मी लिहिली आणि पब्लिश झाली.

मी यात लिहिलं, "बोरिस येल्तसिन नेहमी म्हणत होते की, ते त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील. मात्र, आज त्यांनी त्यांचा विचार बदलला आहे, असं रशियन लोकांना सांगितलं."

पत्रकार म्हणून माझ्या कारकिर्दीची ही सुरुवात होती.

रशियाचे नवे नेते म्हणून व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी देखील ही एक नवीन सुरुवात होती.

येल्तसिन पुतिन यांना काय म्हणाले होते?

बोरिस येल्तसिन यांच्या राजीनाम्यानंतर, रशियन राज्यघटनेनुसार पंतप्रधान व्लादिमीर पुतिन हे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष झाले.

तीन महिन्यांनंतर देशात निवडणुका झाल्या आणि त्यात पुतिन विजयी झाले.

रशियन राष्ट्राध्यक्ष कार्यालय (क्रेमलिन) सोडताना येल्तसिन यांनी पुतिन यांना शेवटचा निरोप दिला. तेव्हा ते पुतिन यांना म्हणाले, "रशियाची काळजी घ्या."

युक्रेनवरील रशियाच्या युद्धाला तीन वर्ष पूर्ण होत असताना, मला येल्तसिन यांचे हे शब्द पुन्हा पुन्हा आठवत आहेत.

कारण रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचे घातक परिणाम झाले आहेत.

हे घातक परिणाम मुख्यत्वे युक्रेनवर झाले आहेत. तेथील शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे आणि जीवितहानीही झाली.

रशियाचे तत्कालीन अध्यक्ष बोरिस येल्तसिन आणि पुतिन.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रशियाचे तत्कालीन अध्यक्ष बोरिस येल्तसिन यांनी 1999 मध्ये राजीनामा दिला. त्यानंतर पुतिन यांनी रशियाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.

रशियाने युक्रेनचा जवळपास 20 टक्के भाग ताब्यात घेतला आहे. यामुळे या भागातील जवळपास 1 कोटी नागरिक विस्थापित झाले आहेत.

असं असलं, तरी या युद्धाची किंमत रशियाला देखील मोजावी लागली आहे.

- पुतिन यांनी तथाकथित 'विशेष सैन्य मोहीम' सुरू करण्याचा निर्णय घेतल्यापासून रशियाचं युद्धभूमीवर मोठं नुकसान झालं आहे.

- रशियातील अनेक शहरांवर सातत्याने ड्रोन हल्ले होत आहेत.

- युक्रेनच्या सैनिकांनी रशियाच्या कुर्स्क भागात अचानक हल्ला केला, आतमध्ये घुसले आणि या शहराचा काही भाग ताब्यात घेतला आहे.

- आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे रशियन अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव येत आहे. देशांतर्गत दबावही वाढत आहे.

- रशियाची लोकसंख्येची परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.

'मी 25 वर्षांत अनेक पुतिन पाहिले'

25 वर्षांपूर्वी पुतिन सत्तेवर आले तेव्हापासून मी वार्तांकन करत आहे.

31 डिसेंबर 1999 रोजी रशियाचा नवा नेता अडीच दशकांनंतरही (25 वर्ष) सत्तेत असेल किंवा आज रशिया युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारत असेल आणि रशियाचा पाश्चिमात्य देशांसोबतचा तणाव शिगेला पोहचलेला असेल, असं कोणाला वाटलं असेल?

मला अनेकदा प्रश्न पडतो की, बोरिस येल्तसिन यांनी पुतिनऐवजी दुसऱ्या कोणाला आपला उत्तराधिकारी म्हणून निवडले असते, तर इतिहासाला वेगळं वळण मिळालं असतं.

साहजिकच हा प्रश्न वैचारिक आहे, पण इतिहास अशा 'पण, परंतू' आणि 'कदाचित'नं भरलेला आहे.

असं असलं तरी, एक गोष्ट मी नक्की सांगू शकतो की, या 25 वर्षांत मी पुतिन यांचे वेगवेगळे पैलू पाहिले आहेत. हे पाहणारा मी एकटा नाही.

रशियाचे तत्कालीन अध्यक्ष बोरिस येल्तसिन आणि पुतिन.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, व्लादिमीर पुतिन हे मागील 25 वर्षांपासून रशियाच्या सत्तेवर आहेत.

नाटोचे माजी प्रमुख लॉर्ड रॉबर्टसन यांनी 2023 मध्ये मला सांगितलं होतं, "मी ज्या पुतिनला भेटलो, ज्यांच्याशी माझे चांगले संबंध होते आणि नाटो-रशिया कौन्सिलची स्थापना केली, ते आजच्या अहंकाराने भरलेल्या पुतिनपेक्षा पूर्णपणे वेगळे होते."

"जो व्यक्ती मे 2002 मध्ये माझ्या मागे उभा होता आणि म्हणाला की, युक्रेन हे एक सार्वभौम आणि स्वतंत्र राष्ट्र आहे. सुरक्षेबाबत ते स्वतःचे निर्णय घेऊ शकते. तीच व्यक्ती आता युक्रेन हे राष्ट्र नाही असं म्हणत आहे."

"मला वाटतं की, व्लादिमीर पुतिन यांना टीका ऐकायची नाही. देशाबाबत त्यांच्या खूप मोठ्या महत्त्वाकांक्षा आहेत. सोव्हिएत युनियनला जगातील दुसरी महासत्ता म्हणून ओळखलं जात होतं. आज रशिया तसा कोणताही दावा करू शकत नाही. याचमुळे त्यांचा अहंकार दुखावतो आहे, असं मला वाटतं."

लाल रेष
लाल रेष

पुतिन यांच्यात इतके बदल होण्यामागं काय कारण?

'रशियाला पुन्हा महान' बनवण्याची पुतिन यांची ज्वलंत महत्त्वाकांक्षा हेच त्यांच्यातील बदलाचे सर्वात संभाव्य कारण असू शकते. (बरेच लोक याकडे शीतयुद्धातील रशियाच्या पराभवाची भरपाई म्हणूनही पाहतात).

त्यांच्या याच महत्त्वाकांक्षेनं रशियाला शेजारी देश आणि पाश्चिमात्य देशांशी संघर्ष करण्याच्या मार्गावर नेलं आहे.

असं असलं तरी, पुतिन यांच्यासाठी असं होण्याची वेगळी कारणं आहेत.

पुतिन यांची भाषणं आणि वक्तव्ये यावरून असं दिसतं की, पाश्चिमात्य देशांनी रशियाला फसवलं, रशियाचा अपमान केला आणि रशियाच्या सुरक्षाविषयक चिंतेकडे दुर्लक्ष केल्याचं पुतिन यांना वाटतं. त्यामुळे ते नाराज आहेत.

नाटोचे तत्कालीन सरचिटणीस लॉर्ड रॉबर्टसन (डावीकडे) आणि पुतिन.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2001 मध्ये पत्रकार परिषदेदरम्यान नाटोचे तत्कालीन सरचिटणीस लॉर्ड रॉबर्टसन (डावीकडे) आणि पुतिन.

असं असलं तरी 'रशियाची काळजी घ्या' या बोरिस येल्तसिन यांच्या विनंतीचा पुतिन यांनी मान राखला, असं पुतिन यांना स्वतःला तरी वाटतं का?

अलीकडेच मला हा प्रश्न थेट राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना विचारण्याची आणि उत्तर मिळवण्याची संधी मिळाली. वर्षअखेर झालेल्या चार तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या त्यांच्या पत्रकार परिषदेत पुतिन यांनी मला प्रश्न विचारण्यास सांगितलं.

मी पुतिन यांना आठवण करून दिली, "बोरिस येल्तसिन यांनी तुम्हाला रशियाची काळजी घेण्यास सांगितले. मात्र, तुमच्या तथाकथित विशेष लष्करी कारवाईत झालेले लक्षणीय नुकसान, कुर्स्क भागात युक्रेनचं सैन्य, जागतिक निर्बंध आणि आकाशाला भिडणारी महागाई याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही देशाची काळजी घेतली, असं तुम्हाला वाटते का?"

या प्रश्नाचं उत्तर देताना पुतिन म्हणाले, "होय. मी फक्त रशियाची काळजी घेतली नाही, तर देशाला रसातळातून काठावर आणलं."

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

पुतिन यांनी येल्तसिन यांच्या काळात रशिया सार्वभौमत्व गमावलेला देश होता आणि त्यांनी रशियाला अधिक चांगल्या स्थितीत आणलं, असं वक्तव्य केलं.

पाश्चिमात्य देशांनी स्वार्थासाठी रशियाचा वापर केला आणि यासाठी येल्तसिन यांचाही वापर केल्याचा आरोप पुतिन यांनी केला. तसेच रशिया हा स्वतंत्र सार्वभौम देश राहील हे सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचंही पुतिन यांनी नमूद केलं.

पुतिन स्वतःला रशियाच्या सार्वभौमत्वाचे रक्षक मानतात. ते या दृष्टिकोनाचा वापर युक्रेनबरोबरच्या युद्धाचं समर्थन करण्यासाठी करत आहेत का? की पुतिन यांना आधुनिक रशियान इतिहास समजतो असं खरंच त्यांना वाटतं?

मला अजूनही याबद्दल खात्री नाही. मात्र, हाच मुख्य प्रश्न आहे, असं मला वाटतं.

या प्रश्नाचं उत्तर युद्ध कसं संपणार आणि रशियाची भविष्यातील दिशा काय असेल यावर नक्कीच परिणाम करेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)