सीरियातल्या बंडखोरांविरुद्ध रशियाचे अलेप्पोवर हवाई हल्ले; कोण आहेत हे बंडखोर आणि सध्या तिथे काय सुरू?

फोटो स्रोत, Getty Images
सीरियामध्ये पुन्हा एकदा सरकार आणि बंडखोर गटांमधला संघर्ष तीव्र झाला आहे. ब्रिटनच्या सीरियन ऑब्जर्व्हेटरी फॉर ह्युमन राईट्स (एसओएचआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार सिरीयात सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत 370 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
एसओएचआरने दिलेल्या माहितीनुसार सीरियाच्या दक्षिणेत वाढत चाललेल्या बंडखोरीला मोडीत काढण्यासाठी रशियाने रविवारी (1 डिसेंबर) पहाटे अनेक हवाई हल्ले केले आहेत.
एसओएचआरने या प्रकरणातील माहिती देताना सांगितलं की, रशियाने इदलिब आणि हमाच्या ग्रामीण भागाला लक्ष्य करून हे हल्ले केले आहेत. सीरियातल्या बंडखोर गटांनी अलीकडेच या भागावर नियंत्रण मिळवलं होतं.
याआधी रशियाने 2016 मध्ये अलेप्पोवर हल्ला केला होता. त्यानंतर शनिवारी रशियाने सीरियावर हवाई हल्ला केला. सीरियन बंडखोरांनी सीरियातलं दुसऱ्या क्रमांकाचं शहर ताब्यात घेतल्यानंतर हा हल्ला करण्यात आला आहे.


बंडखोरांनी मोठ्या शहरांकडे मोर्चा वळवला आहे
एसओएचआरने सांगितले की, बंडखोर सैनिकांनी शनिवारी सीरियातील दुसरे सर्वात मोठे शहर असणाऱ्या अलेप्पोच्या दक्षिणेकडील हमाजवळील अनेक ग्रामीण भागांमध्ये प्रवेश केला. हमा हे सीरियातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
एसओएचआरने सोशल मीडियावर लिहिले आहे, "सीरियन लष्कराने आता या परिसरातील अनेक शहरे आणि गावांभोवती 'संरक्षणाची रेषा आखली आहे'.
शनिवारी, सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांनी 'सर्व बंडखोर आणि त्यांच्या समर्थकांविरोधात लढण्याची आणि सीरियाच्या स्थिरता आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्याची' शपथ घेतली.

फोटो स्रोत, Getty Images
बशर अल-असद यांच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे, "सीरिया सहकारी देश आणि मित्रदेशांसोबत मिळून या बंडखोरांचा पराभव करण्यासाठी सक्षम आहे. त्यांनी कितीही मोठे हल्ले केले, तरी आम्ही त्यांचा नायनाट करू."
सीरियात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गृहयुद्धात आतापर्यंत जवळपास 5 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याची सुरुवात 2011 मध्ये झाली, जेव्हा बशर अल-असद सरकारने लोकशाही समर्थक आंदोलन दडपण्यासाठी कारवाई केली होती.
2020 मधील युद्धविराम करारानंतर सीरियातील संघर्ष मोठ्या प्रमाणात शांततापूर्ण मार्गाने होत होता. परंतु विरोधी सैन्याने वायव्येकडील इडलिब शहर आणि आजूबाजूच्या बहुतेक प्रांतावर नियंत्रण ठेवले आहे.
इदलिब शहर अलेप्पोपासून केवळ 55 किलोमीटर अंतरावर आहे. 2016 मध्ये सरकारी सैन्याने त्यांचा पराभव करेपर्यंत हे शहर बंडखोरांचा बालेकिल्ला होते.
सीरियातील या ताज्या हल्ल्यांचे नेतृत्व इस्लामिक अतिरेकी गट हयात तहरीर अल-शाम (एचटीएस) आणि त्याचे तुर्कीय-समर्थित मित्रांनी केले आहे.
एचटीएस हा असद सरकारच्या विरोधात लढणाऱ्या सर्वात प्रभावी आणि प्राणघातक गटांपैकी एक मानला जात होता आणि इदलिबमध्ये हा गट आधीपासूनच सक्रिय होता.
सीरियाच्या लष्कराचं म्हणणं काय आहे?
एसओएचआरने दिलेल्या माहितीनुसार, बंडखोरांनी अलेप्पो विमानतळ आणि आसपासच्या डझनभर शहरांचा ताबा घेतला आहे.
त्यांनी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 5 वाजता कर्फ्यूची घोषणा केली. एसओएचआरनं असंही म्हटलं आहे की, बंडखोर सैनिकांनी दक्षिणेकडील हमाच्या दिशेने आगेकूच केली आहे आणि सीरियन सैन्य तिथून मागे हटलं आहे.
मात्र, शनिवारी रात्री हा दावा फेटाळून लावल्याचं सीरियाच्या माध्यमांनी सांगितलं. यासाठी त्यांनी सैन्यातील एका सूत्राचा हवाला दिला आहे.
सीरियन सैन्यानं सांगितलं, "बंडखोरांनी अलेप्पो आणि इदलिबच्या आघाड्यांवर अनेक दिशांनी मोठे हल्ले केले आणि ही लढाई '100 किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रावर' पसरली होती.
यामध्ये आमचे डझनभर सैनिक मारले गेल्याचं सीरियन लष्करानं म्हटलं आहे.
सीरियातल्या गृहयुद्धाच्या भीषण काळात बशर अल-असद यांना सत्तेवर ठेवण्यात रशियन हवाई दलाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. रशियन लष्कराने शनिवारी अलेप्पोमध्ये हवाई हल्ले केले आहेत.

फोटो स्रोत, EPA
2016 मध्ये रशियाने अलेप्पोवर हवाई हल्ला करून सीरियाच्या सरकारी सैन्याला हे शहर पुन्हा ताब्यात घेण्यास मदत केली होती. त्यानंतर रशियाने केलेला हा पहिलाच हल्ला आहे.
एसओएचआरने सांगितले की, इदलिबवर शनिवारी आणखी 9 रशियन हल्ले झाले.
या भागातून आलेल्या फोटोंमध्ये शनिवारी अलेप्पोच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर ट्रॅफिक जाम झाल्याचे दिसून आले. लोक हे शहर सोडण्याचा प्रयत्न करत होते आणि आकाशात धुराचे लोट उठताना दिसत होते.
वेगवेगळ्या देशांच्या प्रतिक्रिया
या आठवड्याच्या सुरुवातीला बंडखोरांनी केलेले आक्रमण सीरियाच्या गृहयुद्धातील सर्वात महत्त्वपूर्ण संघर्ष आहे. त्यामुळे जगातील अनेक देश या संघर्षावर लक्ष ठेवून आहेत.
या प्रकरणी प्रत्येक देशाने काय म्हटले आहे ते आपण पाहूया.
सीरियासाठी संयुक्त राष्ट्रांचे विशेष दूत गेयर ओ'पेडरसन म्हणाले, "या संघर्षामुळे देशातील शांतता पुनर्स्थापित करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे."
"सीरिया आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षातून मार्ग काढण्यासाठी अर्थपूर्ण आणि ठोस संवाद करणं गरजेचं आहे. याशिवाय सीरियात आणखी विभाजन आणि विनाश होण्याचा धोका आहे," असंही त्यांनी नमूद केलं.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिका
गृहयुद्धाच्या काळात अमेरिकेने बंडखोर गटांना पाठिंबा दिला होता. सध्याच्या सीरियातील परिस्थितीवर अमेरिकेने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अमेरिकेने म्हटलं, "सीरियाचं 'रशिया आणि इराणवर असणारं अवलंबित्व' आणि 2015 च्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या शांतता योजनेवर पुढे जाण्यास नकार दिल्यानं ही परिस्थिती उद्भवली आहे."
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कार्यालय असलेल्या व्हाईट हाऊसने या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे.
या निवेदनात म्हटलं आहे, "आम्ही सीरियातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि गेल्या 48 तासांपासून या भागातील इतर देशांशी संपर्क साधत आहोत."
"अमेरिका सहयोगी देशांना तणाव कमी करण्यासाठी, नागरिकांचे आणि अल्पसंख्याक गटांचे संरक्षण करण्यासाठी, गंभीर आणि विश्वासार्ह राजकीय प्रक्रियेचा पाठपुरावा करण्याचे आवाहन करते."
इराण
इराण हा सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांचा प्रमुख मित्र देश आहे. इराणचे सर्वोच्च मुत्सद्दी अब्बास अराकची रविवारी सीरियाची राजधानी दमास्कस येथे पोहोचले आहेत जिथे ते बशर अल-असद यांची भेट घेणार आहेत.
यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री अराकची तुर्कीला भेट देणार आहेत. तुर्किये सीरियामध्ये उपस्थित असलेल्या काही बंडखोर गटांना समर्थन देतात.
'हयात तहरीर अल-शाम' बंडखोर गट काय आहे?
सीरियातील बंडखोर गटांनी बुधवारी सीरिया सरकारविरोधात मोठा हल्ला केला. या हल्ल्यानंतर, शनिवारपर्यंत त्यांनी देशातील दुसरे सर्वात मोठे शहर असलेल्या अलेप्पोच्या 'मोठ्या भागांवर' नियंत्रण मिळवले होते.
या हल्ल्यामुळे रशियाने 2016 नंतर पहिल्यांदाच अलेप्पोवर हल्ला केला आणि सीरियाच्या सरकारी सैन्याला शहरातून माघार घ्यावी लागली.
हयात तहरीर अल-शाम (एचटीएस) या इस्लामिक कट्टरतावादी गटाने या हल्ल्याचे नेतृत्व केले होते. या संघटनेचा सीरियन संघर्षातल्या सहभागाचा मोठा इतिहास आहे.
एचटीएसची स्थापना 2011 मध्ये 'जभात अल-नुसरा' नावाने झाली. हा गट अल कायदा या कट्टरतावादी संघटनेचा थेट सहयोगी होता.

फोटो स्रोत, Getty Images
इस्लामिक स्टेट (IS) गटाचा म्होरक्या अबू बकर अल-बगदादीनेही ही संघटना तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
हा गट राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या विरोधात लढणाऱ्या सर्वात प्रभावी आणि प्राणघातक गटांपैकी एक मानला जातो.
बीबीसी मिडल इस्टचे प्रतिनिधी सेबॅस्टियन अशर म्हणतात, "असं वाटतं की, क्रांतिकारी विचारांच्या ऐवजी जिहादी भूमिकेमुळेच या गटाला प्रेरणा मिळाली. त्याकाळी 'फ्री सीरिया'च्या बॅनरखाली एकत्र आलेल्या मुख्य विद्रोही गटाशी या गटाचे मतभेद असल्याचंही समोर आलं होतं."
2016 मध्ये, या संघटनेचा नेता अबू मोहम्मद अल-जवलानी याने सार्वजनिकरित्या अल कायदाशी संबंध तोडले. त्यांनी 'जभत अल-नुसरा' बरखास्त करून नवीन संघटना स्थापन केली.
एका वर्षानंतर, इतर अनेक समविचारी गट या संघटनेत विलीन झाले आणि या गटाला 'हयात तहरीर अल-शाम' असं नाव देण्यात आलं.
बंडखोर गटांतर्गत संघर्ष
गेल्या चार वर्षांपासून सीरियातील परिस्थिती पाहून तेथील गृहयुद्ध संपल्यासारखं वातावरण होतं.
राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांनी येथील प्रमुख शहरांवर बिनविरोध वर्चस्व मिळवलं आहे. मात्र अजूनही देशातल्या बऱ्याच भागांवर त्यांचं नियंत्रण नाही. यामध्ये पूर्वेकडील कुर्दीश-बहुल भागांचा समावेश आहे, जे संघर्षाच्या सुरुवातीपासून कमी-अधिक प्रमाणात सीरियन सरकारच्या नियंत्रणाबाहेर गेले आहेत.
देशाच्या दक्षिणेकडील प्रदेशात, जेथे 2011 मध्ये असद राजवटीविरुद्ध बंड सुरू झाले, तेथे तुलनेने हे बंड शांत झालं आहे. स्वतःला इस्लामिक स्टेट म्हणवून घेणारा गट सीरियाच्या विस्तीर्ण वाळवंटात सुरक्षेला धोका निर्माण करत आहे.
याशिवाय उत्तर-पश्चिमेकडील इदलिब प्रांतावर गृहयुद्धाच्या काळात येथे आलेल्या जिहादी आणि बंडखोर गटांनी कब्जा केला आहे.
इदलिब हे अनेक वर्षांपासून युद्धभूमी बनले आहे, कारण सीरियाच्या सरकारी लष्कराला येथे पुन्हा ताबा मिळवायचा आहे. परंतु 2020 मध्ये रशिया आणि तुर्किये यांच्या मध्यस्थीनंतर युद्धविराम करार झाला. हा युद्धविराम बऱ्याच अंशी यशस्वी झाला होता.
इस्रायली हल्ल्यांची भूमिका
रशिया हा राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांचा दीर्घकाळापासून प्रमुख मित्र आहे, तर तुर्कियेने काही बंडखोर गटांना पाठिंबा दिला आहे.
इदलिबमध्ये सुमारे 40 लाख लोक राहतात. यापैकी बहुतेक लोक हे अशा शहरांमधून विस्थापित झाले आहेत, ज्यांना बशर अल-असद यांच्या सैन्याने युद्धानंतर पुन्हा ताब्यात घेतले होते.
अलेप्पो शहर हे सीरियातील सर्वात रक्तरंजित युद्धाचे साक्षीदार आहे.
बंडखोरांचा येथे मोठा पराभव झाला होता. बंडखोरांना मागे हटवण्यासाठी बशर अल-असद यांनी रशियन हवाई दलाची आणि जमिनीवरच्या हल्ल्यांसाठी इराणची मदत घेतली होती. यामध्ये हिजबुल्लाहचाही समावेश होता.

फोटो स्रोत, Getty Images
अलीकडेच लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यामुळे हिजबुल्लाहला मोठा फटका बसला आहे. याशिवाय इस्रायलने सीरियातील इराणच्या वाणिज्य दूतावासावरही हल्ला केला.
इदलिबच्या बंडखोर गटांनी अलेप्पोवर अनपेक्षित हल्ला करण्याच्या निर्णयात या अलीकडील घटनांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे यात शंका नाही.
आता काही काळापासून, एचटीएसने इदलिबमध्ये आपले मुख्यालय स्थापन केलं आहे. याठिकाणी एचटीएस स्थानिक प्रशासन देखील चालवतं. मात्र, कथित मानवी हक्कांच्या उल्लंघनामुळे त्यांच्या प्रशासनाला कायदेशीर बनवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.
या गटाने तेथील इतर गटांशीही संघर्ष केला आहे.
अल कायदाशी संबंध तोडल्यानंतर, एचटीएसने सीरियामध्ये कट्टरतावादी इस्लामिक राज्य स्थापन करण्यावर त्यांचं लक्ष केंद्रित केलं. आयएसनेही तसंच करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यात ते अपयशी ठरले होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











