इस्रायलने आक्रमण केलेलं असताना लेबनॉनचं लष्कर नेमकं काय करतंय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, केरीन टोर्बी
- Role, बीबीसी न्यूज
- Reporting from, बैरुत
इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील युद्ध वरचेवर चिघळत चाललं आहे. पण हा वाद नवा नसून मागच्या चार दशकांपासून हा संघर्ष चालत आलेला आहे.
इस्रायल, अमेरिका आणि ब्रिटनसह तिच्या मित्रराष्ट्रांच्या नजरेत हिजबुल्लाह ही एक दहशतवादी संघटना असून शेजारील लेबनॉन देश तिला आश्रय देत आलेला आहे.
हिजबुल्लाहच्या अस्तित्वाकडे इस्रायल आपल्या सुरक्षेला असलेला धोका म्हणून पाहतो. त्यामुळे हिजबुल्लाहचा खात्मा करणं हे इस्रायलचं अधिकृत सुरक्षा धोरण आहे.
तर दुसऱ्या बाजूला इस्रायल हा देशच वसाहतवादी असून इस्रायलचा विरोध हे हिजबुल्लाहच्या स्थापनेमागचंच एक प्रमुख कारण आहे, असं ही संघटना म्हणते.
त्यामुळे मागच्या 40 वर्षांपासून इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यामध्ये चकमक सुरूच आहे.
हमासच्या हल्ल्यानंतर तर मागच्या वर्षभरात दोन्ही बाजूंनी सातत्यानं एकमेकांवर आक्रमण केलं जात आहे. त्यामुळे तणाव शिगेला पोहोचला आहे.
कम्युनिकेशन डिव्हाईसेसचा स्फोट घडवून आणून इस्रायलनं 2006 नंतर पहिल्यांदाच लेबनॉनच्या भूमीत घुसखोरी करून हल्ला केलाय.

फोटो स्रोत, Getty Images
या हल्ल्याला हिजबुल्लाह आणि आता इराणनंही प्रत्युत्तर दिलेलं आहे. पण या सगळ्या गोंधळात लेबनिज लष्कर काय करतंय? हा मोठा प्रश्न आहे.
कारण हल्ला तर प्रत्यक्षात लेबनॉनच्या भूमीवर झालेला आहे. आपल्या भूमीत परकीय आक्रमण झाल्यानंतरही लेबनॉन लष्कर निष्क्रिय का? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. हिजबुल्लाहच्या प्रतिकाराबरोबरच आता तर इराणनंही क्षेपणास्त्रं डागून या वादात उडी घेतलेली आहे.
लेबनॉनचा बदला घेण्यासाठी इराणने हात पुढे सरसावले आहे. त्यामुळे हे युद्ध संपूर्ण आखाती प्रदेशात पसरत चाललं आहे.
आखाती प्रदेशावर युद्धाचं सावट पसरलेलं असताना आणि लेबनॉन याची युद्धभूमी बनलेला असताना लेबनिज लष्कर स्वसुरक्षेसाठी काय योजना करत आहे? हा प्रश्न आहे.


लेबनॉनच्या रक्षणाची जबाबदारी उचलतंय कोण? लेबनॉनचं लष्कर की हिजबुल्लाह ?
इस्रायल आणि हिजबुल्लाह सातत्यानं एकमेकांवर हल्ले करत असताना लेबनॉनचं लष्कर मात्र यात कुठेच दिसत नाही.
हे युद्ध लेबनॉनच्या भूमीवर लढलं जात असताना लेबनिज लष्कराची निष्क्रियता आश्चर्यकारक आहे. इस्रायल हा अधिकृतरित्या लेबनॉनचा शत्रू देश आहे. आणि शत्रू राष्ट्र सीमा पार करून हल्ला करत असताना त्याचा प्रतिकार करणं ही लष्कराची जबाबदारी आहे.
पण इस्रायलचा प्रतिकार करण्याची क्षमताच लेबनॉनच्या लष्कराकडे नाही. इस्रायलचे हल्ले रोखणं किंवा प्रतिहल्ले करण्यासाठी लेबनॉन लष्कराकडे ना पुरेशी शस्त्रास्त्रे आहेत ना आवश्यक आर्थिक रसद.
दुसऱ्या बाजूला इस्रायलकडे जगातली सर्वांत आधुनिक शस्त्रास्त्रे आणि तंत्रज्ञान असलेलं लष्कर आहे. अमेरिका आणि ब्रिटनसारख्या ताकदवान राष्ट्रांचा मजबूत पाठिंबा देखील इस्त्रायलला लाभलेला आहे.
त्यामुळे इस्रायल लष्कराला आधुनिक शस्त्रास्त्रे आणि निधीची कसलीही कमतरता नाही.

फोटो स्रोत, Getty Images
इस्रायल आणि लेबनॉनच्या लष्कराची कुठल्याही प्रकारची तुलना होऊच शकत नाही. लेबनॉनचं लष्कर आणि एकूण सुरक्षा यंत्रणा अशक्त ठेवण्यात अमेरिकेची भूमिका मोठी आहे.
लेबनॉनची लष्करी ताकद वाढू नये म्हणून गेली कित्येक वर्ष अमेरिका लेबनॉनमध्ये हस्तक्षेप करत आलेली आहे.
लेबनॉन सामरिकदृष्टया कमजोरच राहील, याची खातरजमा करण्यासाठी तिथे आपल्या सोयीचं सरकार कसं निवडून येईल याची तजवीज अमेरिका करत आलेली आहे.
इस्रायलला धोका उत्पन्न होईल असा कुठलाही निर्णय आणि क्षमता लेबनॉनमध्ये विकसित होऊच नये यासाठी तिथली सरकारे पाडणे आणि नवीन सरकार निवडून आणणे असे हस्तक्षेप अमेरिका आधीपासून करत आल्याचा आरोप सातत्यानं केला जातो.
पुरेशा निधी अभावी लेबनिज लष्कर आधीच कमजोर झालेलं असताना 2020 च्या बैरूतमधील गोदामांच्या स्फोटानं अडचणींमध्ये आणखी भर घातली.
या स्फोटानं आधीच संकटात असलेली लेबनॉनची अर्थव्यवस्था आणखी गर्तेत गेली. अर्थव्यवस्थाच कमजोर झाल्यानं लेबनॉनच्या लष्कराला देण्यासाठी तिथल्या सरकारकडे पुरेसा निधीच उपलब्ध नव्हता.
आधीच कमी झालेली लेबनॉन लष्कराची रसद मग या स्फोटांनंतर तर अक्षरशः खोळंबली. लेबनॉन लष्करातील सैनिकांचे पगार आणि लष्कराच्या गाड्यांमध्ये इंधन भरायचे देखील पैसे उरले नाहीत. निधीचा पुरवठाच थांबल्यानंतर लेबनिज लष्कर निष्क्रिय बनलं.
लेबनॉन लष्कराला अमेरिकेचा आधार
जी हिजबुल्लाह अमेरिकेच्या सर्वांत धोकादायक दहशतवादी संघटनेच्या यादीत अग्रस्थानी आहे त्या हिजबुल्लाहला लेबनॉननं आश्रय दिलेला आहे.
हिजबुल्लाह संघटना मुख्यतः लेबनॉनच्या भूमीतून चालते. तरी गंमत म्हणजे याच लेबनॉन लष्कराला अमेरिका आर्थिक सहाय्य पुरवते.
लेबनॉन लष्कराचा सर्वांत मोठा देणगीदार आज अमेरिका आहे. मध्यंतरी निधी अभावी लेबनॉन लष्करातील अधिकारी आणि सैनिकांचे पगार थकल्यानंतर अमेरिकेनेच मदत केली होती. हा विचित्र विरोधाभास आहे.
काही प्रमाणात अमेरिका लेबनॉनच्या लष्कराला गाड्यांचा ताफा, यांत्रिक उपकरणे व छोटी शस्त्रात्रे देखील अधूनमधून पुरवत असते.
पण अमेरिका इस्रायलला पुरवत असलेल्या लष्करी आणि आर्थिक मदतीच्या तुलनेत ही मदत अगदीच क्षुल्लक आहे.
पण दोन राष्ट्र एकमेकांशी लढत आहेत आणि त्या दोघांनाही युद्धासाठी रसद पुरवणारा देश हा एकच आहे, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अरब क्षेत्रातील सर्वच देशांच्या लष्करांची स्थिती लेबनॉनसारखीच बिकट आहे. “इस्रायलचा सामना करण्याची ताकद अथवा क्षमता लेबनॉनच काय अरब देशांतील कुठल्याच लष्कराकडे नाही,’’ असं लेबनॉन सरकारचे संयुक्त राष्ट्रसंघातील माजी प्रतिनिधी जनरल मुनिर शेहाद यांनी बीबीसीशी बोलताना प्रांजळपणे मान्य केलं.
“त्यामुळे इस्रायली सैन्याला जो काही प्रतिकार अरब मुस्लीमांकडून केला जातो तो फक्त गनिमी काव्यानेच. प्रत्यक्ष युद्धात इस्रायलला मातच नव्हे तर आव्हान देणंही आखाती देशात कुणालाच शक्य नाही,” असंही शेहाद सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
लेबनॉन लष्करातील माजी जनरल खलिल अल होलू सांगतात, “लेबनॉनमध्ये शांतता कायम ठेवणं हे लष्कराचं प्रमुख लक्ष्य आहे. आज लेबनॉनधील अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न मोठा नाजूक बनला आहे. 5 लाख पेक्षा जास्त लोक जे हिजबुल्लाहचे समर्थक आहेत त्यांंना दुसऱ्या प्रदेशात विस्थापित व्हावं लागलंय.
"ज्या नवीन प्रदेशात ते विस्थापित झालेत तिथे हिजबुल्लाहविषयी सहानुभूती नाही तर विरोध आहे. त्यामुळे तिथे तणावपूर्ण स्थिती बनलेली आहे. अशा तणावपूर्ण स्थितीत संघर्षाची ठिणगी कधीही पेटू शकते. नागरी युद्धाचीही शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे हा संभाव्य वाद टाळून शांतता कायम ठेवणं हेच आमच्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे," होलू सांगतात.
इस्रायलने लेबनॉनवर हल्ला करून हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नसरल्लाह यांची तर हत्या केलीच शिवाय हिजबुल्लाहचे लेबनॉनमधील तळही उद्धस्त केले आहेत.
त्यामुळे हिजबुल्लाहचे अनेक सदस्य व समर्थक लेबनॉनच्या वेगवेगळ्या भागात विस्थापित झाले आहेत. हिजबुल्लाहचे समर्थक व विरोधक असे वेगवेगळे गट एकाच भागात आल्यामुळे त्यांच्यातील तणावातून स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली आहे.
अशा परिसरामध्ये हा गटांमध्ये संघर्ष उद्भवू नये यासाठी संवेदनशील भागांमध्ये लेबनिज सैनिक मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेलं आहे.
हे वेगवेगळे गट एकमेकांसमोर आल्यामुळे संघर्ष पेटून परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते याची कल्पना लेबनॉन सरकारलाही आहे. त्यामुळे राष्ट्रीय एकजुटीला प्राधान्य देत आपापसातील वाद मिटवून नागरी शांतता टिकवण्याचं आव्हान सरकारनं आपल्या नागरिकांना केलं आहे.

इतर काही महत्त्वाच्या बातम्या :

तर लेबनॉनचं सैन्य इस्रायलविरोधात युद्धात उतरलंय का? हा प्रश्नाचं सरळसरळ उत्तर ‘नाही’ असंच आहे. लेबनॉनमध्ये जागीजागी विशेषतः दक्षिणेत लेबनॉन सैन्याला तैनात करण्यात आलंय. हे सैनिक फक्त निगराणी आणि शांतता प्रस्थापित करण्याचं काम करत आहेत.
नुकताच इस्रायलनं हिजबुल्लाचा समर्थक समजून एका मोटरसायकल स्वारावर ड्रोन हल्ला केला होता. ही मोटरसायकल लेबनॉनच्या लष्कराने उभारलेल्या चेकपोस्टवरून जात असतानाच ड्रोन डागलं गेलं. त्यात मोटरसायकल स्वारासोबतच चेकपोस्टवरील एक लेबनिज सैनिकही मारला गेला. पण तरीही प्रतिकारात इस्त्रायलवर कुठलाही हल्ला लेबनॉनच्या सैन्यानं केलेला नाही.
शस्त्रसंधीचा करार करून युद्धाला विराम बसावा, यादृष्टीने लेबनॉन प्रयत्न करत आहे. पण त्यासाठी आधी लेबनॉनमध्ये अंतर्गत शांतता प्रस्थापित होणं गरजेचं आहे. लेबनॉनमध्येच अंतर्गत हिंसाचार सुरू झाल्यास शस्त्रसंधीची उरली सुरली शक्यताही नाहीशी होऊन जाईल. त्यामुळे विशेषत: लेबनॉनमधील इस्रायली विरोधक व अतिरेक्यांवर रोख लावली जाणं गरजेचं आहे.
जागोजागी सैन्य तैनात करून करडी नजर ठेवण्यामागे लष्कराचा हाच हेतू आहे. इस्रायल विरोधात युद्ध पुकारण्याची क्षमता तर लेबनॉनच्या सैन्याकडे नाही. पण अंतर्गत सुरक्षा आणि शांतता टिकवणंही सैन्याला आता अवघड जात आहे.
कारण त्यासाठी देखील बराच फौजफाटा आणि रसद गरजेची आहे. आणि तेवढी रसद व निधी दुर्दैवानं लेबनिज लष्कराकडे आजघडीला उपलब्ध नाही. त्यामुळे इस्रायलचा प्रतिकार करणं तर दूरची गोष्ट आपल्या देशाची निगराणी करणंही लेबनॉनच्या लष्कराला जड जात आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)







