इस्रायल-हमास संघर्ष हिजबुल्लाह आणि लेबनॉनद्वारा इराणपर्यंत कसा पोहोचला?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी
आधी इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू होतं. मग इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात चकमक उडाली. आता पुन्हा इस्रायल आणि इराणमध्ये संघर्ष पेटतो आहे. पश्चिम आशियातल्या राजकारणात हे वळण कसं आलं?
खरं तर इराण आणि इस्रायल या दोन देशांतली चढाओढ नवी नाही.
एकेकाळी सहकार्याचं नातं असलेल्या या दोन देशांमधले संबध 1979 साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाल्यानंतर बिघडत गेले.
इराणला आता इस्रायलचं देश म्हणून अस्तित्वच मान्य नाही. तर इस्रायललाही इराण हा सर्वांत मोठा धोका वाटतो.
इराण अण्वस्त्र तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप इस्रायल वारंवार करत आला आहे तर इराणला मात्र हा दावा मान्य नाही.
पश्चिम आशियात आज हे दोन देश दोन विरोधी ध्रुवांवरची सत्ताकेंद्रे बनली आहेत. प्रामुख्यानं अरब आणि सुन्नी मुस्लीम राष्ट्रांचा समावेश असलेल्या या प्रदेशात या दोन देशांची स्वतःची विशिष्ट ओळख आहे.
इराण हे शिया पर्शियन तर इस्रायल ज्यू बहुसंख्य असलेलं राष्ट्र आहे. गेल्या अनेक वर्षांत दोघांमध्ये छुपा संघर्ष सुरू आहे. त्यानं अनेकदा रक्तरंजित रूपही घेतलं.
याचं कारण या प्रदेशातल्या सामरिक आघाड्यांमध्ये आणि भू-राजकीय परिस्थितीत दडलं आहे, पण याचे परिणाम मात्र जगावर होऊ शकतात.


7 ऑक्टोबर 2023 रोजी पॅलेस्टिनी कट्टरवादी संघटना हमासनं इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इराण-इस्रायलही पुन्हा संघर्षाच्या उंबरठ्यावर पोहोचले. त्या हल्ल्यात आपला थेट हात असल्याचं इराणनं स्पष्टपणे नाकारलं आहे.
पण हल्ल्यानंतर इस्रायलनं गाझामध्ये आक्रमण केलं, तेव्हा इराण आणि इराणच्या ‘अॅक्सिस ऑफ रेझिस्टन्स’ या लष्करी आघाडीनं इस्रायलविरोधात भूमिका घेतली आणि हा संघर्ष चिघळत गेला.
इराणचा अॅक्सिस ऑफ रेझिस्टन्स काय आहे?
इराणचा अॅक्सिस ऑफ रेझिस्टन्स म्हणजे अक्षगट किंवा लष्करी आघाडी हे पश्चिम आशियातलं इराणच्या समर्थकांचं नेटवर्क आहे. यात प्रामुख्यानं शिया मुस्लिमांच्या सशस्त्र गटांचा समावेश आहे.

सीरियातलं सरकार आणि काही संघटना, गाझा आणि वेस्ट बँकमधल्या हमास आणि पॅलेस्टिनियन इस्लामिक जिहादसारख्या या संघटना, लेबननमधील हिजबुल्लाह, येमेनमधले हूथी बंडखोर, इराकमधल्या इस्लामिक रेझिस्टन्स इन इराकसारख्या संघटना तसंच बहारिनमधल्या अल-अश्तार ब्रिगेड आणि सराया अल मुख्तार या शिया सशस्त्र गटांचा समावेश आहे.
पण हे नेटवर्क काही आत्ता तयार झालेलं नाही. तर या प्रदेशात इस्रायल आणि अमेरिकेच्या प्रभावाला उत्तर म्हणून इराणनं हे नेटवर्क तयार केल्याचं सांगितलं जातं.
ऑक्सफर्ड अनालिटिकाच्या लॉरा जेम्स बीबीसीला सांगतात, “आपण स्वतः आक्रमण करण्याच्या बाजूने नाही, अशी इराणची भूमिका आहे. पण आपल्या देशाच्या सुरक्षिततेला मोठा धोका आहे, असं इराणला वाटतं.”
त्यांच्या मते, हा गट अस्तित्वात येण्याची पाळंमुळं 1980 मधल्या इराण-इराक युद्धात आहेत. त्यावेळी त्यावेळी इराकनं इराणवर हल्ला केला होता.
“इराण-इराक युद्धादरम्यान इराकच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांत अनेक इराणी नागरिक मारले गेले होते. त्यानंतर या प्रदेशात आपलं स्थान नेमकं काय आहे, याविषयी इराणची भूमिका तयार होत गेली. पुन्हा एकटं पडण्याची वेळ ओढवू द्यायची नाही, अशी त्यांची भावना बनली,” लॉरा सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
यातले काही गट याआधी सीरिया आणि इराकमधल्या कट्टरवादी सलाफी आणि इस्लामिक स्टेटविरोधात लढत होते.
पण 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलनं गाझामध्ये आक्रमण केलं. त्यानंतर यातले काही गट पॅलेस्टिनींना समर्थन देत इस्रायलविरोधात सक्रिय झाले.
येमेनमधल्या हूथी बंडखोरांनी तांबड्या समुद्रात इस्रायल आणि इस्रायल समर्थकांची जहाजं अडवली, हिजबुल्लाह इस्रायलच्या उत्तर भागात रॉकेट्स डागली, इस्लामिक रेझिस्टन्स इन इराकनं जॉर्डन आणि इस्रायली कब्जातल्या गोलन हाईट्स प्रदेशात ड्रोन हल्ले केले.
हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नसरल्लांचा इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाल्यावरही तसंच चित्र दिसलं.
अमेरिका या गटांचा उल्लेख इराणचे प्रॉक्सी असा करते, म्हणजे या गटांच्या आड इराण आपला प्रभाव वाढवू इच्छित असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
पण इराणचा या गटांवर नेमका किती प्रभाव आहे, हे स्पष्ट नाही. यातल्या सीरियामध्ये इराणचं सैन्य तैनात आहे. तर इतर काही गटांना इराण सैनिकी प्रशिक्षण, हत्यारं आणि आर्थिक मदत पुरवत असल्याचं सांगितलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेच्या दाव्यानुसार 2020 साली इराणनं हिजबुल्लाहला 70 कोटी अमेरिकन डॉलर्स म्हणजे साधारण 58 अब्ज रुपयांची मदत केली होती. तर पॅलेस्टिनी संघटनांना इराणनं 10 कोटी अमेरिकन डॉलर्स म्हणजे 8 अब्जांहून अधिक रुपये दिले. इराणनं हा दावा फेटाळला आहे.
पण त्याविषयी जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे गॉर्डन ग्रे बीबीसीच्या रॉस अटकिन्स यांना सांगतात, “इराण अॅक्सिस ऑफ रेझिस्टन्समधील प्रत्येक संघटनांच्या दैनंदिन कारभारात लक्ष घालत नाही, पण जेव्हा तुम्ही सामरिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देता, तेव्हा या संघटनांनी केलेल्या गोष्टींसाठी तुम्ही जबाबदार ठरता.”
इराणचे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजे IRGC आणि कड्स फोर्स या निमलष्करी संस्था अॅक्सिस ऑफ रेझिस्टन्समध्ये समन्वयाचं काम करतात असा अमेरिकेचा दावा आहे.
या दोन्ही संस्था आणि या अक्षगटातील अनेक संघटनांना अमेरिकेनं दहशहतवादी घोषित केलंय आणि त्यांच्या तळांवर ड्रोन किंवा रॉकेटनं हल्लेही केले आहेत.
सध्या इराणला नेमकं काय हवं आहे, याविषयी वेगवेगळे दावे केले जातात. पण अमेरिका आणि इस्रायलला आव्हान देण्यासाठी इराणला या मित्रदेश आणि संघटनांचं सहकार्य गरजेचं वाटतं.
गाझातल्या युद्धानं इराण-इस्रायल संघर्ष का पेटला?
हमासनं इस्रायलवर हल्ला केल्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजे 8 ऑक्टोबर 2023 रोजी, लेबनॉनमधील शिया संघटना हिजबुल्लाह आणि इस्रायलमध्ये चकमक उडाली.
तसंच येमेनमधले हूथी बंडखोरही इस्रायलविरोधात आणखी आक्रमक झाले.
हिजबुल्लाह आणि हूथी बंडखोरांना इराणचा पाठिंबा आहे. त्यामुळे प्रत्युत्तरादाखल इस्रायलनं इराणच्या छुप्या तळांवर हल्ले सुरू केले.
यातल्या अनेक हल्ल्यांची जबाबदारी इस्रायली सैन्यानं उचलली नाही, पण तज्ज्ञांनी इस्रायलकडेच बोट दाखवलं.

फोटो स्रोत, Getty Images
डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 दरम्यान वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचे म्हणजे IRGC चे काही अधिकारी मारले गेले होते.
पण 1 एप्रिल 2024 रोजी सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये इराणच्या दूतावासावर हल्ला झाला, त्यानंतर इराणनं उघडपणे आक्रमक पवित्रा घेतला.
14 एप्रिल 2024 रोजी इराणने इस्रायलवर एक मोठा हल्ला केला. इराणनं सुमारे 300 रॉकेट्स आणि ड्रोन्स डागली. त्यातली बहुतांश अस्त्रं इस्रायलनं परतवून लावली.
19 एप्रिल 2024 रोजी इराणच्या इस्फाहान शहरात लष्करी तळावर रॉकेट हल्ले झाले. इस्रायलनं जबाबदारी घेतली नाही, पण या हल्ल्यांमागे त्यांचाच हात असल्याची चर्चा रंगली.
त्यानंतर परिस्थिती आणखी हाताबाहेर जाऊ न देण्याची भूमिका दोन्ही बाजूंनी घेतल्याचं दिसलं.
31 जुलै 2024 रोजी इराणची राजधानी तेहरानमध्ये एका घरावर झालेल्या हल्ल्यात हमास या पॅलेस्टिनी सशस्त्र संघटनेचे राजकीय नेते ईस्माईल हानिये मारले गेले. हा हल्ला इस्रायलनं केल्याचा दावा इराणनं केला.
दरम्यान, इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातला संघर्ष मात्र आणखी चिघळत गेला.
27 सप्टेंबरला इस्रायली हल्ल्यांत हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नसरल्लाह आणि इराणच्या IRGCचे डेप्युटी कमांडर अब्बास निलोफरूशान यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर प्रत्युत्तरादाखल इराणनं 1 ऑक्टोबर 2024 रोजी इस्रायलवर 180 हून अधिक क्षेपणास्त्रं डागली. ही क्षेपणास्त्र परतवून लावण्यात अमेरिका आणि ब्रिटनच्या सैन्यानंही इस्रायलला मदत केली.
त्यामुळेच आता इराण आणि इस्रायलमधला संघर्ष आणखी विकोपाला गेला, तर तो केवळ दोन देशांपुरता न राहता, या प्रदेशातले अनेकजण त्यात ओढले जाण्याची भीती काहींना वाटते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











