इस्लामिक क्रांतीनंतर इराणच्या नेत्यांचा इतिहास; हत्या, हकालपट्टी आणि अधोगती

फोटो स्रोत, GETTY IMAGES - IRNA - FARS
इराणमधील राजकीय परिस्थिती ही जगासाठी एकप्रकारे गूढच आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष आणि तेथील सर्वोच्च नेते यांच्यातील संघर्ष देखील नेहमीच चर्चेत असतात. मध्यपूर्वेतील देश असला तरी इराणमधील राजकीय परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. इराणमधील राजकारणाचे विविध रंग आणि स्थित्यंतरांचा हा आढावा...
इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या 45 वर्षांच्या इतिहासात सध्याचे सर्वोच्च नेते अली खामेनी सोडून इतर सर्व राष्ट्राध्यक्षांना कोणत्या तरी संकटाला तोंड द्यावं लागलं आहे.
एकतर ते सत्तेत असतानाच मृत्यू पावले आहेत किंवा त्यांचा राजकीय स्वरुपात बळी तरी देण्यात आला आहे. अनेकांची तर राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर दुसऱ्यांदा निवडणूक लढवण्याआधीच हकालपट्टी करण्यात आली. मोहम्मद अली राजई यांच्यानंतर इब्राहिम रईसी दुसरे असे राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच एखाद्या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे.
इब्राहिम रईसी रविवारी (19 मे) अझरबैझानच्या पूर्व प्रांतात धरणाचं उद्घाटन करण्यासाठी गेले होते. तिथून परतत असताना त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं होतं.
त्यांच्या मृत्यूची खातरजमा सोमवारी (20 मे) मदत पथकं घटनास्थळी पोहोचल्यानंतर करण्यात आली होती. या दुर्घटनेमध्ये राष्ट्राध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्र्यांसह नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी (23 मे) मशहद मध्ये त्यांचा दफनविधी झाला. याच शहरात 1960 मध्ये रईसी यांचा जन्म झाला होता.
आता 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर आतापर्यतचे इराणमधील राज्यकर्ते आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या शेवटाचा एक आढावा घेऊया.
मेहदी बजारगान : राजीनामा
1979 मध्ये इस्लामिक क्रांती झाल्यानंतर सरकारचे पहिले (हंगामी) पंतप्रधान मेहदी बजारगान यांच्या पहिल्या दिवसापासून तक्रारी होत्या. त्यांना आपल्या पदासाठी अधिक अधिकार हवे होते.

फोटो स्रोत, Getty Images
तेहरानमध्ये अमेरिकन दूतावासावर कब्जा होण्यासह अनेक अडचणींना जेव्हा त्यांना तोंड द्यावं लागलं आणि त्यासंदर्भात काही करण्यात ते असमर्थ ठरले, तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता.
मेहदी बजारगान यांनी आपल्या राजीनाम्यानंतर दोन दिवसांनी देशाच्या नागरिकांना उद्देशून भाषण करताना म्हटलं होतं की जेव्हा एका पंतप्रधानाला देखील कोणाची भेट घ्यायची असल्यास धर्मगुरुची परवानगी घ्यावी लागते, तेव्हा सहन करण्यापलीकडच्या वेदना होतात.
अबुल हसन बनी सद्र : पदच्युती आणि पलायन
इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे पहिले धर्मगुरू अयातुल्लाह रुहोल्लाह खामेनी यांनी अबुल हसन बनी सद्र या एका सर्वसाधारण व्यक्तीला राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार बनवलं होतं.
आणि अबुल हसन 75 टक्क्यांपेक्षा अधिक मतं घेऊन जिंकून आले होते.
युद्धविषयक बाबींचं व्यवस्थापन करण्याची त्यांची पद्धत आणि इस्लामिक रिपब्लिक पार्टीकडून लादण्यात आलेले पंतप्रधान मोहम्मद अली राजाई यांना त्यांचा विरोध असल्यामुळे मतभेद वाढतच गेले होते.
त्यांनी इराक विरुद्ध युद्धात सैन्याच्या भूमिकेवर भर दिला होता. मात्र इस्लामिक रिपब्लिक पार्टीला या युद्धात आयआरजीसी (रिपब्लिकन गार्ड)ची मोठी भूमिका हवी होती.

फोटो स्रोत, Getty Images
त्या वेळेचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. त्यामुळेच संविधान बाजूला ठेवून खामेनी यांनी इतर पथकंदेखील बनी बद्र यांच्या नियंत्रणात दिली होती.
इराणी मजलिस मध्ये बहुमत असणाऱ्या रिपब्लिक पार्टी बरोबरच्या संघर्षामुळे अखेर अबुल हसन बनी सद्र यांना पदच्युत करण्यात आलं.
इराणी कॅलेंडरनुसार जून 1981 मध्ये इराणच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे संसदेतील निर्णायक मतदानाद्वारे पदच्युत करण्यात आलं.
बद्र यांच्या विरोधात महाभियोग चालविण्यात आला होता. त्यावेळेस अली खामेनी सह, बद्र यांच्या विरोधकांनी त्यांच्याविरोधात जोरदार भाषणं केली होती.
बद्र पदच्युत झाल्यानंतर त्यांना 'देशद्रोह आणि सरकारविरुद्ध कारस्थान' करण्याच्या आरोपाखाली अटक वॉरंटला देखील तोंड द्यावं लागलं होतं.
ते फ्रान्सला पळून गेले आणि आपलं उर्वरित आयुष्य ते तिथेच होते.
मोहम्मद अली रजाई : स्फोटात मृत्यू
बनी सद्र यांना पदच्युत केल्यानंतर मोहम्मद अली रजाई इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले.
त्यांचा काही आठवड्यांचा राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ फारसा विशेष नव्हता. त्यांनी 2 ऑगस्ट 1981 ला पदभार स्वीकारला होता.
त्याच वर्षी पंतप्रधान कार्यालयात झालेल्या स्फोटामुळे देशाचे पंतप्रधान मोहम्मद जवाद बहनार यांच्याबरोबर त्यांचादेखील मृत्यू झाला होता.
हा स्फोट 30 ऑगस्ट 1981 ला झाला होता.

फोटो स्रोत, Getty Images
या बॉम्बस्फोटाचा आरोप पीपल्स मुजाहिदीन संघटनेवर (साजमान ए मुजाहिदीन ए खल्क) झाला होता. मात्र या संघटनेनं अधिकृतपणे या बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली नाही.
रजाई यांच्यानंतर अली खामेनी राष्ट्राध्यक्ष बनले. राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळाच्या शेवटी आणि अयातुल्लाह खामेनी यांच्या मृत्यूनंतर नेता म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती.
इराणमधील इस्लामिक क्रांतीनंतर खामेनी हे एकमेव प्रमुख आहेत जे आपल्या कार्यकाळाच्या शेवटी एका उच्च पदावर पोहोचले आणि राजकीय स्पर्धेमध्येदेखील विजय मिळवला.
मीर हुसैन मोसवी : तुरुंगवास
अली अकबर वेलायती यांना आपला पंतप्रधान बनवण्याची खामेनी यांची इच्छा होती. मात्र, संसदेत वेलायती विश्वासदर्शक ठराव जिंकू शकले नाहीत. शेवटी खामेनी यांना आपल्या इच्छेविरुद्ध मीर हुसैन मोसवी यांचं नाव संसदेला सुचवावं लागलं.
खामेनी यांच्याबरोबर असलेल्या तणावामुळे मीर हुसैन मोसवी यांना एकदा राजीनामा द्यावा लागला होता.
खामेनीच्या नेतृत्वाखाली आणि 1980 च्या दशकात संविधानात सुधारणा केल्यानंतर पंतप्रधान पद संपवण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
यानंतर मोसवी राजकारणातून बाजूला झाले आणि वीस वर्षांपर्यत राजकारणात दिसले नाहीत.
वीस वर्षानंतर राजकीय मौन सोडत 2009 मध्ये मोसवी यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेत उतरण्यास होकार दिला. मात्र यात त्यांना यश आलं नाही.
या निवडणुकीनंतर निदर्शकांनी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांना पदावरून दूर करण्याची मोहिम सुरू केली. याला त्यांनी ग्रीन मूव्हमेंट असं नाव दिलं होतं.
या निदर्शनांमुळे मोसवी यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं.
अरब जगतात झालेल्या उलथापालथीनंतर 2 फेब्रुवारी 2013 ला मोसवी यांना अटक करण्यात आली. अजूनही ते तुरुंगात आहेत.
अकबर हाशमी रफसंजानी : जलतरण तलावात संशयास्पद मृत्यू
अकबर हाशमी रफसंजानी 1989 मध्ये राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळातील सुरूवातीची चार वर्षे तणावग्रस्त होती.
हिजबुल्लाह सारख्या संघटनांनी त्यांच्या सांस्कृतिक धोरणांना विरोध करण्यास सुरूवात केली होती.
1993 मध्ये रफसंजानी यांचा दुसरा कार्यकाळ सुरू झाला होता. त्यावेळेस अयातुल्लाह खामेनी यांनी 'अभिजात वर्ग आणि खुल्या व्यापार धोरणाचा' उघडपणे विरोध केला होता.
खामेनी यांच्यानंतर अकबर हाशमी रफसंजानी यांना इराणमधील सर्वांत शक्तिशाली व्यक्ती मानलं जायचं.
2005 च्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महमूद अहमदीनेजाद यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र त्यांना सत्तेतून पदच्युत करण्याच्या प्रक्रियेत निर्णायक क्षण 17 जुलै 2009 ला आला.

फोटो स्रोत, Getty Images
त्या वर्षी अहमदीनेजाद यांनी निवडणूक जिंकली होती. मात्र लोकांनी निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. तेहरान सह देशातील अनेक शहरांमध्ये यासंदर्भात निदर्शनं देखील झाली होती.
17 जुलैला हाशमी रफसंजानी यांनी तेहरानमध्ये शुक्रवारच्या नमाजच्या वेळेस आपला अंतिम राजकीय संदेश दिला. यामध्ये त्यांनी निदर्शकांना पाठिंबा दिला आणि महमूद अहमदीनेजाद ज्या निवडणुकीत विजयी झाले त्या निकालांविषयी त्यांनी संशय व्यक्त केला.
यानंतर 2013 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल केलं. ही धक्का देणारी बातमी होती.
माजी सुधारणावादी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद खातमी यांनी त्यांना पाठिंबा दिला, मात्र 21 मे 2013 ला इराणच्या गार्डियन कौन्सिलनं रफसंजानी यांचं नामांकन रद्दबातल ठरवलं.
मात्र दोन वर्षांनी ते इराणच्या संसदेच्या वरच्या सभागृहात म्हणजे 'मजलिस ए खोब्रगान'च्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्यानं जिंकले.
8 जानेवारी 2017 ला जलतरण तलावात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला संशयास्पद मानलं जातं.
2018 मध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी रफसंजानी यांच्या मृत्यूचा तपास पुन्हा करण्याचा आदेश दिला.
रफसंजानी यांच्या कुटुंबियांनी आरोप केला होता की त्यांच्या शरीरात सर्वसाधारण माणसापेक्षा 10 पट किरणोत्सर्ग आढळून आला होता.
मोहम्मद खातमी : सुधारणांवर भर
23 मे 1997 ला मोहम्मद खातमी यांची दोन कोटीपेक्षा अधिक मतांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली होती. मात्र सुरूवातीच्या महिन्यांपासूनच सरकारमधील तणावाची चिन्हे स्पष्ट दिसू लागली होती.
2001 मध्ये इराणचे सर्वोच्च नेत्याने सुधारणावादी प्रसारमाध्यमांना शत्रूचा डेटाबेस म्हटलं आणि डझनावारी प्रकाशनं बंद करण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images
राष्ट्राध्यक्ष मोहम्मद खातमी यांनी म्हटलं की, त्यांच्या सरकारला दर 9 दिवसांनी संकटाला तोंड द्यावं लागतं.
2004 मध्ये संसदीय निवडणुकीच्या निकालाविरोधात प्रदर्शनं झाली. त्यानंतर इराणमध्ये प्रसारमाध्यमांवर खातमी यांचा फोटो छापण्यावर बंदी घालण्यात आली होती.
फार्स समाचार एजन्सी नुसार खातमी यांच्या देशाबाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली होती.
जरी त्यांना इराणमधील राजकारणातून बाजूला सारण्यात आलं होतं, तरीदेखील त्यांनी काही सुधारणावाद्यांनी विरोध केलेला असतानादेखील मागील निवडणुकांमध्ये भाग घेण्यासाठी लोकांना आमंत्रण दिलं.
महमूद अहमदीनेजाद : रागीट नेता
2005 मध्ये अहमदीनेजाद राष्ट्राध्यक्ष झाले होते. त्यांची निवड झाल्यानंतर अयातुल्लाह खामेनी आणि त्यांच्या जवळच्या मौलवींनी दिलेल्या वक्तव्यांवरून असं दिसत होतं की इराणला राष्ट्राध्यक्ष पदासाठी सर्वात उपयुक्त व्यक्ती मिळाला आहे.
मात्र ही राजकीय मैत्री फार काळ टिकली नाही. अहमदीनेजाद यांनी 2009 मध्ये दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली.

फोटो स्रोत, Getty Images
राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधी समारंभात अहमदीनेजाद यांनी इराणी नेत्याच्या (धर्मगुरू) हाताऐवजी त्यांच्या खांद्याचं चुंबन घेतलं. इराणमध्ये अशी कोणतीही प्रथा नाही.
काही दिवसानंतर त्यांनी असफनदियार रहिम मशाई यांना आपला प्रथम डेप्युटी म्हणून पुढे आणलं.
मात्र खामेनी यांनी एका खासगी पत्रात लिहिलं की, या प्रकारचा कोणताही पर्याय त्यांना योग्य वाटत नाही.
मात्र जोपर्यत इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या कार्यालयातून हे पत्र सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करेपर्यत अहमदीनेजाद यांनी आपला निर्णय बदलला नव्हता.
यानंतर खामेनी यांनी माहिती मंत्री हैदर मोस्लेही यांना पदावरून हटवण्यास विरोध केला. मात्र राष्ट्राध्यक्षावर याचा परिणाम झाला नाही.
राग व्यक्त करण्यासाठी ते 11 दिवस राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात गेले नाहीत. महमूद अहमदीनेजाद तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी 2017 मध्ये पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहिले. मात्र गार्डियन कौन्सिलने त्यांचं नामांकन रद्द ठरवलं.
हसन रुहानी
हसन रुहानी यांनी 2013 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सत्तेत आले. त्यांना सर्वात सुरक्षित राजकीय व्यक्तींपैकी एक मानलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
आपल्या कार्यकाळाच्या सुरूवातीपासूनच रुहानी यांनी खामेनी यांचा विश्वास संपादन करण्याचे प्रयत्न केले.
मात्र अमेरिकेबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न आणि 'संयुक्त व्यापक कार्य योजना' (जेसीपीओए) नावाचा आणखी एक करार करण्याच्या प्रयत्नांबद्दल खामेनी यांनी अनेकदा टीका केली.
हसन रुहानी आणि त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध अनेक आर्थिक गुन्ह्यांचे आरोप करण्यात आले.
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांमध्ये हसन रुहानी यांचा भाऊ हसन फरीदून यांचा देखील समावेश होता.











