इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रईसींच्या ताफ्यातील हेलिकॉप्टरचा अपघात, परराष्ट्र मंत्रीही होते सोबत

इराण

फोटो स्रोत, Reuters

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रईसी यांच्या ताफ्यातील एका हेलिकॉप्टरचा रविवारी (19 मे) खराब हवामानामुळे अपघात झाला आहे.

पण अपघात झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष होते की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रईसी आणि परराष्ट्र मंत्री होसेन अमीर-अब्दुल्लाहियन यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. इराणच्या सरकारी माध्यमानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

इराणचे गृहमंत्री अहमद वाहिदी यांनी राष्ट्राध्यक्ष रायसी आणि परराष्ट्र मंत्री हेलिकॉप्टरमध्ये होते या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

हेलिकॉप्टरमध्ये इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर मलिक रहमाती आणि इतर अनेक लोकही होते.

इराणच्या सरकारी माध्यमानुसार, हेलिकॉप्टरला उड्डाणादरम्यान काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्या आणि त्यामुळं 'हार्ड लँडिंग' करावं लागलं. हे हेलिकॉप्टर ताफ्यात असलेल्या तीन हेलिकॉप्टरपैकी एक आहे.

अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांना घेऊन जाणारे इतर दोन हेलिकॉप्टर सुखरुप पोहोचले आहेत.

इराणच्या गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार बचाव पथक घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. पण खराब हवामानामुळं घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत आहेत.

त्यामुळं घटनेची माहिती मिळून तासाभरानंतरही बचाव पथक घटनास्थळी पोहोचू शकलं नाही. या भागात एकूण 40 बचाव पथकं तैनात करण्यात आली आहेत. या मदत कार्यात ड्रोन युनिट्सही मदत करत आहेत.

नकाशा
फोटो कॅप्शन, ज्या भागात हेलिकॉप्टरने हार्ड लँडिंग केले ते ठिकाण तबरीझ शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे.

इराणच्या आपत्कालीन सेवेनुसार घटनास्थळी आठ रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत. पण खराब हवामानामुळं बचाव पथकालाही अडचणी येत आहेत.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष रईसी अझरबैजानमधील किझ कलासी आणि खोदाफरिन धरणांचे उद्घाटन केल्यानंतर तबरेझ शहराकडं जात होते.

बचाव पथकासह उपस्थित असलेल्या फार्स न्यूजच्या वृत्तानुसार दाट धुक्यामुळं बचाव कार्यात अडचणी येत आहेत.

या डोंगराळ आणि प्रचंड झाडे असलेल्या भागात दृश्यमानता (visibility) फक्त पाच मीटरपर्यंत असल्याची माहिती फार्स न्यूजच्या प्रतिनिधीनं दिली आहे.

हेलिकॉप्टरनं ज्याठिकाणी हार्ड लँडिंग केलं तो वर्झेकान भाग तबरेझ शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे.

तबरीझ ही इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांताची राजधानी आहे.

इराण

फोटो स्रोत, TASNEEM

फोटो कॅप्शन, इराणने बचावकार्य पथकाच्या आठ रुग्णवाहिका घटनास्थळाकडे रवाना केल्या आहेत.

इराणचे गृहमंत्री अहमद वाहिदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक बचाव पथकं राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टरचा शोध घेतायत.

"खराब हवामान आणि धुक्यामुळे घटनास्थळी पोहोचायला वेळ लागतोय. बचावकार्य टीम त्यांचं काम करत आहे. आम्हाला आशा आहे की बचावकार्य लवकरच पूर्ण होईल," असं वाहिदी यांनी सरकारी वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.

इराण

फोटो स्रोत, IRNA

फोटो कॅप्शन, इब्राहीम रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघातापूर्वीचा शेवटचा फोटो इराणची सरकारी एजन्सी IRNA ने प्रसिद्ध केला आहे. (19 मे 2024)

त्याचबरोबर इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी लोकांना राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.

राष्ट्राध्यक्ष रईसी आणि इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर-अब्दुल्लाहियन यांच्याशिवाय पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर यांच्यासह अनेक लोक हेलिकॉप्टरमध्ये होते.

हेलिकॉप्टरमधील लोकांविषयी अजूनपर्यंत कोणतीही माहिती समोर आली नाहीये.

कोण आहेत इब्राहीम रईसी?

इब्राहिम रईसी यांचा जन्म 1960 मध्ये इराणचे दुसरे सर्वात मोठे शहर मशहाद येथे झाला.

याच शहरात शिया मुस्लिमांसाठी सर्वात पवित्र मानली जाणारी मशीददेखील आहे.

रईसी यांचे वडील मौलवी होते. ते पाच वर्षांचे असताना त्यांचं निधन झालं.

इब्राहीम रईसी नेहमीच शिया परंपरेनुसार काळी पगडी घालतात. ज्यावरून अशी मान्यता आहे की ते पैगंबर महंमदाचे वंशज आहेत.

इब्राहीम रईसी

फोटो स्रोत, Reuters

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वयाच्या 15 व्या वर्षांपासून त्यांनी कोम शहरातील शिया संस्थेत शिक्षण सुरू केले.

आपल्या विद्यार्थी जीवनात त्यांनी पाश्चिमात्य देशांचा पाठिंबा असलेल्या मोहम्मद रेझा शहा यांच्याविरोधात निदर्शनं केली होती.

त्यानंतर अयातुल्ला रुहोल्ला खामेनी यांनी 1979 मध्ये इस्लामी क्रांतीच्या माध्यमातून शहा यांना सत्तेवरून काढून टाकले.

राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रईसी इराणचे कट्टरतावादी नेते आणि देशाचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्लाह अली खमेनेई यांचे निकटवर्तीय मानले जातात.

 इब्राहीम रईसी

फोटो स्रोत, EPA

2021 मध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ते विजयी झाले होते. निवडणूक प्रचारात त्यांनी रुहानी यांच्या राजवटीत झालेल्या भ्रष्टाचार आणि आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून स्वत:चा प्रचार केला होता.

इराणच्या न्यायव्यवस्थेचे प्रमुख असलेल्या रईसी यांचे राजकीय विचार 'अत्यंत कट्टरतावादी' मानले जातात.

'डेथ कमिटी' सदस्य

इस्लामिक क्रांतीनंतर त्यांनी न्यायपालिकेत काम करण्यास सुरुवात केली आणि अनेक शहरांमध्ये वकील म्हणून काम केले.

यादरम्यान ते इराण प्रजासत्ताकचे संस्थापक आणि 1981 मध्ये राष्ट्राध्यक्ष बनलेले अयातुल्ला रुहोल्ला खुमैनी यांच्याकडून प्रशिक्षण घेत होते.

रईसी केवळ 25 वर्षांचे असताना इराणचे डेप्युटी प्रोसिक्युटर (सरकारचे दुसऱ्या क्रमांकाचे वकील) बनले होते.

नंतर ते न्यायाधीश बनले आणि 1988 मध्ये स्थापन झालेल्या गोपनीय लवादांमध्ये सहभागी झाले. त्याला 'डेथ कमिटी' म्हणून ओळखले जाते.

 इब्राहीम रईसी

फोटो स्रोत, EPA

या लवादांनी आधीच विविध कारणांमुळं तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या हजारो राजकीय कैद्यांवर 'पुन्हा खटले' चालवले.

त्यापैकी बहुतांश राजकीय कैदी इराणमधील डाव्या आणि विरोधी गट मुजाहीदीन-ए-खलका (एमईके) किंवा पिपल्स मुजाहीदीन ऑर्गनायझेशन ऑफ इराण (PMOI) चे सदस्य होते.

या लवादांनी किती राजकीय कैद्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली हे माहिती नाही. मात्र, मानवाधिकार गटांच्या मते, त्यात जवळपास 5,000 स्त्री-पुरुषांचा समावेश होता.

फाशी दिल्यानंतर त्या सर्वांना अज्ञात ठिकाणी सामूहिक कबरीत दफन करण्यात आलं. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी ही घटना म्हणजे मानवतेविरोधातील गुन्हा असल्याचं म्हटलं आहे.

इब्राहीम रईसी यांनी या प्रकरणात कोणतीही भूमिका नसल्याचं सातत्यानं म्हटलं आहे. पण इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला खुमैनी यांच्या फतव्यानुसार ही शिक्षा "योग्य" होती, असंही त्यांनी म्हटलं आहे.