प्रसिद्ध अन् प्रतिष्ठा असूनही वाट्याला एकाकी संघर्ष, व्हॉइसरॉय कर्झनच्या तीन मुलींची गोष्ट

    • Author, वकार मुस्तफा
    • Role, बीबीसी उर्दू

एका संध्याकाळी टॉमनं आपली सर्व रहस्यं उघड करण्याचा निर्णय घेतला. त्यांनं पत्नी सिमीला त्याच्या आतापर्यंतच्या सर्व प्रेमप्रकरणांबद्दल मोकळेपणानं सांगितलं आणि हे केवळ मौजमजा करण्यासाठी मी केलं, असं तो म्हणाला.

सिमीचं खरं नाव सिंथिया होतं. सिमी व्हाइसरॉय कर्झनची मुलगी होती. कर्झन 1899 ते 1905 या काळात भारताचे व्हाइसरॉय आणि गव्हर्नर जनरल होते.

तिचा पती टॉम म्हणजे ओसवाल्ड मोस्ले हे त्यांचं नाव. टॉम ब्रिटिश राजकारणात सक्रिय होता. नंतर तो फॅसिझमकडे झुकला.

आपल्या पतीच्या खुलाशामुळं सिंथियाला अश्रू अनावर झाले. रडतच ती त्याला म्हणाली, "पण या सर्व मुली तर माझ्या चांगल्या मैत्रिणी होत्या."

अखेर सिमीचा 1933 मध्ये मृत्यू झाला.

मेरी आयरीन ही कर्झन यांची दुसरी मुलगी होती.

तिला 'नीना' नावानंही ओळखलं जात. 1896 मध्ये जन्म झालेली आयरीन सिमीपेक्षा दोन वर्षांनी मोठी होती. परंतु, तिने लग्न केलं नव्हतं.

कर्झनच्या तिसरी मुलीचं नाव होतं अलेक्झांड्रा. तिला 'बाबा' म्हटलं जात. हिचे पण आपल्या बहिणीच्या पतीबरोबर म्हणजे ओसवॉल्ड मोस्लेबरोबर प्रेमसंबंध होते.

मोस्लेनं सिमीच्या मृत्यूनंतर आपली प्रेयसी डायना गेन्सशी लग्न केले. हा विवाह सोहळा हिटलरचा त्यावेळचा सहकारी जोसेफ गोबेल्सच्या बर्लिन येथील घरात झाला होता. या विवाह सोहळ्याला अडॉल्फ हिटलरची खास उपस्थिती होती.

खळबळजनक दावे

जेन डीले, डायना गेन्सच्या चरित्रात लिहितात की, मोस्ले हा तिच्या प्रेमात वेडा झाला होता.

सेबॅस्टियन मर्फी-बेट्स यांनी डायना मिटफ्रेडच्या पत्रांवर आधारित 'द मेल' या ब्रिटिश वृत्तपत्रात लिहिलं की, मोस्लेंनं केवळ आपल्या पहिल्या पत्नीचा विश्वासघात केला नव्हता. तर तिच्या दोन्ही बहिणी आणि सावत्र आईबरोबरही सूत जुळवलं होतं.

ही खळबळजनक पत्रं स्कॉटलँडच्या नॅशनल लायब्ररीमध्ये आजही सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.

आयरीन, सिंथिया आणि अलेक्झांड्रा यांच्या आईचं नाव होतं मेरी लाइटर. मेरी या अमेरिकेतील श्रीमंत आणि सुंदर युवा महिलांपैकी एक होत्या.

एन डी कॉर्सी यांच्या 'दि व्हॉइसरॉयज डॉटर्स' पुस्तकामध्येही कर्झन यांच्या महिलांबाबतच्या विचारांचा उल्लेख आहे.

या पुस्तकात कर्झन यांची प्रेयसी अलेनॉर ग्लेनच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, जसं एखादा पुरुष चांगले घोडे, उत्तम दर्जाचं मद्य किंवा उत्कृष्ट वस्तूंवर प्रेम करतो. तसं कर्झन माझ्यावर प्रेम करायचे.

कर्झन यांचे ग्लेनसोबतचे प्रेमसंबंध त्यांची पहिली पत्नी मेरी लाइटरच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनंतर सुरू झाले.

आपल्या मुलींप्रती कर्झनच्या वागणुकीबाबत आता अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

संशोधक जो केस बॉर्न लिहितात की, "लॉर्ड कर्झन यांनी आपल्या मुलींना लिहिलेली अनेक प्रेमळ पत्रं या गोष्टीची साक्ष देतात की, ते किती लाघवी पिता होते.

परंतु, पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी आपल्या मुलींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या संपत्तीपासूनही त्यांना वंचितही ठेवलं."

'व्हॉइसरॉय डॉटर्स'चं समीक्षण करताना मिरांडा कार्टर न्यूयॉर्क टाइम्समध्ये लिहितात की, "आयरीन, सिमी आणि बाबाच्या वडिलांनी त्यांचं बालपण आयाकडे सोपवलं. आपल्या मुलींप्रती कर्झन हे कठोर झाले होते. विशेषतः त्यांच्या मुलींच्या आईच्या संपत्तीबाबत."

संपत्ती आणि प्रतिष्ठा

परंतु, याचदरम्यान कर्झन यांनी अमेरिकेच्या श्रीमंत महिला ग्रेस डिगन यांच्याबरोबर नवीन प्रेमकहाणी सुरु केली होती. ग्रेस डिगन या विधवा होत्या.

जेव्हा ग्लेन यांना याबाबत समजलं, तेव्हा त्यांनी रागाच्या भरात 500 प्रेमपत्रांची होळी केली होती.

पहिल्या लग्नापासून ग्रेस डिगन यांना तीन अपत्य होते. दोन मुलं आणि एक मुलगी.

कर्झन यांना आपला वारसदार असावा अशी खूप इच्छा होती. परंतु, ग्रेसपासून त्यांना अपत्य प्राप्ती झाली नाही. त्यानंतर दोघं वेगळं झाले. तरीही दोघांनी घटस्फोट घेतला नव्हता.

वर्ष 1920 च्या दशकाच्या सुरुवातीला कर्झन यांनी ग्रेस डिगन यांना लिहिलेल्या पत्रावरुन असं लक्षात येतं की, ते एकमेकांप्रती एकनिष्ठ राहिले.

परंतु, ओसवॉल्ड मोस्लेनं नंतर खासगीत त्याचे लेडी कर्झन आणि त्यांच्या सावत्र मुली आयरीन आणि अलेक्झांड्रा यांच्याबरोबरही प्रेमप्रकरण असल्याचं मान्य केलं.

एन डी कॉर्सी यांच्या पुस्तकात आयरीन यांच्याबाबत अनेक किस्से आहेत.

पुस्तकात लिहिलं आहे की, "आयरीन एक कुशल शिकारी, चांगली ब्रिज प्लेयर, मद्य प्राशन करणारी आणि एक प्रेमळ स्त्री होती. तिच्या प्रेमात पडणाऱ्यांमध्ये प्रसिद्ध पियानोवादक आर्थर रॉबिनस्टाइनचाही समावेश होता. परंतु लग्नाचे अनेक प्रस्ताव असूनही ती अविवाहित राहिली."

कोणीतरी आपल्या संपत्ती आणि प्रतिष्ठेचा राजकीय कारकिर्दीसाठी वापर करेल, अशी भीती आयरीनला होती.

अल्फा गर्ल

मिरांडा कार्टर आपल्या पुस्तक समीक्षेत लिहितात की," कर्झन यांच्या मधल्या मुलीनं म्हणजे सिंथियानं 21 व्या वर्षी मोस्लेबरोबर विवाह केला. सिंथिया मोस्लेबरोबर प्रामाणिक राहिली. परंतु, मोस्ले विश्वासघातकी आणि राजकीयदृष्ट्या संधीसाधूही होता. तो आधी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा सदस्य झाला. नंतर मजूर पक्षाचा खासदार झाला. शेवटी ब्रिटिश युनियन ऑफ फॅसिस्टचा संस्थापकही बनला."

वर्ष 1929 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सिंथिया लेबर पार्टीची खासदार म्हणून निवडून येत सर्वांना आश्चर्यचकित केलं.

'व्हॉइसरॉय डॉटर्स'नुसार, सिंथिया लेबर पार्टीत आपला पती मोस्लेमुळं आली होती. नंतर फॅसिज्मच्या समर्थनातही ती तितक्याच उत्साहात दिसली.

पुस्तकाच्या लेखिका एन डी कॉर्सी तिला सौम्य-स्वभावाची म्हणतात.

कर्झन यांची सर्वात लहान मुलगी बाबा. कार्टर यांच्या मते बाबा ही एक 'अल्फा गर्ल' होती.

आत्मविश्वासानं भरलेल्या 'बाबा'नं वयाच्या 21 व्या वर्षी एडवर्ड डुडली (फ्रूटी) मिटकाफशी लग्न केलं. डुडली तिच्यापेक्षा वयानं खूप मोठा होता.

डुडली हा हुशार नसला तरी एक चांगला माणूस होता. बाबाच्या फॅशन आणि पार्ट्यांमध्ये तो गुंतला होता.

या बातम्याही वाचा -

डुडली प्रिन्स ऑफ वेल्सचा चांगला मित्र होता. तेच प्रिन्स ऑफ वेल्स नंतर आठव्या एडवर्डच्या रुपात इंग्लंडचे सम्राट झाले.

त्यामुळं त्याला विंडसर्सचा इतिहास जवळून पाहण्याची संधी मिळाली. नंतर बाबाचे मोस्ले बरोबर प्रेमसंबंध सुरू झाले.

बाबांला वाटत होतं की, मोस्लेला ती डायनापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. पण मोस्लेनं डायनाशी लग्न केल होतं. मोस्लेनं दोन वर्षे हे बाबापासून लपवून ठेवलं.

जेव्हा महायुद्धाचा धोका वाढला तेव्हा दोन्ही बहिणींनी 'फॅसिस्ट' चळवळीपासून अंतर ठेवलं. युद्धादरम्यान बाबाच्या हितचिंतकांमध्ये अॅव्हरिल हॅरीमन, वॉल्टर मॉन्कटन आणि ब्रिटीश परराष्ट्र मंत्री लॉर्ड हॅलिफॅक्स यांचा समावेश होता.

आयरीन आपलं वाढतं वय, दारुचं व्यसन आणि अविवाहित असल्यामुळं नैराश्यात गेली. ती आपल्या धाकट्या बहिणीचा हेवा करु लागली.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान आयरीनने सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतलं.

बाबानं 'सेव्ह द चिल्ड्रन फंड'साठी 40 वर्षांहून अधिक काळ काम केलं आणि 1974 मध्ये ती या संघटनेची उपाध्यक्ष झाली.

1925 मध्ये मृत्यू होईपर्यंत कर्झनने आपल्या तिन्ही मुलींपासून अंतर राखलं. आयरीनला तर मृत्यूसमयी त्यांच्या जवळही येण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)