You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'लेडी सचिन' नव्हे, 'मिताली राज'च; महिला क्रिकेटला उंचीवर घेऊन जाणाऱ्या खेळाडूची प्रेरणादायी कहाणी
- Author, शारदा उग्र
- Role, क्रीडा प्रतिनिधी
मिताली राज. भारतीय महिला क्रिकेटमधील मोठं नाव. अनेक विक्रम आपल्या नावे केलेल्या मिताली राज महिला प्रीमियर लीगमधील (WPL) गुजरात जायंट्स संघाच्या मार्गदर्शक (मेंटॉर) होत्या. सध्या त्या या स्पर्धेमध्ये समालोचन करत आहेत
जे लोक डब्ल्यूपीएल फॉलो करतात त्यांना मिताली राज या माजी खेळाडू, टीव्ही एक्स्पर्ट आणि समालोचक म्हणून माहिती असतील.
मात्र, भारतीय महिला क्रिकेटमध्ये मिताली राज या दोन पिढ्या एकत्र जोडणाऱ्या दुवाही आहेत.
झुलन गोस्वामी या मिताली राज यांच्या समकालीन खेळाडू. त्या बॉलिंग करायच्या. दोघींनी अनेक वर्षे भारताकडून एकत्रित क्रिकेट खेळलं आहे.
भारतीय महिला क्रिकेटसाठी दोघींचं मोठं योगदान आहे. या दोघींनी भारतीय महिला क्रिकेटला एका अंधाऱ्या काळात जिवंत ठेवलं होतं. म्हणजे महिला संघाची कामगिरी वाईट होती असंही नाही.
या अंधाऱ्या काळात कमी संसाधनं असली तरी भरपूर विश्वास होता. एकेकाळी दुर्लक्षामुळेच हा संघ बाजूला पडला होता.
14 फेब्रुवारीपासून डब्ल्यूपीएलचा तिसरा हंगाम सुरू झाला आहे. सद्यस्थितीत या स्पर्धेमुळे सर्वत्र महिला क्रिकेटची चर्चा सुरू आहे. ही स्पर्धा प्राइम टाइममध्ये दाखवली जात आहे. त्यामुळे पूर्वी याच महिला क्रिकेटकडे दुर्लक्ष केलं जात होतं, असं म्हणणं आता धाडसाचं ठरेल.
मात्र, मिताली यांच्या दोन दशकांच्या कारकिर्दीनंतर आज महिला क्रिकेट या उंचीवर पोहोचलं आहे. मिताली यांच्या बॅटनं दिलेली हमी केवळ संघासाठीच नाही, तर भारतात महिला क्रिकेट रुजवण्यासाठी, टिकवण्यासाठी देखील महत्त्वाची होती.
'लेडी सचिन' नव्हे, 'मिताली राज'च
महिला क्रिकेटला मुख्य प्रवाहात आणण्यात मिताली यांचं मोठं योगदान आहे. या योगदानाची पायाभरणी कदाचित त्यांच्या क्रिकेटमधील एंट्रीत आहे.
मिताली यांचे वडील निवृत्त एअर फोर्स सार्जंट होते. 90 च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांच्या वडिलांनी ठरवलं की, आठ वर्षांच्या मितालीची उशिरापर्यंत झोपण्याची सवय बदलायला हवी.
त्यांनी मिताली यांना सिकंदराबाद येथील त्यांच्या भावाच्या क्रिकेट कोचिंग क्लासला नेलं. अकॅडमीमध्ये छोट्या मितालीने बॅटींग केली. त्यावेळी काही बॉल तिने लांबवर फटकावले. प्रशिक्षक ज्योती प्रसाद यांना मिताली यांची क्षमता ओळखण्यासाठी ते पुरेसं होतं.
मिताली यांनी त्यांच्या कठोर प्रशिक्षणाचं वर्णन करताना सांगितलं की, "ते सर्व जणू घोड्याच्या शर्यतीसारखं" होतं.
सहा तासांचं कोचिंग सत्र, बॅटऐवजी स्टंप वापरून बॉल मिडल करणं, दोन फिल्डर्समधून शिताफीने गॅप शोधणं, हार्ड लेदर बॉलशी जुळवून घेण्यासाठी दगडांचा वापर करून कॅच घेण्याचा सराव करणं अशा अनेक गोष्टी त्यांच्या प्रशिक्षणाचा भाग होत्या.
दहाव्या वर्षी, मिताली यांनी क्रिकेटकडं पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी भरतनाट्यम नृत्याचा त्याग करण्याचा कठीण निर्णय घेतला.
2016 मध्ये 'द क्रिकेट मंथली'ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, "नृत्य ही माझी वैयक्तिक आवड होती. मात्र, मी क्रिकेटच्या त्या स्तरावर पोहोचले होते, त्यावेळी मला माझ्या प्राधान्यक्रमानुसार निर्णय घ्यावा लागणार होता."
कठोर परिश्रम आणि त्यागाचं फळ मिताली यांना मिळालं. वर्ष 1999 मध्ये वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी त्यांची भारतीय वरिष्ठ महिला संघात निवड झाली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील त्यांच्या चमकदार कारकीर्दीला सुरुवात झाली.
त्या महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडू आहेत.
आपल्या 23 वर्षांच्या दीर्घ करिअरमध्ये एकदिवसीय सामन्यात त्यांनी 50 पेक्षा जास्त सरासरीनं 7805 धावा केल्या. यात सात शतकं आणि 64 अर्धशतकांचा समावेश आहे. महिला क्रिकेटमध्ये वनडेतील सर्वाधिक अर्धशतकांची नोंद मिताली यांच्या नावे आजही कायम आहे.
2002 मध्ये इंग्लंडविरुद्ध त्यांनी 214 धावांची खेळी केली होती. भारतीय महिला क्रिकेटमध्ये कसोटी सामन्यातील हे एकमेव द्विशतक होतं. त्यानंतर थेट 2024 मध्ये शेफाली वर्मानं हा विक्रम मोडला. शेफालीनं भारताकडून दुसरं द्विशतक केलं.
या कामगिरीनंतर मिताली यांची तुलना भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्याशी केली जाऊ लागली. सातत्यपूर्ण धावा केल्यानं मिताली यांना 'फिमेल तेंडुलकर' आणि 'लेडी सचिन' अशी नावं देण्यात येऊ लागली. मात्र, मिताली यांनी कायम ही तुलना नाकारली.
"मला महिला क्रिकेटमधील मिताली राज म्हणूनच ओळखलं जावं असं मला वाटतं. क्रीडाक्षेत्रात मला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे," असं त्यांनी 2018 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं.
महिला क्रिकेटमध्ये त्यांनी जी ओळख निर्माण केली आहे, ती आता ध्रुव ताऱ्याप्रमाणं अढळ आहे.
'कठीण काळातही सातत्य'
उत्कृष्ट विक्रमाइतकंच मितालीचं करिअरही त्यांच्या सहनशक्तीची साक्ष देतं. विशेषत: त्यांच्या करिअरच्या मधल्या टप्प्यात भारतीय महिला क्रिकेटच्या प्रशासकीय मंडळात बदल झाल्यामुळे संघाला कमी संधी मिळाल्या.
मिताली यांनी 1999 मध्ये पदार्पण केलं, तेव्हा हा खेळ भारतीय महिला क्रिकेट असोसिएशनद्वारे (WCAI) नियंत्रित केला जात असत. त्या वेळेपासून 2006 च्या अखेरीपर्यंत, भारतीय क्रिकेट बोर्डाकडे महिला क्रिकेटचं नियंत्रण होतं.
या काळात मिताली यांनी 86 एकदिवसीय आणि आठ कसोटी सामने खेळले. याचा अर्थ, डब्ल्यूसीएआयच्या काळात, मिताली यांनी प्रत्येक वर्षी सरासरी 14 एकदिवसीय आणि 1 कसोटी सामना खेळला.
तुलनेत, 2007 ते जून 2015 दरम्यान, मिताली यांना 67 एकदिवसीय सामने खेळायला मिळाले. म्हणजेच प्रति वर्षी आठ एकदिवसीय सामने आणि केवळ दोन कसोटी सामने खेळले.
जून 2015 हा तुलनेसाठी योग्य काळ ठरतो. कारण त्या वर्षी मे महिन्यात, बीसीसीआयनं जाहीर केलं की महिला क्रिकेटपटूंशी मंडळाकडून करार दिले जातील आणि देशभरात महिला क्रिकेटच्या प्रमाणात वाढ करण्याचे नियोजन करण्यात येईल.
प्रशासकीय बदल आणि बीसीसीआयच्या घोषणेदरम्यानच्या आठ वर्षांत, महिला क्रिकेटची एक पूर्ण पिढी नष्ट झाली. फक्त एका गोष्टीत सातत्य होतं, ते म्हणजे मिताली यांची फलंदाजी आणि झुलन गोस्वामींची गोलंदाजी.
त्या काळाबद्दल बोलताना मिताली म्हणाल्या की, "मार्ग खूप कठीण होता, जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा लोकांना महिला क्रिकेट संघाबद्दल माहितीच नव्हती."
मिताली यांनी संघाप्रती दाखवलेली बांधिलकी आणि सहनशक्तीचं फळ मिळायला सुरुवात झाली. 2017 नंतर महिला क्रिकेटचं महत्त्व वाढलं.
कारण त्यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं एकदिवसीय आणि टी-20 षटकांच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
'प्रत्येकाला मिताली व्हायचंय...'
मिताली यांच्या वारशाचा मोठा प्रभाव सध्याच्या युवा महिला क्रिकेटपटूंमध्ये दिसून येतो. मिताली यांनी 2005 च्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 91 धावांची खेळी केली होती.
ती खेळी बॅटर वेदा कृष्णमूर्तीने पाहिली होती. वेदावर त्या खेळीचा मोठा प्रभाव पडला. त्यानंतर तिने आपल्या पालकांच्या मागं लागून क्रिकेट ट्रायल्ससाठी स्वतःची नोंदणी करुन घेतली होती.
स्टार फलंदाज स्मृती मंधानाने जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यावेळी प्रत्येकजण तिने मिताली राज यांच्यासारखं व्हावं अशी इच्छा व्यक्त करत होते, हे स्वतः स्मृतीनं मान्य केलं आहे. संपूर्ण पिढीला त्यांनी प्रभावित केलं आहे.
भारतातील महिला क्रिकेटवरील आपला प्रभाव पाहून मिताली आभार व्यक्त करतात. पण लगेचच त्या क्रिकेटसाठी आणखी भरपूर काही साध्य करायचं आहे, असंही म्हणतात.
"मी कृतज्ञ आहे की महिला क्रिकेटमध्ये, विशेषतः भारतामध्ये, जे बदल होत आहेत त्याचा मी अजूनही भाग आहे. माझी इच्छा आहे की मी तो दिवस पाहण्यासाठी जगेन, जेव्हा लोक पुरुष आणि महिला क्रिकेटला समान महत्त्व देतील," असं त्यांनी 2016 मध्ये म्हटलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)