पॅरा शूटर अवनी लेखराच्या न्यायाधीश होण्याच्या स्वप्नाबाबत काय म्हणाले माजी सरन्यायाधीश चंद्रचूड?

'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इअर 2024' या पुरस्कार सोहळ्यामध्ये अवनी लेखराला 'बीबीसी पॅरा स्पोर्ट्सवूमन'चा अवॉर्ड प्रदान करण्यात आला.

पॅरा शूटींगमध्ये ऐतिहासिक यश प्राप्त करणाऱ्या अवनीला भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड, काँग्रेसचे नेते सचिन पायलट आणि खासदार कार्तिकेय शर्मा यांनी या समारंभामध्ये पुरस्कारानं सन्मानित केलं.

या कार्यक्रमामध्ये अवनी लेखरानं ऑनलाईन माध्यमातून उपस्थिती लावली होती. तिने म्हटलं, "बीबीसी इंडियाचा 'पॅरा स्पोर्ट्सवूमन ऑफ द इअर अवॉर्ड' जिंकणं माझ्यासाठी खरं तर सन्मानाची बाब आहे. मी बीबीसी इंडियाची मन:पूर्वक आभारी आहे की त्यांनी एवढ्या मोठ्या स्तरावर मला सन्मानित केलं."

पुढे तिने म्हणाली, "गेल्यावेळी जेव्हा मी टोकियो ऑलिंपिकमध्ये मेडल जिंकलं होतं, तेव्हा लोक मला विचारायचे की आता पुढे काय करणार? मी म्हणायचे की, कदाचित 2024 मध्ये माझ्या हातात आणखी काही मेडल्ससोबतच कायद्याची डिग्रीही असेल."

"गेल्या वर्षी या दोन्हीही गोष्टी मी साध्य केल्या. मी कायद्याच्या क्षेत्रात पुढे जाऊ इच्छिते, तसेच यामध्येच मी मास्टर डिग्री घेऊ इच्छिते," असंही ती म्हणाली.

याआधी बीबीसीशी संवाद साधताना तिने म्हटलं होतं की, "मी भरपूर क्राईम शो वगैरे पहायचे. मला कायद्याचं शिक्षण घेण्यामध्ये रस निर्माण झाला होता. त्यानंतर मग मी न्यायाधीश होण्याचा विचार केला."

"मी न्यायव्यवस्थेत जाण्याचा विचार यासाठी केला कारण, त्यामध्ये मोठी ताकद असते आणि तुम्ही व्हीलचेअरवर बसलेल्या एखाद्या व्यक्तीला एवढी ताकद प्राप्त झाल्याचं सहसा पाहिलेलं नसेलच."

पुढे तिने म्हटलं होतं की, "जेव्हा तुम्ही वकिली करता तेव्हा तुम्ही तुमच्या अधिकारांबाबत बरंच काही जाणून घेऊ शकता. लोकांच्या अधिकारांबाबतही जाणून घेऊ शकता. आपण त्यांना त्यांच्या अधिकारांबाबतही जाणून घेण्यात मदत करु शकतो. वकील होऊन हे सगळं करणं फार चांगली गोष्ट आहे."

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी काय म्हटलं?

या समारंभामध्ये अवनीच्या स्वप्नाबाबतची ही गोष्ट ऐकून माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटलं की, जर अवनी वकील अथवा न्यायाधीश झाली तर त्यांना स्वत:ला वैयक्तिकरित्या फारच आनंद होईल.

चंद्रचूड पुढे म्हणाले, "जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला स्पोर्ट्सबद्दल फारसं माहिती नव्हतं. माझ्या दोन मुली स्पेशली एबल्ड आहेत आणि चेस चॅम्पियन आहेत. जेव्हा मी अशा अवॉर्ड्सकडे पाहतो तेव्हा मला माझ्या मुलींबाबत मोठी आशा प्राप्त होते. या माध्यमातूनच भारतातील बाकी महिलांनाही आशा मिळते."

बीबीसीनं या पुरस्कार समारंभाचं आयोजन केलं, यासाठी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी बीबीसीबाबत कौतुकोद्गारही काढले.

चंद्रचूड म्हणाले, "या अवॉर्ड्सच्या माध्यमातून आपण युवा महिला खेळाडूंचा दृढनिश्चय पाहू शकतो. आपण त्यांचा विजय साजरा करतो. आता महिला प्रत्येक ठिकाणी आहेत. मग थिएटर असो वा एखादं टेक्निकलसारखं क्षेत्र असो. त्या स्पेस रिसर्चमध्येही आहेत आणि त्या फायटर प्लेनदेखील चालवत आहेत. हे प्रगतीशील भारताचं सुचिन्ह आहे, जिथे महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत."

अवनी लेखराबाबत बोलताना काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले, "तुमच्या या यशासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन. एक युवा म्हणून एवढं यश प्राप्त केल्याबद्दल तुम्हाला अभिमान असायला पाहिजे. मात्र, माझ्यासाठी मेडलपेक्षाही मोठी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे यांचं स्मितहास्य."

"हे स्मितहास्य अनेक मेडल्सहून अधिक मौल्यवान आहे. तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप साऱ्या सदिच्छा."

पायलट यांनी पुढे म्हटलं, "काळ बदलला आहे. मात्र, महिलांसाठी, खेळाशी निगडीत महिलांसाठी तसेच स्पेशली एबल्ड महिलांसाठी प्रत्येक दिवस आव्हानांचा सामना करणारा ठरतो."

"इतक्या साऱ्या आव्हानांचा सामना करुनही त्या स्मितहास्य देत आहेत. आपल्याला अशाच अनेक लोकांची गरज आहे," असंही त्यांनी म्हटलं.

कसा राहिलाय अवनीचा प्रवास?

अवनी पॅरालिंपिकमध्ये दोन गोल्ड आणि एक ब्राँझ जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. तिने टोकियो ऑलिंपिक 2020 मध्ये गोल्ड आणि ब्राँझ जिंकण्यासोबतच 2024 च्या पॅरिस ऑलिंपिकमध्येही गोल्ड जिंकून मोठं यश प्राप्त केलं होतं.

2012 मध्ये अवनी लेखराच्या कुटुंबाचा कार अपघात झाला होता. या अपघातामुळेच अवनीच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली आणि त्यानंतर तिचा कंबरेपासून खालचा भाग पॅरालाईज्ड झाला.

या अपघातानंतर अवनीला सगळं काही नव्यानं शिकून घ्यावं लागलं. अगदी कसं बसायचं हेदेखील तिला शिकावं लागलं.

2015 मध्ये अवनीच्या वडिलांनी तिला घरातून बाहेर पडण्याकरीता स्पोर्ट्समध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलं.

अवनीनं स्वीमिंग, आर्चरी आणि ॲथलेटिक्समध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले. अथक परिश्रमानंतर तिला शुटींगमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त करता आलं.

2017 मध्ये अवनीनं आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय मेडल जिंकलं. तेव्हा ती 2017 सालच्या वर्ल्ड शुटींग पॅरा स्पोर्ट्स वर्ल्ड कपमध्ये 10 मीटर एअर रायफल प्रकारात सिल्व्हर मेडल जिंकण्यात यशस्वी ठरली.

यानंतर अवनीनं गोल्ड मेडल जिंकण्याचं स्वप्न पाहिलं आणि टोकियो पॅरालिंपिकमध्ये तिने ते पूर्णही करुन दाखवलं. टोकियोमध्ये ती गोल्डशिवाय ब्राँझ मेडल जिंकण्यातही यशस्वी ठरली.

पॅरिस पॅरालिंपिकमध्येही तिने आपल्या यशाची घोडदौड अशीच कायम राखत गोल्ड मेडल जिंकलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)