You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'लग्न का नाही करत? काही प्रॉब्लेम आहे का?', अशा प्रश्नांचा मनावर काय परिणाम होतो? वाचा
- Author, सिराज
- Role, बीबीसी तामिळ
भारतीय समाजव्यवस्थेत विवाह ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. मुला-मुलींच्या आयुष्यात विवाह हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
पुरुषांच्या तुलनेत महिलांवर विवाहाचा मोठा दबाव असतो, असंही म्हटलं जातं.
भारतात एकट्या राहणाऱ्या महिलांवर केलेल्या एका अभ्यासात 2011 च्या जणगणनेच्या आकडेवारीचा दाखला देण्यात आला आहे.
एकट्या राहणाऱ्या महिलांची संख्या 7.14 कोटी होती. जी भारतातील महिलांच्या एकूण संख्येच्या 12 टक्के इतकी होती, असे या अभ्यासात म्हटलं आहे.
2001 मध्ये ही संख्या 5.12 कोटी होती. जी दहा वर्षांत 39 टक्क्यांनी वाढली. परंतु, समाजात एकट्या राहणाऱ्या महिलांना सामाजिकदृष्ट्या वाईट समजलं जातं, असं अकेडेमिया जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात सांगण्यात आलं आहे.
तर समाज एका ठराविक वयानंतर अविवाहित राहणाऱ्या लोकांकडे आणि विशेषतः महिलांकडे कशा नजरेने पाहतो? अशा महिलांना कोणत्या प्रकारच्या सामाजिक दबावाचा सामना करावा लागतो?
एकटं राहणं आणि एकाकी जगणं यात काय फरक आहे?
"लग्न न करणं म्हणजे एखादं मोठं पाप केलं, असं आपल्या समाजात मानलं जातं. केवळ मी लग्न केलं नाही म्हणून माझी आर्थिक परिस्थिती, शिक्षण आणि माझ्या स्किलकडे न पाहता माझ्याबरोबर एखाद्या गुन्हेगारासारखं वागण्याचं औचित्य काय असेल?", असा प्रश्न 40 वर्षीय ज्योती शिंगे उपस्थित करतात.
ज्योती शिंगे या मुंबईच्या आहेत. सध्या त्या उत्तराखंडमधील चक्राता शहरात स्वतःचं गेस्ट हाऊस आणि कॅफे चालवतात.
त्या म्हणाल्या की, "भारतातील बहुतांश अविवाहित महिलांना ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं त्या सर्व समस्यांचा मी सामना केला आहे आणि अजूनही करत आहे."
"काही वर्षांपूर्वी जेव्हा मी दिल्लीत काम करत होते. त्यावेळी मला राहायला घर मिळालं नव्हतं."
त्या पुढे म्हणाल्या, "एका घर मालकाने तर मला तोंडावरच म्हटलं की एकवेळ आम्ही अविवाहित पुरुषांना घर भाड्याने देऊ. पण अविवाहित महिलेवर विश्वास ठेऊ शकत नाही."
"हे वाक्य बोलल्यावर तो ज्या पद्धतीने हसला ते मी कधीच विसरु शकणार नाही. त्यावेळी मी एका नामांकित आयटी कंपनीत चांगल्या पगारावर काम करत होते."
घर शोधताना झालेल्या त्रासामुळे स्वतःचं गेस्ट हाऊस सुरु करण्यासाठी मला प्रेरणा मिळाली, असंही ज्योती यांनी सांगितले.
आताही अनेक लोक मला 'तुम्ही लग्न कधी करणार?', असा प्रश्न विचारतात. असं जगून काय मिळणार आहे?', 'तुमच्यात काही दोष किंवा अडचणी आहेत का?'... पण अशा प्रश्नांना मी आता गांभीर्याने घेत नाही.
ज्योती म्हणाल्या की, "मी आता माझ्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करत आहे. मी हिमालयाजवळील एक अत्यंत सुंदर अशा चक्राता शहरात शांततेत राहत आहे. मी लवकरच एक नवीन हॉटेल सुरु करणार आहे."
"परंतु, माझ्यावर शंका उपस्थित करणाऱ्या लोकांना हे समजत नाही. अविवाहित महिला या महिला नसतातच, असं त्यांचं मत आहे."
संशोधनात काय म्हटलंय?
भारतात एकट्या राहणाऱ्या महिलांवर करण्यात आलेल्या अभ्यासात असं म्हटलं आहे की, 'ज्या महिला समाजातील पारंपारिक रचनेच्या विरोधात जाऊन काम करतात त्यांना दुःखी, अपरिपक्व, अपूर्ण आणि सामाजिक जडणघडणीपासून अलिप्त समजलं जातं.'
अभ्यासात 35 वर्षांहून अधिक वयाच्या चार प्रकारच्या महिलांची विभागणी करण्यात आली, ज्यांना एकल महिला किंवा एकट्याने राहणाऱ्या महिला असं म्हटलं जातं.
- अशा महिला, ज्यांना पती नाही
- घटस्फोटित महिला
- अविवाहित महिला
- पतीपासून विभक्त झालेल्या महिला
एकट्याने आयुष्य व्यतीत करणाऱ्या महिला भले जीवनाकडे कितीही सकारात्मक दृष्टीने पाहत असल्या आणि आर्थिकदृष्ट्या त्या सशक्त असल्या तरी त्यांना अपयशीच मानले जाते, असे या अभ्यासात समोर आलं आहे.
ज्योती म्हणतात की, "जे लोक एकट्याने राहतात, ते दुःखी असतात अशी समाजात धारणा आहे. अनेकांनी मला हे बोलून दाखवलं आहे."
एकटं राहणं आणि एकट्यापणानं जगणं यात फरक आहे, असंही त्यांनी म्हटलं.
त्या म्हणाल्या, "मुंबईत माझंही एक मोठं कुटुंब आहे. वडील, भाऊ, वहिनी आणि त्यांची मुलं. मी एकही कौटुंबिक कार्यक्रम सोडत नाही. प्रत्येक कार्यक्रमात मी सहभागी होते.''
''त्याचपद्धतीने चक्रातामध्येही माझे खूप मित्र आहेत. मी एकटी नाही. मी आनंदी आणि समाधानानं आपलं जीवन जगत आहे.''
'जीवन एकाकी आहे'
मात्र, कोईम्बतूर येथील 43 वर्षीय विनोद कुमार (नाव बदलले आहे) यांचं याबाबत वेगळं मत आहे. ते म्हणतात, "मी शक्य तितके कौटुंबिक मेळावे टाळण्याचा प्रयत्न करतो,"
''कारण, नातेवाईकांच्या प्रश्नांना मी उत्तरं देऊ शकत नाही. लग्न न करणं म्हणजे एक मोठा गुन्हा आहे, असं या लोकांना वाटतं."
विनोद म्हणतात की, "मला आरोग्याशी संबंधित कोणती समस्या येऊ नये याची मी खूप काळजी घेतो. जर मला काही झालं तर हे कोणाला तरी सांगायला मला लाज वाटते.''
''जर एखाद्याला मी माझी अडचण सांगितली की, ही लोकं मला तू लवकरच लग्न केलं पाहिजे, असं सांगतील."
भलेही मला लग्न करण्याची इच्छा झाली तर मला असे प्रश्न विचारले जातात की ज्यामुळे माझ्या मनात न्यूनगंड निर्माण होतो, असं विनोद म्हणाले.
जसं- 'लग्न झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहात?', 'तुम्ही मुलांसाठी पैसे कसे वाचवाल?', 'तुम्हाला लग्नासाठी मुलगी कशी मिळेल?'
"मी प्रत्येकाला उत्तरं देऊन देऊन थकलो आहे. मला हे समजलं आहे की, जे लोक प्रश्नं विचारतात, सल्ला देतात, ते आपल्यासाठी काहीच करणार नाहीत.''
''त्यामुळे, मी अशा लोकांना भेटणं ही टाळतो. मी काहीच करु शकत नाही, मला आयुष्यात एकटेपणाची जाणीव होते."
सायन्स मॅगझिन 'नेचर' मध्ये प्रकाशित एका अभ्यासात म्हटलं आहे की, जे लोक अविवाहित राहतात, ते विवाहित लोकांपेक्षा जास्त उदासिन असतात.
यासाठी सात देशातील एक लाख 6 हजार 556 स्वयंसेवकांवर एक अभ्यास करण्यात आला.
या देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, मेक्सिको, आयर्लंड, कोरिया, चीन आणि इंडोनेशियाचा समावेश होता. घटस्फोटित लोक डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता 99 टक्के असते असं या अभ्यासात आढळून आलं आहे.
एकटं राहणाऱ्या लोकांकडे समाज कसा पाहतो?
एकटं राहणाऱ्या लोकांना ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, त्याची कोणतीच उत्तरं आपल्या समाजाकडे नाहीत, असे लेखक राजसंगीतन यांना वाटतं.
त्यांनी काही पुस्तकं लिहिली आहेत. यात 'द अल्टिमेट हिरोज', 'लव्ह अँड सम क्वेश्चंस' आणि 'द चोकट्टन देसम' या पुस्तकांचा समावेश आहे.
ते म्हणतात की, "समाजात एकटं राहणाऱ्या, घटस्फोटित किंवा जोडीदार गमावलेल्या लोकांच्या लैंगिक गरजांबद्दल इथं कोणीही बोलत नाही."
''प्रत्येक जण तुम्हाला एकच उपाय सांगतो आणि तो म्हणजे 'लग्न करा'. खरं तर स्त्री-पुरुष यांच्यात विवाहाशिवाय दुसरं कोणतंही नातं असू नये, यासाठी हा समाज दक्ष असतो.''
लेखक राजसंगीतन म्हणतात की, एखाद्याला लग्न आवडत नाही म्हणून किंवा त्याच्या बरोबर येणारी जबाबदारी आणि बंधने नको वाटत असतील. याचा अर्थ असा नाही की एखाद्याला जोडीदार नसावा किंवा तो नको असतो.
"गावांबरोबरच शहरांमध्येही एक प्रथा आहे, ज्यात एकट्याने राहणारी महिला जर एखाद्या पुरुषाबरोबर बोलत असेल तर लगेच त्या महिलेकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं.''
"एका व्यक्तीनं जर वैयक्तिक कारणांमुळे लग्न न करण्याचा निर्णय घेतला असेल. तर त्याला या समाजात मैत्री, प्रेम किंवा लैंगिक गरजांच्या आधारावर कोणाशीही संबंध जोडण्याची संधी नसते."
एकटं राहणं ही त्या महिला किंवा पुरुषाची एखादी चूक असेलच असं नसतं, असं राजसंगीतन यांनी म्हटलं आहे.
कदाचित त्यांनी कुटुंबातील जबाबदारीमुळे किंवा एखाद्या सामाजिक दबावामुळे असा निर्णय घेतलेला असू शकतो.
ते म्हणतात की, "अनेक लोक कौटुंबिक दबावामुळे किंवा कारणांमुळे लग्न न करण्याचा निर्णय घेतात."
"जोपर्यंत त्यांची कौटुंबिक स्थिती काही अंशी ठीक होते, तोपर्यंत आपल्या समाजाने लग्नासाठी ठरवलेली वयाची मर्यादा त्यानं ओलांडलेली असते. पण अशा समाजाला त्यांच्या गरजांची अजिबात पर्वा नसते."
एकट्याने राहण्याची इच्छा असलेल्या लोकांची संख्या समाजात वाढत चालल्याचे राजसंगीतन सांगतात.
अशावेळी समाजाकडून अशा लोकांकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा त्यांना समाजातील एक डाग समजलं जातं. या वागणुकीमुळे अशी लोकं गंभीर डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात.
सामाजिक दबावाचा परिणाम
मानसोपचारतज्ज्ञ पूर्णा चंद्रिका म्हणतात, "जे लोक एकटं राहतात त्यांच्या आई-वडिलांना 'तुम्ही या समाजाचा भाग नाहीत' याची वारंवार आठवण करून दिली जाते. यामुळं त्यांच्यात अपराधीपणाची भावना निर्माण होऊ शकते."
"या मंदिरात जा, तो उपाय करून पाहा, त्यांना मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जा," असे खूप सल्ले दिले जातात, असं काही पालकांनी आपल्याला सांगितल्याचं पूर्णा चंद्रिका यांनी म्हटलं.
मुलांमध्ये काही मानसिक समस्या आहे का? हे पाहण्यासाठी काही पालक आपल्या मुलांना माझ्याकडे घेऊन येतात. हे सर्व 'माझा शेजारी याबद्दल काय विचार करत असेल?', या भीतीपोटीच हे सर्व सुरु असतं.
सामाजिक दबावामुळे घाईघाईनं लग्न करून चुकीच्या जोडीदारासोबत राहण्यास भाग पाडलेल्या लोकांना त्यांनी मानसिक आरोग्य समुपदेशन दिल्याचं सांगितलं.
"अविवाहित राहणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे'', असंही पूर्णा चंद्रिका सांगतात.
''लग्न कर, सर्व काही बदलेल, ही मोठी अंधश्रद्धा पूर्वीपासून आपल्या समाजात प्रचलित आहे. जोपर्यंत लोकांची ही धारणा बदलत नाही, तोपर्यंत काहीच बदलणार नाही.''
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.