'एका क्षणी असं वाटलं की, सगळं सोडून निघून जावं', नेहमीच 'दि बेस्ट'साठी झगडणाऱ्या मनू भाकरची प्रेरक कहाणी

    • Author, सौरभ दुग्गल
    • Role, क्रीडा प्रतिनिधी

"मी शक्यतो सकारात्मक विचार करते, फार नकारात्मक विचार करत नाही. पण खूप जास्त विचार करते. त्यामुळं एकदा सगळं सोडून, काहीतरी शिकायला निघून जावं असं वाटलं होतं."

नेमबाज मनू भाकरनं बीबीसीचा स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना या अनुभवाबद्दल सांगितलं.

पण खेळाडुंना सगळ्यावर मात करून पुन्हा नवी सुरुवात करावी लागते. त्यामुळं पदकांचा हा सिलसिला सुरुच राहील अशी आशा तिनं यावेळी व्यक्त केली.

2024 पॅरिस ऑलिंपिकमध्ये नेमबाज मनू भाकरनं जबरदस्त विक्रम केला. तिनं दोन कांस्य पदकं जिंकली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर एकाच खेळाच्या प्रकारात एकापेक्षा जास्त पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय नेमबाज ठरली.

रेकॉर्ड बुकसाठी हा एक आश्चर्यकारक असा विक्रम ठरला आहे. मात्र, रेकॉर्ड बुक्सचा एक दोष असतो, तो म्हणजे ते चांगल्या हेडलाइनसाठी छोटे छोटे तपशील वगळतात.

अगदी त्याच पद्धतीनं, 2021 च्या टोकियो ऑलिंपिकमधील अपयशानंतर मनूच्या चिकाटीला, तिच्या धैर्याला अधोरेखित केलं गेलं नाही, तर पॅरिस 2024 च्या तिच्या यशाचं महत्त्व कमी होईल. तिच्या करिअरमधला तो सर्वात कठीण काळ होता.

टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताला हमखास पदक मिळवून देणारी खेळाडू म्हणून मनूकडं पाहिलं गेलं होतं. या स्पर्धेच्या आधी, तिनं 2018 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये एक सुवर्ण पदक जिंकलं.

त्याच वर्षी युवा ऑलिंपिकमध्ये एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळवलं. 2021 पर्यंत, तिने विविध नेमबाजी विश्वचषकात एकूण 9 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकं जिंकली होती.

पण टोकियोमध्ये, ती सहभागी झालेल्या तीनही स्पर्धांच्या पात्रता फेरीतच बाद झाली. एकाही प्रकारात तिला पुढं जाता आलं नाही.

वैयक्तिक 10 मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये मनूला पदकाची सर्वात जास्त अपेक्षा होती. अवघ्या दोन गुणांनी ती पात्रता फेरीतून बाद झाली. कारण त्याचवेळी तिच्या पिस्तुलात तांत्रिक बिघाड झाला होता.

त्यावेळी तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. पण त्यानंतर मनू पूर्वीपेक्षा जास्त मजबूत होऊन परतली.

'मनूची जिथून सुरुवात झाली...'

मनू पूर्वीपासूनच स्पोर्ट्समध्ये सक्रिय होती. शालेय जीवनात तिने बॉक्सिंग, रोलर स्केटिंग, ॲथलेटिक्स आणि कबड्डी अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये पदके जिंकली.

त्यानंतर ती कराटे आणि इतर मार्शल आर्ट्सकडे वळली. त्यामध्येही तिने राष्ट्रीय स्तरावर पदकं मिळवली.

मनू 2016 मध्ये दहावीत होती. त्यावेळी तिने नेमबाजीला गांभीर्यानं घेतलं.

हे बीज तिच्या वडिलांनी तिच्यात रुजवलं होतं. त्यांना 2007-08 मध्ये इंग्लंड येथे मरीन इंजिनिअरिंगचा अभ्यास करत असताना या खेळाबद्दल माहिती झाली होती.

"मरीन अकादमीत, काही इंजिनिअर जेव्हा ते नाराज असायचे, तेव्हा ते शूटिंग रेंजवर जात असत. त्यांचा राग शांत करण्यासाठी ते या खेळाचा वापर करत असत," असे राम किशन भाकर यांनी सांगितलं.

"माझ्या मनावर या संकल्पनेनं भुरळ घातली. आपली ऊर्जा सकारात्मक पद्धतीने वापरण्याचा हा एक चांगला मार्ग असल्याचं मला जाणवलं."

इंग्लंडहून परतल्यावर भाकर यांनी हरियाणातील झज्जर शहरातील त्यांच्या कुटुंबीयांकडून चालवल्या जात असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी शूटिंग हा खेळ सुरू केला.

अवघ्या दोन वर्षांत व्यावसायिक नेमबाज बनल्यानंतर, 16 वर्षीय मनूनं 2018 मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वरिष्ठ संघात पदार्पण केलं. या स्पर्धेत तिने 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. यानंतर तिच्या करिअरला आणखी वेग आला.

टोकियोतील ऑलिंपिकपर्यंत हा फॉर्म टिकून होता.

'निराश होऊ नका, कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही'

जेव्हा मनू ऑलिंपिकसाठी टोकियोमध्ये पोहोचली, तेव्हा ती महिला 10 मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर होती. आतापर्यंतच्या सर्व जागतिक स्पर्धांमध्ये तिने जबरदस्त कामगिरी नोंदवली होती. यामुळेच ती भारतीय संघातील एकमेव अशी नेमबाज होती, जी तीन इव्हेंट्ससाठी पात्र ठरली होती.

परंतु, मोठ्या स्पर्धेचं दडपण तिच्यावर आल्याचं, तिने ऑलिंपिकनंतर दिलेल्या एका मुलाखतीत मान्य केलं.

"मी पहिल्यांदाच इतका दबाव अनुभवला. मला रात्री झोप येत नव्हती. दिवसाही मी चिंतेत आणि गोंधळलेली असायची," असं तिने 'द इंडियन एक्स्प्रेस'ला सांगितलं.

तिच्या सर्वात आवडत्या 10 मीटर एअर पिस्तूल इव्हेंटच्या पात्रता फेरीदरम्यान तिच्या पिस्तुलमध्ये तांत्रिक समस्या आली, तेव्हा परिस्थिती आणखी बिघडली.

स्पर्धेतील या प्रकारामुळं मनूला इतका धक्का बसला की, तिने शूटिंग सोडण्याचा विचार केला होता.

ती म्हणाली, "त्यावेळी नेमबाजी म्हणजे मला 9 ते 5 असं बांधून टाकणाऱ्या नोकरीसारखं वाटत होतं," असं तिने दुसऱ्या एका मुलाखतीत सांगितलं.

पण 2023 मध्ये दोन वर्षांनी प्रशिक्षक जसपाल राणा आणि मनू पुन्हा एकत्र आले. त्यानंतर स्थिती बदलली. 2023 च्या आशियाई खेळांमध्ये, पुन्हा जुनी मनू परतली.

मनूनं जोरदार पुनरागमन केलं आणि 25 मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं.

आशियाई खेळांनंतर तिच्या महाविद्यालयात आयोजित एका सत्कार समारंभात, मनूनं तिच्या पुनरागमनाच्या तत्त्वज्ञानाचं सार सांगितलं, "जेव्हा तुम्ही निराश असता, तेव्हा कधीही हार मानू नका आणि आपल्या कठोर परिश्रमात सातत्य ठेवा. तेव्हाच तुम्ही मोठं यश प्राप्त करू शकाल."

'आणि तरीही मी उभी राहिल'

"तुम्ही मला इतिहासात कमी लेखाल, कडवट अन् विद्रूप असत्य सांगून तुम्ही मला घाणीत तुडवाल, तरीही धुळीसारखी दाखवेन मी उंच उडून"

टोकियोतील अपयशानंतर, मनूनं नागरी हक्क कार्यकर्त्या माया अँजेलो यांच्या कवितेतील या ओळींतून प्रेरणा शोधली. स्वतःला प्रेरित ठेवण्यासाठी, तिने 'स्टील आय राइज' हे आपल्या गळ्याच्या मागे टॅटू म्हणून गोंदवलं.

"यश आणि अपयश हे खेळाडूंच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतात, पण सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे तुम्ही अडचणींना कसं हाताळता आणि पुन्हा उठून उभं राहण्यासाठी कशी तयारी करता," अशा शब्दांत मनूनं तिच्या पुनरागमनाबद्दल मत व्यक्त केलं.

"टोकियोमध्ये जे घडलं त्यावर मात करणं कठीण होतं, पण मला विश्वास होता की मी पुन्हा उठेन. या शब्दांशी मी स्वतःला जोडते, म्हणूनच मी तो टॅटू गोंदवण्याचा निर्णय घेतला."

राखेतून पुन्हा उभी राहण्याची कथा मनूशी रिलेट करते. मनूला जे जवळून ओळखतात त्यांना तिच्या क्षमतांबद्दल माहिती होतं.

तिचे वडील राम किशन भाकर यांनी 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील एक किस्सा सांगितला. ज्यात त्यांनी मनू तिच्या हातून सर्वोत्कृष्ट कामगिरी होण्यासाठी काय करु शकते, यावर प्रकाश टाकला.

ते म्हणाले, "तिथं एक अशा पद्धतीचं रिंगण होतं, जिथं फक्त विद्यमान किंवा माजी सुवर्णपदक विजेत्यांनाच त्या वॉलवर स्वाक्षरी करण्याची परवानगी होती."

"स्पर्धेच्या एक दिवस आधी, मनू त्या रिंगणात गेली आणि ती तिचं नाव लिहिण्यासाठी एक मार्कर शोधत होती. तेव्हा एका स्वयंसेवकानं तिला विचारलं की, 'तुम्ही सुवर्णपदक जिंकलंय का?' मनूनं ते रिंगण सोडलं आणि जाताना स्वयंसेवकाला सांगितलं की, 'मी उद्या परत येईन.'"

10 मीटर एअर पिस्तूलचं सुवर्णपदक जिंकल्यावर ती खरोखरच तिथं परत गेली होती.

"'मी कोणाच्याही मागं नाही' ही मानसिकता नेहमीच मनूची प्रेरक शक्ती राहिली आहे," असं तिचे वडील अभिमानाने सांगतात.

आपल्यातलं नेहमी सर्वोत्कृष्टच द्यायचं ही तिची तळमळ केवळ शुटिंग रेंजपुरती मर्यादित नाही. मनूने ज्या महाविद्यालयात मास्टर डिग्री घेतली, तिथले सहयोगी प्राध्यापक अमनेंद्र मान यांनी याबाबत त्यांचा अनुभवही शेअर केला.

पॅरिस ऑलिंपिकच्या तयारीमुळं मनूला तिसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टरच्या परीक्षा देता आल्या नाहीत, असं प्रा. मान यांनी बीबीसीला सांगितलं.

"ऑलिंपिकनंतर, तिने दोन्ही सेमिस्टरची परीक्षा एकत्रित दिली आणि एकूण 74 टक्के गुणांक घेत मास्टर्स प्रोग्राममध्ये पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये ती महाविद्यालयात पहिली आली,"

परंतु, यावर मनूचं समाधान झालं नाही.

"मनूने पदवीमध्ये 78 टक्के मिळवले होते आणि तिला आपल्या पोस्ट-ग्रॅज्यूएशनमध्ये किमान तेवढी तरी टक्केवारी मिळवायची होती.

तिची कहाणी केवळ पदकं आणि गुणांबद्दल नाही, तर सर्वोत्कृष्टपेक्षा कमी असलेल्या कशावरही समाधान मानण्यास नकार देणाऱ्या मानसिकतेबद्दल आहे," असं क्रीडा मानसशास्त्रात पीएच. डी मिळवणारे प्रा. मान यावेळी म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)