मनू भाकर : पिस्तुलाच्या परवान्यासाठी संघर्ष ते नेमबाजीत पॅरिस ऑलिंपिकमध्ये कांस्य पदकाला गवसणी

पॅरिस ऑलिंपिकमध्ये मनू भाकरनं भारताचं पदकांचं खातं उघडलं आहे.

22 वर्षीय मनूनं 10 मीटर एयर पिस्टल नेमबाजीच्या फायनलमध्ये 221.7 गुणांची कमाई करत तिसरं स्थान मिळवत कांस्यपदक पटकावलं आहे.

अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या वाय. जे. ओहला सुवर्णपदक तर दक्षिण कोरियाच्याच वाय. जे. किमला रौप्यपदक मिळालं आहे.

पॅरिसमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून देणाऱ्या मनू भाकरला 2021 साली बीबीसीच्या इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द ईयर सोहळ्यात मनू भाकरला सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं होतं.

याआधी 2020साली झालेल्या टोकियो ऑलिंपिकमध्ये मनू भाकर 12व्या स्थानी राहिली होती.

2021साली बीबीसीच्या सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू पुरस्काराची मानकरी

2021 साली बीबीसीच्या इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द ईयर सोहळ्यात मनू भाकरला सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं होतं. इंग्लंडचा क्रिकेटपटू बेन स्टोक्स याने या पुरस्काराची घोषणा केली होती.

त्यावेळी मनोगत व्यक्त करताना मनू भाकर म्हणाली होती की, "हा पुरस्कार माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. माझ्या कष्टांचं चीज होतंय आणि माझी कामगिरी लोकांपर्यंत पोहोचतेय. अंजू बॉबी जॉर्ज यांनाही जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार मला मिळतोय याचाच अर्थ प्रतिभेला कुठेतरी आकार मिळतोय."

BBC ISWOTY या प्रकल्पाची सुरुवात 2019 मध्ये करण्यात आली होती. भारतातल्या प्रेरणादायी महिला खेळाडूंचा यथोचित सन्मान करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. फेब्रुवारी 2021 मध्ये या पुरस्कारासाठी पाच नामांकनं जाहीर करण्यात आली होती. त्यात धावपटू द्युती चंद, बुद्धिबळ खेळाडू कोनेरू हंपी, नेमबाज मनू भाकर, कुस्तीगीर विनेश फोगट आणि भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी यांचा या नामांकनात समावेश होता.

त्यावर्षी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर हा पुरस्कार बुद्धिबळ खेळाडू कोनेरू हंपी यांना जाहीर झाला होता.

टोकियो ऑलिंपिकमध्ये मनू भाकरकडून सर्वांना पदकाची अपेक्षा होती. पण मनूची साफ निराशा झाली. बाराव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

पॅरिसमध्ये मात्र तिनं आत्मविश्वासानं खेळ केला. मनूनं 27 जुलैला झालेल्या पात्रता फेरीत 580 गुणांची कमाई करत तिसरं स्थान मिळवलं.

पात्रता फेरीच्या पहिल्या दोन सीरीजमध्ये तिनं प्रत्येकी 97 गुणांची कमाई केली. तिसऱ्या सीरीजमध्ये 98 गुण मिळवत मनूनं तिसरं स्थान गाठलं. पाचव्या सीरीजमध्ये तिनं एका खराब शॉटवर फक्त 8 गुण मिळवले, पण तेवढा एक शॉट वगळता मनूनं उत्तम कामगिरी करत फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं.

मनू भाकरच्या विजयाबाबत तिचे आई-वडील काय म्हणाले?

मनू भाकरच्या विजयानंतर हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील गोरिया या गावात असलेल्या तिच्या घरी जल्लोषाचं वातावरण आहे.

मनू भाकरची आई सुमेधा भाकर म्हणाल्या की, "मी मनूकडून कधीच कसली अपेक्षा केली नाही. मला फक्त एवढंच वाटतं की माझी मुलगी कुठेही गेली तरी तिने आनंदाने घरी परत यावं आणि तिचं मन तुटू नये."

मनू भाकरीचे वडील राम किशन भाकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, "माझ्यापेक्षा माझ्या शेजाऱ्यांना जास्त आनंद झाला आहे. मनूने पॅरिस ॲालिंपिक पदक जिंकून देशाचं खातं उघडलं आहे आणि संपूर्ण देश आनंदी आहे. याबद्दल मी सर्व देशवासीयांचे आभार मानतो."

"मनूला क्रीडा मंत्रालय आणि फेडरेशनने या खेळाचं साहित्य आणि इतर सगळ्या बाबतीत मदत केली आहे. जसपाल राणा यांच्याशी संलग्न झाल्यानंतर मनूचे मनोबल खूप वाढले आहे."

राम किशन भाकर म्हणाले की, "मनू 2016 मध्ये 10वीत असतानापासूनच नेमबाजीचा सराव करत आहे. मधल्या काळात मनूने या खेळापासून दूर जाऊन काहीतरी वेगळे करण्याचा विचार सुरू केला होता पण, ही मनूची जुनी सवय आहे, कारण तिने कराटेमध्ये राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्यानंतर सांगितलं होतं की, मी आता हा खेळ खेळणार नाही. त्यामुळे शूटिंग सोडण्याचा निर्णयही मला तसाच वाटला होता."

"भारतीय नेमबाजीसाठी हा विजय खूप महत्त्वाचा होता कारण सुमारे 20 हजार मुलं हा खेळ खेळतात. त्यात हरियाणाचे अनेक नेमबाज आहेत. यामुळे खेळाडूंना मोठी चालना मिळेल आणि नेमबाजी हा खेळ एक नवीन उंची गाठेल."

राम किशन भाकर म्हणाले की, मनूच्या आणखीन दोन स्पर्धा बाकी आहेत आणि मला आशा आहे की ती चांगला खेळ करेल.

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी केलं अभिनंदन

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदक जिंकल्याबद्दल मनू भाकरचे अभिनंदन केले.

राष्ट्रपतींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर लिहिलं की, "मनू भाकरही नेमबाजीत भारताला ॲालिंपिक पदक मिळवून देणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. संपूर्ण देशाला मनू भाकरचा अभिमान वाटतो."

मनू भाकरच्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट केली आणि त्यात लिहिलं की, "एक ऐतिहासिक पदक! पॅरिस ॲालिंपिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देणाऱ्या मनू भाकरचं खूप खूप अभिनंदन."

मनूचे अभिनंदन करताना पंतप्रधानांनी लिहिले की, "कांस्यपदकाबद्दल अभिनंदन. हे यश आणखीनच विशेष आहे कारण ती भारतासाठी नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली महिला ठरली आहे. एक अविश्वसनीय कामगिरी!"

क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनीही मनू भाकरचे कांस्यपदक जिंकणे हा अभिमानास्पद क्षण असल्याचे म्हटले आहे.

मनसुख मांडवीया यांनी एक्सवर पोस्ट करून लिहिलं की, "अभिनंदन मनू, तू तुझे कौशल्य आणि समर्पण दाखवले आहेस, तू भारतासाठी ॲालिंपिक पदक जिंकणारी पहिली महिला नेमबाज बनली आहेस."

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही मनू भाकरचं अभिनंदन केलं आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक्सवर लिहिलं की, "तुमची कामगिरी तुमच्या असामान्य कौशल्य आणि दृढतेचा पुरावा आहे. आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे! ही महत्त्वाची संधी असंख्य युवा खेळाडूंना उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देईल."

वयाच्या 16व्या वर्षी मनू भाकरने दोन सुवर्णपदकं जिंकली होती

मनू भाकर ही हरियाणातल्या झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावची रहिवासी आहे. मनूची आई शाळेत शिक्षिका आहे तर वडील मारिन इंजिनियर आहेत.

मनू भाकरने 2018 मध्ये मेक्सिकोमधील आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघा(ISSF)च्या स्पर्धेत भारतासाठी दोन सुवर्णपदकं मिळवून दिली होती.

मनूने 10 मीटर एअर पिस्तूल (महिला) प्रकारात पहिलं सुवर्णपदक तर 10 मीटर एअर पिस्तूल (मिश्र स्पर्धा) प्रकारात दुसरं सुवर्णपदक जिंकलं होतं.

16 वर्षीय मनूने नेमबाजीत एकाच दिवसात दोन सुवर्णपदके जिंकून नवा विक्रम रचला होता. अशी कामगिरी करणारी ती सर्वात तरुण महिला खेळाडू ठरली होती.

या स्पर्धेनंतर बीबीसीच्या प्रतिनिधी सरोज सिंग यांनी मनू भाकरचे वडील राम किशन भाकर यांच्याशी संवाद साधला होता.

या संभाषणादरम्यान राम किशन भाकर यांनी ते मरीन इंजिनिअर असल्याची आणि त्यांनी नोकरी सोडली असल्याची माहिती दिली होती.

मनूच्या वडिलांनी त्यावेळी सांगितलं होतं की, मनूने वेगवेगळ्या खेळांमध्ये प्रयत्न केल्यानंतर अख्तर 2016 मध्ये नेमबाजीची निवड केली होती.

मनू भाकरचा पॅरिस ऑलिंपिकच्या अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास कसा होता?

पात्रता फेरीत सहभागी झालेल्या आठ अव्वल खेळाडूंची अंतिम फेरीसाठी निवड झाली. 22 वर्षीय मनूनं 27 जुलैला झालेल्या पात्रता फेरीत 580 गुणांची कमाई करत तिसरं स्थान मिळवलं.

मनूनं पात्रता फेरीच्या पहिल्या दोन सीरीजमध्ये प्रत्येकी 97 गुणांची कमाई केली. तिसऱ्या सीरीजमध्ये 98 गुण मिळवत मनूनं तिसरं स्थान गाठलं. पाचव्या सीरीजमध्ये तिनं एका खराब शॉटवर फक्त 8 गुण मिळवले, पण तेवढा एक शॉट वगळता मनूनं उत्तम कामगिरी करत फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं.

भारताची आणखी एक पिस्टल नेमबाज ऱ्हिदम सांगवान पात्रता फेरीत पंधरावी आली. तिनं 573 गुणांची कमाई केली.

पात्रता फेरीत हंगेरीच्या मेजर वेरोनिकाने 582 गुणांसह अव्वलस्थान पटकावलं होतं आणि दक्षिण कोरियाची नेमबाज ओ ये जिनने 582 गुणांसह दुसरं स्थान मिळवलं होतं. .

पात्रता फेरीत मनू भाकर 580 गुणांसह तिस-या स्थानी होती.

अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या वाय. जे. ओहला सुवर्णपदक तर दक्षिण कोरियाच्याच वाय. जे. किमला रौप्यपदक मिळालं आहे.

मुलीसाठी नोकरी सोडली होती

मनू भाकरचे वडील राम किशन भाकर यांनी सांगितलं होतं की, मनूने पहिल्यांदाच तिच्या शाळेत झालेल्या एका नेमबाजी स्पर्धेत सहभाग घेतला आणि तिने इतक्या अचूकपणे लक्ष्य भेदले की तिच्या शाळेतले शिक्षकही आश्चर्यचकित झाले होते.

त्यानंतर नियमित सर्व आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर ती वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागली.

पण अडचण अशी होती की मनूला परवानाधारक पिस्तुल घेऊन सार्वजनिक बसमधून प्रवास करता येत नव्हता. आणि ती प्रौढ नसल्यामुळे शूटिंग इव्हेंटमध्ये भाग घेण्यासाठी ती स्वत: गाडी चालवू शकत नव्हती.

त्यामुळे राम किशन भाकर यांनी आपल्या मुलीची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर ते मनूसोबत नेमबाजी स्पर्धांना जाऊ लागले.

राम किशन भाकर म्हणाले होते की, "शूटिंग हा खूप महागडा खेळ आहे. प्रत्येक पिस्तुलाची किंमत प्रत्येकी दोन लाख रुपये आहे. आत्तापर्यंत आम्ही मनूसाठी तीन पिस्तूल विकत घेतल्या आहेत. वर्षभरात आम्ही फक्त तिच्या खेळावर 10 लाख रुपये खर्च करतो."

पिस्तुलाचा परवाना मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला

खूप कमी लोकांना याची माहिती आहे की ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत भारताला पहिलं पदक मिळवून देणाऱ्या मनू भाकरला पिस्तुलाचा परवाना मिळवण्यासाठी अडीच महिने वाट बघावी लागली होती.

सामान्यतः इतर खेळाडूंना हा परवाना एका आठवड्यात मिळतो.

परवाना मिळवण्याच्या प्रक्रियेची आठवण करून राम किशन भाकर म्हणाले की, ""मे 2017 मध्ये मी परदेशातून पिस्तूल आणण्यासाठी अर्ज केला होता. पण माझा अर्ज झज्जर जिल्हा प्रशासनाने रद्द केला होता."

त्यानंतर हे प्रकरण माध्यमांनी उचलून धरलं तेंव्हा असं लक्षात आलं की पिस्तुलाची परवानगी मागताना त्यामध्ये 'स्वसंरक्षण' हे कारण दिलेलं होतं. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी केली आणि सात दिवसांच्या आत मनू भाकरला हा परवाना मिळवून दिला.

मनूच्या शाळेतील मित्र तिला 'ऑलराउंडर' म्हणतात कारण तिने बॉक्सिंग, अ‍ॅथलेटिक्स, स्केटिंग, ज्युडो, कराटे या सगळ्या खेळांमध्ये नशीब अजमावून बघितलं होतं.