मॅटर्निटी पॉलिसी : 'सहा महिन्यांची गरोदर असतानाही मी आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळले'

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आशिया कप स्पर्धेदरम्यान मुलाच्या जन्मासाठी सुट्टीवर म्हणजे पॅटर्निटी लीव्हवर गेला, याची बरीच चर्चा झाली.

2020 मध्ये विराट कोहलीला त्याच्या मुलीच्या जन्माच्या वेळी अशीच सुट्टी मंजुर झाली होती. अनेकांनी बीसीसीआयच्या या पावलाचे कौतुक केले.

पण एखाद्या भारतीय महिला खेळाडूवर अशी परिस्थिती ओढवली तर?

“मी सहा महिन्यांची गरोदर असतानाही मी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळले. मुलाला जन्म दिल्यानंतर लगेचच मी सराव सुरू केला, कारण त्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धा होणार होत्या,” राष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक आणि माजी ऑलिम्पियन सुमा शिरूर सांगतात.

सुमाचा समावेश भारतातल्या त्या महिला खेळाडूंमध्ये केला जातो ज्यांनी खेळ आणि मातृत्वाशी निगडित रूढीवादी कल्पना मोडून काढल्या.

2001 मध्ये सुमा यांच विवाह झाला, त्यावेळी त्या करिअरच्या शिखरावर होत्या. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी एका मुलाला जन्म दिला.

यानंतर अनेकांनी तिची कारकीर्द संपल्याचं भाकित केलं. पण प्रसूतीनंतर दोनच महिन्यांनी सुमा पुन्हा सरावाला लागली. राष्ट्रीय स्पर्धेत खेळली आणि पुढे पदकंही जिंकली. 2004 च्या ऑलिम्पिकमध्ये सुमा यांनी अंतिम फेरी गाठली होती.

आता दोन दशकांहून अधिक काळ उलटून गेल्यावर मागे वळून पाहताना सुमा यांना जाणवंत, की भारतात अजूनही मुले जन्माला घालणाऱ्या महिला खेळाडूंसाठी कोणतीही ‘सपोर्ट सिस्टिम’ नाही, त्यांना फारसा आधार नाही.

सुमा सांगतात, “22 वर्षांपूर्वी मी एकटीने हे केले होते. माझ्या सासूबाई पहिल्या प्रसूतीनंतर प्रवासात माझ्यासोबत होत्या. दुस-यांदा आई माझ्यासोबत प्रवास करत होती.

“पण आज खेळांनी इतकं व्यावसायिक आणि स्पर्धात्मक रूप घेतलं आहे. तेव्हा आपण एक अशी व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे जी खेळाडूंचं मातृत्व आणि त्यासंदर्भात असलेले प्रश्न विचारात घेईल.”

खेळ की मातृत्व ?

स्टेसी पोप यांनी युकेतील डरहॅम विद्यापिठात लिंग, खेळ आणि असमानता यावर संशोधन केलं आहे. त्या सांगतात, "खेळाडूंनी मातृत्व आणि व्यावसायिक खेळातली कारकीर्द यापैकी एकाची निवड करावी अशी अपेक्षा केली जाते.

त्या सांगतात, "याचं कारण खेळातलं करियरही हे पुरुष खेळाडूंच्या मॉडेलवर आधारित आहे. कामाची लैंगिक विभागणी आजही ‘पुरुष हा कमावता तर पालकत्व आणि मातृत्व महिलेची जबाबदारी’ अशी होताना दिसते."

गरोदरपणात किंवा बाळाला जन्म दिल्यानंतर लगेचच खेळाडूंना खेळताना पाहणे आता सामान्य होऊ लागले आहे.

अ‍ॅलिसिया मॉन्टॅनोचे उदाहरण घ्या ना. गरोदरपणातच तिनं अमेरिकन ट्रॅक अँड फील्ड चॅम्पियनशिपमध्ये 800 मीटर शर्यतीत भाग घेतला होता.

भारताच्या महान धावपटू पीटी उषा यांचंच उदाहरण घ्या. आई झाल्यावरही 1998 मध्ये वयाच्या 33 व्या वर्षी उषा यांनी आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला आणि चार पदके जिंकून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला.

मेरी कोम आणि सानिया मिर्झापासून दीपिका पल्लीकलपर्यंत क्रीडा क्षेत्रातील 'सुपरमॉम्स'ची उदाहरणे भारतात आहेत.

पण वास्तव हे आहे की देशातील बहुतांश महिला खेळाडूंना मातृत्व आणि खेळातील करिअर यापैकी एकाची निवड करावी लागते.

2016 च्या रिओ ऑलिम्पिकच्या स्टीपलचेस फायनलमध्ये पोहोचलेल्या ललिता बाबरने आम्हाला सांगितले की हा निर्णय तिच्यासाठी किती कठीण होता.

"जेव्हा तुम्ही खेळात करिअर करण्यावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुम्हाला मुलांपासून दूर राहण्याची तयारी ठेवावी लागते. कारण तुम्हाला चांगली कामगिरी करायची आहे, काही ध्येयं गाठायची आहेत," ललिता सांगते.

“एक स्त्री म्हणून तुम्हाला वाटू शकतं की आई होणे महत्त्वाचे आहे. पण एक खेळाडू म्हणून मुलांना जन्माला कधी घालायचं याविषयी निर्णय घ्यावा लागतो.”

ललिता आता एका मुलाची आई आहे. ती नवी मुंबई महापालिकेत उपायुक्त म्हणूना क्रीडा विभागात काम करते. क्रीडा क्षेत्रात कारकि‍र्दीच्या सुरुवातीला ललिता भारतीय रेल्वेमध्ये काम केले.

ती सांगते, "शासकीय नोकऱ्या असलेल्या महिला खेळाडूंना किमान प्रसूती रजा, बाल संगोपन रजा, वैद्यकीय विमा इत्यादी फायदे मिळतात. पण सर्व खेळाडूंना आणि सर्व महिलांना काही ना काही पाठिंबा मिळायला हवा."

आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतात मातृत्त्व

अलीकडच्या काळात मातृत्वाविषयी आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांच्या दृष्टिकोनात लक्षणीय बदल झाला आहे.

म्हणूनच या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला फुटबॉल विश्वचषकात आम्ही अनेक 'मॉम्स' खेळताना दिसल्या.

त्यात ऑस्ट्रेलियाची कॅटरिना गोरी होती, जी फ्रान्सविरुद्धचा सामना जिंकल्यावर तिची मुलगी हार्परला मैदानात घेऊन आली.

स्पॅनिश फुटबॉलर इरेन परडेस या स्पर्धेसाठी आपल्या मुलाला ऑस्ट्रेलियात सोबतत घेऊन गेली होती.

आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना फिफाला दिलेल्या मुलाखतीत ती सांगते, "जेव्हा तुमचा मुलगा खूप लहान असतो, तेव्हा तुम्हाला त्याची गरज असते, पण त्यालाही तुमची गरज असते."

महिला फुटबॉलपटू एक आई आणि एक खेळाडू असण्याचा हा समतोल साधू शकत आहेत, कारण फिफानं जानेवारी 2021 मध्ये मातृत्वाशी संबंधित नवे नियम, नवं धोरण लागू केले.

गरोदरपणात खेळाडूंना पूर्ण पगार आणि किमान 14 आठवड्यांची रजा मिळावी, असं फिफाचं हे धोरण सांगतं. प्रसूती रजेदरम्यान खेळाडूंना त्यांच्या पगाराच्या किमान दोन तृतीयांश रक्कम दिली जावी, अशीही तरतूद आहे.

महिला टेनिस संघटना (WTA) याबाबतीत आणखी एक वेगळं धोरण राबवते. गरोदरपणातून परतणाऱ्या महिला टेनिसपटूंनान विशेष मानांकन दिले जाते.

महान टेनिसपटू सेरेना विल्यम्स गरोदर होती, तेव्हा खेळू शकत नसल्यानं तिचे रँकिंग घसरले. मग सेरेनाला पुन्हा बिगरमानांकित खेळाडू म्हणून स्पर्धांमध्ये खेळावं लागल्याने महिला टेनिसमध्ये ही विशेष तरतूद करण्यात आली.

अर्थात जे टेनिसला लागू होते ते इतर खेळांना लागू होणार नाही. पण प्रत्येक खेळाची एक विशिष्ठ नियमावली असणं त्या त्या खेळातल्या महिलांसाठी फायद्याचं ठरू शकतं.

क्रिकेटमधील मातृत्व धोरण

हा फोटो तुम्हाला आठवतो का? 2022 साली न्यूझीलंडमध्ये झालेल्या ICC महिला क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारताच्या महिला टीमनं पाकिस्तानची बिस्मा मारूफ आणि तिची मुलगी फातिमासोबत सेल्फी काढला होता.

मारूफला त्या स्पर्धेत आपल्या संघाचे कर्णधारपद आणि आपल्या मुलीला दूध पाजण्याच्या वेळा या दोन्ही गोष्टी सांभाळण्याचा संघर्ष करावा लागला. बिस्माची आई तिच्यासोबत प्रवास करत होती आणि मुलीला सांभाळत होती.

पण ती असे करू शकली कारण पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं मातृत्व धोरण राबवलं आहे ज्यानुसार महिला खेळाडूंना आर्थिक मदतही पुरवली जाते.

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट बोर्डही प्रसूती रजा देतात, तीही पगारासह.

अलीकडेच बीसीसीआयने पुरुष आणि महिला दोघांसाठी समान सामना शुल्क जाहीर करून वेतन समानतेसाठी एक पायंडा घातला आहे. पण अद्याप कंत्राटी महिला खेळाडूंसाठी बीबीसीसीआयचं कोणतेही स्पष्ट मातृत्व धोरण नाही.

यामागे एक कारण हेही असू शकते की, 2006 मध्ये बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेटचा ताबा घेतल्यापाससून तेव्हापासून अशी गरज कधी निर्माण झाली नाही. पण आता बीसीसीआयनेही मातृत्व धोरण लागू करण्याची वेळ आली आहे, असे अनेकांना वाटते.

माजी क्रिकेटपटू आणि स्तंभलेखक स्नेहल प्रधान यांनी 'हिंदुस्तान टाईम्स' या वृत्तपत्रात लिहिले आहे, "एखाद्या नावाजलेल्या खेळाडूला मातृत्व धोरणाचा आधार मिळाला तर या गोष्टीचा भारताच्या सामाजावरही किती चांगला परिणाम होईल, याची कल्पना करा."

त्या लिहितात, “ज्या नोकरदार महिला आणि त्यांच्या नोकरदारांना मुले जन्माला घालण्याचा विचार करत आहेत त्यांना यातून काय संदेश मिळेल? आमच्या शेजाऱ्यांनी (पाकिस्तान बोर्डानं) या दिशेने पावलं उचलली आहेत, आता भारताला पुढे जावे लागेल.”

अर्थात सर्व क्रीडा संस्था गरोदरपणात आर्थिक सहाय्य देऊ शकत नाहीत, निदान सध्यातरी.

खेळातलं प्रसूती धोरण कसं असावं?

अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांना 29 ऑगस्ट 2022 रोजी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत खेळातील मॅटर्निटी पॉलिसीविषयी विचारण्यात आलं होतं.

तेव्हा ते म्हणाले होते, “आम्ही आणखी काही करण्याची गरज आहे का? तर हो आहे. आमच्याकडे पैसा असेल तर आम्ही नक्कीच अधिक भक्कम आधार देणारी व्यवस्था निर्माण करू शकतो. खेळाच्या संघटनेला मिळणारे पैसे आणि येणारा खर्च यांच्यातील ताळमेळ साधत हे करणं ही तारेवरची कसरत आहे."

पण आर्थिक सहाय्य किंवा विशेष मानांकनं अशा सवलतींपेक्षा, खेळाडूंना अशा एका परिसंस्थेची गरज आहे जी मातृत्वाविषयी अडचणी आणि परिस्थितीचा संवेदनशीलपणे विचार करू शकेल. सुमा शिरूर यांनीही हीच गोष्ट मांडली आहे.

सुमा सांगतात की अशा खेळाडूंना काही सुविधा उपलब्ध करून देणं शक्य आहे. “माझ्यामते खेळाडूंना सक्तीच्या शिबिरांत उपस्थित राहण्याच्या नियमात काही शिथिलता आणणे, खेळाडूला तिच्या बाळासोबत प्रवास करण्याची परवानगी देणे, त्यांना स्वतंत्र खोली देणे आणि काही नियमांमधून सूट देणं” अशा गोष्टी करता येऊ शकतात.

सुमा हेही नमूद करतात की स्पर्धात्मक खेळात शेवटी खेळाडूचा फिटनेस आणि फॉर्म ते कुठवर खेळू शकतात हे ठरवतो. “महिला खेळाडूंना त्यासाठी स्वतः आपल्या परीनं संघर्ष करावा लागेलच.”

पण मॅटर्निटी पॉलिसी किंवा मातृत्वाविषयीची ठोस धोरणं महिला खेळाडूंच्या या लढाईत त्यांच्यावरचा भार थोडा हलका करू शकतात.

याचा फायदा संपूर्ण समाजालाही कसा होईल, हे एली बोवेस नेमक्या शब्दांत सांगतात. एली ब्रिटेनमध्ये नॉटिंघम ट्रेंट यूनिवर्सिटीत समाजशास्त्राच्या व्याख्याता आहेत आणि त्या महिला खेळांवरही संशोधन करतात.

त्या सांगतात की, “तुम्ही जेव्हा खेळातल्या स्त्री-पुरुष असमानतेवर तोडगा काढता, तेव्हा तुम्ही जगातही महिलांच्या समानतेसाठीच्या समस्या सोडवण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकता. कारण खेळांचं जग हे आपल्या समाजाचं छोटं रूपच आहे.”

(बीबीसी न्यूजसाठी रेबेका थॉर्न यांच्या बातमीतील माहितीचा समावेशही यात केला आहे.)

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)