मीराबाई चानू : पीरियड सुरू असताना महिला खेळाडू ट्रेनिंग कसं करतात?

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"आज माझा पाळीचा तिसरा दिवस होता. टोकियोतही मी पाळीच्या दुसऱ्या दिवशी खेळले, याचा शरीरावर थोडा परिणाम होतोच. मी पूर्ण प्रयत्न केले, पण पदक माझ्या हातून निसटलं."

भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूनं पॅरिस ऑलिंपिकमध्ये चौथं स्थान मिळाल्यावर ही प्रतिक्रिया दिली.

टोकियो ऑलिंपिकमध्येही ती पाळीच्या दुसऱ्या दिवशी खेळत होती आणि त्यावेळी तिला सुवर्णपदकाऐवजी रौप्य पदकावर समाधान मानवं लागलं होतं.

मीराबाईच्या या विधानानंतर पुन्हा एकदा महिला खेळाडूंची कामगिरी, सराव आणि मासिक पाळी हा मुद्दा चर्चेत आला आहे.

महिला खेळाडू पाळीदरम्यान सराव कसा करतात?

बीबीसी मराठीने गेल्या वर्षी क्रीडा क्षेत्रातील महिला मासिक पाळीदरम्यान सराव कसा करतात या संबंधी हा लेख लिहिला होता. तो मीराबाई चानूच्या ऑलिंपिकमधील सहभागाच्या निमित्ताने पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

“मी एव्हरेस्ट चढून उतरत होते. आठ हजार फुटांवर होते, तेव्हा माझी पाळी सुरू झाली,” 8000 मीटरवरची पाच शिखरं सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक प्रियांका मोहिते तिचा अनुभव सांगते.

“मी थकले होते ऑक्सिजन लावून मी बारा एक तास चढाई केली होती. माझी पाळीची डेट दहा दिवस दूर होती, पण थकव्यामुळे किंवा उंचावरच्या हवामानामुळे माझी पाळी अचानक सुरू झाली. मी त्यासाठी तयारही नव्हते. अक्षरशः टिश्यू पेपर रोल करून दोन दिवस पॅडसारखे वापरले.”

प्रियांकाला आम्ही तिच्या मासिक पाळीच्या अनुभवांविषयी बोलतं केलं कारण सध्या खेळाडू पाळीच्या दिवसांना कशा सामोऱ्या जातात याविषयी चर्चा सुरू आहे. निमित्त आहे महिलांच्या फिफा विश्वचषकाचं.

महिनाभर चाललेल्या या स्पर्धेसाठी यंदा न्यूझीलंडच्या फुटबॉल टीमनं आपली जर्सी बदलली. पांढऱ्या कपड्यांत खेळताना पाळीचे डाग पडण्याची चिंता वाटू नये, यासाठी त्यांनी निळसर रंगाच्या शॉर्ट्स वापरण्यास सुरुवात केली.

जून-जुलैमध्ये विम्बल्डन या मानाच्या टेनिस स्पर्धेनंही पांढऱ्या ड्रेसकोडविषयीचे नियम याच कारणासाठी थोडे शिथिल केले आणि महिलांना रंगीत अंडरशॉर्ट्स घालण्याची परवानगी दिली.

तसं पाळीच्या दिवसांत महिला खेळाडूंनी खेळणं किंवा अगदी मोठं यश मिळवणं ही नवी गोष्ट राहिलेली नाही.

भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूनं टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक मिळवलं, त्यावेळी तिची मासिक पाळी सुरू होती. त्यावेळी कशी शारिरीक आणि मानसिक तयारी केली, याविषयी मीराबाईनं नंतर सांगितलं होतं.

मासिक पाळी हे महिला खेळाडूंसमोरचं असं आव्हान आहे, ज्याविषयी अजूनही खुलेपणानं बोललं जात नाही.

पण महिनाभरात इतर स्त्रियांसारखेच खेळाडूंच्या शरीरातही बदल होत असतात. त्याच्याशी त्या कशा जुळवून घेतात आणि पाळीच्या दिवसांत त्या खेळण्याचा सराव कसा करतात हे जाणून घ्यायचं आम्ही ठरवलं.

या बदलांशी जुळवून घेण्यासाठी तंत्रज्ञान कशी मदत करतंय हेही आम्ही जाणून घेतलं.

पाळीच्या दिवसांत खेळणं कठीण असतं का?

पाळीच्या दिवसांत मूड स्विंग्ज, पोटात दुखणं, पाठदुखी, पायात गोळे आल्यासारखं वाटणं, थकवा, मळमळणं असे अनेक त्रास महिलांना सहन करावे लागतात. खेळाडूंचाही त्याला अपवाद नाही.

अशा स्थितीत काही महिला एखादं वेदनानाशक औषध घेतात, पण खेळाडूंना अँटी ड्रग पॉलिसीमुळे कुठलंही औषध सहज घेता येत नाही.

त्यामुळे वेदना आणि शरीरातल्या बदलांचा विचार करूनच सराव करावा लागतो, अन्यथा दुखापतही होऊ शकते.

स्वीडनच्या कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधील सिसिलिया फ्रायडेन यांनी याविषयी संशोधन केलं होतं. त्यात महिला खेळाडूंमध्ये पाळीआधीच्या आणि पाळीच्या दिवसांत दुखापतींचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलं होतं.

ओव्ह्युलेशन फेज (बीजकोशातून स्त्री जनन पेशी बाहेर येण्याची क्रिया) म्हणजे साधारण पाळीच्या चौदाव्या दिवसाच्या आसपास महिला खेळाडूंना गुडघ्याची दुखापत (anterior cruciate ligament injury) होण्याचं प्रमाण जास्त असल्याचं हे संशोधन सांगतं.

तसंच अखेरच्या आठवड्यात थकवा आणि मूड स्विंग्जचं प्रमाण जास्त असल्याचंही या अहवालात म्हटलं होतं.

2015-16 सालच्या एका संशोधनात दिसून आलं होतं की आघाडीच्या महिला अ‍ॅथलीट्सपैकी अर्ध्यापेक्षा जास्त जणींना मासिक पाळीदरम्यान हार्मोन्समधील बदलांना सामोरं जावं लागतं आणि त्याचा परिणाम त्यांच्या सरावावर आणि प्रत्यक्ष मैदानातल्या कामगिरीवरही होतो.

या संशोधनात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या माजी धावपटू आणि संशोधक डॉक्टर जॉर्जी ब्रुनवेल्स माहिती देतात की “ओव्ह्युलेशनपूर्वी महिलांच्या शरीरात एस्ट्रोजन या हार्मोनची पातळी वाढत असते. त्या काळात बहुतांश महिला शारिरीक क्षमतेच्या सर्वोत्तम स्तरावर असतात. पण ओव्ह्युलेशन होताना आधी एस्ट्रोजनची पातळी एकदमी खाली येते.“

“त्यानंतरच्या टप्प्यात प्रोजेस्ट्रॉन हार्मोनचं प्रमाण वाढतं, त्यामुळे शरिराचं तापमान आणि श्वासोच्छ्वासाचा दर वाढतो, हार्टबीट आणि मेटाबोलिझमचा दर वाढतो. त्यानुसार आहारात बदल करणं फायद्याचं ठरतं. “

पण या हार्मोन्समधल्या बदलांचा प्रत्येकावर वेगळा परिणाम होतो. या माहितीचा विचार आता खेळाडूंच्या सरावाचं वेळापत्रक आखताना होऊ लागला आहे.

खेळाडू पाळीच्या दिवसांत कसा सराव करतात?

यंदाच्या फिफा विश्वचषकात पहिला गोल स्कोर करणारी फुटबॉलर हॅना विल्किनसनशी बीबीसीनं याविषयी बातचीत केली.

हॅना सांगते की “एखाद्या मोठ्या सामन्यात खेळायचंय, तेव्हाच पाळी येऊ नये अशी आशा खेळाडू करायच्या. आता परिस्थिती सुधारली आहे. अनेक प्रशिक्षक आणि ट्रेनर्स महिला खेळाडूंच्या पाळीच्या दिवसांचा विचार करून ट्रेनिंग देऊ लागले आहेत.”

ती नमूद करते की पीरियड असतानाही खेळावं लागेल, शारिरीक कष्ट करावे लागतील याची मानसिक तयारी सर्वात आधी करावी लागते.

गिर्यारोहक प्रियांका मोहिते सांगते, “पीरियड्स ही नैसर्गिक क्रिया आहे. औषधं घेऊन ते पुढे ढकलणं वगैरे यावर माझा विश्वास नाही.

“मी पीरियड्सच्या दिवसांतही थोडाफार सराव करते. किमान थोडं चालणं किंवा ट्रेडमिलवर सराव, योगा, स्ट्रेचिंग करते. पाळी सुरू झाली असेल तर लोअर बॉडी वर्कआऊट करणं टाळते, पण व्यायामात खंड पडू देत नाही.”

शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रशिक्षक हरीश परब तीस वर्षांपासून महाराष्ट्रातल्या खेळाडूंना जिम्नॅस्टिक्सचे धडे देत आले आहेत.

ते सांगतात, “आमच्या विद्यार्थिनींना पाळी येणार असते किंवा आली असते, तेव्हा त्या आम्हाला सांगतात. त्यानुसार आम्ही त्यांच्या व्यायामात, सरावात बदल करतो. त्या जास्त थकणार नाहीत असा सराव या दिवसांत करून घेतो. ऐन ट्रायलच्या दिवशी एखादीचे पीरियड्स आले, तर त्यासाठी त्यांना मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या तयार ठेवणं गरजेचं असतं.”

हरीश परब कोअर स्ट्रेंथनिंग एक्सरसाईझचं आणि आहाराचं महत्त्व समजावून सांगतात. “बहुतांश जिम्नॅस्ट अगदी लहानपणी खेळण्यास सुरुवात करतात. मुली साधारण अकरा बारा वर्षांच्या झाल्या की आम्ही आहारशास्त्रज्ञांसोबत एक सेशन ठेवतो.

त्यांच्या जेवणात लोह आणि कॅल्शियमचं प्रमाण जास्त राहील याची काळजी घेतो. काहीजणींच्या गरजा वेगळ्या असतात आणि त्यानुसार आहार ठरवला जातो. मुलींना पाळी सुरू होण्याच्या वयात आम्ही गायनॅकसोबतही एक सेशन ठेवतो.”

तंत्रज्ञानाची मदत

हॉकी, फुटबॉल, क्रिकेटसारख्या सांघिक खेळांत सगळ्या महिला खेळाडूंसाठी एकच एक फिटनेस रेजिम ठेवून चालत नाही. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. त्यानुसारच फिटनेस ट्रेनर्स त्यांचा व्यायाम ठरवू लागले आहेत.

इंग्लिश इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टसमध्ये महिला खेळाडूंच्या आरोग्याविषयी विभागाचे डॉक्टर रिचर्ड बर्डेन सांगतात,“मासिक पाळीकडे आजवर अनेकदा सरावातला किंवा चांगल्या कामगिरीतला अडथळा म्हणून पाहिलं गेलं आहे.

“पण कुठलाही सराव न करण्यापेक्षा महिनाभरात हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांची माहिती लक्षात घेऊन विशिष्ट दिवशी विशिष्ट ट्रेनिंग करणं जास्त फायद्याचं ठरू शकतं.”

काही खेळाडूंच्या शरीरात महिनाभरात शरीरात ऊर्जेच्या पातळीत बदल घडू शकतात. तर काही खेळाडूंना असा कुठलाही बदल जाणवत नाहीत.

अशा दिवसांची व्यवस्थित नोंद ठेवता यावी यासाठी खेळाडू आता तंत्रज्ञानाची मदत घेऊ लागल्या आहेत.

क्लू, फिटबिट (Clue, Fitbit) सारखी अनेक अ‍ॅप्स महिलांना त्यांच्या पीरियड्सची नोंद ठेवण्यासाठी मदत करतात. तर फिटरवुमन FitrWoman हे अ‍ॅप्स महिला खेळाडूंना वैयक्तिक सराव आणि आहाराविषयी सल्ला देतं.

उदाहरणार्थ, एखाद्या खेळाडूच्या मासिक पाळीविषयी नोंदीनुसार विशिष्ट दिवशी रक्तातील साखरेचं प्रमाण कमीजास्त असण्याची शक्यता असेल, तर हे अ‍ॅप त्यादिवशी प्रोटीनचं सेवन किती असावं, कार्बोहायड्रेट्स किती खायला हवीत याचा सल्ला देऊ शकतं.

स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी कंपनी ओरेकोनं हे अ‍ॅप तयार केलं असून त्याच्या निर्मितीत डॉ. जॉर्जी ब्रुनवेल्स यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

डॉ. ब्रुनवेल्स यांनी अमेरिकन महिला फुटबॉल टीमसोबतही काम केलं आहे आणि जुलै 2019 मध्ये अमेरिकेनं महिला वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा त्यांच्या यशात या तंत्रज्ञानाचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं गेलं होतं.

केवळ ट्रेनिंगच नाही, तर खेळाडूंसाठी कपडे तयार करणाऱ्या कंपन्याही आता महिलांच्या मासिक पाळीचा विचार करून कपडे तयार करत आहेत आणि त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची मदत घेत आहेत.

मोकळेपणानं बोलणं सर्वात महत्त्वाचं

गिर्यारोहक प्रियांका सांगते, की सर्वात आधी पाळीविषयी मोकळेपणानं बोलण्याची गरज आहे. “सुरुवातीला मला पाळीविषयी बोलताना अगदी लाजच वाटायची. आईसमोर, घरातल्यांसमोरही याविषयी बोलताना कचरत असे. एव्हरेस्ट सर करून साऊथ कॉलला (कँप फोर) आले, तेव्हा माझी पाळी सुरू झाली. माझं बहुतांश सामान टीममधल्या एका शेर्पानं पुढे नेलं होतं. मग माझ्यासोबत जो शेर्पा होता त्याच्याशी बोलण्याशिवाय पर्याय नव्हता.”

आता प्रियांका पाळीविषयी खुलेपणानं बोलते आणि कुठल्या शाळेत किंवा कॉलेजात गेली, तर तिथल्या मुलामुलींशी याविषयी संवाद साधते.

प्रियांकानं पुढे अन्नपूर्णावर यशस्वी चढाई केली, तेव्हा तिच्यासोबत चारही पुरुष सहकारी होते. “तुम्ही सगळे एकाच तंबूत आहात. अशात समजा तुम्हाला पॅड किंवा कप बदलायचं आहे, पण वेगवान वारा आहे, बर्फ पडतंय आणि बाहेर जाणं शक्य नाही. मग तुम्हाला टेंटमध्येच पॅड बदलण्याशिवाय पर्याय उरत नाही. सहकाऱ्यांसोबत विश्वासाचं नातं निर्माण झाल्यानं या गोष्टी सोप्या झाल्या.”

अतिशय खराब हवामानात पाळीमुळे पोटात दुखू लागलं, तर चढाई करताना वेग कमी होतो. प्रियांका सांगते की अशावेळी सहकाऱ्यांना आधीच कल्पना दिली तर तेही जुळवून घेतात.

पण हे सगळ्यांनाच शक्य होतं असं नाही. कुस्तीसारख्या पारंपरिक आणि पुरुषांचं वर्चस्व असलेल्या खेळात पाळीचा विषय कसा टाळला जातो, याविषयी अर्जुन पुरस्कार विजेती भारतीय पैलवान दिव्या काकरान हिनं बीबीसीशी बातचीत करताना सांगितलं होतं.

ती म्हणते, “आम्ही प्रशिक्षकांना सांगू शकत नाही की हा प्रॉब्लेम आहे. अनेकदा स्वच्छ टॉयलेट्स नसतात जिथे मुली पॅड बदलू शकतील. सारखं सारखं टॉयलेटला जावं लागलं तर प्रशिक्षकांना काय सांगायचं, कपड्यांवर डाग पडले तर काय करायचं, असे प्रश्न भेडसावतात, अनेकींना अवघडल्यासारखं वाटतं.”

इथे प्रशिक्षकांची भूमिकाही महत्त्वाची ठरते.

हरीश परब सांगतात की तीस वर्षांपूर्वीच्या तुलनेत आता परिस्थिती सुधारली आहे आणि पालकही जागृत झाले आहेत. त्यामुळे खेळात पाळीविषयी मोकळेपणानं चर्चा होऊ लागली आहे.

“काही मुली बोलण्यापासून लाजतात, घाबरतात. त्यांना आत्मविश्वास दिला तर त्या मोकळेपणानं बोलतात. माझ्याशी बोलल्या नाहीत तरी माझ्या महिला सहप्रशिक्षक किंवा थोड्या वयानं मोठ्या मुलींशी त्या संवाद साधतात.”

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)