खाशाबा जाधव यांच्या पहिल्या वैयक्तिक ऑलिम्पिक मेडलची रोमांचक गोष्ट

    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी

देश स्वतंत्र झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ओळख तयार करण्याचा नवीन लढा देशात नुकताच सुरू झाला होता. गरिबी हे आव्हान होतं आणि हाताशी अगदी तुटपुंजी साधनं होती.

अशावेळी क्रीडा क्षेत्रात ज्यांनी भारताची प्रतिमा उंचावली अशी दोन व्यक्तिमत्व म्हणजे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद आणि कुस्तीतले पैलवान खाशाबा जाधव...पैकी ध्यानचंद यांचा जन्मदिवस आपण क्रीडादिवस म्हणून साजरा करतो.

पण मराठमोळ्या खाशाबांचं आयुष्य काही कमी प्रेरणादायी नाही. ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक मेडल मिळवून देण्याचा मान त्यांच्याकडे जातो.

1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या बँटमवेट प्रकारात त्यांनी कांस्य जिंकलं होतं.

ऑलिम्पिक मेडलचा रोमांचक प्रवास

आज खाशाबा जाधव हे भारतीय क्रीडा क्षेत्रात एक चालती बोलती दंतकथा आहेत. पण, त्यांनी मेडल कसं जिंकलं ही कहाणी अगदीच रोमांचक आहे. जाधव यांच्या आयुष्यावर ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संजय दुधाणे यांनी 'ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव' या नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यात मेडल जिंकलेल्या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे.

'ऑलिम्पिक स्पर्धा संपायला फक्त 2-3 दिवसच बाकी होते. बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान आटोपलेलं होतं. त्यामुळे संघाबरोबर असलेले व्यवस्थापक दिवाण प्रताप चंद यांना शहर बघण्याची घाई झाली होती. इतरांनाही युरोपातलं हे शहर मनसोक्त भटकायचं होतं.' दुधाणे आपल्यासमोर तो दिवस उभा करतात.

या पर्यटनाच्या नादात प्रताप चंद खाशाबांच्या मॅचचा दिवसही विसरले. आणि उलट खाशाबांना म्हणाले, 'तुझी मॅच उद्या आहे. तेव्हा आज तू आमच्याबरोबर हिंडायला चल.'

खाशाबा मात्र एका मनसुब्याने हेलसिंकीत आले होते. त्यांचं लक्ष कुस्ती सोडून इतर कुठेही नव्हतं. त्यांनी फिरायला नकार दिला आणि रिकाम्या वेळात इतर पैलवानांचे सामने बघतो असं सागून ते मैदानाच्या दिशेनं निघाले. किट कुठे ठेवायचं म्हणून ते त्यांनी बरोबर घेतलं.

इतर दोन पैलवानांचा सामना सुरू असताना एक विचित्र गोष्ट घडली. खाशाबांना त्यांचं नाव ध्वनीक्षेपक यंत्रातून ऐकू आलं. खरंतर इंग्रजी समजणं कठीणच होतं. पण, नशिबाने जाधव हे आडनाव त्यांना कळलं. त्यांनी चौकशी केली. तर पुढचा सामना त्यांचा असल्याचं त्यांना कळलं.

जाधव यांच्याबरोबर तेव्हा भारतीय संघातील कुणीही नव्हतं. वेळ तर अजिबात नव्हता. तयार होऊन कुस्तीसाठी उतरायचं हा एकमेव पर्याय होता.

शेवटी जाधव सामन्यासाठी मॅटवर उतरले. नशिबाने पहिला प्रतिस्पर्धी न आल्यामुळे बाय मिळाला. त्यानंतर कॅनडा, मेक्सिको आणि जर्मनीच्या मल्लांवर त्यांनी लीलया मात केली.

तर रौप्यही जिंकलं असतं...

त्या काळात गटवार कुस्तीच्या प्राथमिक फेऱ्या होत असत. त्यानुसार खाशाबांना त्यांच्या गटात पाच सामने खेळायचे होते. पुढची क्वार्टर फायनलची लढत रशियाच्या मेमेदबेयोव्हविरुद्ध होती. हा प्रतिस्पर्धी तगडा आहे याची कल्पना खाशाबांना होती.

मॅचची तयारीही त्यांनी केलेली होती. पण, प्रत्यक्ष मॅटवर ही लढत तासभरापेक्षा जास्त चालली. आणि खाशाबांना 0-3 असा पराभव पत्करावा लागला. काही जाणकारांच्या मते, मॅचमध्ये पंचांचे काही निर्णयही खाशाबांच्या विरुद्ध गेले असा उल्लेख संजय दुधाणे यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

ही मॅरेथॉन लढत खेळून खाशाबा दमले होते. पण, पुढच्या पंधरा मिनिटांत त्यांना पुढची फेरी खेळावी लागली. खरंतर ऑलिम्पिक स्पर्धेत दोन सामन्यांमध्ये किमान अर्ध्या तासाची विश्रांती आवश्यक आहे. स्पर्धेचा तसा नियमच आहे.

पण, हे सगळं नाट्य घडत असताना खाशाबा एकटेच तिथे होते. संघाचे व्यवस्थापक नव्हतेच. त्यामुळे त्यांची बाजू मांडायला कुणी नव्हतंच. शिवाय खाशाबांना इंग्रजी तितकंसं जमत नव्हतं. कुस्ती लढायचं तेवढं त्यांना ठाऊक.

त्यामुळे त्यांनी प्रतिकारही नाही केला. जपानच्या शोहोची इशी या मल्लाबरोबर खेळायला ते मॅटवर उतरले. पण, शरीर इतकं दमलं होतं की थोड्या वेळातच 0-3 असा त्यांचा पराभव झाला. रशियाला सुवर्ण मिळालं आणि भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.

'जर व्यवस्थापक खाशाबांबरोबर असते, त्यांनी बाजू मांडली असती, अगदी पंचांच्या निर्णयावरही जरी दाद मागितली असती तर निकाल कदाचित वेगळा असता. भारताच्या खिशात रौप्य नाहीतर सुवर्णही पडलं असतं.' खाशाबांच्या आयुष्याचा अभ्यास केलेले क्रीडापत्रकार संजय दुधाणे हा प्रसंग काल त्यांच्या डोळ्यासमोर घडला असावा असा तो आपल्यासमोर रंगवतात.

प्रत्यक्षात खाशाबा यांच्या सर्व लढती संपल्यावर अगदी पदक वितरणाचा कार्यक्रम पार पडल्यावर भारतीय संघ परतला. पदक स्वीकारतानाही खाशाबा एकटेच होते. पण, त्यांना प्रसंगाचं महत्त्व होतं. त्यांनी धावत तिरंगा आणला तो आपल्याभोवती गुंडाळला आणि अभिमानाने ते पदक स्वीकारायला गेले.

खाशाबांना पदक का जिंकायचं होतं?

1948 सालचं लंडन ऑलिम्पिक खाशाबा पहिल्यांदा खेळले. त्यानंतर लगेच त्यांनी पुन्हा ऑलिम्पिक खेळायचं ते पदक जिंकण्यासाठीच असं ठरवलेलं होतं. लंडनसाठी तयारी करताना आणि अगदी तिथपर्यंत पोहोचताना त्यांना खूप अडचणी आल्या.

संजय दुधाणे सांगतात, आखाड्यातली मेहनत परवडली. पण, बाहेरची नको, असं खाशाबांना वाटायचं. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिकणारा गावरान गडी तो. घरातच कुस्तीचं बाळकडू मिळालेलं. त्यामुळे लाल मातीची चटक कधी लागली कळलं नाही. मातीतल्या कुस्ती जिंकून गदा पटकावणं त्यांना कधीच कठीण गेलं नाही.

राष्ट्रीय स्तरावर चमकल्यावर सगळ्यांनाच वाटायला लागलं या गड्याने ऑलिम्पिक खेळावं. त्यासाठी मेहनतीबरोबरच आर्थिक मदत लागणार होती. कोल्हापूरच्या महाराजांच्या आशीर्वादामुळे आणि सहकाऱ्यांच्या मदतीमुळे ते शक्य झालं. आणि गडी लंडनला जाणाऱ्या बोटीत बसला. पण, त्या काळात बोटीचा प्रवास दोन महिन्यांचा होता. फक्त खाशाबाच नाही तर इतरही भारतीय खेळाडू (यात सुवर्ण पदक विजेता हॉकी संघही आला) हा प्रवास करून लंडनला पोहोचले.

जीवाची आबाळ करून केलेल्या या प्रवासानंतर अनेकांमध्ये ऑलिम्पिक खेळण्याचे त्राणही नव्हते. खाशाबांच्या प्रकृतीवरही याचा परिणाम झाला. पण, त्याही परिस्थितीत खाशाबांचं लक्ष वेधून घेतलं ते लंडन शहर आणि ऑलिम्पिकमधल्या स्पर्धेच्या स्तराने.

1942च्या छोडो भारत चळवळीत त्यांनी विद्यार्थीदशेत भाग घेतला होता. आता ब्रिटिश राजसत्तेला आपल्या पद्धतीने उत्तर देण्याचा मार्गच त्यांना सापडला होता. शिवाय मातीतली कुस्ती आणि मॅटवरची यातला फरकही कळला होता. मोठ्या स्तरावर पदक जिंकल्याने काय फरक पडेल याचा अंदाज आला. त्या भारावलेल्या अवस्थेत ते लंडनची स्पर्धा खेळले. तिथे जरी ते सहावे आले असले तरी भारतात परतले नवीन स्वप्न घेऊन. कुस्तीचं मैदान मारायचं तेही साता समुद्रा पलीकडे जाऊन हा ध्यास त्यांनी घेतला.

हेलसिंकी ऑलिम्पिकची तयारी

खाशाबा त्यावेळी विद्यार्थी दशेत होते. पण, अभ्यासू होते. स्पर्धेचा अंदाज त्यांना लंडनमध्येच आलेला होता. आता स्पर्धा जिंकण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. गोविंद पुरंदरे यांनी पैलवानावर मेहनतही घेतली. किरकोळ शरीरयष्टीचे खाशाबा बँटमवेट(52 किलो) या तळाच्या वजनी गटात फ्रीस्टाईल कुस्ती खेळत. त्यांचा स्टॅमिना असा की ते अव्याहत खेळू शकत होते. अंगभूत हुशारीने त्यांनी स्वत:ला मॅटसाठी तयार केलं. पैशाची जमवाजमव या विषयाने मात्र त्यांना थकवलं.

हेलसिंकीसाठी पैसे हवे होते. यावेळी त्यांच्या कॉलेजचे प्राचार्य खर्डीकर यांनी राहतं घर गहाण टाकून सात हजार रुपये उभे केले. एका बँकेकडून सहा हजारांचं कर्ज घेतलं आणि त्यातून ही हेलसिंकी वारी शक्य झाली. तिथे पदक जिंकल्यावर मात्र गावकऱ्यांनी कऱ्हाडपासून जन्मगाव गोळेश्वर पर्यंत 151 बैलगाड्यांची मिरवणूक काढली होती.

पदक जिंकलं नंतर....

खाशाबा गरीब शेतकरी कुटुंबातले होते. घरी कुस्तीचं वातावरण होतं. पण, ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर खाशाबांची आबाळच झाली. पोलिस खात्यात त्यांना नोकरी लागली ती पदक विजेत्या कामगिरीनंतर तब्बल चार वर्षांनी. पोलीस दलातही उपनिरीक्षक म्हणून लागले. आणि पुढची 22 वर्षं एकाही बढतीशिवाय त्यांनी काढली.

प्रशिक्षक म्हणून त्यांचा अनुभव उपयोगी पडेल असं सरकारला कधी वाटलं नाही, खाशाबांनी इच्छा दाखवूनही. अखेर 1984मध्ये एका मोटार अपघातात त्यांचं निधन झालं.

त्यांचं मूळगाव गोळेश्वरची हद्द जिथे सुरू होते तिथे एक समाधीस्थळ आहे. खाशाबांच्या पदकाखेरीज ही एकमेव त्यांची स्मृती आहे. दरम्यान बीबीसीशी बोलताना खाशाबांचा पुत्र रणजित जाधव यांनी खाशाबांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळावा अशी मागणी केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)