फुटबॉल मॅच पुरुषांची; मात्र इतिहास घडवला महिलांनी

सौदी अरेबियातल्या महिलांनी पहिल्यांदा मैदानात उपस्थित राहून पुरुषांची फुटबॉलची मॅच बघण्याचा आनंद लूटला. सौदीतल्या महिलांच्या मते, ही बाब सौदी अरेबियासाठी ऐतिहासिक आहे.

जेद्दाह इथल्या मैदानावर होणारी फुटबॉलची मॅच बघण्यासाठी महिलांनी उपस्थिती लावली होती. त्यांना फॅमिली गेटमधून मैदानात प्रवेश देण्यात आला. या महिलांनी फॅमिली सेक्शनमध्ये बसून मॅचचा आनंद लूटला.

सौदी अरेबियासाठी हा एक ऐतिहासिक क्षण ठरला. सौदी अरेबियातल्या महिलांवर अनेक निर्बंध आहेत. यातील काही निर्बंध नुकतेच दूर करण्यात आले आहेत. देशाला अधिकाधिक आधुनिक बनवण्यासाठी इथलं सरकार प्रयत्न करत आहे.

महिलांना पुरुषांच्या फुटबॉल मॅच पाहण्याची परवानगी देणं, हा याच प्रयत्नांचा एक भाग आहे.

या नव्या निर्णयानुसार सौदीमध्ये या महिन्यात एकूण तीन मैदानांवर महिला फुटबॉल मॅच पाहू शकतील.

ऐतिहासिक दिवस

जेद्दाहमधील मैदानात महिला प्रेक्षकांचं स्वागत करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलं होतं. महिलांनी उत्साहानं आपापल्या संघांचं समर्थन केलं.

प्रशंसक महिला आणि कर्मचाऱ्यांनी सौदीचा पारंपरिक पोशाख 'अबाया' परिधान केला होता.

यासंबंधी सोशल मीडियावर चाललेल्या हॅशटॅगचा अर्थ होता, 'महिलांच्या मैदानातील प्रवेशाचं लोक स्वागत करत आहेत.' या हॅशटॅगखाली अवघ्या दोन तासांत हजारो मॅसेज लिहिले गेले.

जेद्दाह येथील 32 वर्षीय रहिवाशी आणि फुटबॉल फॅन असलेल्या लामया खालिद नासिर यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "मला या बाबीचा अभिमान वाटतो आणि मी मॅचचा आनंद लूटत आहे."

"उज्ज्वल भविष्याकडे आमची वाटचाल सुरू आहे यात काही शंका नाही. या बदलांची मी साक्षीदार असल्यानं मला खूप आनंद होत आहे," अशी प्रतिक्रिया नासिर यांनी दिली.

जेद्दाह इथल्याच रुवायदा अली कासिम यांनी सांगितलं की, "सौदी अरेबियात मूलभूत बदलांची सुरुवात झाली आहे. तसंच आजचा दिवस सौदी अरेबियासाठी ऐतिहासिक आहे."

सौदीमध्ये महिलांवर कडक निर्बंध

सौदी सरकारनं गेल्या आठवड्यात महिलांना पुरुषांच्या फुटबॉल मॅच बघण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. शनिवारी आणि पुढच्या गुरुवारी होणाऱ्या मॅच बघण्यासाठीही महिला जाऊ शकतील, असं सरकारनं जाहीर केलं होतं.

सरकारच्या या निर्णयानंतर या सामन्यापूर्वी फुटबॉल संघांनी महिलांनी मॅच पाहण्यासाठी यावं, यासाठी ट्विटरवर मोहीम राबवली होती.

सौदी अरेबियाचा शाही परिवार आणि देशातील विविध धार्मिक प्रतिष्ठानं 'वहाबियत'चं पालन करतात. त्यामुळे सौदीमध्ये कपडे आणि वर्तणुकींचे नियम फार कठोर आहेत.

सौदी अरेबियात महिलांना एकटीनं प्रवास करण्याची मुभा नाही. प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत परिवारातील एक पुरुष सदस्य असणं गरजेचं आहे.

बहुतेक रेस्टॉरंट आणि कॅफेमध्ये दोन विभाग असतात. एक पुरुषांसाठी आणि दुसरा कुटुंबासाठी. महिलांना कुटुंबीयांसाठी असलेल्या विभागात पती किंवा कुटुंबातील इतर सदस्यांसोबत जाण्याची परवानगी असते.

सौदी अरेबियात आजही अशा अनेक बाबी आहेत ज्यासाठी महिलांना कुटुंबातील पुरुषांची परवानगी घ्यावीच लागते.

पासपोर्टसाठी अर्ज करणं, विदेश यात्रेवर जाणं, लग्न करणं, बँकेत खातं उघडणं, एखादा व्यापार सुरू करणं आदींचा यात समावेश आहे.

या सुधारणा म्हणजे सौदी अरेबियाला आधुनिक बनवण्यासाठी सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी सुरू केलेल्या प्रक्रियांचा एक भाग आहे.

महिलांसाठी कारची स्वतंत्र शोरूम

सौदी अरेबियात शुक्रवारी आणखी एक बदल बघायला मिळाला. निव्वळ महिला ग्राहकांसाठीची पहिली कार शोरूम जेद्दाहमध्ये सुरू करण्यात आली आहे.

यावर्षीच्या जून महिन्यापासून महिलांना कार चालवण्याची परवानगीही मिळणार आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात हा निर्बंध हटवण्याचं जाहीर करण्यात आलं होतं.

सलमान यांच्या कल्पनेतूनच देशातील मनोरंजन क्षेत्रानं प्रगती करावी यासाठी डिसेंबर महिन्यात सौदीमधील सिनेमांवरील बंदीसुद्धा उठवण्यात आली आहे.

पण या प्रयत्नांना धर्मगुरू आणि समाजातील संकुचित वृत्तीच्या लोकांचा विरोधही होत आहे. या प्रकारच्या निर्णयांमुळे सौदीतील नागरिकांतील नीतिमत्ता खालावेल तसंच या निर्णयांमुळे इस्लामबद्दलचं आकलन आणि राष्ट्रीय ओळख यांना आव्हान दिलं जातं आहे, असं त्यांचं मत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)