फेसबुक न्यूजफीडमध्ये आता माध्यमांपेक्षा मित्रांच्या पोस्ट जास्त दिसणार

नववर्षात 'फेसबुक स्वच्छता अभियाना'चा संकल्प घेतल्यानंतर फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी आता फेसबुकच्या न्यूजफीड मध्ये मोठा बदल घडवून आणणार आहे.

व्यवसायांच्या पोस्ट्स आणि न्यूज मीडियाने टाकलेल्या पोस्टला या नव्या न्यूजफीडमध्ये कमी प्राधान्य असेल. त्याऐवजी नातेवाईक आणि मित्रांनी टाकलेल्या पोस्ट आपल्याला अधिक प्रमाणात पाहायला मिळतील, असं झुकरबर्ग यांनी म्हटलं आहे. ज्या पोस्टमुळं एकमेकांसोबत आपला संवाद वाढू शकेल, अशा पोस्ट जास्तीत जास्त दिसतील, असं ते म्हणाले आहेत.

सध्या ज्या पोस्टला लोकांची अधिक पसंती मिळते, शेअर किंवा कमेंट मिळतात, त्याच पोस्ट आपल्याला आपल्या न्यूजफीडमध्ये अधिक दिसतात. ही पद्धत बदलून आपल्या नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या पोस्टला प्राधान्य दिलं जाणार आहे.

व्यावसायिक आणि माध्यमांच्या पोस्ट वारंवार न्यूजफीडवर येऊ लागल्यामुळं फेसबुकच्या लोकप्रियतेला फटका बसल्याची कबुली फेसबुकनं दिली. आता, एखाद्या ब्रॅंडनी किंवा माध्यमांनी पोस्ट केली असेल आणि त्यावर लोक चर्चा करत असतील, तरच ती पोस्ट पुढे प्रमोट केली जाईल, असं फेसबुकनं म्हटलं आहे.

"या नव्या पद्धतीमुळं लोक फेसबुकवर कमी वेळ राहण्याचा धोका आहे. पण फेसबुकवर घालवलेला वेळ सत्कारणी लागेल," असं झुकरबर्ग म्हणाले. ही नवी पद्धत लागू होण्यासाठी काही आठवड्यांचा वेळ लागणार आहे.

तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे यावर?

"हा निश्चितच मोठा बदल आहे," असं हार्वर्ड विद्यापीठातल्या नीमन जर्नलिझम लॅबच्या लॉरा हझार्ड ओवेन यांचं म्हणणं आहे. "याचा फटका प्रकाशन उद्योगातल्या लोकांना बसणार आहे. यापुढं माध्यमांनी टाकलेल्या पोस्ट खूप कमी प्रमाणात दिसतील," असं त्या म्हणाल्या.

"हे नवं धोरण नेमकं कोणत्या पद्धतीवर अवलंबून असेल याबाबत स्पष्टता नाही," असं ओवेन यांनी म्हटलं आहे. "ज्या विषयावर जास्त चर्चा होईल अशा पोस्ट समोर येतील, असं फेसबुक म्हणतंय. पण यामुळं ज्या विषयावर वाद-विवाद होत आहे, त्याच पोस्ट समोर येण्याची शक्यता आहे," अशी भीती ओवेन यांनी व्यक्त केली.

"गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर लोक नाराज आहेत," असं युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाच्या पत्रकारिता विभागाचे प्राध्यापक गॅबरिल काहन यांनी म्हटलं आहे.

"एकेकाळी फेसबुकवर मैत्रीपूर्ण आणि घरगुती वातावरण असायचं. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांची ही ओळख पुसट होत चालली आहे. आपली जुनी ओळख परत मिळवण्यासाठी फेसबुक प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे," असं काहन यांनी म्हटलं.

समाजाच्या जडण-घडणीवर फेसबुकचा मोठा प्रभाव पडत आहे, अशी कबुली झुकरबर्ग यांनी या आधी दिली आहे, याची आठवण काहन यांनी करून दिली.

फेसबुकच्या नव्या धोरणामुळं चर्चेचं स्वरूप बिघडू शकेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे फेसबुकनं आपली नवी प्रक्रिया पारदर्शक ठेवायला हवी, असं काहन यांनी म्हटलं.

बीबीसीचे तंत्रज्ञान प्रतिनिधी डेव्ह ली यांचं विश्लेषण

बऱ्याच अंशी फेसबुक आपल्या मूळ धोरणाकडं परतत आहे, असं दिसतंय. आपल्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी काय लिहिलं आहे, याला आता जास्त महत्त्व राहील. मित्रांनी शेअर केलेल्या लिंकपेक्षा त्यांनी लिहिलेल्या किंवा मत प्रदर्शित केलेल्या पोस्टला प्राधान्य दिलं जाणार आहे. हे योग्यच आहे.

फेसबुकच्या या नव्या धोरणामुळं फेसबुकमध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. लोकांनी जास्तीत जास्त काळ फेसबुकवर थांबावं, असं फेसबुकचं धोरण होतं. पण या नव्या धोरणामुळं लोक कमी काळ फेसबुकवर थांबतील, हे माहीत असूनदेखील झुकरबर्ग यांनी हा निर्णय घेतला आहे.

मागचं वर्ष फेसबुकसाठी जरा कठीणच गेलं. खोट्या बातम्या पसरवण्यासाठी लोकांनी फेसबुकचा वापर केला. यातून झुकरबर्ग यांनी धडा घेतलाय, असं दिसत आहे.

विश्वासार्हता नसलेल्या बातम्या फेसबुकच्या माध्यमातून फिरत असल्यामुळं फेसबुकला फायद्यापेक्षा नुकसानच अधिक होत आहे. या नव्या धोरणाचा फटका न्यूज वेबसाइट आणि माध्यम समूहांना बसणार आहे.

न्यूज वेबसाइटला बहुतांश ट्राफिक फेसबुकच्या माध्यमातून मिळतं. त्यातून फेसबुकला प्रमोशनचे पैसे मिळतात. फेसबुकचं उत्पन्न यामुळं घटेल, असा एक अंदाज आहे, पण नेमकं ते किती कमी होईल, हाच खरा प्रश्न आहे.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)