You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुलांसाठी शाळेत जायला त्यानं स्वत: बांधला 8 किमी रस्ता!
त्याचं नाव जालंधर नायक. वय 45 वर्षं. ते राहतात ओडिशातल्या एका दुर्गम गावात.
त्यांची तीन मुलं गावापासून 10 किमी अंतरावर असलेल्या निवासी शाळेत शिकतात. पण घरी यायचं तर, त्यांना मोठा कठीण प्रवास करावा लागायचा.
या मार्गावर त्यांना एक-दोन नव्हे तर पाच टेकड्या ओलांडून यावं लागायचं. म्हणून त्या मुलांना शाळा असलेल्या गावातच राहावं लागायचं. पण मुलांपासून दूर वडिलांचा जीव मानेना.
मग त्यांनीच कुदळ आणि पहार हाती घेतली आणि त्यांच्या मुलांचं घरी येणं सोपं व्हावं म्हणून रस्ता तयार केला.
गेली दोन वर्षं, रोज सकाळी हत्यारं घेऊन जालंधर घरातून निघायचे. जवळजवळ आठ तास त्याचं काम चालायचं. दगडधोंडे हटवायचे आणि रोज थोडा थोडा रस्ता तयार करायचा.
असं करत करत अखेर त्यांनी 8 किमीचा खडतर रस्ता मुलांसाठी सोयीचा केला... सगळं काही एकट्याने करत!
"एकदा का हा रस्ता तयार झाला की माझ्या मुलांना आठवड्याच्या अखेरीस किंवा सुटीच्या दिवशी घरी येणं सोपं होईल," असं जालंधर यांनी स्थानिक पत्रकारांना सांगितलं.
उरलेला रस्ता...
शाळेचं गावापासून नायक यांचं गाव 15 किमी दूर. आता त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत, "आता उरलेला 7 किमी रस्ता आम्ही बनवू," असं स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं.
आता हे काम सरकारी अधिकाऱ्यांनी हाती घेतलं आहे आणि जालंधर यांना त्यांनी केलेल्या कामाचे पैसेही द्यायचं ठरवलं आहे.
"सरकार हे काम पूर्ण करत आहे, याचा आनंदच आहे. आता त्यांनी गावात वीज आणि पाण्याचीही सोय करावी," असं जालंधर म्हणतात.
वीज आणि पाणीही द्या
आपण कधीही सरकारकडे मदत मागितली नव्हती. गेल्या महिन्यात याची बातमी झाली तेव्हा त्यांना कळल्याचं जालंधर म्हणाले.
"रस्ता तयार करत असताना त्यांनी एकाही झाडाचं नुकसान होऊ दिलं नाही, हे विशेष," असं जालंधर यांच्या कामाची पहिल्यांदा बातमी करणारे पत्रकार शिवशक्ती बिस्वाल यांनी सांगितलं.
जालंधर यांनी इतका चांगला रस्ता केला आहे की त्यावरून गाड्याही जाऊ शकतील, असंही बिस्वाल म्हणाले.
काही माध्यमांनी जालंधर यांच्या या कामाची तुलना बिहारच्या दशरथ मांझी यांच्याशी केली आहे. मांझी यांनी एकट्यानं डोंगर खोदून जवळच्या गावाला जाण्यासाठी रस्ता तयार केला होता. त्यांच्या या कामावर आधारित एक चरित्रपटही 2015 साली आला होता, ज्यात नवाजउद्दीन सिद्दीकी यांनी मांझी यांचं पात्र साकारलं होतं.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)