आंचल ठाकूरनं भारताला दिलं स्कीइंगमधलं पहिलं पदक

हिमाचल प्रदेशच्या आंचल ठाकूर आंतरराष्ट्रीय स्कीइंग स्पर्धेत भारताला पदक मिळवून देणारी पहिली व्यक्ती ठरली आहे.

आंतरराष्ट्रीय स्की फेडरेशननं तुर्कस्तानात आयोजित केलेल्या अल्पाइन एडर 3200 या स्पर्धेत आंचलनं ब्राँझ मेडल जिंकलं आहे.

बीबीसी हिंदीशी बोलताना आंचलनं सांगितलं की, तिच्यासाठी हा अविश्वसनीय विजय होता.

"मी स्पर्धक म्हणून उतरले तेव्हाच टर्कीमध्ये आश्चर्याने अनेकांनी विचारलं होतं की, भारतात हिमवर्षाव तरी होतो का? त्यांना मी उत्तर दिलं की, भारतात हिमालय आहे, तर हिमवर्षाव होणारच!..." पदक जिंकल्यानंतर बीबीसीशी बोलतना मनालीची रहिवासी असलेली आंचल सांगत होती.

स्कीइंगसारख्या हिवाळी खेळांना भारतात फार महत्त्व मिळत नाही, कारण फार थोड्या भागात बर्फ पडतं.

पंतप्रधानांनी ट्विटरद्वारे सर्वप्रथम आंचलचं कौतुक केलं. आंचलच्या ऐतिहासिक कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

बुधवारपासून आंचल ठाकूर हे नाव ट्विटरवर ट्रेंड करत होतं. केंद्रीय क्रीडा मंत्री राजवर्धन राठोडसहित हजारो भारतीयांनी सोशल मीडियावरून तिचं अभिनंदन केलं आहे.

आंचलच्या कामगिरीमुळं देशात हिवाळी क्रीडा प्रकारांना वाव मिळेल, असं तिचे वडील रोशन ठाकूर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

"पंतप्रधान आणि केंद्रीय क्रीडामत्र्यांनी ट्वीट करून अभिनंदन केल्याचं मी पाहिलं आहे. ही खूपच सकारात्मक बाब आहे. यामुळं अधिक लोक हिवाळी खेळात भाग घेतील," असं ते म्हणाले.

रोशन ठाकूर विंटर गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (WGFI) सरचिटणीस म्हणून काम पाहतात.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)