कुस्तीपटू आंदोलन : लैंगिक छळाविषयी भारतीय महिला खेळाडू बोलत का नाहीत?

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

“आमचं जीवन, आमचा खेळ, आमचं कुटुंब... हे सगळं पणाला लावून आम्ही इथे आलो आहोत. खेळाडूंना न्याय मिळावा यासाठी तीन महिन्यांपासून एवढ्या मानसिक त्रासातून जातो आहोत. हा महिला खेळाडूंच्या सन्मानाचा प्रश्न आहे. आम्हीच सुरक्षित नसू तर बाकीच्या मुलींविषयी काय सांगणार?”

हा उद्विग्न प्रश्न विचारला आहे भारताची लोकप्रिय पैलवान विनेश फोगाटनं. तिच्यासह ऑलिंपिक पदकविजेते पैलवान साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी 23 एप्रिलला नवी दिल्लीत पुन्हा एकदा धरणं आंदोलन सुरू केलं.

खरंतर याआधी 18 जानेवारीला या तिघांनी आंदोलन केलं होतं आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप लावले होते. बृजभूषण यांच्याविषयी किमान 10 महिला पैलवानांनी आपल्याकडे केली असल्याचा आरोप विनेशनं केला होता.

त्यामुळे भारतीय क्रीडाविश्वात खळबळ उडाली होती आणि काहींनी तर खेळांमधला ‘Me Too’ क्षण असल्याचंही म्हटलं होतं. तर बृजभूषण यांनी आपल्यावरचे सर्व आरोप नाकारले.

पण आरोपांचं गंभीर स्वरुप पाहता क्रीडा मंत्रालयानं हस्तक्षेप केला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली. तपास पूर्ण होईपर्यंत बृजभूषणना कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदापासून दूर राहण्यास सांगण्यात आलं.

पण तीन महिन्यांनंतरही काही कारवाई झालेली नाही असं खेळाडूंचं म्हणणं आहे आणि न्याय मिळेल की नाही याविषयी त्यांना आता शंका वाटते आहे.

या सगळ्यामध्ये एक जुनी चर्चा पुन्हा सुरू झाली - विनेश किंवा इतर महिला पैलवान याविषयी याआधी काही का बोलल्या नाहीत?

‘तिनं आधीच आवाज का उठवला नाही?’ हा प्रश्न खरंतर दरवळी एखाद्या महिलेनं लैंगिक छळाविरोधात आवाज उठवला, की विचारला जातो. मग ती जगभरात कुठेही राहणारी असो.

अशा प्रकारे शोषणाविषयी बोलणं अजिबात सोपं नसतं, असं मानसशास्त्रज्ञ आणि कार्यकर्त्यांनीही याआधी अनेकदा निदर्शनास आणून दिलं आहे.

पण तज्ज्ञांच्या मते, भारतीय खेळांची ‘इको सिस्टिम’ अशी आहे, की महिला खेळाडूंना काही बोलणं आणखीनच कठीण होऊन जातं.

खेळातल्या सत्तेचं राजकारण

भारतात बहुतांश क्रीडा संघटनांच्या अध्यक्षपदी पुरुष आहेत आणि ते एकतर राजकारणी, सरकारी अधिकारी किंवा श्रीमंत व्यावसायिक आहेत, हे उघड वास्तव आहे.

केवळ राष्ट्रीय स्तरावरच नाही, तर स्थानिक पातळीवरही क्रीडा संघटनांमध्ये महत्त्वाच्या जागांवर साधारणपणे अशाच ताकदवान पुरुषांचं वर्चस्व दिसून येतं.

याचा कसा परिणाम होतो, याविषयी एका वेटलिफ्टरनं नाव न घेण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं. ती म्हणते, “जेव्हा आरोप ठेवलेली व्यक्ती शक्तीशाली असते, तेव्हा त्यांच्याविरोधात कोणी कारवाई करणार नाही असंच सगळ्यांना वाटतं.”

ती पुढे सांगते, “असे राजकारणी किंवा प्रभावशाली व्यक्ती खेळाच्या सुविधा उभारण्यासाठी मदत करू शकतात आणि खेळासाठी ‘सिस्टिम’ला कामाला लावू शकतात. पण त्यातल्या काहींना संघटना म्हणजे जणू त्यांच्या मालकीचं संस्थान वाटतं. खेळाडू नोकर असल्यासारखे ते वागतात. अशा पुरुषांविरोधात उभं राहणं कधीच सोपं नसतं. "

त्यातही एखादीनं विरोध केला तर परिणाम काहीही होऊ शकतो – टीममधून तुम्हाला बाहेर केलं जाऊ शकतं, ज्याचा परिणाम खेळाडूच्या कारकीर्दीवर आणि मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. या वेटलिफ्टरनं खेळणंच बंद करायचं ठरवलं.

केवळ क्रीडासंघटकच नाही, तर प्रशिक्षक, मेंटॉर, कोच यांच्याकडूनही खेळाडूंना अशा वागणुकीचा सामना करावा लागू शकतो.

इंडियन एक्सप्रेसनं जमा केलेल्या माहितीनुसार, ‘सन 2010 ते 2020 या कालावधीत स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडे लैंगिक छळाविषयी 45 तक्रारी आल्या होत्या, त्यातल्या 29 तक्रारी प्रशिक्षकांविरोधात होत्या.’ पण त्यांच्याविरोधात अगदी मामुली कारवाई करण्यात आळी. पाच प्रशिक्षकांना दंड ठोठावण्यात आला, एकाला निलंबित करण्यात आलं आणि दोघांसोबतचा करार रद्द करण्यात आला.

बहुतांश तज्ज्ञांना वाटतं की कोचिंग आणि सपोर्ट स्टाफमध्ये महिलांची संख्या वाढली, तर खेळांचं वातावरण महिलांसाठी आणखी सुरक्षित होऊ शकेल. पण सध्या अनेक ठिकाणी महिला प्रशिक्षकांचीही कमतता आहे.

हाच मुद्दा ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्सच्या प्रशिक्षक वर्षा उपाध्ये मांडतात. जिम्नॅस्टिक्समध्ये सरावादरम्यान प्रशिक्षकांना कधीकधी खेळाडूंच्या शरीराला स्पर्श करावा लागतो – म्हणजे एखाद्या कसरतीत योग्य पोश्चर (शरीराची स्थिती) कसं असावं हे दाखवण्यासाठी प्रशिक्षकांना असं करावं लगू शकतं.

त्यामुळेच खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यात विश्वासाचं नातं असणं आणि दोघांनीही ते जपणं महत्त्वाचं असतं.

वर्षा सांगतात, “साधारणपणे असा संकेत आहे की, जर एखादा पुरुष प्रशिक्षक असेल तर तिथे सहकारी म्हणून महिला प्रशिक्षक हजर असायला हव्यात. पण अनेकदा असे नियम पाळलेच जात नाहीत. ”

“प्रशिक्षकांनीही लक्षात घ्यायला हवं की आता काळ बदलला आहे आणि ही ‘व्यायामशाळा’ संस्कृती राहिलेली नाही, जिथे प्रशिक्षक म्हणतील ते खरं ठरायचं.”

तक्रार समित्यांचं काय?

एखाद्या महिला खेळाडूनं धाडस केलं आणि तिला सहन कराव्या लागलेल्या लैंगिक छळाविरोधात बोलायचं ठरवलं, तरी तिनं तक्रार नेमकी कुठे करायची? यासाठी फारसे पर्याय उपलब्ध नाहीत आणि आहेत त्यांच्यावरही मर्यादा आहेत.

खरंतर 2011 सालच्या नॅशनल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट कोड ऑफ इंडिया या नियमांनुसार, ‘खेळांत महिलांना सुरक्षित वाटेल, असं वातावरण तयार करणं, ही क्रीडा संघटनांची जबाबदारी आहे..’

खेळाडूंना तक्रार दाखल करता येईल अशी व्यवस्था म्हणजे इंटर्नल कंप्लेंट्स कमिटी (IC कमिटी) स्थापन करणं क्रीडा हे संघटनांसाठी बंधनकारक आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी महिला असायला हवी, त्यातल्या 50 टक्के सदस्य या महिला असायला हव्यात आणि या समितीत एक बाहेरील सदस्य म्हणून महिलांच्या अधिकारांसाठी काम करणाऱ्या संस्थेतील व्यक्तीचा समावेश असायला हवा, असं नियम सांगतात.

पण, बहुतांश क्रीडा संघटनांनी अशा समित्या स्थापन केलेल्या नाहीत. ज्यांनी समित्या स्थापन केल्या आहेत त्यातही नियमांचं पालन झालेलं नाही. तसंच काहींचा अपवाद वगळता क्रीडा संघटनेच्या वेबसाईटवर या IC समितीत कोण आहे, किंवा कुणाला संपर्क करावा याविषयीची माहिती दिलेली नाही.

फेब्रुवारी 2023 च्या नोंदीनुसार भारतीय कुस्ती महासंघाच्या समितीमध्ये केवळ एकच महिला सदस्य आहे.

क्रीडा संघटनांमध्येच असलेल्या या अनास्थेचं वर्णन एका नेमबाजी प्रशिक्षकांनी अगदी नेमक्या शब्दांत केलं आहे. त्या म्हणतात की, अशी समिती असणं “हे बंधनकारक आहे, मात्र भारतातल्या इतर अनेक गोष्टींप्रमाणेच याचं पान केलं जात नाही. पण मला वाटतं की (पूर्वीच्या तुलनेत) आता अधिकाधिक संघटना याविषयी जागरूक होऊ लागल्या आहेत.”

त्यांच्या मते या जागरुकतेचा परिणाम खेळापलीकडे इतर क्षेत्रांतही होऊ लागला आहे.

अर्जुन पुरस्कार विजेते आणि माजी ऑलिंपियन अ‍ॅथलीट आदिल सुमारीवाला यांचंही मत आम्ही जाणून घेतलं. सुमारीवाला हे आता अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत आणि खेळातल्या तसंच क्रीडासंघटनांमधल्या गणितांची त्यांना चांगली जाण आहे.

आदिल सांगतात, “मी याला सेफगार्ड्स पॉलिसी (संरक्षणात्मक धोरण) म्हणतो कारण यात सर्वांचा समावेश आहे आणि स्त्रिया आणि लहान मुलांच्या सुरक्षेला आम्ही प्राधान्य देतो आहे. आमच्या धोरणात अशीही तरतूद आहे जिथे एखाद्यानं खोटा आळ घेतला किंवा काही द्वेषातून आरोप केला असं सिद्ध झालं तर त्या व्यक्तीवरही कारवाई केली जाते.”

केवळ प्रशिक्षकच नाही तर खेळांच्या प्रशासनातही अधिकाधिक महिलांचा समावेश व्हायला हवा, असंही आदिल नमूद करतात.

ते सांगतात “क्रीडा प्रशासकांनी विश्वासाचं वातावरण तयार करणं अत्यंत गरजेचं आहे कारण खेळाडू आणि क्रीडा संघटना यांच्यातलं नातं सर्वात महत्त्वाचं आहे.”

‘एकमेकींसाठी उभं राहण्याची गरज’

खेळाडू अनेकदा ध्येयावर लक्ष केंद्रीत करून जगत असतात, सतत मोठ्या स्पर्धेचा सामना करत असतात. त्यामुळे खेळातलं जगणं एकाकी होऊ शकतं. अशात तुम्ही स्वतःचं संरक्षण करेल असं ‘सेफ्टी नेट’ स्वतःच उभारायला हवं, असं भारताच्या एका माजी ऑलिंपियन नेमबाजानं बीबीसीशी बोलताना सांगितलं.

ती म्हणाली, “नेमबाजीच्या जगात माझ्या मित्र मैत्रिणींशी माझं नातं कायम घट्ट राहिलं आहे. आम्ही स्पर्धा करायचो, पण एकमेकांसाठी उभं राहायचो. मला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल, तर मी त्यांच्याशी बोलायचे. त्यामुळे मलाच बळ मिळायचं, कारण काही प्रत्युत्तर द्यायची वेळ आली तर मला त्यांची सोबत व्हायची.”

पण आता खेळांत स्पर्धा वाढली, तसे नातेसंबंध बदलले आहेत असंही तिचं मत आहे. “महिलांना ‘सिस्टरहूड’ची गरज असते. तुम्ही एकमेकींशी बोललात, एकत्र आवाज उठवलात तर काही कारवाई केली जाण्याची शक्यता जास्त असते.”

पण सगळ्याच महिला खेळाडूंना असं मैत्रिणींचं नेटवर्क मिळणं शक्य नसतं.

खेळातली आक्रमकता अत्याचाराचं कारण?

यापलीकडे, खेळात आक्रमकतेचा मुद्दाही आहेच. आता आक्रमकता हा खरंतर खेळाचा भागच आहे. पण केवळ अशा वृत्तीवर भर देणं, म्हणजे दादागिरी, गुंडगिरीला प्रोत्साहन देण्यासारखं आहे, ज्यातून पुढे लैंगिक छळवणूकही होऊ शकते.

स्वित्झर्लंडमध्ये राहणाऱ्या आणि खेळाडूंच्या अधिकारांसाठी काम करणाऱ्या पयोष्णी मित्रा यांना हाच मुद्दा अतिशय महत्त्वाचा वाटतो.

पयोष्णी सांगतात, “केवळ लैंगिक छळच नाही तर एकूणच सत्तेत असलेल्या लोकांचा उद्धटपणा, गैरवर्तन हे सामान्य असल्याचं मानलं जातं. विनेश, साक्षी आणि बजरंग मीडियाशी बोलत होते, तेव्हा याच गोष्टीकडे माझं लक्ष गेलं.

“खेळात एक प्रकारची उतरंड आहे जिच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं आणि त्यातून सत्तेचा गैरवापर कसा होतो हे समजून घ्यायला हवं. आघाडीचे खेळाडू समोर येऊन याविषयी बोलत आहेत, ही मोठी गोष्ट आहे,” असं पयोष्णी यांनी NDTV ला सांगितलं आहे.

महिला खेळाडूंकडे समर्थ नायिका, ज्यांना काहीही अशक्य नाही अशा व्यक्ती म्हणून पाहिलं जातं. पण त्या माणूस आहेत हेही समजून घ्यायला हवं.

बरं, फक्त भारतातच असं घडतंय असंही नाही.

2018 साली यूएस जिम्नॅस्टिक्स टीमचा डॉक्टर लॅरी नासर याला महिला खेळाडूंच्या लैंगिक छळाप्रकरणी 175 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. दीडशेहून अधिक जिम्नॅस्ट्सनी त्याच्या विरोधात तक्रार केली होती.

नासर यांच्या खटल्यानं पुन्हा एकदा हे दाखवून दिलं, की अगदी अमेरिकेतल्या पूर्णपणे व्यावसायिक स्तरावरील खेळातही खेळाडूंना लैंगिक छळाचा सामना करावा लागू शकतो. तेही अशा व्यक्तींकडून, ज्यांच्यावर या खेळाडूंची काळजी घेणं, त्यांना मार्गदर्शन करणं, प्रशिक्षण देणं अशी जबाबदारी असते.

अशा खेळाडूंवर किती दबाव असतो, ज्यामुळे त्या बोलू शकत नाहीत? याविषयी ऑलिंपिक पदकविजेती स्टार अमेरिकन जिम्नॅस्ट सिमोन बाईल्सनं भाष्य केलं होतं.

अमेरिकेतील एनबीसी वाहिनीवरच्या ‘द टुडे शो’ला दिलेल्या मुलाखतीत सिमोन म्हणाली होती, "मला वाटतं आम्ही खेळाडू गोष्टी एका कप्प्यात बंद करण्यात पटाईत असतो. त्यामुळे आम्ही अशा घटना बाजूला सारतो, कारण इतर कुणी असा काही विचार करावा किंवा आम्ही त्यावर काही विचार करावा असं आम्हाला वाटत नाही."

चांगली कामगिरी करण्यासाठी असलेला दबावही महिला खेळाडूंना लैंगिक छळाविषयी बोलण्यापासून रोखू शकतो.

नेमका किती दबाव असतो खेळाडूंवर? वर्षा उपाध्ये सांगतात, “यातल्या अनेक मुली गरीब किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातल्या आहेत. त्यांच्यासाठी खेळ हे त्या गरीबीतून बाहेर पडण्याचंही एक साधन असतं. खेळातून तुम्हाला नोकरी वगैरे मिळू शकते आणि आपलं आयुष्य असं पणाला लावणं त्यांना परवडणारं नसतं. त्यामुळे त्या तक्रार करत नाहीत..”

वर्षा पुढे सांगतात, “जिल्हापातळीपासूनच दबावाची सुरुवत होते. पालकही खूप महत्त्वाकांक्षी झाले आहेत आजकाल. आपल्या मुलीनं हे जिंकायलाच हवं असा त्यांचा आग्रह असतो. त्यामुळे कधीकधी तेही अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. पालकांनी हे लक्षात घ्यायला हवं की एक मर्यादा असते जी ओलांडता येत नाही. कोच आणि खेळाडू हे एक प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक नातं आहे आणि या नात्याचं ते प्रोफेशनल स्वरूप टिकवून ठेवायला हवं.”

आता महिला पैलवान बोलत आहेत आणि त्यामुळे याबाबतीतल्या अगदी मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधलं गेलं आहे. यातून काही चांगलं घडेल, अशी आशा वर्षा यांना वाटते आहे.

पण सध्या खेळाडूंना परिणामांचीही चिंता वाटते आहे. दिल्लीत पहिल्या आंदोलनादरम्यान विनेशनं भीती बोलून दाखवली होती. तिनं सांगितलं होतं की, “मी पंतप्रधानांकडे छळवणुकीविषयी तक्रार केल्यापासून मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. मी आज उघडपणे बोलले आहे, उद्या मी जीवंत असेन की नाही हे मला माहिती नाही.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)