You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BBC ISWOTY: महिला खेळाडूंसाठी कोणतीही 'एक्स्पायरी डेट' नसते - पी. टी. उषा
आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटवण्यासाठी पी. व्ही. सिंधू आणि एम. सी. मेरी कोम भारताच्या सर्वोत्तम आशा आहेत, असं मत क्रीडापटू पी. टी. उषा यांनी व्यक्त केलं.
'बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार' 2020 च्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
टोकियो येथे होणाऱ्या आगामी ऑलिम्पिक स्पर्धेबाबत पी.टी.उषा यांना विचारले असता त्यांनी सांगितले, "पी. व्ही. सिंधू आणि एम. सी. मेरी कॉम भारतासाठी सुवर्ण पदक जिंकू शकतात. सिंधू यांनी आधीही या स्पर्धेत पदक पटकावले आहे त्यामुळे यावेळी त्या सुवर्ण पदक जिंकतील, असं वाटतं. मेरी कॉम यांनीही सातत्याने चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे त्यांच्यासाठीही चांगली संधी आहे."
'इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकनं आज जाहीर करण्यात आली. दिल्ली येथे व्हर्च्युअल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही नामांकनं प्रसिद्ध करण्यात आली. भारतीय महिला खेळाडूंच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.
द्युती चंद (अॅथलेटिक्स), कोनेरू हंपी (बुद्धिबळ), मनू भाकेर (नेमबाजी-एअरगन शूटिंग), रानी (हॉकी), विनेश फोगाट (कुस्ती-फ्रीस्टाईल रेसलिंग) या पाच खेळाडूंची पुरस्काराच्या नामांकनासाठी निवड करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेत पी. टी. उषा आणि पॅराबॅडमिंटन चॅम्पियन मानसी जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर-2020 या पुरस्कार सोहळ्यातून भारतातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे.
या माध्यमातून भारतातील महिला खेळाडूंच्या प्रेरणादायी कहाण्या सगळ्यांसमोर येणार आहेत. खेळाच्या दुनियेतील वेगवेगळ्या प्रकारांत नाव कमावणाऱ्या उदयोन्मुख महिला खेळाडूंनाही यामुळे प्रेरणा मिळणार आहे.
या पुरस्कारासंदर्भातील व्हर्च्युअल पत्रकार परिषदेला आज (8 फेब्रुवारी) वेगवेगळ्या भाषांमधील क्रीडा पत्रकार उपस्थित होते.
डिटिजल विश्वात भारतीय महिला क्रीडापटूंना किती स्थान मिळतं, असं विचारल्यावर मानशी जोशी यांनी म्हटलं, "महिला खेळाडूंविषयी इंटरनेटवर खूप कमी गोष्टी लिहिल्या जातात. यातील त्यांची टक्केवारी खूप कमी आहे. आपण माणूस म्हणून महिला खेळाडूंचा संघर्ष आणि त्यांच्या कामगिरीविषयी खूप बोललं पाहिजे जेणेकरून हा गॅप भरून काढला जाईल."
ती पुढे म्हणाली, "बीबीसीच्या उपक्रमामुळे महिला खेळाडूंविषयी लोकांमधील जागरुकतेत भर पडत आहे. यामुळे मी जो खेळ खेळते, पॅरा बॅडमिंटन या खेळाविषयी लोकांमधील जिज्ञासा अजून वाढीस लागेल."
गेल्या काही वर्षांत खेळात काय बदल झाले याविषयी बोलताना पी. टी. उषा यांनी भारतासाठी मिळवलेल्या पदकावेळची परिस्थिती आणि आता खेळाडूंना कोणत्या सुविधा मिळत आहेत याची तुलना केली.
त्यांनी म्हटलं, "जेव्हा मी खेळत होते, तेव्हा मोठ्या प्रमाणावर सुविधा नव्हत्या आणि परदेशासोबत संपर्क नसल्यामुळे मी पदक गमावलं. आता त्यात सुधारणा होत आहे. परदेशी प्रशिक्षक आमच्या खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत. खेळाडूंना आता चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत, पण अजून यावर काम करण्याची गरज आहे. मला वाटतं की प्रत्येक शाळेत किमा खेळण्यासाठी किमान एक ट्रॅक किंवा कोर्ट असावं."
खेळाडू महिलांसाठी एखादी एक्स्पायरी डेट असते का, असा प्रश्न सहभागींपैकी एक जणांनी विचारला. कारण, लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात अनेक बदल होतात. तिला वैयक्तिक आयुष्य आणि खेळ या दोहोंमध्ये समतोल साधावा लागतो. या प्रश्नाला पी.टी. उषा यांनी त्यांच्या स्वत:च्या अनुभवानुसार उत्तर दिलं.
त्यांनी म्हटलं, "मला नाही वाटत की, महिलांना कोणती एक्स्पायरी डेट असते. 1976-77 दरम्यान मी माझी कारकीर्द सुरू केली. 1990 पर्यंत मी खेळात सक्रीय होते. मी 102 आंतरराष्ट्रीय पदकं जिंकली. त्यानंतर मी माझं स्पोर्ट्स स्कूल सुरू केलं आणि त्या माध्यमातून 7 आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले. त्यांनी आतापर्यंत 76हून अधिक पदकं मिळवली आहेत.
माझ्या 2 विद्यार्थ्यांनी ऑलिम्पिकमधील पदकांची कमाई केली आहे. 1980मध्ये माझं लग्न झालं. माझ्यासोबत माझा मुलगा, नवरा आणि आई राहत असे. मी माझं करिअर आणि कुटुंब सांभाळायला सक्षम होते. लग्नानंतर तुम्हाला खेळ चालू ठेवायचा असेल तर कुटुंबाचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो, असं मला वाटतं."
बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर-2020 पुरस्कारासाठी बीबीसीच्या भारतीय भाषांच्या व्यासपीठांवर मतदान करता येणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील तरुण गुणवंत महिला खेळाडूला बीबीसी Emerging Player of the Year award देऊन गौरवणार आहे. तसंच भारतीय क्रीडा क्षेत्रात मोलाचं योगदान दिल्याबद्दल Lifetime Achievemt Award देण्यात येणार आहे.
24 फेब्रुवारी 18.00 पर्यंत मतदान करता येणार आहे आणि विजेत्यांची घोषणा एका व्हर्च्युअल कार्यक्रमाद्वारे 8 मार्च रोजी केली जाणार आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)