You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अनिता देवी : पोलिस कॉन्स्टेबल ते नेमबाजीतली नॅशनल चॅम्पियन
हरयाणा पोलीस दलात काम कार्यरत असलेल्या अनिता देवी यांनी नेमबाजीत देशाचं प्रतिनिधीत्व केलेलं आहे. आता त्या आपल्या मुलाला या खेळासाठी तयार करत आहेत.
अनिता देवी यांनी 2008 मध्ये हरयाणा पोलीस दलात नोकरी मिळवली. त्यानंतर त्यांनी नेमबाजी खेळात घवघवीत यश प्राप्त केलं.
या काळात अनिता देवी यांचे पती धरमबीर गुलिया यांचा त्यांना मजबूत पाठिंबा मिळाला.
खेळामध्ये सहभाग घेतल्यानंतर आपण एके दिवशी राष्ट्रीय चॅम्पियन बनू हा विश्वास अनिता देवी यांना आधीपासूनच होता.
देवी यांनी सहभाग नोंदवलेल्या प्रत्येक स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली.
2011 ते 2019 दरम्यान झालेल्या प्रत्येक राष्ट्रीय स्पर्धेत अनिता देवी यांनी पदकांची कमाई केली. पण यादरम्यान आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळता न आल्याचा आज अनिता देवी यांना पश्चाताप होतो.
पुरेशा माहितीअभावी आपल्याला आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाकडून (ISSF) मान्यता मिळवता आली नाही. त्यामुळे आपण आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवू शकलो नाही, असं त्या सांगतात.
अनिता देवी यांचं करिअर बहरात असताना त्या भारतात तिसऱ्या क्रमांकाच्या नेमबाज होत्या.
अखेर, हॅनोव्हर येथे झालेल्या एका आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत अनिता देवी यांनी 2016 मध्ये सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत जाण्यासाठी ISSF कडे नोंदणी करणं अनिवार्य नव्हतं. अनिता देवी यांना या स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक तर 25 मीटर एअर पिस्टल सांघिक प्रकारात कांस्यपदक मिळालं.
36 वर्षीय अनिता देवी यांचा सराव अजूनही सुरुच आहे. पण त्यांनी आता आपल्या 14 वर्षीय मुलावर लक्ष केंद्रीत केलं आहे.
नेमबाजी क्षेत्रात प्रवेश
अनिता देवी या मूळच्या हरयाणातील पलवल जिल्ह्यातल्या लालप्रा गावच्या. त्यांच्या आई-वडिलांनी नेहमीत अनिता यांच्या खेळाला प्रोत्साहन दिलं.
अनिता यांचे वडील स्वतः एक पैलवान होते. मुलीनेही कुस्ती खेळच निवडावा असं त्यांना वाटायचं. पण अनिता यांनी कुस्तीने कानाला दुखापत होते, असं सांगत त्याला नकार दिला.
अनिता यांना शूटिंगबाबत इतकी माहिती नव्हती. पण हरयाणा पोलीस दलात नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी विभागाकडून विशेष परवानगी घेऊन कुरूक्षेत्र येथे सराव सुरू केला. पण त्यासाठी अनिता यांना सोनिपतवरून दोन तास प्रवास करून जावं लागत असे. अशा पद्धतीने सराव करत अनिता देवी यांनी महिन्याभरातच हरयाणा राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावलं.
पतीने प्रोत्साहन दिल्यामुळे आपलं शूटिंगमध्ये करिअर घडू शकलं, असं अनिता देवी सांगतात.
शूटिंग खेळात सहभाग नोंदवायचं ठरवलं, त्यावेळी अनिता देवी यांचा मासिक पगार फक्त 7 हजार 200 रुपये होता. पण अशा स्थितीतही पतीने 90 हजार रुपयांची पिस्तूल अनिता यांना विकत घेऊन दिली.
अनिता यांच्या विभागानेही वेळोवेळी त्यांना पाठिंबा दिला. त्यांच्या सहकार्यामुळे अनिता यांना सरावासाठी पुरेसा वेळ उपलब्ध व्हायचा.
कालांतराने अनिता देवी यांची कारकिर्द बहरू लागली. पण यादरम्यान त्यांचं कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचं वरीष्ठांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी अनिता यांना कोणतीही एक गोष्ट निवडण्यास सांगितलं.
अनिता देवी यांनी शूटिंग हा खेळ निवडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपला राजीनामा विभागाकडे पाठवून दिला.
पण नंतर पोलीस विभागात याविषयी चर्चा झाली. अखेर त्यांनी अनिता देवी यांचा राजीनामा स्वीकारला नाही.
त्यामुळे अनिता यांनी पोलीस विभागातील नोकरी सुरुच ठेवली. पुढे त्यांची सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी बढतीही झाली.
यशप्राप्ती
2013 हे वर्ष अनिता देवी यांच्यासाठी अत्यंत यशस्वी ठरलं. यावर्षी त्या राष्ट्रीय चॅम्पियन बनल्या. याच वर्षी झालेल्या ऑल इंडिया पोलीस चॅम्पियनशीप स्पर्धेत त्यांनी तीन सुवर्णपदकांची कमाई केली. तसंच त्यांना सर्वोत्कृष्ट नेमबाज पुरस्कारही मिळाला.
2015 मध्ये क्वाड्रेनियल राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनिता यांनी रौप्यपदक जिंकलं.
आता राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या मुलासोबत सहभागी होण्याचं अनिता यांचं स्वप्न आहे. त्यांचा मुलगा एके दिवशी भारतासाठी नक्कीच ऑलिंपिक पदक जिंकेल असा विश्वास अनिता देवी यांना आहे.
आपला संघर्षाचा काळ आठवताना अनिता सांगतात, "कठीण प्रसंगी माझ्या कुटंबाने माझी साथ दिली. त्यामुळेच मला हे यश मिळवता आलं. पण या यशामाने फार मोठा त्याग आहे. 2013 मध्ये तर मी माझ्या वडिलांच्या अंत्यविधीलाही उपस्थित राहू शकले नव्हते."
वडिलांच्या प्रोत्साहनामुळेच आपण खेळामध्ये आपली कारकिर्द घडवू शकलो, असं अनिता सांगतात. आता आपल्या मुलालाही अशाच प्रकारे तयार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.