You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एक संघ, 32 कांस्य, 38 रौप्य, 34 सुवर्ण पदकं आणि लैंगिक छळ झालेल्या 500 मुली
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
'एक संघ, 32 कांस्य पदक, 38 रौप्य पदकं, 34 सुवर्ण पदकं आणि लैंगिक छळ झालेल्या 500 मुली' नेटफ्लिक्सच्या 'अॅथलिट ए' या डॉक्युमेंट्रीचं हे वर्णन. खेळाच्या इतिहासातलं आजवरचं सर्वांत मोठं, जगाला हादरवून टाकणारं लैंगिक शोषण कसं झालं, सिस्टिमॅटिक रितीने ते कसं दाबलं गेलं आणि हे शोषण झालेल्या मुलींच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला हे यात दाखवलंय.
"माझी आई त्या खोलीत असायची. तिच्यासमोर तो एका हाताने मला मसाज करायचा आणि दुसऱ्या हाताने माझ्या योनीत किंवा गुदद्वारात बोटं घालायचा. हा हात टॉवेलने झाकलेला असायचा." - एक पीडित खेळडू
"मी न्यायाधीश मॅडमला विनंती करतो की त्यांनी मला फक्त 5 मिनिटं या नराधमासोबत एका बंद खोलीत एकटं सोडावं... नाही... एक मिनिटं, तुम्ही तोही नाही दिलात तर मी इथेच याला मारीन... तुमची मुलगी असती तर तुम्ही काय केलं असतं?" - ज्याच्या तिन्ही मुलींचं शोषण झालंय असा पिता
"त्याने तसं केलं. मी एका महिला कोचला सांगितलं. त्या मला म्हणाल्या माझा गैरसमज होतोय. मी वारंवार सांगत राहिले हे वेगळंय, कोणी ऐकलं नाही. शेवटी मी दुसऱ्या दिवशी जाऊन त्याला सॉरी म्हटलं."
"खेळाडू महत्वाचे, खेळाडू सर्वप्रथम, त्यांचं हित ही आपली प्राथमिकता." - जवळपास 500 मुलींचं लैंगिक शोषण करणारा गुन्हेगार एका मुलाखतीत बोलताना
"एका संतापलेल्या बाईइतकं जगात काहीच वाईट नसतं. ती काहीही करू शकते." - तो गुन्हेगार कोर्टात आपली बाजू मांडताना
"तू खरी हिरो आहेस. तू सुरुवात केली म्हणून इतर मुलींना आवाज मिळाला आणि याला चळवळीचं स्वरूप मिळालं. तू हे करून दाखवलंस." या केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीश एका पीडितेचं कौतुक करताना.
वेगवेगळ्या वेळी, खरंतर 20 वर्षांच्या प्रदीर्घ काळात घडलेल्या एका खऱ्याखुऱ्या कथेचे, खरंतर दुःस्वप्नाचे हे तुकडे. हे तुकडे जोडून एक कथा तयार होते... अत्याचाराची, छळाची, सत्तेने दाखवलेल्या माजाची, दुर्बलांचा आवाज दाबल्याची, अफाट धैर्याची, दृढनिश्चयाची आणि विजयाच्या शक्यतेची... कारण हा लढा अजूनही संपलेला नाही.
बाई कर्तुत्वाने कितीही मोठी असली, कितीही किर्ती तिच्या वाटेला आली असली तरी तिचं लैंगिक शोषण थांबत नाही. या ना त्या प्रकारे ते होतंच असतं. त्याहून वाईट म्हणजे, ते झाल्यानंतर तिने त्याविरोधात बोलण्याचा प्रयत्न केला तर तिच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही.
याचं ढळढळीत उदाहरण म्हणजे अमेरिकेची जिमनॅस्टिक्स टीम. जवळपास गेल्या वीस वर्षांत त्यांच्या महिला जिमनॅस्ट्सनी शेकडो ऑलिम्पिक मेडल्स जिंकली, वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्या आणि त्याच वेळेस याच खेळाडूंच लैंगिक शोषणही होत होतं. यात जागतिक किर्तीची सिमोन बाईल्सही आली.
2012 साली लंडनमध्ये जेव्हा अमेरिकेचा संघ जिंकत होता, तेव्हाही, ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये महिला जिमनॅस्टिक खेळाडूंचं लैंगिक शोषण सुरू होतं.
हा विषय आता आठवायचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी अमेरिकेत या लैंगिक शोषण प्रकरणी एफबीआयच्या (अमेरिकेची सुरक्षा संस्था) भूमिकेबद्दल सिनेटसमोर सुनावणी झाली.
तपास अधिकाऱ्यांनी जेव्हा लैंगिक छळाच्या तक्रारी आल्या तेव्हा त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, अक्षरशः त्या बासनात बांधून ठेवून दिल्या, आणि एकप्रकारे गुन्हेगाराला अभयच दिलं असा त्यांच्यावर आरोप आहे.
एफबीआयचं चुकलं असं म्हणत या संस्थेच्या संचालकांनी बिनशर्त माफी मागितली आहे.
याच प्रकरणी सिनेट समितीसमोर बोलताना सिमोन बाईल्सने म्हटलं की, "ज्याने शोषण केलं तो एकटा गुन्हेगार नाहीये, ज्यांनी अनेक वर्षं आमचं शोषण होऊ दिलं ती यंत्रणाही तितकीच दोषी आहे."
अॅली राईसमन 2012 आणि 2016 साली अमेरिकेच्या जिमनॅस्ट टीमची कॅप्टन होती. तिने सिनेटसमोर बोलताना म्हटलं की, "सहा वर्षांपूर्वी मी माझ्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल पहिल्यांदा बोलले होते. अजूनही आम्ही जे घडलं त्याची उत्तरं आणि उत्तरदायित्वासाठी झगडतोय याची आता घृणा वाटतेय."
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सलग वीस वर्षं यूएसए जिमनॅस्टिकच्या छत्राखाली जिल्हा, राज्य, देश, आंतरराष्ट्रीय अशा सगळ्या पातळ्यांवर खेळणाऱ्या, मिशिगन विद्यापीठातल्या किंवा जिमनॅस्टिक्सशी संबंध नसणाऱ्या, फक्त नृत्यागंना किंवा चीअरलीडर असणाऱ्या 500 हून अधिक मुलींचं लैंगिक शोषण लॅरी नासर या डॉक्टरने केलं.
लॅरी नासरची मुलींचं शोषण करायची पद्धत म्हणजे तो मुलींच्या योनीत, ग्लोव्ह न घालता बोटं घालायचा, ती फिरवायचा. याला त्याने 'व्हॅजिनल अॅडजस्टमेंट' असं नाव दिलं होतं. हा प्रकार तो चालता-बोलता शिताफीनं करायचा.
त्याचं म्हणणं होतं की ही एक उपचारपद्धती आहे आणि याने मुलींची हाडं दुखत असतील, पाठ, कंबर, पाय, नडग्या कुठेही दुखापत झाली असेल तर ती बरी होते, किंवा त्रास कमी होतो.
गंमत म्हणजे त्याला कधीच कोणी याबद्दल नीट विचारलं नाही आणि तो मुलींचं शोषण करत राहिला.
पण सलग वीस वर्षं? सलग वीस वर्षं कोणाच्याही लक्षात न येता तो हे कसं करू शकला?
हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल.
1972 सालचं म्युनिक ऑलिम्पिक. सोव्हियत युनियनच्या एका बारक्या पोरीने जिमनॅस्टिक्समध्ये इतिहास घडवला. अवघ्या 17 वर्षांच्या ओल्गा कोर्बुटने जिमनॅस्टिकमध्ये असे काही कर्तब दाखवले जे आजवर त्या खेळाच्या इतिहासात कोणीच दाखवले नव्हते.
एचबीओच्या 'अॅट द हार्ट ऑफ गोल्ड' या डॉक्युमेंट्रीत या क्षणाचं फुटेज दाखवलं आहे. तेव्हा कॉमेंट्रीएटर म्हणतो,
"जिमनॅस्टिक्समध्ये कधीच कोणत्याही महिलेने हे केलं नाहीये." दुसरा कॉमेंट्रीएटर लगेच उत्तरतो... "जिमनॅस्टिकच्या इतिहासात हे कधीच कोणीच केलं नाहीये."
इथून महिला जिमनॅस्टिकचं चित्र बदलायला सुरूवात झाली. यावर शिक्कामोर्तब केलं ते 1976 च्या मॉन्ट्रियल ऑलिम्पिकने. याच स्पर्धांमध्ये नादिया कोमिनीची नावाचं वादळ धडकलं. अवघ्या 14 वर्षांच्या या मुलीने जिमनॅस्टिकमधला सर्वोत्तम स्कोअर 'परफेक्ट टेन' मिळवला होता.
या आधी ज्या महिला खेळाडू जिमनॅस्टिकच्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायच्या, तर खऱ्या अर्थाने प्रौढ असायच्या. वयाने मोठ्या असायच्या. त्यांना बॅलेची पार्श्वभूमी होती. या खेळामध्ये कसरतींपेक्षा नजाकत होती, नृत्याच्या अंगाने जाणारं जिमनॅस्टिक्स होतं. ओल्गा आणि नादियानंतर जिमनॅस्टचं वय कमी कमी होत गेलं. अगदी 13-14-15 अशा वयांच्या मुली स्पर्धांमध्ये दिसायला लागल्या.
त्या मुली अशा काही कसरती करत होत्या की बघणाऱ्याने थक्क होऊन दाही बोटं तोंडात घालावीत. त्यांची उर्जा विलक्षण होती. रोमानिया, सोव्हियत युनियनकडून जिमनॅस्टिक्समध्ये मात खावी लागत असल्यामुळे अमेरिकेनेही तोच ट्रेंड आपलासा केला. लहान लहान मुलींना जिमनॅस्टिक्समध्ये आणायचं, खेळवायचं.
पण का?
याबद्दल वॉशिंग्टन पोस्टशी बोलताना अमेरिकेच्या राष्ट्रीय पातळीवरच्या कोचने सांगितलं होतं की, "लहान मुलींची शरीरं लवचिक असतात. एकदा त्या वयात आल्या की त्यांच्या शरीरावर नियंत्रण मिळवणं अवघड जातं. लहान मुली काहीही करू शकतात, त्यांचं शरीर पूर्णपणे तयार झालेलं नसतं आणि त्यांना कुठलीही भीती नसते."
ही विचारसरणी असलेल्या कोचचं पुढे काय झालं ते येईल ओघात.
लहान मुलींना जिमनॅस्टिक्समध्ये आणण्याचा विरोध करणारे काही लोक असंही म्हणतात की, त्यांना कंट्रोल करणं, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं सोपं असतं म्हणून संघ अशा मुलींना प्राधान्य देतात.
म्हणजेच त्यांना स्वतःचा आवाज नसतो आणि म्हणूनच त्यांचं शोषण करणंही सोपं असतं.
"या मुलींना सर्वोत्तम परफॉर्मन्स द्यायचा असतो, म्हणजे मग जिमनॅस्टिक संघाला प्रायोजक मिळतील, पैसा मिळेल. ऑलिम्पिक कमिटी लोकांसमोर त्यांना मिरवेल. त्यांच्या स्पर्धा दाखवणाऱ्या चॅनल्सला जाहिरातींचा पैसा मिळेल. ही सगळी यंत्रणा पैसा कमवून देणारं मोठं मशीन आहे आणि याचा केंद्रबिंदी आहेत या लहान मुली आणि त्यांनी शरीरं. हीच सिस्टिम शोषणकर्त्यांना बळ देते," वॉल स्ट्रीट जर्नलच्या पत्रकार रिबेक डेव्हिस ओब्रायन एचबीओच्या 'अॅट द हार्ट ऑफ गोल्ड' या डॉक्युमेंट्रीत म्हणतात.
हेच लॅरी नासरने अनेक वर्षं केलं. तरीही या मुलींमध्ये आपलंच काहीतरी चुकतंय ही भावना बळावत राहिली.
लॅरिसा ब्राऊन 1997 साली 16 वर्षांच्या होत्या आणि स्पार्टन युथ क्लबकडून जिमॅनिस्टिक खेळायच्या. त्या एचबीओच्या डॉक्युमेंट्रीमध्ये म्हणतात, "मला त्याची उपचारपद्धती खूप विचित्र वाटायची. मी त्यावेळेच्या मिशिगन विद्यापीठाच्या हेड कोच कॅथी क्लेगस यांना सांगितलं, लॅरी माझ्या योनीत बोटं घालतोय. त्या म्हणाला तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी लॅरीला ओळखते, तो असं करूच शकणार नाही."
दुसऱ्या दिवशी लॅरीने या प्रकाराबद्दल लॅरिसाला विचारलं, "मी त्याला म्हणाले, सॉरी. ही माझी चुक आहे. माझं चुकलं," लॅरिसा सांगतात.
"मी स्वतःला सांगितलं की चूक माझी आहे, मी प्रॉब्लेम आहे. पुढची चार वर्षं मी त्याच्याकडे जात राहिले आणि तो माझं शोषण करत राहिला."
1997 साली जेव्हा लॅरिसा बॉईस यांनी लॅरी नासरची तक्रार केली तेव्हा जन्मही झाला नव्हता अशा अनेक मुलींचं शोषण नंतर लॅरीने केलं. कोणाचीही भीती न बाळगता तो मुलींचं शोषण करत होता.
1997 ते 2015 या काळात त्याच्याविरुद्ध 17 अनधिकृत तक्रारी फक्त मिशिगन विद्यापीठात आल्या होत्या. तरीही मिशिगन विद्यापीठाने याकडे लक्ष दिलं नाही.
2014 साली एका मुलीने अधिकृत तक्रार केली, पण विद्यापीठाने म्हटलं की या मुलीला वैद्यकीय ट्रीटमेंट आणि लैंगिक शोषणातला फरक कळाला नाही.
शोषणाची पद्धत
लॅरी नासर मिशीगन विद्यापीठ आणि अनेक मोठमोठ्या जिमनॅस्टिक क्लबसाठी फिजिओथेरेपिस्ट म्हणून काम करायचा. त्यासाठी तो कोणतंही मानधन घ्यायचा नाही.
त्याचं व्यक्तिमत्व एकदम छान होतं, तो मुलींचा, त्यांच्या पालकांचा विश्वास संपादन करायचा. त्यांची काळजी घ्यायचा, त्यांच्याशी मृदू भाषेत बोलायचा.
त्यांचं वागणं या मुलींच्या कोचेसच्या अगदी विपरीत होतं.
कोचेस मुलींना हिडीसफिडीस करायचे, ओरडायचे, त्यांना दुखापत झाली तरी लक्ष द्यायचे नाहीत. वजनावरून बोलायचे, खाण्यावरून बोलायचे.
नादिया कोमिनीचीला एका हुकूमशाही राजवटीत, त्याच मानसिकतेने ज्यांनी ट्रेन केलं ते कोच दांपत्य बेला आणि मार्था करोली नंतर अमेरिकेत पळून आले.
त्यांनी अमेरिकेच्या जिमनॅस्टिकमधल्या पदक विजेत्या खेळाडू घडवल्या खऱ्या, पण त्यांच्या ट्रेनिंग सेंटरचं वातावरण असंच हुकूमशाही होतं.
ट्विस्टार्स नावाच्या क्लबचा कोच होता जॉन गेडार्ट. अतिशय कडक, चिडका माणूस. तोच वर उल्लेखलेला ज्याने म्हटलं की, "लहान मुलींवर नियंत्रण ठेवणं, त्यांना आपल्या ताब्यात ठेवणं सोपं असतं."
यांच्या कोचिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग घेणाऱ्या मुली असायचा 10 ते 17 या वयोगटातल्या. ज्यांना टीनएजर्स असं म्हणतात. डोळ्यापुढे एकच स्वप्न, ऑलिम्पिकमध्य मेडल जिंकायचं. त्यासाठी कितीही त्रास सहन करायची तयारी असणाऱ्या या मुली.
त्यांच्या कोचची एकच विचारसरणी, लहान मुली आणा, त्यांना कठोर प्रशिक्षण द्या, त्यांना वयात येऊ देऊ नका, त्याची पाळी सुरू होऊ देऊ नका, त्यांच्या शरीराची ठेवण बदलू देऊ नका... त्या जिंकतील. पण यात त्या मुलींच्या मनावर काय परिणाम होत असेल?
कायोली रॅन्च, ट्विस्टार्स, मिशिगन विद्यापीठ... सगळीकडे हिडीसफिडीस करणारी माणसं. अशात एकच मायेचा ओलावा सगळीकडे होता... लॅरी नासर.
तो या मुलींचा दिवस कसा होता ते त्यांना विचारायचा, घरच्यांची चौकशी करायचा, कोच वाट्टेल ते बोललेले असायचे, अशा वेळेस मुलींना धीर द्यायचा.
मुलींचं डायट अतिशय कडक असायचं, तरीही त्यांनी मध्येच चोरून एखादं चॉकलेट आणून द्यायचा आणि त्यांना खूश करायचा.
लोकांमध्येही तो लोकप्रिय होता. गपिष्ट होता. वेगवेगळ्या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून जायचा.
पालक खोलीत असताना तो बिनधास्त मुलींच्या योनीत हात घालून त्यांचं शोषण करायचा. पण पालकांना कळायचं नाही की काय होतंय.
टेलर लिव्हिंस्टन नावाची एक जिमनॅस्ट म्हणते, "माझे वडील खोलीत बसलेले होते, आणि त्याने माझ्या योनीत बोटं घातली. मी चक्रावले... असं कसं होईल, समोर बाबा बसलेत ना... पण मला परत वाटलं, त्यांना कळतंय का माझ्याबाबतीत काय होतंय ते? मग मीच स्वतःची समजून घातली, लॅरी डॉक्टर आहेत, त्यांना माहितीच असेल ना काय घडतंय ते."
जॉन गेडार्ट किंवा मार्था आणि बेला करोलींना कधीच कळलं नाही आपल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये काय होतंय ते?
लॅरिसा बॉयस म्हणते की त्यांना फक्त रिझल्ट हवे असायचे. किती दिवसात मुलगी दुखातपतीतून बरी होऊन पुन्हा खेळायला उभी राहू शकते. लॅरी त्यांना कमीत कमी वेळ सांगायचा, त्या पलीकडे ते बघायचे नाहीत.
स्वतः लॅरिसाचा पाय फ्रॅक्चर असताना लॅरीने तिला ना एक्स-रे काढू दिला ना तिला दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ दिलं. महिनाभर ती तशाच पायाने सराव करत होती. शेवटी तिला उभं राहाणं अशक्य झाल्यावर तिने आपले प्रशिक्षक जॉन गेडार्ट यांना सांगितलं की मी स्पर्धा खेळू शकत नाही, तर तिला हाकलून लावलं.
त्यानंतर ती हॉस्पिटलला गेली आणि एक्स-रे काढला तेव्हा दिसलं की तिच्या नडगीच्या हाडाचा अक्षरशः चुरा झाला होता.
हे प्रकरण बाहेर कसं आलं?
वारंवार तक्रारी होऊनही, त्या अधिकृत नव्हत्या, पीडितांनी किंवा त्यांची आई-वडिलांनी सह्या करून नावानिशी तक्रारी केल्या नव्हत्या, असं म्हणत लॅरी नासरवर कारवाई झाली नाही.
2015 साली अमेरिकेच्या नॅशनल टीमची सदस्य असलेल्या मॅगी निकोल्सचं ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचं स्वप्न भंगलं. यूएसए जिमनॅस्टिक संघटनेने तिने लॅरी नासरविरोधात तक्रार केली म्हणून तिला वगळलं असं तिचे आई-वडील नेटफ्लिक्सच्या 'अॅथलीट ए' या डॉक्युमेंट्रीत म्हणतात.
पण एका बातमीमुळे हे सगळं बदलायला सुरुवात झाली. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सिमोन बाईल्स आणि तिची सहकाऱ्यांनी गोल्ड मेडल मिळवलं तेव्हाच इंडिस्टार या वर्तमानपत्राने जिमनॅस्टिकचे कोच महिला खेळाडूंचं कसं शोषण करतात आणि जिमनॅस्टिक्स संघटना अशा खेळाडूंना कशी पाठीशी घालते हे दाखवणारी एक बातमी प्रसिद्ध केली.
2014 साली राष्ट्रीय जिमनॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष स्टीव्ह पेनी यांनी कोर्टासाठी जवाब नोंदवताना म्हटलं होतं की, "लैंगिक शोषणाची कोणतीही तक्रार त्यांच्या संस्थेकडे आली तर ते लगेच पोलिसांकडे जात नाही. जर ती तक्रार लेखी नसेल आणि त्यावर पीडिता किंवा तिच्या आईवडिलांची सही नसेल तर त्या तक्रारीची दखल घेतली जात नाही."
याच स्टीव्ह पेनी यांनी मॅगी निकोल्सच्या आईवडिलांना सांगितलं होतं की पोलिसात जाऊ नका, आम्ही लॅरी नासर प्रकरणी अंतर्गत चौकशी करू.
बातमी प्रसिद्ध झाली त्याच दिवशी त्या वर्तमानपत्राला एका माजी खेळाडूचा फोन आला. हिनेच पुढे इतिहास घडवला. रेचल डॉलहॉलेंडर हिने इंडिस्टारच्या पत्रकारांना फोन करून सांगितलं की तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे, पण माझं शोषण कोचकडून नाही तर एका डॉक्टरकडून झालंय.
रेचलने बीबीसीशी बोलताना सांगितलं, "माझी आई त्या खोलीत असायची. तिच्यासमोर तो एका हाताने मला मसाज करायचा आणि दुसऱ्या हाताने माझ्या योनीत किंवा गुदद्वारात बोटं घालायचा. हा हात टॉवेलने झाकलेला असायचा. एकदा त्याने माझ्या ब्राची बटणं काढली आणि माझ्या स्तनांशी चाळे केले. तेव्हा मला पूरेपूर कळलं की हे काहीतरी वेगळं आहे."
अजून दोन खेळाडू पुढे आल्या पण त्यांनी आपली नावं त्यावेळी जाहीर केली नाहीत.
पण रेचल डॉलहॉलेंडर कोर्टात गेली. त्याच वेळी आणखी एक पीडिता कोर्टात केस दाखल करण्याच्या तयारीत होती.
मॅगी निकोल्स प्रकरणात लॅरी नासरची अंतर्गत चौकशी झाली होती त्यामुळे त्याने जिमनॅस्टिक्स संघटनेबरोबर काम करणं बंद केलं होतं. संघटनेने कोणतीही शिक्षा न देता त्याला निवृत्त होऊ दिलं होतं.
मिशिगन विद्यापीठानेही त्याला एका तक्रारी प्रकरणी तीन महिन्यांसाठी निलंबित केलं होतं, पण तो परत त्यांच्यासोबत काम करायला लागला.
कोर्टात केस दाखल झाली, तसे हजारो लोक त्याच्या समर्थनार्थ पुढे आले. पीडितांना ट्रोलिंग सुरू झालं. लोक म्हणायला लागले की या मुलीच 'तशा' आहेत. त्या पैशांसाठी हे करताहेत. पण लॅरीच्या घराची झाडझडती चालू असताना बाहेरच्या कचराकुंडीत टाकून दिलेला चाईल्ड पॉर्नचा एक साठा एका पोलीस कर्मचाऱ्याला सापडला आणि केसची दिशा बदलली.
लॅरीच्या मित्राच्या मुलीनेही आपलं शोषण झाल्याचं म्हटलं. तिचं नाव होतं कायली स्टीफन्स ती खेळाडू नसल्यामुळे 'वैद्यकीय उपचारांचा' बचाव इथे लागू होणार नव्हता. म्हणून पोलीस लॅरीला अटक करू शकले.
या मुलीने पुढे कोर्टात म्हटलं, "सहा वर्षांच्या मुलीने लैंगिकरित्या सक्रिय असायला नको. मला त्या वयात कार्टून आवडायचे, टेडीबिअर आवडायचे, माझे दुधाचे दातही पडले नव्हते. पण मी लैंगिकरित्या सक्रिय होते, मला हे माहितीही नव्हतं आणि माझी याला परवानगी असण्याचा प्रश्नच नव्हता."
ही मुलगी पुढे म्हणाली, "माझ्या आई-वडिलांना जेव्हा मी सांगितलं तेव्हा त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी वय वर्षं 12 ते 18 या काळात माझ्या घरच्यांपासून दुरावले. माझ्या वडिलांसाठी मी एक खोटे आरोप करणारी मुलगी होते.
दरवेळेस आमचा वाद झाला की ते मला लॅरीची माफी मागायला सांगायचे. पण जेव्हा सत्य बाहेर आलं तेव्हा ते हादरले. त्यांना दिसलं की त्यांनी माझ्यावर विश्वास न ठेवल्यामुळे काय घडलं. त्यानंतर आम्ही आमचे नातेसंबंध सुधारण्याचे अनेक प्रयत्न केले पण 2016 साली त्यांनी आत्महत्या केली."
चाईल्ड पॉर्न बाळगल्याच्या प्रकरणी लॅरीची सुटका होणार नव्हती. त्याने 10 मुलींचं लैंगिक शोषण केल्याचं मान्य केलं. खटला न लढवताच हे मान्य केल्यामुळे त्याच्यावर इतर 156 मुलींच शोषण केल्याप्रकरणी खटला चालणार नव्हता.
लॅरी नासरला 2018 साली सगळ्या गुन्ह्यांची मिळून 300 वर्षांच्या कैदेची शिक्षा झाली.
'तू एक सैन्य उभं केलंस'
लॅरीवर इतर मुलींच्या शोषणासाठी खटले चालणार नव्हते पण लॅरीच्या कृत्यामुळे या मुलींच्या आयुष्यावर काय परिणाम झाला भर कोर्टात लॅरीसमोर सांगण्याची परवानगी पीडित मुलींना दिली होती.
आधी फक्त 6 मुली बोलणार होत्या, पण एकूण 156 मुली बोलल्या. यात ऑलिम्पिक पदक विजेत्या अॅली राईसमन आणि जॉर्डन विबर ही होत्या.
ऑलिम्पिक पदकविजेती आणि अमेरिकेची स्टार खेळाडू सिमोन बाईल्स हिनेही एक पत्रक काढून आपल्या बाबतीत काय घडलं ते जगासमोर मांडलं.
या केसची पहिली सुनावणी रोझमेरी अॅक्वालिना यांच्यासमोर झाली. लॅरीने आधीच आपले गुन्हे मान्य केल्यामुळे त्यांना निष्पक्ष राहाण्याची गरज नव्हती. त्यांनी जजपेक्षाही या मुलींच्या काऊन्सिलरची भूमिका बजावली.
त्या म्हणायच्या, "मला माहितेय तुमच्यापैकी अनेकजणी घाबरलेल्या आहेत. असं समजा की इथे फक्त तुमची आई आणि मी आहोत. मोकळेपणाने बोला."
जज अॅक्वालिना यांनी मीडिया सर्कस मांडली आहे असा आरोप लॅरीने कोर्टाला पत्र लिहून केला. याच पत्रात तो म्हणाला की, 'या मुली पैशासाठी हे करत आहेत. मी त्यांच्यावर उपचार केले आणि त्या परत परत माझ्याकडे येत राहिल्या. एका संतापलेल्या बाईइतकं जगात काहीच वाईट नसतं. ती काहीही करू शकते.'
अॅक्वालिना यांनी रेचल डॉलहॉलेंडर हिला सैन्याच्या जनरलची उपमा दिली. त्या कोर्टात म्हणाल्या की, "तू खरी हिरो आहेस. तू सुरुवात केली म्हणून इतर मुलींना आवाज मिळाला आणि याला चळवळीचं स्वरूप मिळालं. तू हे करून दाखवलंस."
सगळ्यात शेवटी रेचलने आपलं म्हणणं वाचून दाखवलं. ती म्हणाली, "जेव्हा यंत्रणा, अधिकारी, पालक, लहान मुलांसाठी जे जे उत्तरदायी असतात, ते त्यांचं ऐकत नाहीत तेव्हा असं दृश्य दिसतं. पीडित मुलींनी भरलेलं कोर्ट."
तिने म्हटलं की फक्त लॅरी नासरचं नाही, तर त्याला पाठीशी घालणाऱ्या सगळ्या व्यक्ती, सगळी यंत्रणा दोषी आहे.
यातल्या इतर लोकांचं पुढे काय झालं?
एकदा हे स्कॅण्डल पुढे आल्यानंतर, लॅरी नासरला शिक्षा झाल्यानंतर इतरांनाही जबाबदार धरलं गेलं.
जॉन गेडार्ट या ट्विस्टार्सच्या कोचवरही लैंगिक शोषणाचे आरोप झाले. त्यांच्यावर मानवी तस्करी आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल झाले. फेब्रुवारी 2021 साली त्यांनी राहत्या घरात आत्महत्या केली.
बेला आणि मार्थ करोली यांचं राष्ट्रीय ट्रेनिंग सेंटर बंद झालं.
लॅरिसा बॉयस हिने 1997 साली ज्या मिशिगन विद्यापीठाच्या कोचला सांगितलं होतं की लॅरी तिचं शोषण करतोय, त्या कोच कॅथी क्लेजस यांना 90 दिवसांची कैद झाली.
यूएसए जिमनॅस्टिक्सने सगळ्या पीडित महिलांना जवळपास 500 मिलीयन डॉलर्सची भरपाई दिली.
मिशिगन विद्यापीठाच्या अध्यक्ष लू अॅना सायमन यांनी 2018 साली राजीनामा दिला.
लॅरी नासरला पाठिंबा देणारे मिशगन विद्यापीठाचे अधिष्ठाता विल्यम स्ट्रँपेल यांनी प्रकृतीच्या कारणावरून राजीनामा दिला, पण विद्यार्थिनींचे नग्न फोटो बाळगल्याप्रकरणी त्यांना अटक झाली. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.
यूएसए जिमनॅस्टिक्सचे अध्यक्ष स्टीव पेनी आपल्या पदावरून पायउतार झाले. लॅरी नासर प्रकरणी पुरावे नष्ट केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, आणि अटक झाली. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.
अमेरिकेच्या ऑलिम्पिक कमिटीचे प्रमुख स्कॉट बकमन यांना पद सोडवं लागलं.
अमेरिकेच्या ऑलिम्पिक कमिटीने राष्ट्रीय जिमनॅस्टिक संघटनेची मान्यता काढून घेतली. त्या संघटनेचं अस्तित्व संपवलं.
एफबीआयच्या इंडियानापोलीस राज्यातल्या स्थानिक कार्यालयाने हे प्रकरण दाबलं, असा आरोप झाला. एफबीआयचे अध्यक्ष ख्रिस्टोफर रे यांनी जाहीर माफी मागितली. या प्रकरणी एका अधिकाऱ्याला काढून टाकलं आहे तर दुसरा अधिकारी आधीच निवृत्त झाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
अमेरिकेतल्या अनेक राज्यांनी लहान खेळाडूंच्या लैंगिक शोषणाविरोधात कडक कायदे केले. अधिकृत तक्रार आली असो किंवा नसो अशा प्रकरणी प्राथमिक तपास झाला पाहिजे अशी तरतूद केली.
भारतात काय?
खेळाच्या क्षेत्रातलं सगळ्यात मोठं सेक्स स्कॅण्डल म्हणून या प्रकरणाला ओळखलं जातं. पण हेही मान्य केलं पाहिजे की या प्रकरणाची उशीरा का होईना सविस्तर चौकशी झाली, आणि यात गुंतलेल्या सगळ्या लोकांना काही ना काही शिक्षा झाली.
पीडित मुलींना मदत मिळाली, कायदे बदलले. अमेरिकेच्या ठिकाणी दुसरा देश असता तर इतक्याच मोठ्या प्रमाणावर बदलले असते का?
इंडियन एक्स्प्रेसने त्यांच्या एका बातमीत म्हटलं होतं की खेळातल्या लैंगिक शोषणाविरुद्ध तक्रार करणं भारतीय महिला खेळाडूंसाठी जवळपास अशक्य असतं, कारण त्या आधीच गरीब घरांमधून आलेल्या असतात. तक्रार केली तर आपलं भविष्य खराब होईल, करियर हातातून जाईल ही भीती त्यांना असते.
या बातमीत असाही उल्लेख केलाय तक्रार येऊन त्यांच्यावर कारवाई होत नाही, तर अनेक वर्षं चौकशी चालू राहाते. इंडियन एक्स्प्रेसने यासाठी खास RTI दाखल केली होती.
अशात मुली ऑलिम्पिकमध्ये पदकं आणतात म्हणून आपण खूश होत असू तर मग मोठाच प्रश्न आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)