You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टोकियो ऑलिंपिक डायरी - सिमोन बाईल्स, मानसिक आरोग्य आणि सर्वोत्तम असण्याचं दडपण
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारताचा क्रिकेटर विराट कोहली, जपानची टेनिसस्टार नाओमी ओसाका आणि अमेरिकेची जिम्नॅस्ट सिमोन बाईल्स यांच्यात काय साम्य आहे? हे तिघंही यशस्वी खेळाडू आहेत, तिघंही लहान वयातच प्रकाशझोतात आले आणि तिघांनीही आपल्या मानसिक आरोग्याविषयी उघडपणे बोलण्याचं धाडस दाखवलंय. बाईल्सनं जिम्नॅस्टिक्सच्या सांघिक स्पर्धेतून मंगळवारी माघार घेतली, तेव्हापासून ऑलिंपिक नगरीत तिचीच चर्चा आहे. सिमोन या स्पर्धेत पहिल्या रोटेशनमध्ये खेळायला उतरली. पण व्हॉल्टवर पहिल्याच प्रयत्नात तिला चांगली कामगिरी करता आली नाही.
बाईल्स त्यानंतर सांघिक स्पर्धेत खेळणार नसल्याचं जाहीर झालं, तेव्हा पत्रकारांमध्ये एकच कुजबूज सुरू झाली.कारण बाईल्स ही टोकियो ऑलिंपिकमधल्या स्टार खेळाडूंपैकी एक आहे. पण तिनं माघार घेण्यामागचं कारण कळल्यावर मात्र सर्वजण हा क्षण किती विलक्षण आहे, आणि किती स्वाभाविक आहे, यावर आम्ही बोलू लागलो.
एरवी खेळाडू हे अनेकांना 'सुपरह्यूमन' म्हणजे महामानवासारखे वाटतात. पण खेळाडूंना आपल्यासारख्या भावना आहेत, याचा अनेकांना विसर पडतो. बाईल्सनं तिच्या पत्रकार परिषदेत हेच तर सांगितलं. ती म्हणाली, "आम्हीही शेवटी माणसंच आहोत." ती पुढे सांगते, "आम्ही इथे आनंद लुटायला हवा, पण तसं होत नाहीये."
खेळातील मानसिक आरोग्याच्या समस्यांवर प्रकाश
24 वर्षांची बाईल्स सध्याची जगातली सर्वात लोकप्रिय जिम्नॅस्ट आहे. मायकल फेल्प्स, उसेन बोल्ट अशा ऑलिंपिक गाजवणाऱ्या पिढीनं रिटायरमेंट घेतल्यानंतर बाईल्स आता ऑलिंपिक खेळांची सर्वात मोठी स्टार मानली जाते. रिओ ऑलिंपिकमध्ये सिमोननं चार सुवर्णपदकं आणि एक कांस्यपदक मिळवून जगाला आपली दखल घ्यायला लावली होती. साहजिकच टोकियोत तिच्याकडून असलेल्या पदकांच्या आणि विक्रमाच्या अपेक्षा उंचावल्या.
अनेकांनी आजवरच्या सर्वोत्तम जिम्नॅस्टपैकी एक म्हणून सिमोन बाईल्सचं वर्णन केलं आहे. तिला लैंगिक अत्याचाराचा आणि वर्णद्वेषाचाही सामना करावा लागला होता. साहजिकच एक कणखर खेळाडू म्हणून तिची प्रतिमा निर्माण झाली आहे. अशा अडचणींचा सामना करून जेव्हा एखादा खेळाडू पदकं कमावतो, तेव्हा त्यांच्या यशाचं कौतुक होतंच. पण त्यांच्याकडून अवाजवी अपेक्षा केल्या जाऊ लागतात आणि या अपेक्षांचं ओझ्यात रुपांतर होतं. हे ओझं वाहणारी बाईल्स एकटीच नाही. गेल्या महिन्यातच जपानची टेनिसस्टार नओमी ओसाकानं फ्रेन्च ओपनमधून माघार घेतली होती. आपल्या मानसिक स्थितीविषयी ओसाकानं त्यावेळी लिहिलं होतं.
अपेक्षांचं ओझं
हा काळ खरंतर सगळ्या मानवजातीसाठीच कठीण आहे. कोव्हिडची साथ आणि लॉकडाऊनमुळे आपल्यापैकी बहुतेक सगळेचजण खासगी, व्यावसायिक आणि सामाजिक आयुष्यात तणावाचा सामना करतो आहोत. अर्थात, गेल्या काही वर्षांत मानसिक समस्यांविषयी जागरुकताही वाढली आहे. त्यामुळे स्वाभाविकच अनेकजण बाईल्स आणि ओसाका यांच्या पाठीशी उभे राहतायत, त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करताना दिसतायत. कदाचित हेच कारण आहे की या दोघीच नाही, तर जगभरातले खेळाडू मानसिक आरोग्याविषयी उघडपणे बोलू लागले आहेत.
भारताचा विचार केला तर क्रिकेटर विराट कोहली त्याला आलेल्या नैराश्याविषयी काही महिन्यांपूर्वीच बोलला होता. इंग्लंडचा माजी क्रिकेटर मार्क निकोलासच्या पॉडकास्टमध्ये बोलताना कोहलीनं 2014 सालच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान त्याला जाणवलेल्या त्रासाविषयी माहिती दिली होती. "प्रामाणिकपणे सांगायचं, तर तुम्ही खूप विचार करता, तेव्हा अपेक्षांचं ओझं बनतं," असं तो म्हणाला होता.
यशाची न दिसणारी बाजू
कधीकधी अपेक्षांचं ओझं नाही, तर प्रेरणेचा अभाव किंवा कधी कधी यशानंतर आलेलं रिकामेपणही मानसिक समस्या निर्माण करू शकतं. अशाच रितेपणाचा उल्लेख नेमबाज अभिनव बिंद्रानं मे महिन्यात केला होता. "अनेकजण अपयशाचा सामना कसा करायचा याविषयी बोलतात. पण माझ्यासाठी यशाचा सामना करणं हे माझ्या आयुष्यातलं सर्वात कठीण आव्हान होतं," असं तो म्हणाला होता.
अभिनव बिंद्रानंच 2008 सालच्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं आणि भारताचं ते ऑलिंपिकमधलं पहिलंच सुवर्णपदक ठरलं होतं. बिंद्रानं त्याआधीच जागतिक नेमबाजी स्पर्धा आणि बाकीच्या सर्व मोठ्या स्पर्धांमधली पदकंही मिळवली होती. "एक दिवस माझं स्वप्न पूर्ण झालं होतं. पण त्यामुळे माझ्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली. मला नैराश्यानं ग्रासलं. माझ्या आयुष्याचं काय करावं, पुढे कोणतं पाऊल उचलावं हे कळत नव्हतं. तो माझ्या जीवनातला कदाचित सर्वात कठीण काळ होता," असं बिंद्रा त्यावेळच्या मानसिक ताणाविषयी बोलताना सांगतो.
म्हणतात ना, शिखरावर पोहोचल्यावर तुम्हाला एकतर दुसरं शिखर दिसतं, नाहीतर समोरची दरी घाबरवू शकते..
मानसिक आरोग्याविषयी जागं होण्याची वेळ
"एखादा सामान्य माणूस त्याच्या आयुष्यात ज्या ज्या भावनांचा अनुभव घेईल, त्यातून खेळाडूंना कधीकधी एका दिवसभरात जावं लागतं," भारताच्या एका माजी क्रिकेटरनी मला आज सांगितलं आम्ही खेळात मानसिक आरोग्याविषयी समजुतदारपणा आणि जागरुकतेची गरज कशी आहे, यावर बोललो. आणि प्रत्येकच क्षेत्रात लोकांनी एकमेकांची साथ देणं कसं महत्त्वाचं आहे, याविषयीही बोललो. अनेकदा समोरची व्यक्ती कोणत्या मानसिक अवस्थेतून जाते आहे, हे आपल्याला माहितही नसतं. म्हणूनच बाईल्सच्या निर्णयाची चर्चा होते आहे, हे चांगलंच आहे असं मला वाटतं. ऑलिंपिक पदकाऐवजी स्वतःच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याचा तिचा निर्णय धाडसी असाच म्हणायला हवा. सिमोननं या निर्णयात टीमचा विचार करण्याची प्रगल्भताही दाखवली आहे. एखादा अनफिट खेळाडू मॅचमध्ये न खेळण्याचा निर्णय ज्या सहजतेनं घेतो, त्याच सहजतेनं तिनं हा निर्णय घेतला आहे. आणि ही सहजताच काही तज्ज्ञांच्या मते महत्त्वाची आहे. मानसिक आरोग्याच्या समस्या ही स्वाभाविक गोष्ट आहे. म्हणतात ना, सगळं ठीक नसणंही ठीक असतं कधीकधी.
क्रीडामानसशास्त्रज्ञ काय सांगतात
सिमोन बाईल्सच्या निर्णयानंतर क्रीडा क्षेत्रात मानसिक आरोग्यावर लक्ष देणं किती महत्त्वाचं आहे, याविषयी मी क्रीडा मानसशास्त्रज्ञ मुग्धा धामणकर यांच्याशी बातचीत केली.
त्या सांगतात, की याआधीही अनेक खेळाडूंना मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना केला आहे, पण त्याविषयी उघडपणे बोललं जात नसे.
धामणकर सांगतात, "सिमोन बाईल्स आणि नओमी ओसाकासारख्या आघाडीच्या खेळाडू बोलत आहेत. त्यामुळे बाकीचे खेळाडू आणि सर्वसामान्य लोकांनाही जाणीव होईल की मानसिक आरोग्याविषयी बोलणं निषिद्ध नाही, काही समस्या असतील तर त्याविषयी बोलताना त्यांना आता कमीपणा वाटणार नाही."
"एक क्रीडामानसशास्त्रज्ञ म्हणून मला समाधान वाटतं, की खेळाडू आता याविषयी बोलू लागले आहेत. खेळातील कामगिरीमध्ये मानसिक आरोग्याचाही महत्त्वाचा भाग असतो, याची जाणीव त्यांना होते आहे."
पण फक्त यशस्वी किंवा उच्च स्तरावर खेळणारे खेळाडूच नाही, तर अगदी सुरुवातीच्या पातळीतील खेळाडूंच्याही मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं असं त्यांना वाटतं.
"खेळाडू अगदी लहान वयापासूनच त्यांची शारिरीक क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. मानसिक आरोग्याचा विचार त्या पातळीपासूनच व्हायला हवा. तरूण वयात मेंटल ट्रेनिंगची सुरुवात अधिक फायद्याची ठरू शकते. जशी शारिरीक वाढ होते, तसं येणाऱ्या वेगवेगळ्या अनुभवांसोबत मनही आकार घेत असतं.
"युवा खेळाडू अनेक नकारात्मक गोष्टी, दबाव आणि अपेक्षांचा सामना करत असतात ज्याचा नकळत त्यांच्यावर परिणाम होतो. यातून अनेकजण खेळ सोडून द्यायचा निर्णय घेतात तर अनेकजण त्या समस्यांसह प्रवास करत राहतात. मानसिक आरोग्याचा विचार त्या वयापासूनच केला तर मैदानातल्या कामगिरीसाठी आवश्यक सर्व गोष्टींवर भर देता येईल," असं धामणकर सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)