You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मीराबाई चानूने रिओतला पराभव पचवून टोकियोमध्ये कसं मिळवलं रौप्य पदक?
- Author, सूर्यांशी पांडे
- Role, बीबीसी हिंदी
टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये वेटलिफ्टिंग खेळप्रकारात रौप्य पदकावर आपलं नाव कोरणारी मीराबाई चानू आता भारतात परतली आहे.
26 वर्षीय मीराबाई चानूने 48 किलो वजनी गटात दिमाखदार कामगिरी करत रौप्य पदकाची कमाई केली.
मीराबाई चानूने ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पदक पटकावण्याची किमया केली. अशी कामगिरी भारताच्या खेळाडूने पहिल्यांदाच केली आहे.
आपलं नाव जगभरात पोहोचवून चानू भारतात दाखल झाली, तेव्हा तिचं स्वाभाविकपणे जंगी स्वागत करण्यात आलं.
चानूने यापूर्वी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतही सहभाग नोंदवला होता. पण तिथे तिला तीन प्रयत्नांनंतरही बार उचलता आलं नव्हतं. त्यानंतर चानू खूपच निराश झाली होती. पण तिने मेहनत घेऊन आपल्यातील क्षमता सिद्ध करून दाखवली आहे.
मीराबाई चानू भारतात परतल्यानंतर बीबीसीच्या प्रतिनिधी सूर्यांशी पांडेय यांनी तिच्याशी संवाद साधला. वाचा तिची पदक पटकावल्यानंतरची मुलाखत जशीच्या तशी -
सूर्यांशी - तुझ्या कानात हे आगळेवेगळे टॉप्स दिसतायत, कोणताही प्रश्न विचारण्याआधी तुझ्या कानातल्या टॉप्सबद्दल थोडं सांग.
मीराबाई - ऑलिम्पिकच्या पाच वर्तुळांचं हे डिझाईन आहे. स्पर्धेला जाण्यापूर्वी हे डिझाईन मी अतिशय मनापासून बनवून घेतलं होतं. रिओ ऑलिम्पिकमध्ये मी अपयशी ठरले होते. त्यामुळे ऑलिम्पिकचं लक्ष्य डोळ्यासमोर राहण्यासाठी असं काहीतरी बनवून घ्यावं, हा विचार सतत माझ्या मनात होता.
मी गळ्यातलं बनवून घ्यावं म्हटलं पण अखेर कानातले बनवून घेतले. ऑलिम्पिकचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणा म्हणून या टॉप्सनी काम केलं.
सूर्यांशी - तू जे करून दाखवलंस ते अतिशय अवघड असं काम होतं. तुला मध्यंतरी पाठीची दुखापत झाली होती. त्यानंतर तू नैराश्यातही गेली होतीस. पण नंतर तू कशा प्रकारे या सगळ्यावर मात केलीस?
मीराबाई - रिओ ऑलिम्पिक ही माझी पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा होती. मी त्यासाठी खूप मेहनत घेतली होती. कठोर मेहनत करूनसुद्धा माझं तिथलं पदक हुकलं. त्याचं मला खूपच जास्त दुःख झालं.
अनेक दिवस मी अन्नपाण्याचा त्याग केला होता. मी पूर्णपणे खचले होते. इतकी मेहनत करूनसुद्धा पदक मिळत नसेल तर पुढे मी काय करू, असं मला सतत वाटायचं.
पण नंतर माझ्या फेडरेशनमधील सहदेव सर, विजय सर आणि माझ्या कुटुंबीयांनी मला खूप समजावलं. तू तरूण आहेस, तू पुढचा विचार कर, भूतकाळात काय घडलं, त्याचा विचार करत बसू नकोस, असं त्यांनी सांगितलं.
मलाही नंतर त्याची जाणीव झाली. खेळाडू असल्यानंतर जय-पराजय होतच असतो. त्यामुळे पुढच्या ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करायची असेल तर मला आणखी मेहनत घ्यावी लागेल, असा मी निर्धार केला.
2017 ला जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धा होणार होती. मी त्यावर लक्ष केंद्रित केलं. तिथं मला चांगली कामगिरी करता आली. नंतर 2018 मध्ये पाठीची दुखापत उफाळून आली होती. त्यामुळे मला खूप त्रास झाला. दिवसभर बेडवरच झोपून राहावं लागायचं. मी निराश झाले होते. पण मी पराभव स्वीकारला नाही.
सूर्यांशी - घरी तू किती दिवसांनंतर परतलीस?
मीराबाई - मी तब्बल दोन वर्षांनी घरी परतले. पाच वर्षांपासून माझं असंच सुरू आहे. पण आपल्या खेळासाठी आपल्याला काही त्याग करावे लागतात. त्याचाच हा भाग आहे. आईशी बोलणं व्हायचं पण जास्त भेट व्हायची नाही. ऑलिम्पिक स्पर्धेत पदक पटकावल्यानंतर सर्वात आधी मला आईचीच आठवण आली.
सूर्यांशी - मणिपूरमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा नेमकं काय वाटलं?
मीराबाई - मी खूपच भावनिक झाले होते. लोकांनी माझं खूपच जंगी स्वागत केलं. माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आले होते. लोक माझं इतकं कौतुक करत असल्याचं पाहून मला खूप आनंद झाला. ते मी शब्दात सांगू शकत नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)