You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Tokyo Olympics : गोष्ट 1964 च्या टोकियो ऑलिम्पिकमधल्या प्रेमकहाणीची
टोकियोत 1964 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेला जाताना विमानात भेटलेल्या दोन ऑलिम्पिकपटूंनी, यंदाच्या स्पर्धेत उतरलेल्या स्पर्धकांना 'सर्वकाही आत्मसात' करून घेण्याचा सल्ला दिला आहे.
सायकलपटू ह्युज पॉर्टर आणि जलतरणपटू अनिता लॉन्सब्रोग यांनी या भेटीनंतर पुढच्याच वर्षी लग्न केलं. ते सध्या वॉल्वरहॅम्पटनमध्ये राहतात.
रोम ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलेल्या लॉन्सब्रोग या ब्रिटनचा ध्वज हाती घेऊन मार्च करणाऱ्या पहिल्या महिला खेळाडूही होत्या.
टोकियोतील या स्पर्धेसाठी जे खेळाडू जपानला गेले आहेत, त्या सर्वांनी चांगल्या आठवणींचा खजिना साठवावा, असं त्यांनी म्हटलं.
लॉन्सब्रोग यांनी 1960 च्या रोम ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं, तर 1962 मध्ये 'स्पोर्ट्स पर्सनालिटी ऑफ द इअर' म्हणून त्यांची निवडही झाली होती. 400 मीटर स्पर्धेत त्या 7 व्या स्थानावर राहिल्या होत्या.
देशाचा ध्वज घेऊन मार्च करण्याची संधी त्यांना मिळाली होती, त्याबाबतही त्यांनी अनुभव मांडले. तुम्ही एवढ्या मोठ्या मैदानामध्ये प्रवेश करता आणि अचानक प्रचंड आवाज तुम्हाला ऐकायला येऊ लागतो, असं त्या म्हणाल्या.
"मला लगेचच मागं वळून पळून जावं, अशी इच्छा झाली होती. पण तुम्हाला पुढं चालत राहावं लागतं आणि हा तर एक मोठा सन्मान होता."
ह्युज पॉर्टर हे सायकलिंगमध्ये चार वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेले आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेचं सुवर्णपदकही त्यांच्या पदकांच्या यादीत आहे. 1964 टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.
"मला प्रचंड सर्दी आणि सोबतच छातीमध्ये इन्फेक्शन झालेलं होतं. ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत तुम्हाला पदकाची कमाई करायची असेल तर अशा अडचणींमुळं खूप भ्रमनिरास होतो," असं ते म्हणाले.
पण स्पर्धेच्या दरम्यानच्या काळात या दोघांना एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळाली, असं त्यांनी सांगितलं.
"सोहळा अखेरच्या टप्प्यात असताना ह्युजनं मला नाश्त्यासाठी आमंत्रित केलं होतं, असं मूळच्या हडर्सफिल्ड येथील लॉन्सब्रोग यांनी सांगितलं.
"मला त्यांच्याजवळ बसता यावं म्हणून त्यांनी त्यांच्या टीम मॅनेजरला बाजूला सरकायला सांगितलं होतं."
गेल्यावर्षीपासून लांबलेल्या यंदाच्या स्पर्धेवर कोव्हिड साथीच्या संकटामुळं मोठा परिणाम झाला आहे. त्याबद्दल पॉर्टर यांनी चिंता व्यक्त केली.
"खेळाडुंना एखाद्या हॉटेल किंवा ऑलिम्पिक व्हिलेजमध्येच राहावं लागेल. त्यांना बाहेर जायला परवानगी मिळणार नाही. अशा परिस्थिती ते सराव प्रशिक्षण कसं पूर्ण करतील, याची मला काळजी वाटत आहे.
"अशा वातावरणात त्यांना सर्वोत्तम कामगिरी करता येईल की नाही याची शंका आहे. त्यामुळं मला वाईट वाटत आहे," असंही पॉर्टर म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)