टोकियो ऑलिंपिकची डायरी: ओरिगामी, रिसायकलिंग आणि शांततेची चळवळ

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

टोकियो ऑलिम्पिक : कोणत्या देशांना किती पदकं?

लहानपणी कधी पावसाच्या साठलेल्या पाण्यात कागदाची होडी करून सोडली आहे? किंवा शाळेत वहीच्या पानाचं विमान करून एकमेकांना मारलं आहे?

मग कागदाच्या अशा घड्या घालून वेगवेगळ्या गोष्टी तयार करण्याची कला म्हणजे ओरिगामी विषयी तुम्हाला नक्कीच माहिती असेल.

टोकियोमध्ये मला ही ओरिगामी अचानक कुठेही येऊन भेटते. कधी स्वागतासाठी लावलेल्या बोर्डवर, तर कधी बाहेरून मागवलेल्या जेवणासोबत. कधी कुणीतरी प्रेस सेंटरच्या कॅफेमध्ये चॉपस्टिक्स ठेवण्यासाठी काहीतरी ओरिगामी वस्तू तयार केलेली दिसते.

परवा आमच्या हॉटेलच्या लॉबीमधून काही सामान घेत होते. तिथे रिसेप्शन डेस्कवर काम करणारा एक मुलगा कागदाची फुलं बनवत बसला होता.

माझ्याकडे लक्ष गेल्यावर गडबडून लगेच उभा राहिला आणि जपानी रिवाजाप्रमाणे कंबरेत काहीसं वाकत पुढे झुकून अभिवादन केलं.

आज कोव्हिडच्या पीसीआर टेस्टसाठी गेले होते, तर तिथे टेस्ट सँपल जमा करून घेणाऱ्या मुलींनी डेस्कवर कागदापासून पंखे, छोटी छोटी कासवं, हंस पक्षी आणि बोटी बनवून ठेवल्या होत्या. त्याही चॉपस्टिक रॅपर, पावतीचे कागद अशा एरवी वाया जाणाऱ्या वस्तूंपासून.

मी थोडावेळ घुटमळत ते पाहात होते. ते खूपच क्यूट दिसतायत म्हणून सांगितलं तर दोघी काच आणि मास्कआडून गोड हसत म्हणाल्या, आरिगातो (म्हणजे धन्यवाद)...

मी विचारलं, हे काही खास कारणासाठी बनवता आहात? तर एकजण म्हणाली, "नाहीतर कागद फेकून द्यावा लागला असता."

हे किती छान आहे ना? टाकाऊतून टिकाऊ, हा इथे फक्त संदेश नाही. काहीही वाया जाऊ द्यायचं नाही, यावर जपानच्या संस्कृतीत भर दिला जातो, हे अनेकदा वाचलं आहे.

बेटांनी बनलेल्या या देशात मुळात साधनसंपती मर्यादित आहे. त्यामुळे 'यूज अँड थ्रो' म्हणजे 'वापरा आणि फेकून द्या' अशा वाया घालवण्याकडे भुवया उंचावून पाहिलं जातं आणि त्यासाठी 'मोत्तेनेई' हा शब्दही आहे जपानी भाषेत.

केनियाच्या नोबेल विजेत्या वांगारी मथाई यांच्यासारख्या अनेक पर्यावरणवादींनी मोत्तेनेई मागचं तत्वज्ञान जगानं अंगिकारायला हवं, अशी भूमिका उगाच घेतली नव्हती.

भारतीय खेळाडूंचे सामने कधी आहेत? पाहण्यासाठी क्लिक करा..

ऑलिंपिकच्या आयोजकांनीही त्यावर भर द्यायचं कबूल तर केलं होतं. इथे अनेक गोष्टी रिसायकल केलेल्या किंवा रिसायकल करता येतील अशा आहेत.

कार्डबोर्डपासून बनवलेली पार्टिशन्स आहेत. क्रीडाग्रामात कार्डबोर्डपासून बनवलेले बेड्स आहे. पेपर कप्स आहेत. अगदी मेडल्सही इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातील रिसायकल केलेल्या धातूपासून बनवली आहेत.

एकूणच माझ्यासारख्या प्लास्टिक टाळण्यासाठी जिथे तिथे स्टीलची बाटली घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीला आवडतील अशा अनेक गोष्टी आहेत.

पण कोव्हिडच्या काळात वाढलेला प्लॅस्टिकचा कचराही आहे आणि तो रिसायकल करण्याचं आव्हानही जपान पेलू शकेल का हा प्रश्नही पडतो. ऑलिंपिक संपल्यावरच त्याचं उत्तर मिळू शकेल.

बाकी ओरिगामीविषयी बोलत होतो, म्हणून एक गोष्ट आठवली. हिरोशिमावरच्या अणुहल्ल्यात जखमी झालेल्या सादाको सासाकीची गोष्ट.

अणुहल्ला झाला तेव्हा सासाकी जेमतेम दोन वर्षांची होती. दहा वर्षांनी कॅन्सरनं तिचा मृत्यू झाला. त्याआधी हॉस्पिटलमध्ये असताना सासाकीनं एक हजार क्रेन म्हणजे सारस पक्षी तयार करण्याचं ठरवलं होतं.

जपानमध्ये असं मानलं जातं, की एखाद्यानं कागदापासून असे एक हजार सारस पक्षी तयार केले, तर त्याची इच्छा पूर्ण होईल. पण सासाकीचा त्याआधीच मृत्यू झाला, आणि मग तिच्या मित्र मैत्रिणींनी एक हजार पक्षी पूर्ण केले.

तेव्हापासून हे पक्षी जगभरात शांततेचं प्रतीक बनले आहेत. अगदी ऑलिंपिकसारखेच.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)