ऑलिम्पिक डायरी : टोकियोपर्यंत कशी पोहोचली बीबीसी मराठीची टीम?

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

टोकियो ऑलिम्पिक : कोणत्या देशांना किती पदकं?

'तकेशीज कासल' आठवतोय? 1980-90 च्या दशकातला जपानमधला तो गेम शो जगभरातले लोक आजही पाहतात. त्यात स्पर्धकांना जसे खूप सारे अडथळे पार करावे लागायचे. मुंबईहून इथे टोकियोला पोहोचेपर्यंत माझा प्रवासही काहीसा तसाच होता.

एकतर वर्षभर पुढे ढकललेलं ऑलिम्पिक होईल की नाही, हेही माहिती नव्हतं. त्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत तर खेळाचा विचारही करणंही शक्य नव्हतं.

कोव्हिडमुळे जपाननं आपल्या सीमा बंद केल्या आहेत आणि परदेशी नागरिकांना इथे येण्यावर निर्बंध आहेत. त्यासाठी मुळात व्हिसा मिळणंही कठीण.

त्यामुळेच ऑलिम्पिक ॲक्रेडिटेशन कार्ड हातात पडलं, तेव्हा खूप हायसं वाटलं. कारण या कार्डवरच आम्हाला जपानमध्ये प्रवेश मिळणार होता. पण त्याआधी अजून बरीच कामं बाकी होती.

टेस्ट, टेस्ट, टेस्ट...

आम्हाला इथे येण्याआधी दोन आठवडे घरीच विलगीकरणात राहावं लागलं. प्रवासाला निघण्याआधीचे सात दिवस रोज आमची रोज RTPCR टेस्ट व्हायची. विचार करा, सात दिवस नाकाची काय अवस्था झाली असेल..

तिकडे चंदीगडला माझे सहकारी अरविंद छाबडा यांना तर मान्यताप्राप्त टेस्ट सेंटर शोधण्यापासून तयारी करावी लागली आणि शेवटच्या टेस्टसाठी दिल्लीत जावं लागलं.

सगळी तयारी झाली, असं म्हणून जर दम घेतेय न घेतेय तोच एकदम मोठा झटका बसला. जाण्याच्या जेमतेम दोन दिवस आधी आमचं विमानच रद्द झाल्याचा ईमेल आला. मग पुन्हा खूप सारे फोन कॉल्स, ईमेल्स आणि घरातूनच धावपळ. सरतेशेवटी दुसऱ्या विमानाचं तिकिट मिळालं.

तेरा जुलैच्या संध्याकाळी मी अखेर घरातून बाहेर पडले, तेव्हा मुंबईत पावसाळी हवा होती. एरवी गर्दीनं भरलेला मुंबईचा आंतरराष्ट्रीय टर्मिनल बऱ्यापैकी ओस पडला होता. प्रत्येक ठिकाणी. कागदपत्रांची तपासणी करण्यात, तीन तासांचा वेळ गेला. आधी मुंबईतून दिल्ली आणि मग तिथून टोकियो अशी मजल दरमजल करत हा प्रवास झाला. 14 जुलैच्या दुपारी मी टोकियोला पोहोचले.

टोकियोचं पहिलं दर्शन

टोकियोच्या हानेडा एयरपोर्टवर उतरताच आम्हाला इतर प्रवाशांपेक्षा वेगळं केलं गेलं. पुन्हा बरेच सोपस्कार आमची वाट पाहात होते. या काऊंटरवरून त्या काऊंटरवर असं करताना ठिकठिकाणी स्वयंसेवक मदत करत होते आणि कोणी ठरलेला मार्ग सोडून दुसरीकडे जात नाही ना, यावर त्यांची नजर होती. कोव्हिड टेस्ट निगेटिव्ह आल्यावरच आम्हाला बाहेर पडण्याची परवानगी मिळाली.

एयरपोर्टबाहेर पडलो, तेव्हा संध्याकाळचे सहा वाजत आले होते. मला इतकी झोप येत होती, पण टोकियोची पहिली झलक पाहिली आणि सगळा थकवा निघून गेला.

भारतीय खेळाडूंचे सामने कधी आहेत? पाहण्यासाठी क्लिक करा..

हॉटेलला पोहोचल्यावर आम्हाला तीन दिवस आपापल्या रूमध्ये पूर्ण विलगीकरणात राहावं लागलं. आमच्या टीमची म्हणजे मी, अरविंद आणि बाकीच्या देशांतून आलेले बीबीसीतले सहकारी यांची वेगवेगळ्या 'बबल्समध्ये' विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे अगदी शेजारच्या खोल्यांमध्ये राहात असूनही पहिले तीन दिवस आम्ही एकमेकांना भेटू शकलो नाही.

विलगीकरणातले दिवस

या काळात आम्हाला रोज टेस्टही करावी लागली आणि केवळ तेवढ्यासाठी हॉटेलबाहेर जाण्याची परवानगी होती. इथे सलायव्हा टेस्ट्स आहेत. म्हणजे एका नळीतून ट्यूबमध्ये थुंकी जमा करावी लागते. त्या ट्यूबवर बारकोड लावून टेस्टसाठी नोंदणी करावी लागते. दर ठराविक दिवसांनी ही टेस्ट आम्हाला करावी लागणार आहे.

जपानच्या सरकारच्या नियमांनुसार आमच्या फोन्सवर ॲप इन्स्टॉल केली आहेत, जी आम्ही कुठे गेलो आणि कुणाच्या संपर्कात आलो, आम्हाला काही लक्षणं जाणवतायत का हे सगळं सतत मॉनिटर करतात. त्याशिवाय आम्हाला आमचं रोजचं तापमान, संपर्कात आलेल्या व्यक्ती यांची नोंद ठेवावी लागते.

पहिले दोन आठवडे आम्हाला हॉटेलमध्ये असताना जेवण आपापल्या खोल्यांतच करायचंय. विलगीकरण संपल्यावरही केवळ सुरक्षा मान्यता असलेल्या रेस्टॉरंट्समध्येच आम्ही जाऊ शकतो.

त्यामुळे ऑनलाईन ॲप्सची मोठी मदत होते आहे. पण यातही काही अडचणी आहेत. कारण बहुतांश ॲप्समध्ये सगळा मेन्यू जपानी भाषेतच लिहिलेला असतो. मग भाषांतराच्या ॲपचा वापर करत ऑर्डर करावी लागते. बाकी रूममध्ये फ्रिज आणि मायक्रोवेव्ह असल्यानं जेवणाचे प्रयोगही सुरू आहेत.

तर, इथल्या जेवणाविषयी नंतर सविस्तर लिहिनच. पण आज इथेच थांबायला हवं, बरीच रात्र झाली आहे. उद्या भेटूयात.. सायोनारा!

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)