टोकियो ऑलिम्पिक कोरोना व्हायरसमुळे 2021मध्ये होणार, 1940च्या दुर्दैवाची पुनरावृत्ती

    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

टोकियो ऑलिम्पिक : कोणत्या देशांना किती पदकं?

कोरोना व्हायरसच्या जगभरातील उद्रेकाचा फटका टोकियो ऑलिंपिकला बसला आहे. जुलैमध्ये नियोजित ही जागतिक क्रीडा स्पर्धा आता एका वर्षाने पुढे ढकलण्याचा निर्णय यजमान जपान आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती अर्थात IOCने घेतला आहे.

चीनमधून सुरू झालेल्या कोरोना वायरसचा संसर्ग प्रादुर्भाव आता जगभरातल्या 189 देशांमध्ये झाला आहे. जगभरात सुमारे 3 लाख 35 हजार लोकांना याची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असून मृतांचा आकडा 14,600 वर आहे.

त्यामुळेच आधी कॅनडा आणि त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियन संघाने अधिकृतपणे या स्पर्धेतून माघार घेतली आणि आयोजकांनी ही स्पर्धा पुढे ढकलावी, असं आवाहन अनेक क्रीडापटूंनी केलं होतं.

टोकियोमध्ये होणाऱ्या या समर ऑलिंपिक पाठोपाठ पॅरालिम्पिक गेम्सही तिथेच होणार होते. आता या दोन्ही स्पर्धा पुढील वर्षी म्हणजे 2021मध्ये होणार, पण त्याच्या नंतर नाही, असं यजमान जपानचे पंतप्रधान शिंझो आबे आणि IOCचे प्रमुख थॉमस बॅक यांनी एका संयुक्त निवेदनात म्हटलं.

त्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंगळवारी एक बैठक घेऊन हा निर्णय घेतला. पुढील आयोजनापर्यंत ऑलिंपिकची मशाल टोकियोमध्येच राहणार, असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं.

सुरुवातीला ही स्पर्धा प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवता येईल का, अशा पर्यायांवर आयोजक विचार करत होते. ही अनिश्चितता जपानच्या बहुदा टोकियोच्या नशिबी काही पहिल्यांदा आलेली नाही.

काही क्रीडाप्रेमींना नक्कीच आठवण झाली असावी ती 1940च्या ऑलिंपिक खेळांची, ज्याचं यजमानपद जपानला आणि विशेष म्हणजे टोकियो शहरालाच मिळालं होतं. पण तेव्हासुद्धा ही स्पर्धा होऊ शकली नव्हती.

टोकियोकडून यजमानपद हिरावून घेणारं तेव्हा असं काय झालं होतं तेव्हा? हे जाणून घेणं मनोरंजक आहे, कारण आतापेक्षाही जास्त खल तेव्हा स्पर्धेवरून आणि अगदी यजमानपदावरूनही झाला होता.

तेव्हा सुरू असलेल्या दुसऱ्या महायुद्धाचं. स्पर्धा तर रद्द झाली. पण, त्या काळात तेव्हा नेमकं काय घडलं होतं.

1940चं न झालेलं ऑलिम्पिक

जगभरातील आघाडीची काही वृत्तपत्रं तुम्ही वाचलीत तर त्यात टोकियो ऑलिंपिकचा उल्लेख 'शापित ऑलिंपिक' असा केलेला तुम्हाला आढळेल. द सन या ब्रिटिश वृत्तपत्राने तर तशी ठळक बातमी काही दिवसांपूर्वी केली होती.

भारतीय खेळाडूंचे सामने कधी आहेत? पाहण्यासाठी क्लिक करा..

कारण 1940मध्ये नियोजित ऑलिंपिक खेळांचं यजमानपद आधी टोकियो शहराला बहाल करण्यात आलं होतं, मग तिथली राजकीय परिस्थिती बघून ते हेलसिंकीला हलवण्यात आलं. आणि पुढे दुसऱ्या महायुद्धाचा कहर पाहता ते कधी झालंच नाही.

ऑलिंपिक खेळांच्या इतिहासात ही क्रीडास्पर्धा पूर्णपणे रद्द करावी लागण्याचं हे एकमेव उदाहरण आहे. 1916 आणि नंतर 1944मध्ये स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय आधीच झाला होता. तर स्पर्धा पुढे ढकलणं आजतागायत घडलेलं नव्हतं. ही वेळ आता 2020 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेवरच ओढवली आहे.

टोकयोचं 'शापित ऑलिम्पिक'

ऑलिंपिक खेळांना अधिकृत भाषेत 'गेम्स ऑफ ऑलिंपियाड' असं म्हटलं जातं. त्यानुसार 1940मध्ये होणारे खेळ हे 'Games of the Twelfth Olympiad' असणार होते, म्हणजे बारावे ऑलिम्पिक खेळ.

हे खेळ नेमके कुठे होणार, हे ठरवण्याची प्रक्रिया 1932मध्ये सुरू झाली. बार्सिलोना, रोम, हेलसिंकी आणि टोकियो ही चार शहरं यजमानपदाच्या स्पर्धेत होती. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेवर तोपर्यंत युरोपीयन देशांचीच मक्तेदारी होती. आणि 1896पासून सुरू झालेल्या या स्पर्धा युरोपीयन देशांमध्येच फिरत होत्या.

पण यावेळी खुद्द ऑलिम्पिक संघटनेचा आणि इटली, स्पेन, नाझी जर्मनी यांसारख्या राष्ट्रांचा जपानला पाठिंबा होता. त्याला किनार होती 1931 मुनकेड-मंचुकुयो बेटावरून जपान आणि चीन दरम्यान निर्माण झालेल्या लष्करी समस्येची.

मुनकेड बेटावर ताबा मिळवल्यावरून जपानला लीग ऑफ नेशन्समधूनही बाहेर काढण्यात आलं होतं. चीन आणि जपान एकमेकांसमोर उभे ठाकले होते. लेखिका सँड्रा कॉलिन्स यांच्या 1940 ऑलिंपिक गेम्स - 'मिसिंग ऑलिंपिक' या पुस्तकात हे उल्लेख स्पष्टपणे सापडतात.

अशावेळी ऑलिंपिक समिती आणि काही युरोपियन देशांनी साथ दिल्यामुळे 1936मध्ये ऑलिंपिक खेळांचं आयोजन आश्चर्यकारकरीत्या जपानच्या टोकियो शहराकडे सोपवण्यात आलं.

जपानने मात्र देशावर आर्थिक संकटं असतानाही या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं. आणि आशियातील पहिल्या ऑलिंपिक स्पर्धा म्हणून त्याची जाहिरात केली. 17 वर्षांपूर्वी देशात झालेल्या भूकंपामुळे अर्थव्यवस्थेला आलेली मरगळही त्यांना झटकून टाकायची होती. त्यांनी स्पर्धेची जोरदार तयारी सुरू केली.

माशी कुठे शिंकली?

जपानने ऑलिंपिक आयोजनाची जोरदार तयारी सुरू केली. मुख्य स्पर्धेसाठी मिजी जिंगु हे नॅशनल स्टेडिअम उभारण्यात आलं. ऑलिंपिक व्हिलेजची उभारणी किनुटा पार्कमध्ये सुरू झाली. आणि इतक्यात मंचुकुयो बेटांवरून चीन आणि जपानमधील वातावरण आणखी तापलं.

7 जुलै 1937ला दुसरं सायनो-जपान युद्ध सुरू झालं. आणि देशातच आर्थिकदृष्ट्या हे ऑलिंपिक जपानला परवडणार नाही, अशी हाकाटी सुरू झाली.

जपानी सैन्यावरही ताण होता. त्यांनी ऑलिंपिक स्टेडियमच्या बांधकामासाठी स्टीलऐवजी लाकडाचा वापर करा. स्टील युद्ध साहित्यासाठी लागणार आहे, अशी मागणी केली. हे सगळे प्रसंग सँड्रा कॉलिन्स यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहेत.

जपानी संसदेत त्यामुळे ऑलिम्पिक आयोजन हा रोजच चर्चेचा मुद्दा ठरू लागला. मार्च 1938 पर्यंत म्हणजे कैरोमध्ये झालेल्या ऑलिंपिक समितीच्या बैठकीपर्यंत जपानने आयोजनाचा हेका कायम ठेवला होता. पण युद्ध परिस्थिती चिघळत असलेली बघून जुलै महिन्यात सरकारला विशेष अधिवेशन बोलवावं लागलं.

त्यात ऑलिंपिक आयोजन आणि इतर आंतरराष्ट्रीय सोहळ्यांच्या आयोजनावरच चर्चा झाली. आणि अधिवेशनाची सांगता इतर सोहळे पुढे ढकलणे आणि ऑलिंपिक आयोजन नाकारण्याच्या निर्णयाने झाली.

तेव्हाचे पंतप्रधान कोइची किडो यांनी 16 जुलै 1938ला तशी अधिकृत घोषणा केली. ऑलिंपिक स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय होताना आयोजन समिती आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक परिषद यांच्या दरम्यान एक करार होत असतो. आणि त्यावेळच्या करारात स्पर्धा पुढे ढकलण्याचा पर्याय नव्हता. त्यामुळे जपानला यजमानपदावरील हक्क सोडावा लागला.

टोकयो ते हेलसिंकी

टोकियोने यजमानपद नाकारल्यावर यजमानपद हेलसिंकी शहराकडे चालून आलं. कारण सुरुवातीच्या प्रक्रियेत त्यांचा नंबर टोकियोच्या मागोमाग होता. पण इतक्यात दुसऱ्या महायुद्धाचे ढग युरोप आणि आशियावर जमू लागले.

आणि अखेर 1940च्या ऑलिंपिक स्पर्धा अनिश्चित काळासाठी रद्द कराव्या लागल्या. पुढे 1948मध्ये लंडनचे ऑलिंपिक होईपर्यंत ऑलिंपिक खेळांचा विचारही झाला नाही.

ऑलिंपिक स्पर्धा नियमितपणे सुरू झाल्यावर मात्र हेलसिंकी शहराला 1952 आणि टोकियो शहराला 1964मध्ये आयोजनाची संधी मिळाली.

ऑलिंपिक स्पर्धा आणि युद्धाचे सावट

आतापर्यंत फक्त युद्धानेच ऑलिंपिक खेळांचा खेळखंडोबा केलाय. 1916च्या स्पर्धा पहिल्या महायुद्धामुळे होऊ शकल्या नाहीत. 1944मध्येही दुसऱ्या महायुद्धामुळे ऑलिंपिक शक्य झालं नाही. 1940च्या ऑलिंपिक स्पर्धाही रद्द कराव्या लागल्या.

1936मध्ये जर्मनीच्या बर्लिन शहरात ऑलिम्पिक पार पडलं. तिथे अॅडॉल्फ हिटलर यांचं नाझी सरकार सत्तेत होतं. त्यामुळे अमेरिकेनं बहिष्काराची धमकी दिली होती. पण अखेर अमेरिकेसह एकूण 49 देशांनी बर्लिन ऑलिंपिकमध्ये सहभाग नोंदवला.

1980च्या मॉस्को ऑलिंपिकला शीतयुद्धाची किनार होती. आणि अमेरिकेसह 60 देशांनी या स्पर्धेतून माघार घेतली होती. पण स्पर्धा मात्र ठरल्यासारखी पार पडली. आतापर्यंत स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय अशक्य परिस्थितीतच झाला आहे.

आता 2020मध्ये जगावर कोरोना व्हायरसचं संकट घोंघावतंय. हे प्रत्यक्ष युद्द नसलं तरी रोगाचा वाढता संसर्ग बघता या कोव्हिड-19 रोगाने अनेक देशांत युद्धासारखीच परिस्थिती निर्माण केली आहे. आणि त्यामुळेच लोकांचं आरोग्य आणि जीवाचा विचार करता हे ऑलिंपिक ठरल्यासारखं पुढे न्यावं का असा विचार अनेक देश करतायत.

हे वाचलंत का?

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)