कोरोना व्हायरस : IPL, ऑलिंपिक होणार की नाही?

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

इंडियन वेल्स ओपन म्हणजे टेनिसच्या जगतात ग्रँड स्लॅम स्पर्धांखालोखाल महत्त्वाच्या स्पर्धांपैकी एक. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात होणाऱ्या या स्पर्धेला कुणी पाचवी ग्रँड स्लॅम स्पर्धाही म्हणतात. पण कोरोना व्हायरसच्या साथीच्या पार्श्वभूमीवर 46 वर्षांत पहिल्यांदाच ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे आणि कदाचित ती रद्दच होण्याची शक्यता आहे.

कोरोना व्हायरसचा फटका बसलेली ही एकच स्पर्धा नाही. चीनच्या वुहान शहरातून या विषाणूच्या उद्रेकाची सुरुवात झाली होती. पण आज जगभरातील अनेक देशांमध्ये या विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळं क्रीडा स्पर्धांवरही अनिश्चिततेचं सावट आहे. आयपीएल आणि ऑलिंपिकचाही त्याला अपवाद नाही.

आयपीएलवर कोरोना व्हायरसचं सावट

29 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि चेन्नईच्या संघांमधल्या सामन्यानं आयपीएलच्या तेराव्या मोसमाची सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा ठरल्याप्रमाणेच पार पडेल असं बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काही दिवसांपूर्वी इंडिया टुडेशी बोलताना म्हटलंय. "बीसीसीआय कोरोना व्हायरससंदर्भातली आवश्यक ती सगळी काळजी घेईल" अशी माहितीही त्यांनी दिली.

आयपीएलमध्ये गुंतलेली आर्थिक गणितं पाहता ही स्पर्धा रद्द करावी लागणं बीसीसीआयला परवडणारं नाही. पण क्रिकेट मोजक्याच देशांत खेळलं जातं, आणि सध्यातरी त्यातल्या कुठल्या देशात कोरोनाव्हायरसची साथ पसरलेली नाही. त्यामुळं थायलंडमध्ये आयर्लंडच्या महिला संघाचे सामने वगळता क्रिकेटचे बहुतेक आंतरराष्ट्रीय सामने रद्द झालेले नाहीत.

तरीही खबरदारी म्हणून बीसीसीआय स्पर्धेदरम्यान चाहत्यांसोबत हात मिळवणं टाळा, किंवा दुसऱ्यांचे फोन हातात घेऊन सेल्फी काढणं टाळा, अशा सूचना खेळाडूंना देण्याची शक्यता मात्र आहे.

भारत दौऱ्यावर आलेली दक्षिण आफ्रिकेची क्रिकेट टीमही अशाच स्वरुपाची काळजी घेणार असल्याचं त्यांचे प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी सांगितलं. येत्या 12 मार्चपासून त्यांची टीम भारतात धर्मशाला, लखनऊ आणि कोलकाता इथे तीन वन डे सामने खेळणार आहे.

सध्या श्रीलंका दौऱ्यावर असलेले इंग्लंडच्या क्रिकेटर्सही विषाणूपासून सुरक्षिततेची काळजी घेतायत. तिथल्या अध्यक्षीय संघासोबतच्या सामन्यानंतर खेळाडू शेकहँडऐवजी 'फिस्ट पम्प' करतानाचा फोटोही प्रसिद्ध झाला आहे.

क्रीडा जगताची सावध भूमिका

पण कोरोना व्हायरसविषयी क्रीडा जगतात इतकी सावधानता का दिसून आहे? कारण खेळ फक्त मैदानापुरते मर्यादित नसतात.

खेळांचे सामने अनेकदा मोठ्या स्टेडियम्समध्ये भरवले जातात, जिथे हजारो लोक एकत्र येतात. अशा गर्दीच्या जागी विषाणूंचा प्रसार अधिक वेगानं होत असल्यानं तिथं जाणं टाळावं असं जगभरातल्या तज्ज्ञांनी सांगितलं आहे. तसंच अनेकदा हे सामने पाहण्यासाठी लोक एका देशातून दुसऱ्या देशात जातात, आणि त्यांच्याद्वारा विषाणूंचा प्रसार होण्याची भीती आणखी वाढते.

त्यामुळंच क्रीडा संघटना खेळांचे सामने रद्द करणे, किंवा पुढे ढकलणे किंवा प्रेक्षकांशिवाय खेळवणे अशा उपाययोजना करताना दिसतायत.

कुठल्या खेळांवर, कुठल्या देशात परिणाम झाला आहे?

चीन आणि इटली या दोन देशांत कोरोना व्हायरसच्या उद्रेकाची तीव्रता मोठी आहे. त्याचा परिणाम त्या दोन देशांतल्या बहुतांश खेळाडूंवर आणि क्रीडा स्पर्धांवर दिसतो आहे. या दोन देशांतल्या अनेक खेळाडूंनाही बाहेरच्या देशांतल्या स्पर्धांमधून माघार घ्यावी लागली आहे.

चीनमध्ये होणारे महिला टेनिसचे सामने रद्द करण्यात आले आहेत, फॉर्म्युला वन ची चायनीज ग्रांप्री पुढे ढकलण्यात आली आहे. तर इटलीच्या पंतप्रधानांनी तीन एप्रिलपर्यंत देशातले सगळे सामने निलंबित करत असल्याचं जाहीर केलंय. इंडियन वेल्स ही अमेरिकेतली टेनिस स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.

रग्बी युनियनचे सामने, बॅडमिंटन चायना मास्टर्स अशा काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर युरोपा लीग फुटबॉल, चॅम्पियन्स लीग फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड कप, सायकलिंग अशा स्पर्धा प्रेक्षकांशिवाय किंवा मर्यदित प्रेक्षक संख्येत खेळवल्या जातायत.

जपान, दक्षिण कोरिया या देशांतही कोरोना व्हायरसच्या प्रसाराची तीव्रता पाहायला मिळाली आहे. त्यामुळं टोक्योमध्ये यंदा होणाऱ्या ऑलिम्पिकविषयीही अनिश्चिततेचं वातावरण आहे.

ऑलिम्पिकविषयी अनिश्चितता

12 मार्च रोजी ऑलिम्पिकची मशाल ग्रीसच्या ऑलिम्पियामध्ये प्रज्वलीत केली जाणार आहे आणि नंतर ती जपानपर्यंतचा प्रवास सुरू करेल. पण यंदा ऑलिंपिक होणार की नाही, याविषयी सध्या तरी अनिश्चितता कायम आहे. सध्या तरी आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी ठरलेल्या वेळेनुसार म्हणजे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत टोक्योमध्ये ऑलिंपिक होईल अशी ग्वाही दिली आहे.

पण ऑलिंपिक ठरल्यानुसार झालं, तरीही त्यावर कोरोना व्हायरसचं सावट दिसून येईल. कारण या साथीमुळं अनेक खेळांच्या ऑलिंपिक पात्रता फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळं ऑलिम्पिक गाठण्याची संधी काही खेळाडूंना गमवावी लागू शकते आणि पदक तालिकेवर त्यामुळं परिणाम होऊ शकतो. विशेषतः चीनला त्याचा फटका बसू शकतो.

याआधी 1916 साली पहिलं महायुद्ध आणि 1940 आणि 1944 साली दुसरं महायुद्ध यांमुळं त्या त्या वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा रद्द झाल्या होत्या. पण एखाद्या विषाणूमुळे ऑलिम्पिक रद्द करण्याची किंवा पुढे ढकलण्याची वेळ कधी ओढवलेली नाही.

2003 साली सार्स या रोगाच्या कोरोना व्हायरसची साथ पसरली होती, तेव्हा महिलांचा फुटबॉल विश्वचषक चीन ऐवजी अमेरिकेत हलवण्यात आला होता. तर युनायटेड किंग्डममध्ये होणारी बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप रद्द करण्यात आली होती. 2004चं अथेन्स ऑलिंपिक मात्र ठरल्याप्रमाणेच पार पडलं होतं.

त्यामुळंच ऑलिंपिकच्या आयोजकांनी आणि खेळांच्या चाहत्यांनीही अजून आशा सोडलेली नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)