कोरोना व्हायरसबद्दल या 11 गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव चीनमध्ये सर्वत्र पसरल्याच्या बातम्या येत आहेत. त्याच बरोबर भारतात एकूण 30 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तसेच प्राथमिक चाचणीमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याची लक्षणं दिसणाऱ्यांची संख्या 23 वर गेली आहे.

कोरोना विषाणूची लागण झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. हा आजार काय आहे आणि नेमके कोणते उपचार घ्यावे लागतात हे जाणून घेण्यासाठी

कोरोना व्हायरसमुळे होणारा कोव्हिड-19 हा श्वसनमार्गाचा आजार आहे. ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवल्यास तातडीने रुग्णालयात जावे, या विषाणूला मारून टाकण्याचा उपाय नाही. पण त्रासापासून आराम मिळण्यासाठी बाकीच्या सपोर्टिव्ह ट्रिटमेंट करता येऊ शकतात.

म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचं आहे. विशेषतः रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांनी, गर्भवती, कॅन्सर रुग्ण यांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे, असं मत डॉ. अविनाश भोंडवे यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केलं.

डॉ. भोंडवे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या मुलाखतीत कोरोना व्हायरसशी संबंधित अनेक शंकांचं निरसन केलं.

कोरोना व्हायरस आणि त्याच्यामुळे होणारा आजार कोव्हिड-19 यांची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. चीनमध्ये याची सुरुवात झाली. तर आता जगभरातल्या अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरस जाऊन पोहोचला आहे. सध्या यामुळे चिंतेचं वातावरण आहे, पुरेशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे याविषयी अनेक गैरसमज लोकांमध्ये निर्माण झाले आहेत.

कोरोना व्हायरसबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी बीबीसीने डॉ. अविनाश भोंडवे यांची मुलाखत घेतली. डॉ. भोंडवे यांची मुलाखत प्रश्नोत्तराच्या स्वरुपात पुढीलप्रमाणे -

1. कोरोना व्हायरसचा नेमका उगम कसा झाला, त्याचा प्रसार कसा झाला?

कोरोना व्हायरस हा आधीपासूनच अस्तित्वात होता. फक्त तो माणसापर्यंत आलेला नव्हता. वटवाघळांमार्फत तो माणसापर्यंत येऊन पोहोचला, असा अंदाज आहे. असे बरेच आजार आहेत, जे प्राण्यांमध्ये होते आणि आता माणसांमध्ये आले आहे. याला मोठ्या प्रमाणात झालेलं नागरीकरण कारणीभूत आहे.

त्या प्राण्यांच्या भूमीवर माणसाने अतिक्रमण केलं. त्यामुळे या प्राण्यांशी माणसाचा जास्त संपर्क होत आहे. याची लागण सर्वप्रथम चीनमध्ये झाली. चीन लोकांनी वटवाघळासारख्या एखाद्या प्राण्याचे मांस खाल्यामुळे तो मानवी शरीरात दाखल झाला.

2. सध्या याचा संसर्ग कोणत्या माध्यमातून होत आहे?

या विषाणूचा संसर्ग श्वसनमार्गातून होतो. सर्वप्रथम विषाणू नाकात, घशात आणि फुफ्फुसात जातो. त्यानंतर तो संपूर्ण शरीरात पसरतो. याची लागण झालेल्या रुग्णाला खोकला येतो. लागण झालेली व्यक्ती आपल्या आजूबाजूला खोकली की त्याचा आपल्यालाही संसर्ग होण्याची शक्यता असते.

किंवा लागण झालेला व्यक्ती खोकलल्यानंतर हे विषाणू ठराविक वेळेपर्यंत टेबलवर, वाहनाच्या सीटवर किंवा दरवाजाच्या हँडलवर असे कुठेही पडलेले असू शकतात. याठिकाणी तुम्ही स्पर्श केल्यानंतर नाकाला हात लावला तर त्याचा तुम्हाला संसर्ग होऊ शकतो.

3. चीनमधून आलेल्या वस्तूंच्या माध्यमातून याचा संसर्ग होतो का?

कोरोना व्हायरसचा उगम चीनमध्ये झाला हे खरं असलं तरी तिथून आलेल्या वस्तूंच्या माध्यमातून कोरोना व्हायरसचा प्रसार होत नाही.

रुग्ण व्यक्तीच्या खोकल्यावाटे याचा प्रसार होतो. पण तिथून आलेल्या वस्तूंपासून आपल्याला काहीही धोका नाही.

4. चिकन-मटण खाल्ल्याने याचा प्रसार होतो का?

याचा संसर्ग प्राण्यांमधून माणसाला झालेला आहे. पण नक्की कोणत्या प्राण्यातून उगम झाला हे माहीत नाही. त्यामुळे अशी शंका सर्वजण घेत आहे. पण जर तुम्ही कच्चं मांस खात असाल तरच तशी शक्यता आहे. भारतात मांस योग्यप्रकारे शिजवून खाण्याची पद्धत आहे.

तर चीनमध्ये कच्चे प्राणी, पक्षी, कीटक खाण्याची पद्धत आहे. उलट भारतात अंडीसुद्धा उकडून खाल्ली जातात. 55 डिग्रीपेक्षा जास्त तापमान असेल तर हे विषाणू जिवंत राहत नाहीत. त्यामुळे आपण बिनधास्त चिकन-मटण खाऊ शकतो.

5. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका कुणाला आहे?

रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांना याचा सर्वांत जास्त धोका आहे. त्याशिवाय गर्भवती, कॅन्सर रुग्ण, एचआयव्ही रुग्ण, किमोथेरपीसारखे उपचार सुरू असलेले रुग्ण यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अशा व्यक्तींनी थोडासाही त्रास जाणवू लागल्यास तातडीने उपचार घ्यावेत.

6. रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवाल?

रोगप्रतिकारशक्तीबाबत लोकांमध्ये गैरसमज आहेत. रोगप्रतिकारशक्ती आपल्याला जन्मापासूनच बऱ्याच आजारांबाबत असते. बाळ जन्माला आल्यानंतर आई त्याला स्तनपान देते, त्याचवेळी त्याला अनेक रोगांना लढण्याची ताकद मिळते. पण ज्या आजारांची रोगप्रतिकारशक्ती नसते, अशा आजारांचं लसीकरण केलं जातं.

एकूणच आपलं आरोग्य हीच आपली रोगप्रतिकारशक्ती आहे. आरोग्य सुदृढ राहण्यासाठी चौरस आहार, व्यायाम आणि नियमित वैद्यकीय तपासणी करणं महत्त्वाचं आहे.

7. तुळशीच्या पानाचं सेवन केल्यानं याचा प्रसार रोखता येतो, हा दावा कितपत खरा?

या दाव्यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. कोरोना व्हायरसवरचा उपाय अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे कोणत्याही ऐकीव माहितीवर विश्वास ठेवू नका. परंपरागत शास्त्रांचा वापर करून चुकीची माहिती पसरवली जात आहे.

8. भारतातील उन्हाळ्यात हा विषाणू जिवंत राहू शकतो का?

हा विषाणू 55 डिग्रीपेक्षा जास्त तापमानात जिवंत राहत नाही. आपल्या देशातील उन्हाळ्यात तापमान 40 किंवा 42 डिग्रीच्या आसपास असतं. त्यामुळे उन्हाळ्यात हा विषाणू मरून जाईल, अशी अजिबात शक्यता नाही. म्हणून आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचं आहे.

9. माहिती उपलब्ध नाही, तर डॉक्टर कशाप्रकारे उपचार करत आहेत?

हा श्वसनमार्गाचा आजार आहे. लवकरात लवकर त्याचं निदान होणं आवश्यक आहे. यामध्ये ताप येणं, सर्दी, खोकला ही लक्षणं दिसू लागतात. ही लक्षणं दिसतात त्वरित त्या व्यक्तीची तपासणी करणं गरजेचं आहे. त्याची चाचणी केल्यावर विषाणूची लागण झाल्याचं कळून येतं.

त्या विषाणूला मारुन टाकण्याचा उपाय नाही. पण ताप, सर्दी यांच्या त्रासापासून पेशंटला आराम मिळण्यासाठी बाकीच्या सपोर्टिव्ह ट्रिटमेंट करता येऊ शकतात.

हा विषाणू ठराविक काळ शरीरात राहून निघून जातो. असं बऱ्याच विषाणूंच्या बाबतीत आहे.

आपण या विषाणूला मारू शकत नाही. पण शरीरात राहून तो जे नुकसान करु शकतो त्याला रोखण्यासाठी ट्रीटमेंट केली जाते.

10. मास्क वापरून या विषाणूला रोखता येतं का? कोणत्या प्रकारचे मास्क वापरावेत?

श्वास घेताना हा विषाणू बाहेरच राहील असा मास्क वापरल्यास प्रभावी ठरेल. कोणतंही कापड, साधा मास्क, रुमाल वापरु नये. यासाठी N95 पद्धतीचा मास्क उपयोगी ठरेल. पण याची गरज रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्स यांना जास्त आहे.

सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावर मास्क घालून फिरण्याची गरज नाही. पण गर्दीच्या ठिकाणी फिरताना आपल्या आजूबाजूला कुणी खोकलल्यामुळे संसर्ग होऊ नये, याची काळजी घ्यावी. त्यासाठी मास्क वापरु शकतो.

11. निदान करण्यासाठी कुठे-कुठे तपासणी केंद्र आहेत?

भारतात सहा ठिकाणी याचं निदान होतं. पण तुम्हाला तिथं जाण्याची गरज नाही. प्रत्येक गावात सरकारी दवाखान्यात यासाठी तपासणी कक्ष आहेत. संशयास्पद असल्यास पुढची प्रक्रिया होईल. खासगी डॉक्टरसुद्धा याबाबत मार्गदर्शन करू शकतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)