You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारताबरोबर इंडोनेशियाही 2032च्या ऑलिंपिक आयोजनाच्या स्पर्धेत
सध्या एशियन गेम्सचं आयोजन करत असलेल्या इंडोनेशिया 2032च्या ऑलिंपिक आणि पॅरालिंपिकच्या आयोजनासाठी प्रयत्नशील असणार आहे. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विदोदो यांनी ही घोषणा केली आहे.
2032च्या ऑलिंपिक आयोजनासाठी या आधीच भारत, ऑस्ट्रेलियातील आग्नेय क्विन्सलँड आणि चीनमधील शांघायही प्रयत्नशील आहेत. भारत आणि इंडोनेशियाला ऑलिंपिक संयोजनचा पूर्वानुभव नाही.
विदोदो यांनी शनिवारी इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटीचे अध्यक्ष थॉमस बाक यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
इंडोनेशियात सध्या 18वे एशियन गेम्स सुरू आहेत. अनेक खेळांचा सहभाग असलेली जगातल्या सर्वांत मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक एशियन गेम्स आहेत.
विदोदो म्हणाले, "एशियन गेम्सच्या यशस्वी आयोजनाच्या अनुभवानंतर आम्ही यापेक्षाही मोठी क्रीडा स्पर्धा आयोजित करू शकतो असा आम्हाला विश्वास आहे."
आर्थिक कारणांमुळे व्हिएतनामने माघार घेतल्यानंतर या एशियन गेम्सचं आयोजन 4 वर्षांपूर्वी इंडोनेशियाकडे देण्यात आलं. या क्रीडा स्पर्धांच्या संयोजनाच्या दर्जाबद्दल इंडोनेशियाचं कौतुक होतं आहे.
बाक यांनी इंडोनेशियाच्या उमेदवारीचं स्वागत केलं आहे. एशियन गेम्सच्या आयोजनाने इंडोनेशियाला भक्कम पाया दिला आहे, असं ते म्हणाले.
बाक म्हणाले, "इंडोनेशियाने एशियन गेम्सचं आयोजन यशस्वीरीत्या केलं असल्याने, त्यांनी ऑलिंपिकचं आयोजनही करण्याची क्षमता असल्याचं दाखवून दिलं आहे. इंडोनेशियामध्ये मित्रत्व आणि कार्यक्षमता या दोन्ही गोष्टी दिसून आल्या आहेत."
2020चं ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक टोकियोमध्ये होत आहे. तर 2024 आणि 2028च्या ऑलिंपिकसाठी अनुक्रमे पॅरिस आणि लॉस एंजेलिस यांची निवड यापूर्वीच झालेली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)