महंमद अली का होते शतकातील सर्वोत्तम खेळाडू?

क्रीडा क्षेत्राशी संबंध आला असेल किंवा नसेल पण महंमद अली हे नाव ऐकलं नाही, अशी व्यक्ती अभावानेच सापडेल. 20व्या शतकातील सगळ्यांत प्रभावशाली आणि प्रथितयश बॉक्सर म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. किंबहुना अनेक जण त्यांना सर्वश्रेष्ठ बॉक्सरच मानतात.

अलींची कारकीर्द जितकी यशस्वी तितकीच वादग्रस्त. अशा महंमद अली यांचा आज 75वा जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकीर्दीचा घेतलेला हा मागोवा.

कॅशिअस मार्सेलस क्ले हे त्यांचं मूळ नाव. त्यांचा जन्म 17 जानेवारी 1942 रोजी अमेरिकेतल्या केंटकी राज्यात झाला.

1960च्या रोम ऑलिंपिकमध्ये लाईट हेवीवेट गटात त्यांनी सुवर्ण पदक जिंकलं आणि ते पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर चार वर्षात त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला आणि महंमद अली हे नवा धारण केलं.

'द ग्रेटेस्ट' या नावाने ते लवकरच ओळखले जाऊ लागले. 1964मध्ये सोनी लिस्टॉनला हरवून त्यांनी पहिल्यांदा विश्वविजेतेपद पटकावलं. आणि नंतर तीन वेळा विश्व हेविवेट गटात विजेतेपद पटकावणारे ते पहिले बॉक्सर ठरले होते.

आपल्या कारकीर्दीत ते एकूण 61 सामने खेळले आणि त्यातले 56 त्यांनी जिंकले. 1981मध्ये बॉक्सिंगमधून त्यांनी निवृत्ती पत्करली.

एका क्रीडा नियतकालिकाने त्यांचा 'शतकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू' म्हणून गौरव केला. तर बीबीसीनेही 'शतकातला सर्वोत्तम क्रीडापटू' असा त्यांचा सन्मान केला.

बॉक्सिंग रिंगमध्ये त्यांचं कौशल्य वादातीत होतं. तर सामन्यांपूर्वी आणि नंतर त्यांच्या वक्तव्यांमुळे ते कायम चर्चेत राहिले.

रिंगच्या बाहेर ते सामजिक कार्यकर्ते होते. नागरी हक्क संरक्षणाचे खंदे पुरस्कर्ते होते. क्रीडा, जातीयवाद आणि राष्ट्रीयता या विषयांवर उघडपणे त्यांनी मतप्रदर्शन केलं. पण या सगळ्याच्या पलीकडे ते कवीही होते.

'तुमची जगासमोर काय ओळख रहावी?' हा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी स्वत:चं वर्णन, "आपल्या लोकांचा कधीही सौदा न करणारी व्यक्ती" असं केलं होतं.

"हे अती झालं असं वाटत असेल तर मी एक चांगला बॉक्सर आहे, असं तुम्ही म्हणू शकता. मग मला तुम्ही सुंदर नाही म्हटलं याचं मला वाईट वाटणार नाही," अली यांनी आपलं म्हणणं पूर्ण केलं.

रोम ऑलिंपिकनंतर लगेचच अली यांनी व्यावसायिक बॉक्सिंगला सुरुवात केली. 22व्या वर्षी त्यांनी हेवीवेट विजेतेपद जिंकलं आणि जगाला अक्षरश: अचंबित केलं.

लिस्टॉन तेव्हाचा अजेय खेळाडू होता. 'त्याला हरवू' अशी गर्जना अली यांनी सामन्यापूर्वीच केली होती. फक्त काहीच लोकांना तेव्हा अली यांच्यावर भरवसा वाटला होता.

लिस्टॉन विरुद्धच्या पहिल्या सामन्याची तयारी करताना त्यांचा ओढा मुस्लीम धर्माकडे दिसून आला होता. मग त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला आणि आपलं नाव बदललं.

1967मध्ये अमेरिकन सरकारच्या व्हिएतनामशी युद्ध करण्याच्या निर्णयाला त्यांनी विरोध केला. त्यासाठी त्यांनी अमेरिकन नागरिकांची टीकाही सहन केली.

अमेरिकन नागरिकासाठी अनिवार्य असलेलं सैनिकी प्रशिक्षण घ्यायला त्यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांचं विश्वविजेतेपद आणि बॉक्सिंगचा परवानाही रद्द करण्यात आला.

त्यामुळे पुढची चार वर्षं बॉक्सिंगपासून त्यांना दूर रहावं लागलं.

1971मध्ये ते बॉक्सिंग रिंगमध्ये परतले आणि काही संस्मरणीय सामने खेळले. आणि अखेर लोकांच्या मनातली आपली जुनी प्रतिष्ठा त्यांनी परत मिळवली.

8 मार्च 1971रोजी न्यूयॉर्क शहरात झालेली आणि जगभर गाजलेली जो फ्रेझर विरुद्धची लढत त्यांनी गमावली. व्यावसायिक बॉक्सिंगमधला हा त्यांचा पहिला पराभव होता.

त्यानंतर विश्वविजेतेपद त्यांनी परत मिळवलं ते थेट 1974मध्ये. 'रंबल इन द जंगल'मध्ये झालेल्या या लढतीत त्यांनी जॉर्ड फोरमन यांचा पराभव केला.

कारकीर्दीत तीन वेळा त्यांनी विश्वविजेतेपद पटकावलं - 1964, 1974 आणि अंतिम 1978 मध्ये.

1996मध्ये अटलांटा इथं झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये त्यांच्या हस्ते ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित करण्यात आली. तर 2012च्या लंडन ऑलिंपिकमध्ये ध्वजवाहनाचा मान त्यांना मिळाला.

पण त्यानंतर हळूहळू त्यांची प्रकृती खालावत गेली. डिसेंबर 2014 मध्ये त्यांना पहिल्यांदा रुग्णालयात भरती करावं लागलं.

अखेर 3 जून 2016ला 74व्या वर्षी त्यांचा मृत्यू ओढवला.

अंतिम समयी ते प्रसिद्धीपासून दूर होते. त्यांच्या प्रवक्त्यांनी अमेरिकेतल्या एरिझोना राज्यात फिनिक्स शहरात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी मीडियाला दिली.

त्यांना श्वसनविकार होता. आणि 1984 मध्ये पार्किंसन्सचा झटकाही त्यांना आला होता.

त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, त्यांचं जन्मगाव असलेल्या केंटकी राज्यातल्या लुईसव्हिल गावात त्यांचा दफनविधी करण्यात आला.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)