You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एशियन गेम्स : इंडोनेशियात क्रीडा स्पर्धांच्या बंदोबस्तासाठी 77 जणांना ठार केलं
इंडोनेशियामध्ये सुरू होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर इथल्या पोलिसांनी अनेक छोट्या गुन्हेगारांना थेट संपवून टाकलं आहे. अशी माहिती मानवाधिकारांसाठी काम करणाऱ्या अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेनं दिली आहे.
अॅम्नेस्टी इंटरनॅशनल संस्थेनं या हत्यांचा निषेध केला असून याप्रकरणी तपासाची मागणी केली आहे. 'आधी गोळ्या घाला, मग चौकशी करा' असं इंडोनेशियाच्या पोलिसांचं धोरण असल्याचं या संस्थेनं म्हटलं आहे.
अॅम्नेस्टी संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीपासून जवळपास 77 जणांना पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारलं आहे. यातले 31 मृत्यू हे ज्या शहरात आशियाई स्पर्धा होणार आहेत त्या भागातले आहेत.
ज्यांनी चौकशी दरम्यान विरोध केला त्यांनाच गोळ्या घातल्याचं इथल्या प्रशासनानं स्पष्ट केलं.
बीबीसीच्या इंडोनेशिया सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार, जुलैपासून मोठ्या प्रमाणात पोलिसांनी शहरभर धाडी टाकण्यास सुरुवात केली. यावेळी धाड टाकणाऱ्या अधिकाऱ्यांना वरिष्ठांनी कठोर कारवाईस मागे-पुढे करू नका, असे स्पष्ट निर्देश दिले होते.
दोन आठवडे चालणाऱ्या या आशियाई क्रीडा स्पर्धा आज, शनिवारपासून सुरू होत आहेत. इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता आणि दक्षिण सुमात्रातलं शहर पॅलेमबँग इथे या स्पर्धा पार पडणार आहेत.
इंडोनेशियाच्या पोलिसांनी जवळपास 1 लाख पोलीस आणि जवानांची या खेळांच्या सुरक्षेसाठी नियुक्ती केली आहे. 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या दरम्यान चालणाऱ्या स्पर्धेत 17 हजार खेळाडू सहभागी होत आहेत. ऑलिंपिकनंतरची ही सगळ्यांत मोठी स्पर्धा मानली जाते.
"इथल्या प्रशासनानं सगळ्यांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. पण, आम्ही पाहतो आहोत की, पोलिसांनी अनेकांना कोणत्याही कारणाशिवाय ठार केलं आहे. एका आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन हे कधीही मानवी हक्कांच्या मूळावर उठता कामा नये," असं अॅम्नेस्टी इंडोनेशियाचे प्रमुख उस्मान हमीद यांनी सांगितलं.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात हत्यांचं सत्र वाढलं. ग्रेटर जाकार्तामधल्या 11 जणांना ठार करण्यात आलं, तर ४4 जणांच्या पायावर गोळी मारण्यात आली.
2017च्या तुलनेत 2018मध्ये छोट्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्यांच्या हत्येत तब्बल 64 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
"हे धक्कादायक आकडे पाहता पोलिसांकडून उगाच आणि जादा कारवाई केली जात असल्याचं दिसून येतं," असं हमीद म्हणतात.
राष्ट्रीय पोलीस प्रमुख टिटो कार्नावियान यांनी दिलेल्या माहितीनुसार, हजारो नागरिकांना अटक करण्यात आली असून शेकडोंना ताब्यात घेतलं आहे. जेणेकरून देशात येणाऱ्या प्रवाशांना त्यांचा कोणताही त्रास होणार नाही.
ते पुढे सांगतात, "गेल्या महिन्यात मी माझ्या अधिकाऱ्यांना पाकिटमार आणि बॅग चोरांचं जाळं संपूर्ण उध्वस्त करण्याचे आदेश दिले आहेत. जर, एखाद्यानंही विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना थेट संपवून टाकण्यास सांगितलं आहे."
पोलिसांची ही कारवाई क्रीडा स्पर्धा सुरू असेपर्यंत चालू राहील. पण, जाकार्तामधल्या नागरिकांनी या कारवाईला विरोध केलेला नाही. अशी माहिती बीबीसी इंडोनेशियाचे प्रतिनिधी हैदर अफान यांनी दिली.
या कारवाईबद्दल एका रहीवाशाला विचारलं असता तो सांगतो की, "मी पोलिसांच्या कारवाईचं पूर्ण समर्थन करतो. नाहीतर लोकांना रस्त्यावर वावरणं देखील मुश्किल होऊन बसेल."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)