मॅराडोनाचा हँड ऑफ गॉड गोल आणि इंग्लंड-अर्जेंटिनाच्या फुटबॉल वैराची कथा

    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

क्रिकेटमध्ये भारत-पाक हे जसे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत, तसंच वैर फुटबॉलमध्ये इंग्लंड आणि अर्जेंटिना या देशांमध्ये आहे. या दोन्ही देशांसाठी या अनुषंगानं 22 जून ही तारीख महत्त्वाची. कारण मॅराडोनाचा हँड ऑफ गॉड गोल.

त्याच सार्वकालीन महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचं निधन झालं. ते 60 वर्षांचे होते.बॉलवर नियंत्रण मिळवण्याची हातोटी, अफलातून पदलालित्य आणि गोल करण्यातलं अद्भुत कौशल्य यामुळे मॅराडोना यांचं नाव दिग्गज फुटबॉलपटूंच्या मांदियाळीत घेतलं जातं. दिएगो मॅराडोना यांच्या नेतृत्वात खेळणाऱ्या अर्जेंटिनाने फुटबॉल विश्वविजेतेपदावर नाव कोरलं होतं.

फुटबॉलच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध अर्जेंटिना या वैराचं एक कारण लॅटिन अमेरिकन फुटबॉल विरुद्ध युरोपीयन फुटबॉल हे आहेच. शिवाय फॉकलंड आयलंड्समध्ये झालेल्या नागरी युद्धाची किनार त्याला आहे. त्यानंतर उभय टीममधली कटुता वाढण्यासाठी निमित्त ठरला २२ जून १९८६ रोजी मेक्सिको सिटीमध्ये झालेल्या वर्ल्ड कप मॅचमध्ये दिग्गज अर्जेंटाईन खेळाडू दिएगो मॅराडोनाने केलेला 'हँड ऑफ गॉड गोल'.

विशेष म्हणजे मॅराडोना यांचा हा गोल आणि फुटबॉलच्या इतिहासात शतकात सर्वोत्तम ठरलेला गोल याच मॅचमधले आहेत.

काय आहे हँड ऑफ गॉड गोल?

१९८६चा फुटबॉल वर्ल्ड कप मेक्सिको देशात झाला. इंग्लंड आणि अर्जेंटिना या दोन्ही टीम स्पर्धेपूर्वी विजेतेपदाच्या दावेदार नव्हत्या.

पण, स्पर्धेच्या साखळी फेरीत मात्र दोघांनी दणदणीत कामगिरी केली होती. अर्जेंटिनासाठी दिएगो मॅराडोनाचा काळ नुकता सुरू झाला होता. इंग्लंडचा गोलकीपर पीटर शिल्टन सर्वांत अभेद्य बचावासाठी प्रसिद्ध होता.

इंग्लंड आणि अर्जेंटिनाच्या टीम क्वार्टर फायनलच्या मॅचसाठी मेक्सिको सिटी शहरात आमने सामने आल्या. १९६६च्या वर्ल्ड कपपासून दोन टीममधून विस्तवही जात नव्हता.

टीमचे पाठीराखेही आपला राग स्टेडिअमबाहेर मुक्तपणे व्यक्त करत. तर इंग्लिश समालोचक अर्जेंटिना टीमचा नामोल्लेख टाळून 'द अदर टीम' किंवा 'प्लेअर फ्रॉम अदर टीम' असं म्हणायचे.

अशा वेळी २२ जूनच्या दुपारी ही मॅच सुरू झाली. अपेक्षेप्रमाणेच मुकाबला मॅराडोना आणि इंग्लिश गोली पीटर शिल्टन यांच्यामध्ये होता.

पहिल्या हाफमध्ये मॅराडोनाचे काही सुरेख पास शिल्टन यांनी अडवले. पण, दुसऱ्या हाफमध्ये दहाव्याच मिनिटाला तो क्षण आला.

मॅराडोना यांनी मैदानाच्या डाव्या बगलेतून बॉल पुढे खेळायला सुरुवात केली. म्हणता म्हणता त्यांचा हल्ला तीव्र झाला. आणि डाव्या बाजूनेच भन्नाट वेगाने पुढे सरकत त्यांनी बॉल गोलजाळ्याच्या दिशेनं लाथाडला.

हा पहिला फटका इंग्लिश मिडफिल्डर स्टिव्ह हॉज यांनी अडवला. पण, बॉल त्यांना लागून उडाला. गोलकीपर शिल्टनही हा बॉल घेण्यासाठी गोलजाळं सोडून पुढे धावले. खरंतर शिल्टन ६ फूट उंचीचे. तर मॅराडोना त्यांच्यापेक्षा आठ इंचाने कमी.

पण, चपळ हालचालींनी मॅराडोना आधी बॉलजवळ पोहोचले. आणि क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी बॉल गोलजाळ्यात ढकलला. असं करताना त्यांचा हात हवेत होता. आणि बॉल खांद्याच्या दिशेनं उंच उडालेलाही सगळ्यांनी पाहिला. पण, सगळं इतकं क्षणार्धात घडलं की रेफरींना हे दिसलं नाही.

आणि त्यांनी हा गोल घोषित केला. यूट्यूब या सोशल मीडिया साईटवर या मॅचची क्षणचित्रं उपलब्ध आहेत.

पीटर शिल्टन आणि इतर इंग्लिश खेळाडूंनी अर्थातच विरोध केला. पण, तेव्हा आतासारखे थर्ड अंपायर नव्हते. त्यामुळे गोल अर्जेंटिनाच्या नावावर लागलाच. अर्जेंटिनानं मॅच २-१ अशी जिंकली.

मॅराडोना यांची प्रतिक्रिया काय होती?

या गोलनंतर दोन देशांमधलं वातावरण आणखीनच तापलं. इंग्लंडने निषेध व्यक्त केला. मॅच नंतरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मॅराडोना यांनी दिलेलं उत्तर असं होतं, "तो गोल झाला त्याला कारण थोडं आपलं डोकं आणि थोडा दैवी हात."

'द सन' या इंग्लिश वृत्तपत्राने त्यांचं हे वक्तव्य छापलं होतं. तेव्हापासून या गोलला नाव पडलं 'हँड ऑफ गॉड'.

सीएनएन वेबसाईटवर मार्क बेचेल यांनी राईट टू चीट नावाने एक लेख लिहिला आहे. २००५ साली लिहिलेल्या या लेखात मॅराडोनाचं आणखी एक वक्तव्य आहे.

"गोलनंतर माझे सहकारी मला मिठी मारतील असं मला वाटलं होतं. कुणीच पुढे आलं नाही. शेवटी मी ओरडलो, मला मिठी मारा नाहीतर रेफरींना शंका येऊन ते गोल देणार नाहीत."

गोल ऑफ द सेंच्युरी

हँड ऑफ गॉड नंतर चारच मिनिटात फुटबॉल जगताला २०व्या शतकातला सर्वोत्तम फुटबॉल गोल बघायला मिळाला. आणि तो करणाराही दुसरा तिसरा कुणी नाही तर मॅराडोना होता.

अर्जेंटिनाच्या हाफमध्ये मिडफिल्डर हेक्टर एन्रिक यांनी मॅराडोनाकडे पास दिला. तिथून त्यांनी जी सुरुवात केली ते म्हणता म्हणता ते इंग्लंडच्या गोलजाळ्यापाशी थडकले.

असं करताना त्यांनी सात इंग्लिश खेळाडूंना चकवलं. आणि शेवटी गोली पीटर शिल्टनला चकवत काम फत्ते केलं. अर्जेंटिनाचा मॅचमधला दुसरा गोल.

हा गोल २००२मध्ये फिफाने घेतलेल्या जनता पोलमध्ये शतकातला सर्वोत्तम गोल ठरला. या गोलबद्दल मॅराडोना म्हणतात, "मी खरंतर वल्डानोकडे पास देण्यासाठी चाल रचली होती. पण, इंग्लिश खेळाडूंनी मला चारही बाजूंनी घेरलं. मला दुसरा पर्यायच उरला नाही. गोल मीच पूर्ण केला."

त्याचवेळी इंग्लंडच्या खेळाडूंनी आपल्याला पाय मध्ये घालून खाली पाडलं नाही या त्यांच्या खिलाडूवृत्तीसाठी त्यांनी आभारही मानले.

अर्जेंटिना-इंग्लंड वैर वाढलं की कमी झालं?

तेव्हाच्या वृत्तपत्राची कात्रणं इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यातून असं स्पष्ट दिसतं की इंग्लिश फुटबॉल टीम आणि त्यांचे पाठिराखे यांना हा पराभव आणि त्यातला हँडबॉल जिव्हारी लागला.

अगदी आजही त्यांच्या मनात अर्जेंटिनाच्या टीमने फसवल्याची भावना आहे.

तर अर्जेंटिनाने पुढे जाऊन तो वर्ल्ड कप जिंकला. आणि इंग्लंड विरुद्धचा विजय म्हणजे फॉकलंड आयलंडमध्ये झालेल्या पराभवाचा बदला टीमने घेतला आहे अशी त्यांच्या देशवासीयांची भावना होती.

महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या टीमने फॉकलंड युद्धानंतर बरोबर चार वर्षांनी हा विजय मिळवला होता.

मॅराडोना गॉड ऑफ फुटबॉल

स्वत: मॅराडोना यांच्यासाठी १९८६चा वर्ल्ड कप कमालीचा यशस्वी ठरला. चपळ खेळ, गोल करण्याची हातोटी, त्यासाठी संधी निर्माण करण्याची कला यामुळे त्यांचं नाव सर्वदूर पसरलं.

भारताचे माजी राष्ट्रीय फुटबॉलपटू आणि सध्या क्रीडा पत्रकारिता करणारे आशिष पेंडसे यांच्या मते, "मॅराडोना त्या वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाच्या विजयाचे शिल्पकार होते. तो वर्ल्ड कपच मॅराडोनाचा होता."

"आणि इंग्लंडविरुद्धची मॅचच कशाला तो कप त्यांनीच अर्जेंटिनाला मिळवून दिला. मॅराडोना यांच्या खेळाच्या रुपाने फुटबॉल प्रेमींना काही जादूई प्रसंग मैदानावर अनुभवायला मिळाले. पुढची काही वर्षं ते जिथे खेळतील तिथे देव हीच उपाधी त्यांना मिळाली." पेंडसे यांनी मॅराडोना यांना बघण्याचा त्यांचा अनुभव सांगितला.

मॅराडोना यांचे भारतीय चाहते

गंमत म्हणजे १९८६चा तो वर्ल्ड कप भारतीय टीव्हीवर प्रसारित झालेला पहिला फुटबॉल वर्ल्ड कप होता. त्यामुळे पेंडसे आणि त्यांच्या मित्रांनी घरी जमून त्या मॅचचाही आनंद घेतला.

"टीव्हीवरचं प्रक्षेपण तेव्हा स्पष्ट नसायचं. त्यामुळे मॅचमध्ये मॅराडोनांच्या बाबतीत नेमकं काय घडलं हे तेव्हातरी स्पष्ट दिसलं नाही. पण, मैदानावरची अशांतता समजण्यासारखी होती."

त्यांनी हँड ऑफ गॉड गोलबद्दल सांगितलं. "८६च्या वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या मॅच भारतात दाखवल्या गेल्या नाहीत. त्यावरून कोलकातामध्ये तर मोर्चे निघाले. मग अखेर तेव्हाचे माहिती आणि प्रसारणमंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांनी पुढाकार घेतला आणि मॅच सुरू झाल्या."

मॅराडोना यांना भारतीय फुटबॉल प्रेमींनी पहिल्यांदा पाहिलं. तिथून पुढे कोलकाता आणि पुणे-कोल्हापूर, गोव्यात सगळे त्यांचे कट्टर फॅन बनले.

"कोलकात्यामध्ये तर मॅराडोना यांचा अधिकृत फॅन क्लब उभा राहिला. मॅराडोना यांच्या फुटबॉलने सगळ्यांना आनंद दिला." आशिष पेंडसे यांनी आपलं फुटबॉल प्रेम आणि मॅराडोना प्रेम एका दमात सांगितलं.

८० नंतर १९९०चं दशकंही मॅराडोना यांनी गाजवलं. ५ फूट ५ इंच उंचीच्या या खेळाडूने अर्जेंटिनासाठी १६७ मॅचमध्ये एकूण ११६ गोल केले. त्यांना लागलेल्या अमली पदार्थांच्या व्यसनामुळे त्यांची कारकीर्द अखेर खंडित झाली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)