फुटबॉलपटू पेले यांचं प्रदीर्घ आजाराने निधन, जाणून घ्या त्यांच्याविषयी 9 महत्त्वाच्या गोष्टी

    • Author, फर्नांडो डुआर्टे
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हीस

ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचं निधन झालं आहे. ते 82 वर्षांचे होते.

त्यांच्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 1281 गोल केले. त्यांनी ब्राझीलसाठी 92 सामने खेळले. त्यात त्यांनी 77 गोल कले.

त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 1958,1962 आणि 1970 असं तीनदा वर्ल्ड कप जिंकला. त्यांना 2000 साली प्लेयर ऑफ सेंच्युरी हा खिताब देण्यात आला.

गेल्या काही वर्षांपासून त्यांना किडनी आणि प्रोस्टेट ग्रंथींचा आजार होता.

त्यांच्या मुलीने पेले यांच्या निधनाची माहिती दिली, "आम्ही जे काही आहोत ते तुमच्यामुळे आहोत, आमचं तुमच्यावर अतिशय जास्त प्रेम आहे."

पेले यांनी त्यांच्या कारकीर्दीत संपूर्ण फुटबॉल विश्वावर अधिराज्य गाजवलं होतं. पेले यांनी फुटबॉलमधून 1977 साली निवृत्ती घेतली होती. पण आजही त्यांच्या अविस्मरणीय खेळींची चर्चा फुटबॉल चाहत्यांमध्ये होताना दिसते.

पेले 3 फुटबॉल विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचे प्रतिनिधी राहिले आहेत. अशी कामगिरी करणारे ते जगातील एकमेव खेळाडू आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 1363 सामने खेळले. पेले यांच्या नावावर तब्बल 1281 गोल करण्याचा विक्रम आहे.

पेले यांच्या खेळाबाबत आणि त्यांच्या विक्रमांबाबत शेकडो किस्से जगभरात सांगितले जातात. पण त्यांच्या जीवनाबाबत अशा काही गोष्टीसुद्धा आहेत, त्या लोकांना फारशा माहीत नाहीत.

पेले यांच्यामुळे पंचांना बाहेर जावं लागलं

18 जून 1968 ची गोष्ट आहे. पेले यांचा फुटबॉल क्लब सँटोस आणि कोलंबियन ऑलिंपिक स्क्वॉड यांच्यात एक मैत्रीपूर्ण सामना खेळवण्यात येणार होता. यादरम्यान, पंच गुईलेरमों वेलासक्वेज यांनी पेले यांना मैदानातून बाहेर जाण्यास सांगितलं.

(रेड कार्डचा वापर 1970 साली सुरू झाला होता.) पेले यांच्यावर फाऊल केल्याचा आरोप होता. पेलेंनी पंच वेलाक्वेज यांचा अनादर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

पण, पंचांच्या या निर्णयावरून प्रचंड मोठा वाद झाला. सँटोस क्लबच्या खेळाडूंनी याला विरोध दर्शवला. तिथं उपस्थित प्रेक्षकांनीही याचा विरोध केला. या वादामुळे त्यांना मैदानाबाहेर जावं लागलं. त्यांनी आपली शिटी एका लाईन्समनला दिली आणि पेलेला पुन्हा मैदानात बोलावलं, असं वेलाक्वेज यांनी 2010 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं.

पेले यांनी खरंच युद्ध रोखलं होतं का?

1960 च्या दशकात पेले यांचा सँटोस FC जगातील सर्वांत लोकप्रिय फुटबॉल क्लबपैकी एक होता. याचा फायदा घेऊन हा संघ जगभरात अनेक मैत्रीपूर्ण सामने खेळायचा. त्यावेळी नायजेरियामधील युद्धग्रस्त भागात 4 फेब्रुवारी 1969 रोजी एक सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात सँटोस क्लबने बेनिनी सिटीच्या एका स्थानिक क्लबला 2-1 ने मात दिली होती.

त्यावेळी नायजेरियामध्ये गृहयुद्ध सुरू होतं. इतिहासकार ग्यूहरमें गॉरचे यांच्या मते, ब्राझीलचे खेळाडू आणि अधिकारी सुरक्षेच्या कारणावरून चिंताग्रस्त होते. यामुळे दोन्ही पक्षांनी युद्धविरामाची घोषणा केली होती.

या कहाणीच्या सत्यतेवरून वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. पेले यांची पहिली आत्मकथा 1977 साली प्रकाशित झाली होती. त्यामध्ये याबाबत काहीच लिहिलेलं नव्हतं.

पण 30 वर्षांनंतर प्रकाशित झालेल्या दुसऱ्या आत्मकथेत या घटनेचा उल्लेख करण्यात आला होता.

या एका सामन्यामुळे नाजरेरियातील गृहयुद्ध थांबू शकतं, असं खेळाडूंना सांगण्यात आलं होतं, असं पेले यांनी आत्मकथेत लिहिलं आहे.

"ही गोष्टी पूर्णपणे खरी आहे किंवा नाही, याबाबत मला स्पष्ट माहीत नाही. पण आम्ही तिथं होतो, तोपर्यंत कुणीही त्याठिकाणी घुसखोरी करणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली होती," असं पेलेंनी लिहिलं आहे.

लेनन यांची भेट

पेले 1975 मध्ये न्यूयॉर्कमधील कॉसमॉस क्लबकडून खेळण्यासाठी अमेरिकेला गेले होते. तिथं त्यांनी इंग्रजी भाषा शिकण्यास सुरुवात केली.

त्या ठिकाणी बिटल्समधील गायक आणि गिटारवादक जॉन लेनन यांच्याशी पेले यांची भेट झाली. लेनन त्यावेळी जपानी भाषा शिकत होते.

पेले म्हणतात, "बिटल्स आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी इंग्लंडच्या एका हॉटेलात ब्राझील संघाला भेटण्याचे प्रयत्न केले होते. पण ब्राझील फुटबॉल असोसिएशनच्या संचालकांनी त्यांना खेळाडूंना भेटण्यापासून रोखलं होतं. असं लेननने सांगितलं होतं."

युरोपच्या क्लबसाठी का खेळू शकले नाही?

पेले यांनी युरोपमधील कोणत्याही क्लबकडून फुटबॉल खेळला नाही, अशी टीका त्यांच्या टीकाकारांकडून केली जाते. पण हीच गोष्ट पेले यांच्यासाठी फायदेशीर ठरल्याचं सांगितलं जातं.

ब्राझीलच्या इतर अनेक खेळाडूंप्रमाणेच पेलेसुद्धा आपल्या कारकिर्दीत सर्वोच्च शिखरावर होते. त्यावेळी त्यांना परदेशी जाण्यापासून रोखण्यात आलं.

सँटोस क्लबनेसुद्धा रिअल माद्रीद आणि AC मिलान क्लबची ऑफर धुडकावून लावली.

त्यावेळी आपण कुठून खेळावं याचा निर्णय खेळाडूंच्या हातात नसायचा.

पेले यांनी ब्राझीलमध्येच राहावं, यासाठी सरकारकडूनही दबाव होता. 1961 मध्ये राष्ट्रपती जॅनियो क्वाड्रोस यांनी तर चक्क पेले हे राष्ट्रीय संपत्ती असल्याचं घोषित केलं. त्यांना एक्सपोर्ट करता येऊ शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं.

पण नंतर 1975 मध्ये पेले यांनी न्यूयॉर्क कॉसमॉस या परदेशी क्लबकडून सामने खेळले.

50व्या वर्षी ब्राझीलचे कर्णधार

पेले फक्त एकदा ब्राझीलचे कर्णधार बनले. त्या आधी प्रत्येकवेळी त्यांनी क्लब आणि देश दोन्ही संघांचं कर्णधारपद नाकारलं होतं.

राष्ट्रीय संघातून निवृत्ती स्वीकारल्यानंतर 19 वर्षांनी म्हणजेच 1990 मध्ये त्यांनी एका मैत्रीपूर्ण सामन्यात सहभाग नोंदवला होता. त्यावेळी ब्राझील विरुद्ध विश्व एकादश असा तो सामना झाला.

हा सामना पेले यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त खेळवण्यात आला होता. या सामन्यात पेले कर्णधार होते.

पेले यांचं 'अपहरण'

सँटोस क्लबचे खेळाडू 5 सप्टेंबर 1972 रोजी त्रिनिदाद अँड टोबॅगोमध्ये खेळवण्यात येत असलेल्या एका सामन्याबाबत नाराज होते.

संघातील सुरक्षा फळीतील खेळाडू ओबेरदान यांनी ब्राझीलच्या एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतील याबाबत सांगितलं आहे.

"सामना लवकरात लवकर संपवून परतण्याचा आमचा विचार होता. पण पेलेने 43 व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर पोर्ट ऑफ स्पेनमधील प्रेक्षक बेधुंद झाले.

प्रेक्षक मैदानात घुसले. त्यांनी पेले यांना खांद्यावर बसवून जल्लोष करायला सुरू केलं.

अशा स्थितीत त्यांना परत आणणं शक्य नव्हतं. यामध्ये बराच वेळ गेला. ते एक प्रकारे पेले यांचं 'अपहरण'च होतं.

सिल्व्हेस्टर स्टेलॉन फिके पडले

1980 च्या दशकात सिल्व्हेस्टर स्टेलॉन अत्यंत लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जात. त्यांच्या एस्केप टू व्हिक्टरी या चित्रपटाचं शूटिंग 1980 साली सुरू झालं होत. हा चित्रपट दुसऱ्या महायुद्धात नाझी आणि कैदी यांच्या फुटबॉल संघांबाबत एक काल्पनिक कहाणी होती.

अनेक माजी फुटबॉलपटू या चित्रपटात काम करत होते. पेलेसुद्धा त्यामध्ये होते. पेले यांनी एका दृश्यात एक्रोबॅटिक बायसिकल शॉट मारला होता.

पेले यांनी ब्राझीलच्या UOL वेबसाईटला दिलेल्या मुलाखतील या चित्रपटाबाबत एक किस्सा सांगितला आहे.

ते सांगतात, "चित्रपटाच्या स्क्रिप्टनुसार, हा शॉट स्टेलॉन हे मारणार होते. तर गोलकिपर पेले असणार होते. पण स्टेलॉन किक मारूच शकले नाहीत."

पेले गोलकिपर म्हणूनही चांगले होते.

सँटोस क्लबकडून त्यांनी चारवेळा गोलकिपरची भूमिका बजावली. यात 1964 साली खेळवल्या गेलेल्या ब्राझिलियन कपचा सेमीफायनल सामन्याचा सुद्धा समावेश आहे. या चारही सामन्यात पेले यांनी विरोधी संघाला गोल करू दिला नाही. हे सर्व सामने पेले यांच्या संघानेच जिंकले.

पेले यांच्या नावावरून नामकरण

पेले यांचे चाहते देअर इज ओनली वन पेले हे गाणं गातात. पण जगात पेले नावाचे हे एकटेच नाहीत. त्यांच्या नावाने नामकरण करण्यात आलेले अनेक लोक जगात आहेत.

पेले नामक इतर अनेकजण फुटबॉल आणि इतर क्षेत्रात आहेत. आफ्रिकेतील एक लोकप्रिय खेळाडू अबेदी एयू. यांनासुद्धा अबेदी पेले म्हणून ओळखलं जातं. त्यांना लहानपणी हे नाव देण्यात आलं.

पेले यांना एडसन नावाने धर्मांतरीत करण्यात आलं होतं. हे नावसुद्धा अनेकांना देण्यात आलं.

ब्राझिलियन इंस्टीट्यूट ऑफ जिओग्राफी अँड स्टेटिस्टीक्सच्या माहितीनुसार, ब्राझीलमध्ये 1950 पासून 43 हजार 511 लोकांचं नाव एडसन होतं. दोन दशकांनंतर पेले यांच्या गोलची संख्या 1 हजारांच्या पुढे गेली. त्यावेळी एडसन नावाच्या लोकांची संख्या 1 लाख 11 हजार इतकी होती.

राष्ट्रपतिपदासाठी प्रयत्न

1990 साली पेले यांनी राजकारणात उतरण्याबाबत सांगितलं होतं. आपण 1994 च्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहोत, असं ते म्हणाले होते.

राजकारणात दाखल होऊन पेले 1995 ते 1998 पर्यंत ब्राझीलचे क्रीडामंत्री होते. पण ते राष्ट्राध्यक्ष बनू शकले नाहीत.

ब्राझीलच्या खेळाडूंना क्लब बनवण्याचं स्वातंत्र्य देणारा कायदा निर्माण करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती.

पेले खेळत असताना ज्या गोष्टी शक्य नव्हत्या. त्यांना पेले यांनी मंजुरी मिळवून दिली.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)