You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
FIFA 2018 : कोण जिंकणार फुटबॉल वर्ल्ड कप?
वर्ल्डकप जिंकण्यासाठी नक्की काय करावं 32 संघांनी. जिंकण्यासाठी काही विशिष्ट फॉर्म्युला आहे का?
32 देश, एकच विजेता
210 देश वर्ल्डकपमध्ये स्थान मिळावं यासाठी प्रयत्नशील असतात. यातून केवळ 32 देशांना प्रत्यक्ष विश्वचषकात खेळण्याची संधी मिळते. या 32 संघांपैकी कोणता संघ जिंकणार हे तुम्ही सांगू शकता का? ट्रेंड्स, आकडेवारी आणि पॅटर्न्स यांचा अभ्यास करून बीबीसी स्पोर्ट्सनं विजेता कोण हा निष्कर्ष काढला आहे. विजेता होण्यासाठी त्या संघानं काय करायला हवं
मानांकन मिळवा, कप जिंका
1998 पासून वर्ल्डकपची व्याप्ती वाढली आणि 32 संघ सहभागी होऊ लागले. तेव्हापासून विजेत्या संघांना मानांकन देण्यात आलं आहे. बिगरमानांकित संघानं वर्ल्डकप जिंकण्याची किमया 1986 मध्ये साधली होती. त्यावेळी दिएगो मॅराडोनाच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनानं वर्ल्डकपवर नाव कोरलं होतं.
मानांकन मिळालेले म्हणजेच अव्वल आठ संघच जेतेपदावर कब्जा करतात या गृहितकानुसार आपण 24 बिगरमानांकित संघांना बाजूला ठेऊया आणि मानांकित संघांबद्दलच बोलूया.
आयोजक असण्याचा फायदा
वर्ल्डकपचं आयोजन करणाऱ्या संघाला आपसूकच मानांकन मिळतं. 44 वर्षांपासून चालत आलेल्या नियमाचा फायदा रशियाला मिळाला. जागतिक क्रमवारीत रशिया 66व्या स्थानी आहे. वर्ल्डकपचं आयोजनाचे अधिकार मिळाले नसते तर अव्वल आठमध्ये त्यांना स्थान मिळालं नसतं. मात्र वर्ल्डकपचं आयोजन करणं जिंकण्याचा मंत्र नाही.
1930 ते 1978 या कालावधीत झालेल्या वर्ल्डकपमध्ये पाच यजमानांनी जेतेपद पटकावलं. मात्र त्यानंतर झालेल्या नऊ वर्ल्डकपमध्ये केवळ एकदा यजमानांनी जेतेपदावर नाव कोरलं आहे. मात्र अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका जेतेपदाचे दावेदार होते असं ठामपणे म्हणता येणार नाही. 1990 मध्ये इटली, 2006 मध्ये जर्मनी आणि 2014 मध्ये ब्राझील यांना यजमान असल्याचा फायदा घेता आला नाही.
गोलरक्षणातून जेतेपदापर्यंतचा प्रवास
वर्ल्डकप 32 संघांचा झाल्यापासून पाच विजेत्या संघांपैकी कोणीही सात सामन्यांमध्ये आपल्याविरुद्ध चारपेक्षा जास्त गोल होऊ दिलेले नाहीत. अन्य सात संघांकडे नजर टाकल्यास पोलंडचा बचाव तोकडा आहे.
प्रत्येक सामन्यागणिक स्वत:विरुद्ध त्यांनी 1.4 गोल होऊ दिले आहेत. जर्मनी आणि पोर्तुगाल यांनी स्वत:विरुद्ध 0.4 गोल होऊ दिले आहेत तर बेल्जियम आणि फ्रान्स यांनी 0.6 गोल होऊ दिले आहेत. ब्राझीलची आकडेवारी 0.61 तर अर्जेंटिनाची 0.88 एवढी आहे.
युरोपची सद्दी
वर्ल्डकपचे विजेते युरोप किंवा दक्षिण अमेरिका खंडातीलच असतात. गेल्या काही वर्षात युरोपियन संघांची कामगिरी चांगली झाली नव्हती मात्र दक्षिण आफ्रिकेत स्पेनची कामगिरी तसंच ब्राझीलमध्ये जर्मनीने जेतेपदासह गाजवलेलं वर्चस्व ट्रेंडला छेद देणारं होतं.
युरोपात झालेल्या स्पर्धांमध्ये मात्र घरच्या संघांनी जेतेपदावर मक्तेदारी सिद्ध केली आहे. युरोपातील दहा संघांकडे यजमानपद असताना बिगरयुरोपच्या देशांना केवळ एक जेतेपद पटकावता आलं आहे. शेवटचा अपवाद म्हणजे स्वीडनमध्ये ब्राझीलने 1958 मध्ये मिळवलेलं जेतेपद.
गोलकीपर ठरवतो विनर
दोनदा विजेत्या संघातील खेळाडूने गोल्डन बूट पुरस्कार पटकावला आहे. 2002 मध्ये ब्राझीलच्या रोनाल्डोने तर 2010 मध्ये स्पेनच्या डेव्हिड व्हिलाने गोल्डन बूट पटकावला होता.
विजेता संघ त्याच्या गोलकीपरच्या क्षमतेवर ओळखला जातो. गेल्या पाच वर्ल्डकपमध्ये गोल्डन ग्लोव्ह अर्थात सर्वोत्तम गोलकीपरचा पुरस्कार विजेत्या संघाच्या गोलकीपरने पटकावला आहे.
उर्वरित चार संघांपैकी मॅन्युअल न्युअर (जर्मनी), ह्युगो लोरिस (फ्रान्स) आणि थिबाऊट कौर्टिस (बेल्जियम) हे यंदा सर्वोत्तम गोलकीपरचा पुरस्कार पटकावू शकतात. पोर्तुगालचा रुई पॅट्रिको यंदा गोल्डन ग्लोव्ह पुरस्कारावर नाव कोरू शकतो.
अनुभव बाळगा
विश्वचषकाची व्याप्ती 32 संघांपर्यंत झाल्यापासून अधिकाअधिक अनुभवी खेळाडू संघात घेण्याचा संघांचा कल आहे.
वर्ल्डकपविजेत्या फ्रान्स संघातील प्रत्येक खेळाडूने किमान 22 सामने खेळले होते. चार वर्षांपूर्वी झालेल्या विश्वचषकात जर्मनीच्या प्रत्येक खेळाडूने किमान 42 सामन्यात देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं.
ब्राझीलच्या खेळाडूंनी किमान 28 सामन्यात देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं. 2006 मध्ये इटलीच्या खेळाडूंनी किमान 32 सामने देशासाठी खेळले होते. उर्वरित तीन संघांनी वर्ल्डकपसाठी अंतिम संघांची घोषणा केल्यानंतर फ्रान्सच्या खेळाडूंनी किमान 24 सामने खेळले आहेत.
माजी विजेते होऊ नका
वर्ल्डकप पटकावल्यानंतर चार वर्षांनी तो पुन्हा मिळवणं सगळ्यांत कठीण गोष्ट आहे. 1958 आणि 1962 मध्ये ब्राझीलनं सलग वर्ल्डकप पटकावण्याची किमया केली होती. मात्र त्यानंतर कोणत्याही संघाला पटकावलेला वर्ल्डकप आपल्याकडे राखता आलेला नाही.
ब्राझीलच्या लागोपाठच्या यशानंतरच्या 13 वर्ल्डकपविजेत्या संघांपैकी केवळ दोन संघांना पुढच्या वर्ल्डकपमध्ये उपांत्यपूर्व फेरीचा टप्पा गाठता आला आहे. 1990 मध्ये अर्जेंटिनानं तर 1998 मध्ये ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरी गाठता आली होती. मागील 4 वर्ल्डकपमध्ये माजी विजेत्यांना प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला आहे.
तूर्तास जर्मनीची वर्ल्डकपमधील कामगिरी चांगली आहे. गेल्या नऊ वर्ल्डकपमध्ये त्यांनी दोनदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. तीन वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे तर दोन वेळा तिसरं स्थान पटकावलं आहे.
मात्र रशियात ते जिंकणार का? या प्रश्नाचं उत्तर इतिहासाकडे पाहिलं तर नाही असं मिळतं.
रशिया वर्ल्डकपमध्ये कोण जिंकणार हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल. बेल्जियम! अन्य संघांपैकी कोणी आकडेवारी आणि इतिहास बाजूला सारून जिंकलं नाही तर बेल्जियमचं जेतेपद पक्कं आहे. पण अन्य कुणीही जिंकू शकतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)