2026 फुटबॉल वर्ल्ड कप अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोत होणार

2026 फुटबॉल विश्वचषकाच्या आयोजनाचे अधिकार अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांना मिळाले आहेत.

याआधी 2002 मध्ये दक्षिण कोरिया आणि जपान यांनी संयुक्तपणे वर्ल्डकपचं आयोजन केलं होतं. पण कुठल्याही एका देशाने फुटबॉल विश्वचषकाचं आयोजन केल्यास त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणाऱ्या बोजासंदर्भात उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. म्हणून या संयुक्त यजमानपदाची घोषणा करण्यात आली आहे.

अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा यांनी आयोजनासाठी संयुक्त आवेदन सादर केलं होतं. या तीन राष्ट्रांनी मिळून मोरोक्कोला मागे टाकत 2026 वर्ल्ड कपच्या आयोजनाचे अधिकार पटकावले.

FIFA शी संलग्न सदस्य राष्ट्रांपैकी 134 मतं अमेरिका-कॅनडा-मेक्सिको या त्रिकुटाला मिळाली, तर मोरोक्कोला 65 मतं मिळाली.

"हा फुटबॉलचा विजय आहे. आपण सगळे केवळ फुटबॉलमुळे एकजुट आहोत," असं US सॉकरचे अध्यक्ष कार्लोस कॉर्डेरो म्हणाले. "आमच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा मान आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे."

2026 वर्ल्ड कप हा सर्वाधिक संघांना सामावून घेणारा विश्वचषक असणार आहे. सध्या वर्ल्डकपमध्ये 32 संघ खेळतात. 2026 वर्ल्डकपमध्ये 48 संघ सहभागी होतील. 34 दिवसात 80 मॅचेस होणार आहेत.

याआधी वैयक्तिक पातळीवर मेक्सिकोने दोनदा (1970 आणि 1986) आणि अमेरिकेने एकदा (1994) वर्ल्ड कपचे यजमानपद भूषविलं होतं. कॅनडाने 2015 साली महिला वर्ल्ड कपचं आयोजन केलं होतं.

14 जूनपासून रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये 2018 फुटबॉल वर्ल्ड कप सुरू होत आहे. तर 2022चा फुटबॉल वर्ल्ड कप कतारमध्ये होणार आहे.

हे पाहिलंत का?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)