फुटबॉल वर्ल्डकप : स्पर्धेमागच्या घरगुती हिंसेचं सत्य

फुटबॉल मॅचमध्ये आपण सपोर्ट करत असलेली टीम हरली की, वाईट वाटतंच. चिडचिडही होते. पण मॅचच्या निर्णयाने घरगुती हिंसाचाराला खतपाणी मिळत असल्याचं धक्कादायक वास्तव संशोधनाद्वारे उघड झालं आहे.

फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा सुरू झाली तेव्हा एक मीम व्हायरल झालं होतं. ते मीम ना विनोदी होतं, ना त्यात नॉस्टॅल्जिक ग्राफिक्स होतं की बुवा इंग्लंडने कसा 1966 पासून वर्ल्डकप जिंकला नाहीये. त्यात होती फक्त आकडेवारी... घरगुती हिंसाचाराची.

हे मीम घरगुती हिंसाचारासंबंधात काम करणाऱ्या एका संस्थेनं बनवली होतं. कारण साधं होतं, सगळ्यांचं लक्ष फुटबॉलकडे एकवटलेलं असताना त्यांना एका महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडायची होती.

या मीममधली आकडेवारी इंग्लंडमधल्या लॅंकेस्टर विद्यापीठातल्या अभ्यासकांनी 2013 मध्ये केलेल्या अभ्यासावर आधारित होती.

या प्रकल्पात लॅंकेस्टर शहरात 2002, 2006 आणि 2010 मध्ये फुटबॉल वर्ल्डकपच्या काळात शहर पोलिसांकडे घरगुती हिंसाचाराच्या किती तक्रारी आल्या याचा अभ्यास करण्यात आला होता. त्यात असं लक्षात आलं की, ज्या ज्या वेळेस इंग्लंड मॅच हरलं, लॅंकेस्टर शहरातल्या घरगुती हिंसाचाराच्या घटनेत 38 टक्क्यांनी वाढ झाली. ज्यावेळी मॅच ड्रॉ झाली त्यावेळी हा आकडा 26 टक्के होता तर मॅचच्या दुसऱ्या दिवशी घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये 11 टक्के वाढ झाली होती.

या अभ्यासात एकाच शहरातल्या तक्रारींचा अभ्यास केला असला तरी, यामुळे एका नव्या चर्चेला सुरूवात झाली आहे. नुसतं पोलिसांनाच नाही तर सर्वसामान्य नागरिकांनाही घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं लक्षात आलं. म्हणूनच यूकेमध्ये 'घरगुती हिंसाचाराला रेड कार्ड' दाखवा अशी नवी मोहीम सुरू झाली आहे.

अर्थात फक्त फुटबॉलची अटीतटीची मॅच अशा हिंसाचाराला कारणीभूत असते असं नाही. दारू, ड्रग्स, आणि जुगार असं घातक समीकरणही त्याला कारणीभूत असू शकतं. "फुटबॉल मॅचच्या वेळेस एखादी जीवघेणी स्पर्धा सुरू आहे असा भास तयार होतो. आणि अशा वेळेस एखादा फुटबॉलचा चाहता दारू पित असेल किंवा सट्टा लावत असेल तर घरगुती हिंसाचारांच्या घटना घडू शकतात," पाथवे प्रॉजेक्ट या तरुण मुलींसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या कार्यकर्त्या लीअॅन्ड्रा नेफिन सांगतात.

एकट्या इंग्लंड आणि वेल्समध्ये 16 ते 59 या वयोगटातले 19 लाख लोक घरगुती हिंसाचाराला बळी पडतात. यातले 7,13,000 पुरुष आहेत तर 12 लाख स्त्रिया आहेत.

त्यांच्यातलीच एक आहे पेनी. तिच्या माजी बॉयफ्रेण्डसोबत दोन वर्षं राहताना तिला काय काय सहन करावं लागलं हे तिने बीबीसीला सांगितलं.

टीव्हीवर फुटबॉल चालू असल्याचा नुसता आवाज जरी आला तरी आपल्या बॉयफ्रेण्डपासून शक्य तेवढ्या लांब राहायचा तिचा प्रयत्न असायचा. अर्थात हे प्रत्येक वेळेस शक्य नव्हतं. ते एकाच बेडरूमच्या घरात राहायचे.

"त्याला कोणी मित्र नव्हते. त्यामुळे त्याची इच्छा असायची की मी त्याच्याबरोबर मॅच पाहावी. त्याच्या छंदात मीही रस घ्यावा असं त्याला वाटायचं. पण जेव्हा मी त्याच्यासोबत मॅच पाहायचे, तेव्हा फक्त एका कोपऱ्यात काही न बोलता बसून राहायचे. आणि सतत एकच प्रार्थना करायचे. देवा याची टीम (चेल्सी) जिंकू दे. याची टीम जिंकू दे. कारण मला माहीत होतं, याची आवडती टीम जर हरली तर माझं काही खरं नाही. माझ्यावर होणारा शारीरिक आणि मानसिक अत्याचार वाढणार."

त्या गोष्टीकडे मागे वळून बघताना विमनस्कपणे पेनी सांगते, "अर्थात फुटबॉल फक्त बहाणा होता. माझ्यावर भडकायला त्याला कुठलंही कारण चालायचं. अगदी फ्रिजमधल्या गोष्टी त्याच्या पद्धतीने रचून ठेवल्या नाहीत तरीही माझी खैर नसायची." तिला पुढे बोलवत नाही. "माफ करा. मला ते दिवस आठवले तरी कसंतरी होतं."

पण तरीही पेनीच्या बॉयफ्रेण्डची टीम हरली की तिला जास्तच शिवीगाळ व्हायची. "तो दिवस दिवस तोंड उतरवून बसायचा आणि असं दाखवयचा की मी तिथे नाहीच. म्हणजे माझं काही अस्तित्वच नाही. तो रात्रीचा स्वयंपाक करायचा आणि मला जेवायला द्यायचा नाही."

अशा प्रकारचं वागणं म्हणजे मानसिक अत्याचार आहे, असं महिलांसाठी काम करण्याऱ्या स्वयंसेवी संस्थांचं म्हणणं आहे. 2015 मध्ये यूकेत अशा प्रकारच्या वागण्याला गुन्हा घोषित केलं गेलं. समोरच्या माणसाकडून आपल्याला हवं ते करून घेण्यासाठी अशा वागण्याचा वापर केला जातो.

पेनीची केस म्हणजे हजारात एखादी असेल असं वाटू शकतं. पण या व्हायरल झालेल्या मीमने नुसता फुटबॉलसारखा 'सुंदर' खेळ आणि घरगुती हिंसाचार यांच्यातल्या संबंधांवर प्रकाश पाडला असं नाही तर घरगुती हिंसाचाराचा प्रश्न किती जटिल आहे हेही दाखवून दिलं.

"फुटबॉलसारख्या खेळात जिद्द, अभिमान आणि पुरुषी बाणा अशा सगळ्याचं मिश्रण असतं," लीअॅन्ड्रा सांगतात. त्यांच्या मते तरुण मुली, विशेषतः 16 ते 19 वयाच्या मुली अशा वेळेस अत्याचाराला बळी पडू शकतात. आणि त्यांना मदत करणारी कोणतीही यंत्रणा नसते. या मुलींना खरंतर मोठ्या प्रमाणावर घरगुती अत्याचाराला तोंड द्यावं लागतं. तरीही त्या मदत मागत नाहीत. याच कारण कदाचित त्या मुलींना ऑनलाईन मदत मागणं जास्त सोपं जात असावं."

"मी अशी एक केस हॅण्डल केली होती. एक 17 वर्षांची मुलगी तिच्या 21 वर्षांच्या पार्टनरबरोबर सुट्टी घालवायला आली होती. ते इंग्लंडची मॅच पाहात होते आणि ती टीम हरली. त्यादिवशी संध्याकाळी तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं कारण तिच्या पार्टनरने तिला मारहाण केली होती."

पेनीसाठीही प्रत्येक गोल म्हणजे सुटकेचा निश्वास होता आणि प्रत्येक रेड कार्ड, किंवा हुकलेला गोल म्हणजे काळजीचं कारण होतं.

ज्यावेळेस तिच्या माजी बॉयफ्रेण्डच्या आवडती टीम चेल्साची मॅच नसायची तेव्हा तो तिच्यावर भडकायला तो इतर कारण शोधायचा, पेनी सांगते. "मी कामावरून घरी यायचे तेव्हा स्वयंपाकघरातल्या सगळ्या सुऱ्या एका ठिकाणी फेकलेल्या सापडायच्या किंवा आरशावर काहीतरी अपमानास्पद लिहिलेलं असायचं."

हा प्रकार इथेच थांबला नाही. "कधी कधी मी कामावरून घरी यायचे आणि सगळं घर अंधारात बुडलेलं सापडायचं. तो सगळे लाईट बंद करायचा आणि लपून बसायचा."

या विषयावर जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा लक्षात आलं की, इंग्लंडचं जिंकणं किंवा हरणं हे फक्त खेळापुरतं मर्यादित न राहता काही व्यक्तींवर त्याचा वाईट परिणामही होऊ शकतो. पण पेनी ठामपणे सांगते की, फक्त फुटबॉल किंवा दारू हेच घरगुती हिंसाचाराचं कारणं नाही. सगळ्या प्रकारचा घरगुती हिंसाचार दारू पिऊनच केला जातो असं नाही किंवा त्यामागे दडलेली पुरुषी मनोवृत्ती दरवेळेस लक्षात येईल असं नाही.

फुटबॉलच्या चाहत्यांचा एक वर्ग पुरुषप्रधान संस्कृती मानतो, मर्दानगी दाखवायला फुरफुरतो आणि लैंगिक भेदभावाला उत्तेजन देतो आणि स्त्री कॉमेंटेटर्स पडद्यावर आल्या की टीका करतो. एक छोटा वर्ग असला तरी सगळेच असे नाहीत.

यूकेतल्या घरगुती हिंसाचार प्रतिबंधक स्वयंसेवी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सॅन्ड्रा होर्ली म्हणतात की, फुटबॉलला घरगुती हिंसाचाराचं मुख्य कारण समजणं चुकीचं आहे. "दारू, खेळातली हार किंवा दोन्ही यांना घरगुती हिंसाचाराचं कारण समजणं म्हणजे अत्याचार करणाऱ्याला मोकळीक देण्यासारखं आहे. यामुळे त्यांच्या कृत्याला ते जबाबदार नाहीत असा संदेश जातो."

"फुटबॉल म्हणजे दारू पिणं किंवा जुगार खेळणं यासारखा घरगुती अत्याचाराचा एक बहाणा आहे. वर्ल्डकप संपल्यावरही कित्येक मुलींना त्यांच्या आई-वडिलांकडून होणाऱ्या अत्याचाराला तोंड द्यावं लागतं हे विसरून कसं चालेल?" सॅन्ड्रा विचारतात.

यंदाचा वर्ल्डकप पेनीनी एन्जॉय केला. पण तरीही तिला काही जणांचं वागणं खटकलं. "मला कोणाच्या आनंदावर विरजण घालायचं नाहीये. पण लोकांनाही हे लक्षात घेतलं पाहिजे की, त्यांचं असं दारू पिणं, गुंडगिरी करणं आणि धिंगाणा घालणं किती भीतीदायक आहे."

एका साध्याशा आकडेवारीने एवढ्या मोठ्या प्रमाणात जनजागृती केली हे पाहून ती खुश आहे. "हे चांगलंच आहे. वर्ल्डकपच्या वेळेस घरगुती हिंसाचाराच्या जास्तीत जास्त तक्रारी पोलिसात केल्या जात असतील कारण त्याचे परिणाम भयानक असू शकतात. पण आपण हे विसरायला नको की घरगुती हिंसाचाराचा प्रश्न फुटबॉलच्या आधीही होता आणि संपल्यावरही असेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)