FIFA World CUP : मॅच जिंकल्यावर जपानी लोकांनी उचलेलं 'हे' पाऊल पाहून सर्वच झाले अचंबित

    • Author, अँड्रेअस इलमर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

फुटबॉल मॅच संपल्यावर प्रेक्षक सहसा स्टेडियममध्ये धिंगाणा घालतात, बाटल्या, प्लास्टिक, फास्ट फूड टाकून तसंच निघून जातात. पण जपानी प्रेक्षकांनी जरा हटकेच विजय साजरा केला.

मंगळवारी रात्री (19 जून) कोलंबिया संघाला 2-1 अशी धूळ चारत जपाननं फुटबॉल मॅच जिंकली. फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये दक्षिण अमेरिकेतल्या संघावर जपाननं पहिल्यांदाच विजय मिळवला.

विजयी संघाचे प्रेक्षक बरेचदा स्टेडियममध्ये राडा करत जल्लोष करतात. जपानी प्रेक्षकांनीही विजय साजरा केला, पण त्यानंतर त्यांनी पू्र्ण स्टेडियम स्वच्छही केलं!

येतानाच मोठ्या पिशव्या आणल्या

मॅच बघायला येतानाच जपानी लोक मोठ्या पिशव्या घेऊन आले होते. मॅच संपताच सगळ्यांनी मिळून कचरा गोळा केला आणि स्टेडियम चकाचक स्वच्छ केलं.

'समुराई ब्लू'च्या (जपानच्या फुटबॉल संघाचं नाव) समर्थकांनी हे पहिल्यांदाच केलेलं नाही. याआधीही त्यांच्या अशा चांगल्या सवयीचं कौतूक झालं आहे.

"ही केवळ फुटबॉलपुरती संस्कृती नसून संपूर्ण जपानची संस्कृती आहे," असं जपानमधले क्रीडा पत्रकार स्कॉट मॅकइन्टायर यांनी बीबीसीला सांगितलं. ते सध्या फुटबॉल वर्ल्ड कपनिमित्त रशियात आले आहेत.

'समुराई ब्लू'च्या चाहत्यांनी स्टेडियम स्वच्छ केल्यावर त्यांना आश्चर्य वाटलं नाही.

"फुटबॉल खेळ हा एका संस्कृतीचं प्रतीक आहे, असं आपण ऐकत आलो आहे. सगळं स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवणं हा तर जपानी समाजाच्या सवयींचा महत्त्वाचा भाग आहे. फक्त फुटबॉलच नव्हे तर सगळ्या खेळांबाबत जपानी प्रेक्षक असंच वागतात," असंही ते सांगतात.

लहानपणापासूनची सवय

खरंतर यावर्षीच्या वर्ल्ड कपमध्ये सेनेगलचे प्रेक्षक स्टेडियम स्वच्छ करत होते. पण त्याची खरी सुरुवात जपानी लोकांनी केली होती आणि त्यासाठी ते प्रसिद्ध आहेत.

जपानमध्ये फुटबॉल मॅच बघायला आलेल्या परदेशी प्रेक्षकांना याचं नेहमीच आश्चर्य वाटतं.

"ते (परदेशी प्रेक्षक) जपानमध्ये आल्यावर बाटल्या, फास्ट फूड तसंच ठेऊन जाताना दिसतात. पण त्यावेळी जपानी लोक त्यांना खुणावून कचरा उचलण्याची विनंती करतात," असं मॅकइन्टायर यांनी बीबीसीला सांगितलं.

जपानमध्ये स्वच्छतेची सवय लहानपणापासूनच लावली जाते.

"फुटबॉलची मॅच संपल्यावर स्टेडियम स्वच्छ करणं हे शाळेत शिकवलेल्या सवयीचाच एक भाग असतो. शाळेत असताना मुलांकडूनच शाळेचा वर्ग, परिसर स्वच्छ करून घेतला जातो," अशी माहिती जपानच्या ओसाका युनिव्हर्सिटीतले समाजशास्त्राचे प्राध्यापक स्कॉट नॉर्थ यांनी दिली.

"लहानपणापासून या गोष्टी सतत सांगितल्यामुळे लोकांना त्याची सवय होऊन जाते," असं ते पुढं सांगतात.

मॅच संपल्यावर जपानी लोक सफाई करतानाचे व्हीडिओ सोशल मीडियावर येत राहतात.

फुटबॉल वर्ल्ड कपसारख्या जागतिक स्पर्धेत स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्याबरोबर जपानी लोक त्यांची जीवनशैली जगासमोर मांडतात, असं प्राध्यापक नॉर्थ सांगतात.

त्यांच्या मते "आपल्या पृ्थ्वीची सगळ्यांनी काळजी घ्यावी हे पटवून देण्यासाठी वर्ल्ड कप पेक्षा भारी ठिकाण काय असेल?"

याचा अर्थ आम्ही आनंद साजरा करत नाही असं नाही, पण त्याच बरोबर आम्ही आमचं भान विसरत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

"हे जरा तुम्हाला रटाळ वाटेल पण हा देश आदर आणि नम्रता या गुणांवर उभारलेला आहे," असं स्कॉट हसतमुखानं सांगतात.

"फुटबॉलमुळे इतके देश आणि लोक एकत्र येतात ही एक मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपण एकमेकांकडून खूप काही शिकतो. हेच तर फुटबॉलच्या खेळाचं सौंदर्य आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)