लठ्ठपणा कमी करता करता तिनं कमावले सिक्स पॅक अॅब्स

    • Author, नवीन नेगी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"मी फार लठ्ठ होते. काहीही खात होते. जंक फूड मला फार आवडत असे. इतकंच काय मी दारूही प्यायचे. तुम्हाला विश्वास बसणार नाही माझं वजन 85 किलो झालं होतं."

किचनमध्ये ग्रीन टी बनवत मधू झा आम्हाला सांगत होत्या. त्यांनी आम्हाला चहा दिला. चहा देत त्या म्हणाल्या त्यांच्या घरी साखर येत नाही आणि त्या कधीच साखर खात नाहीत.

त्या किचनमध्ये होत्या त्यावेळी हॉलमध्ये असलेल्या एका महिलेच्या फोटोकडे आमचं लक्ष गेलं. सूट आणि सलवार अशा पोशाखालातील ही महिला अगदी सर्वसामान्य भारतीय महिला दिसत होती. तर दुसरीकडे एका शेल्फमध्ये स्पर्धेत जिंकलेल्या विविध ट्रॉफी आणि पदकं लक्ष वेधून घेत होती. 5 फूट 6 उंचीची ही बाई कोणी सामान्य नाही, एव्हाना आमच्या लक्षात आलं होतं.

मग मधू त्यांची बॅग घेऊन चालू लागतात. त्या जीमला जात आहेत, जी आता त्यांची खरी ओळख बनली आहे.

त्यांच्या चेहऱ्यावर आता राकट, कणखर भाव आहेत. खांदे मजबूत झाले आहेत. जेव्हा त्या रस्त्यावर चालू लागतात तेव्हा त्यांची शारीरिक ठेवण इतर महिलांच्या मानानं वेगळी जाणवते.

लोक त्यांच्याकडे पाहातच राहातात. "जेव्हा मी जीमला जात असते तेव्हा लोक माझ्याकडे पाहतात. कोण ही बाई? असा प्रश्न त्यांच्या मनात आलेला असतो. कधीकधी काही जण सेल्फी घेण्यासही उत्सुक असतात," असं त्या सांगतात.

जीममध्ये बॉडीबिल्डर मधू

ट्रॅक पॅंट आणि स्कीन टाईट टीशर्ट घातलेल्या 30 वर्षांच्या मधू खांद्यावर 40 किलो वजन घेऊन स्कॉट करू लागल्या. त्यानंतर त्यांनी पुशअप केले. पाठोपाठ ट्रायसेप्स, बायसेप्स, अॅब्जचे व्यायाम केले.

घामाने पूर्ण भिजलेल्या मधूने त्यांची कथा सांगितली. "मी बिहारची आहे. माझं शिक्षण कोलकातामध्ये झालं. 8 वर्षांपूर्वी मी दिल्लीत आले. नोएडामधील एका संस्थेत मी डिझाईनिंगची शिक्षिका म्हणून काम करते."

मधू आम्हाला सांगत असताना आमचं लक्ष त्यांच्या मसल्सवर असतं. हे त्यांच्याही लक्षात आलं. "ही सगळी कमाई गेल्या 3 वर्षांतील आहे. पूर्वी मी एक जाड मुलगी होते. मला माझं स्थूल शरीर आवडत होतं. कुणी मला यावरून चिडवलं तर मला त्याचं काही वाटतं नव्हतं."

पण असं काय घडलं की त्यामुळे त्यांनी त्यांचं शरीर इतकं बदललं.

त्या हसत सांगतात, "मला फरक पडत नव्हता. पण माझ्या घरच्यांना मात्र काळजी वाटायची. माझा लहान भाऊ मला छोटा हत्ती म्हणून लागला होता."

जिना चढताना मला धाप लागायची आणि पाठदुखीचाही त्रास सुरू झाला होता. माझ्या घरच्यांनी मला जीमला पाठवलं. पूर्ण वर्षाची फी भरल्यानं, जीमला जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता, त्या सांगतात.

ते 21 दिवस

ज्याला सारखं पार्टी करायला आवडत आणि नेहमी तोंड सुरू असत अशा माणसाला जीममध्ये ढकललं तर काय होईल? त्याचा दिवस कधीच चांगला सुरू होणार नाही.

मधू त्यांची आठवण सांगताना म्हणाल्या, "पहिल्या दिवशी माझ्या ट्रेनरने हलका वॉर्मअप करून घेतला. पण 20 मिनिटांतच मी दमून गेले. दुसऱ्या दिवशी जीमला जातो असं सांगून मी पार्टीला गेले."

त्यानंतर मात्र जीमच्या ट्रेनरने त्यांना फैलावर घेतलं. ट्रेनरने मला सांगितले की सलग 21 दिवस जीमला यावं. त्यानंतरही जर मला जीमपेक्षा पार्टी करणंच आवडलं तर फीचे पैसे परत देतो असं म्हणाला.

या 21 दिवसांनी मधूचं सगळं जीवन बदलून टाकलं. वजन कमी होऊ लागलं होतं आणि मधूच्या शरीरात नवा उत्साह संचारला होता. त्यांचं वजन कमी होऊ लागलं होतं. सुरुवातीला व्यायाम करताना पायात वेदना होत होत्या पण याला त्या आता गोड वेदना म्हणतात. या वेदना त्यांना आवडू लागल्या होत्या कारण त्यांना माहिती होतं की त्यांचं शरीर सुडौल होऊ लागलं होतं.

बॉडी बिल्डिंग

मधू यांनी त्यांचं वजन 50 किलोपर्यंत कमी केलं होतं. शरीराचे रिफ्लेक्स आता सुधारले होते. पण मधू यांनी त्यानंतरही जीमला जाणं सुरू ठेवलं. त्यांना आता जीमला जाण्याचा छंदच लागला होता. जर जीमला नाही गेलं तर शरीरात वेगळीच अस्वस्थता वाटते. त्यानंतर ट्रेनरने मला बॉडी बिल्डिंगकडे वळण्याचा सल्ला दिला. त्यांनी माझी ओळख रजत आणि बिंदिया यांच्याशी करून दिली.

मधू यांचा प्रवास आता बॉडी बिल्डिंगच्या दिशेनं सुरू झाला. शरीर सुडौल करण्याबरोबरच मसल्स बनवण्याकडंही त्या लक्ष देऊ लागल्या.

ट्रायसेप्स दाखवत त्या म्हणाल्या, "मी दररोज 2 तास व्यायाम करत होते. जास्तीतजास्त वजन उचण्याचा मी प्रयत्न करत होते. माझा डाएट चार्ट बदलण्यात आला होता."

2018मध्ये त्यांनी पहिल्यांदाच बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भाग घेतला. नोएडामध्ये झालेल्या फिटलाईन क्लासिक फिटनेस स्पर्धेत त्या अंतिम फेरीत पोहोचल्या. त्यानंतर नॅचरल बॉडी बिल्डिंग युनियन इंटरनॅशनलच्या प्रो कार्डधारक त्या पहिल्या महिला बनल्या. प्रो कार्ड असणं म्हणजे बॉडी बिल्डिंग स्पर्धेत त्या भारताचं प्रतिनिधित्व करू शकतात.

मधूच्या पोटावर सिक्स पॅक्स दिसतात. महिलांची जी नाजूक प्रतिमा दाखवली जाते त्याच्या बरोबर विरोधी जाणारं हे चित्रं आहे.

त्यांच्या ट्रेनर बिंदिया शर्मा म्हणतात, "जेव्हा मी पहिल्यांदा मधूला पाहिलं तेव्हा तिनं वजन कमी केलं होतं. ती अशक्त वाटत होती. पण तिनं थोडे परिश्रम घेतले तर ती चांगली बॉडी बिल्डर होऊ शकते, असा मला विश्वास होता."

पहिल्यांदाच बिकिनीमध्ये

नोएडामध्ये झालेल्या एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी भाग घेतला होता. यात बिकिनी राऊंडही होता. बिकिनी परिधान करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती.

त्या सांगतात,"मी फारच अस्वस्थ झाले होते. स्टेजवर आल्यानंतर मी फक्त माझ्या ट्रेनरकडे पाहिलं आणि परफॉर्मन्स सुरू ठेवला. या स्पर्धेत माझा चौथा नंबर आला, ही माझ्यासाठी आनंदाची बाब होती"

मधू सांगतात त्या जेव्हा संस्थेत मुलांना शिकवण्यासाठी जातात तेव्हा विद्यार्थी त्यांची स्तुती करतात आणि तुमच्या सारख्या मसल्स करायच्या आहेत, असं सांगतात.

त्यांची कथा सांगत असतानाच मधू यांचा व्यायाम सुरू होता. सायंकाळ झाली होती. मधूने आम्हाला विचारलं, "भूक लागली आहे. छोले भटुरे खायचे का?" आम्ही हसत म्हटलं बॉडी बिल्डरला तळलेलं खायचं नसतं ना. राहुदे.

यावर चिकन सॅंडविच पुढं करत त्या म्हणाल्या, "सगळंच खाल्लं पाहिजे. फक्त ते स्वच्छ आणि चांगलं असावं."

हेही वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)