रेश्मा निलोफर नाहा : ही आहे भारतातली पहिली महिला मरीन पायलट

    • Author, कमलेश
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

समुद्राच्या लाटांना कापणाऱ्या जहाजांना ती योग्य मार्ग दाखवते. समुद्रातील अरुंद, खोल, आडव्यातिडव्या मार्गांमधून जहाजाला सुखरूप घेऊन जाते.

पण ती स्वतः जहाज चालवत नाही, तर जहाजं तिच्या इशाऱ्यावर चालतात! ही आहे रेश्मा निलोफर नाहा, भारताची पहिली मरीन पायलट.

पायलट म्हटलं की सामान्यपणे विमान उडवणाऱ्या एखाद्या व्यक्तीचं चित्र डोळ्यासमोर येतं. पण मरीन पायलट हे त्यापेक्षा फार वेगळे असतात.

जहाजांना बंदरापर्यंत पोहोचवणं आणि परत समुद्रात घेऊन जाणं, ही एक कला आहे, जी एका मरीन पायलटकडून अपेक्षित असते. ते बंदरापासून समुद्राच्या एका विशिष्ट सीमेपर्यंत प्रत्येक मार्ग, तिथली परिस्थिती आणि धोक्यांविषयी अचूक माहिती ठेवतात. त्यांच्याशिवाय कोणत्याही जहाजाला बंदरात प्रवेश करणं कठीण होऊन बसतं.

मालवाहू जहाजांना बंदरात घेऊन येणं आणि बंदरात नांगर टाकण्यापासून, परत त्या जहाजांना समुद्रातील एका विशिष्ट सीमेपर्यंत सोडून येणं, यासारखी कामं हे मरीन पायलट करत असतात.

आणि रेश्मा यांना ही कला आता चांगलीच माहितीये. आता तर जलमार्गांशी त्यांची जणू मैत्रीच झाली आहे, त्यांना हवामानाच्या तऱ्हा चांगल्याच ठाऊक आहेत.

आव्हानात्मक काम

मरीन पायलट हे मर्चंट नेव्हीचाच एक भाग आहे. जहाज वाहतूक मंत्रालयाअंतर्गत कोलकाता पोर्ट ट्रस्टवर रेश्मा यांची नियुक्ती झाली. या बंदरावर नेव्ही, कोस्ट गार्डचे जहाज, कार्गो आणि खाजगी कंपन्यांच्या मालवाहू जहाजांची रहदारी सुरू असते.

रेश्मा या कोलकाता पोर्ट ट्रस्टमध्ये मरीन पायलट आहेत. इथं त्या सहा वर्षांहून अधिक काळापासून काम करत आहेत. याच वर्षी त्यांनी प्रशिक्षण पूर्ण करून मरीन पायलटची जबाबदारी सांभाळायला सुरुवात केली आहे.

कोलकाता पोर्ट ट्रस्टवर हुबळी नदीची स्थिती पण फारशी चांगली नाही. ही नदी सागर द्विप इथं समुद्राला मिळते असं रेश्मा सांगतात. त्यांना बंदरापासून सागर द्विपपर्यंत जहाजासोबत जवळपास जवळपास 150 नॉटिकल माइल्सचा (अंदाजे 300 किमी) प्रवास करावा लागतो.

हुबळी नदीमध्ये पाण्याचा प्रवाह तीव्र असतो. अनेकदा तर लहानसहान जहाजांना तीव्र प्रवाह उलट वाहून नेतो.

"पहिली मरीन पायलट होण्याचा आनंद तर होतोच, पण त्याच वेळी हे काम फार आव्हानात्मक आहे याची जाणीवसुद्धा होते," या पदाविषयी रेश्मा सांगतात.

"मी इथं अनेक वर्षांपासून प्रशिक्षण घेत आहे आणि आता मला माझं काम चांगलं जमतं. पण ज्या वेळेस एखादं जहाज फक्त तुमच्या भरोशावर पुढे सरकतंय, हे कळतं, तेव्हा तुमच्यावर किती मोठी जबाबदारी आहे, याची जाणीव होते," त्या पुढे सांगतात.

"एक प्रकारे जहाजातील सर्व प्रवासी आणि सगळ्या सामानाची जबाबदारी तुमच्यावर असते. त्यांना सुखरूपपणे पोहोचवण्याचं काम तुमच्या खांद्यावर असतं. पाण्यातला मार्ग किंवा हवामानाविषयीचा एक चुकीचा निर्णय मोठं नुकसान करू शकतं."

जहाजांना कुठल्या मार्गांवरून मार्गक्रमण करावं लागतं, याविषयी विचारल्यावर रेश्मा सांगतात, "प्रत्येक बंदराची भौगोलिक स्थिती वेगवेगळी असते. कुठं बंदरापर्यंत येता-येता समुद्राचं नदीत रूपांतर होतं, आणि मार्गही चिंचोळा होऊन जातो. कुठं पाणी खोल असतं तर कुठं उथळ."

"कधीकधी तर पाण्याचा प्रवाह फार वाढतो. अशा वेळी लहान आकाराच्या जहाजांना हाताळणं कठीण होऊन बसतं. प्रत्येक जहाजाविषयीही तुम्हाला सर्वकाही माहिती असेल, असं नाही. जहाजाच्या कॅप्टनला समुद्राविषयी माहिती असतं, पण त्याला बंदराविषयी माहिती नसतं. त्यामुळेही ते ही मरीन पायलटवरच अवलंबून असतात," त्या सांगतात.

सेलर ते मरीन पायलट

रेश्मा मूळ चेन्नईच्या. बिर्ला इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रांचीशी संलग्न एका संस्थेतून त्यांनी मरीन टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी एका कंटेनर शिपिंग कंपनी 'मर्स्क (Maersk)'मध्ये दोन वर्षं नोकरी केली आणि सेलर सेकंड ऑफिसरचा परवाना मिळवला. नंतर कोलकत्ता पोर्ट ट्रस्ट इथं मरीन पायलटसाठी अर्ज केला.

मरीन पायलट होण्यासाठी काय पात्रता हवी याबद्दल रेश्मा सांगतात, "तुमच्याकडे सेलर सेकंड ग्रेड ऑफिसरचा परवाना असला पाहिजे. आधी जहाजाच्या कॅप्टनला या पदावर नियुक्त केलं जायचं. पण कॅप्टन या पदासाठी फारसे इच्छुक नसल्याने मरीन पायलट्सची संख्या घटली आहे."

"त्यानंतर सेलर यांनाही या पदावर नियुक्त करण्यात येऊ लागलं. खरं तर मरीन पायलट पदासाठी एक दीर्घकालीन प्रशिक्षण घ्यावं लागतं, आणि जे कॅप्टन असतात त्यांना हे प्रशिक्षण घेणं आवडत नाही."

कामाची वेळ निश्चित नाही

एका मरीन पायलटचं काम बंदर आणि जहाज दोन्ही ठिकाणी असतं. कोलकत्ता पोर्ट ट्रस्टवर रेश्मांची शिफ्ट अशी की त्यांना सलग दोन दिवस काम करावं लागतं आणि नंतर दोन दिवस सलग सुटी असते.

रेश्मा सांगतात की "हे काम यासाठीपण कठीण आहे कारण बंदरामधून बाहेर पडण्याचा वेळ निश्चित नसतो. जहाज आल्यानंतर आम्हाला हवामान आणि नदीच्या प्रवाहाचा अंदाज घ्यावा लागतो."

"कधी दुपारी दोन वाजता निघावं लागतं तर कधी रात्रीच्या दोन वाजता! मग आठ-दहा तास किंवा पूर्ण दिवसभर जहाजातच राहावं लागतं. जर बंदराच्या सीमेपर्यंत पोहोचलो तर तिथं असलेल्या स्टेशन्सवर थांबतो किंवा यार्डसमधून परत येतो."

त्या सांगतात की भारतीय नौदल आणि मर्चंट नेव्हीमध्ये महिलांची संख्या फारच कमी आहे. आता हळूहळू ती वाढू लागली आहे.

पण इथं येण्यासाठी शारीरिक क्षमतेशिवाय मानसिक बळही लागतं. महिलांविषयी या क्षेत्रात अद्याप स्वीकार्हता नसली तरी त्यांना मानसिदकृष्ट्या तयार राहिलं पाहिजे.

रेश्मा यांचं एका मरीन इंजिनिअरबरोबर लग्न झालेलं असून त्या कुटुंबासह कोलकातामध्ये राहते. मग एवढं आव्हानात्मक काम करताना त्याचा कुटुंबावर परिणाम होतो का?

रेश्मा सांगतात, "एका सुनेकडून जशा अपेक्षा असतात, त्या मी पूर्ण करू शकत नाही. पण माझ्या कुटुंबाला त्याची कुठलीच अडचण नाही. जर घरात सगळेच समजूतदार असतील तर महिलांना पुढे जाण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)