#MeToo : ...आणि भारतीय मीडियातील लैंगिक छळाच्या कहाण्या झाल्या उघड

    • Author, टीम बीबीसी हिंदी
    • Role, नवी दिल्ली

कोणत्याही क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करणं महिलांसाठी आव्हानात्मक आणि कठीण असतं. नोकरीच्या ठिकाणी कामाच्या आव्हानांबरोबरच कधीकधी त्यांना लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागतो.

अशा प्रकरणांमध्ये प्रसारमाध्यमाचं क्षेत्रही सुटलेलं नाही. बाहेरून या जगतात कितीही झगमगाट जाणवत असला तरी त्याच्या आत एक अंध:काराची किनार आहे.

दररोज छोट्या मोठ्या अशा सगळ्या मिडीया हाऊसेसमध्ये एखाद्या महिलेबरोबर झालेल्या छळवणुकीच्या चर्चा होत असतात. या चर्चांमधील तपशील पहिल्यांदाच समोर येत आहेत. मुख्य म्हणजे महिलाच या प्रकरणांना वाचा फोडत आहेत.

पत्रकारितेशी निगडित अनेक स्त्रिया आपल्या कामाच्या ठिकाणी झालेल्या लैंगिक छळवणुकीला सोशल मीडियावर लिहू लागल्या आहेत. यातील बहुतांश महिला देशातल्या प्रसिद्ध संस्थांचं प्रतिनिधित्व करत होत्या किंवा आहेत.

ज्या पुरुषांवर या महिलांनी आरोप लावले आहेत तेसुद्धा पत्रकारितेतीलच प्रसिद्ध चेहरे आहेत. याकडे भारतातील #Metoo चळवळ म्हणून पाहिलं जात आहे.

या चळवळीनं जोर धरल्यानंतर शुक्रवारी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयानं ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांची एक समिती नेमण्याची घोषणा केली आहे.

#MeTooIndia या चळवळीत समोर आलेल्या सर्व तक्रारींचा विचार ही समिती करणार आहे.

तसेच, #SexualHarassmentAtWork च्या तक्रारी हाताळण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्याची ठोस अमलबजावणी कशी करावी यासाठी ही समिती उपाय सुचवेल, असं मनेका गांधी यांनी जाहीर केलं.

चॅटचे स्क्रीनशॉट

काही दिवसांपूर्वी बॉलिवुड अभिनेत्री तनुश्री दत्ताने बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकरांवर एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान छेडछाड करण्याचा आरोप लावला होता. त्यानंतर अनेक महिलांनी त्यांच्याबरोबर झालेल्या लैंगिक छळवणुकींच्या घटनांचा उल्लेख करण्यास सुरुवात केली.

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळवणुकीबाबत महिला आता समोर येत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर उद्भवलेल्या परिस्थितीचं वर्णन करत आहेत. इतकंच नाही तर या दुर्व्यवहारात सामील असलेल्या पुरुषांचे नाव जाहीर करत आहेत.

प्रसारमाध्यमांशी निगडित अनेक महिलांनी या प्रकरणी ट्वीट केलं आहे. ज्या पुरुषांनी हे कृत्य केलं त्यांच्याबरोबर झालेल्या चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

या सगळ्या प्रकरणांची सुरुवात खरंतर कॉमेडिअन उत्सव चक्रवर्तीवर एका महिलेने केलेल्या आरोपांमुळे झाली. या महिलेने गुरुवारी ट्वीट करत आरोप लावला की त्याने तिच्याकडे तिच्या नग्न छायाचित्रांची मागणी केली. त्याबरोबरच उत्सवने स्वतःच्या गुप्तांगाचा फोटो संबंधित महिलेला फोटो पाठवला.

त्यानंतर अनेक महिलांनी आपल्याबरोबर झालेल्या घटनांची सोशल मीडियावर वाच्यता करण्यास सुरुवात केली.

पत्रकार संध्या मेनन यांनी ट्वीट करून एकेकाळी तिचे वरीष्ठ राहिलेले संपादक आर. श्रीनिवासन यांच्यावर आरोप लावले आहेत.

"ही घटना 2008 ची आहे. तेव्हा आम्ही बेंगलुरूमध्ये एक पेपर लाँच करणार होतो. ते शहर मला तेव्हा नवीन होतं. सध्या टाइम्स ऑफ इंडियाच्या हैदराबादच्या आवृत्तीचे निवासी संपादक असलेले श्रीनिवासन यांनी एकदा मला घरी सोडण्यासंबंधी विचारणा केली होती."

"तेव्हा त्यांनी आमच्यापैकी अनेकांना आमच्या आमच्या घरी सोडलं. माझं सर्वांत दूर, म्हणून सर्वांत शेवटचं घर होतं. तेव्हा ते माझ्या घरी आले आणि माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला."

या आरोपांच्या उत्तरादाखल आर.श्रीनिवास लिहितात, "टाइम्स ऑफ इंडियाच्या लैंगिक हिंसाचारविरोधी समितीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. एका ज्येष्ठ महिलेच्या नेतृत्वाखाली ही चौकशी सुरू आहे. मी या चौकशीत पूर्ण सहकार्य करेन."

अनेक दिग्गजांवर आरोप

सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी महिलांनी अशा प्रकारे घेतलेल्या पुढाकाराची स्तुती केली आहे. "आपल्याबरोबर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रसारमाध्यमांतील स्त्रियांचं मी अभिनंदन करते. न्यायव्यवस्थेत सुद्धा अनेक महिला या विरोधात लढत आहेत. त्यांनाही माझा पूर्ण पाठिंबा आहे."

काही काळापूर्वी हफिंग्टन पोस्ट या इंग्रजी वेबसाईटसाठी काम करणाऱ्या अनुराग वर्मा यांच्यावरही अनेक महिलांनी आक्षेपार्ह मेसेज पाठवण्याचा आरोप केले आहेत. अनुराग हे स्नॅपचॅटवर अशा प्रकारचे मेसेजेस करत असल्याचा उल्लेख महिलांनी केला आहे. त्यामुळे अशा मेसेजचा कुठलाही पुरावा स्टोर करता आला नसावा, असा अंदाज आहे. कारण स्नॅपचॅटवर 24 तासांनी मेसेजेस डिलीट होतात.

या आरोपांना उत्तर देताना अनुराग यांनी माफी मागितली असून ते मेसेज गंमत म्हणून पाठवले होते, असं ते म्हणतात.

ते पुढे लिहितात की या मेसेजेसमुळे कोणाच्या भावना दुखावतील याची मला कल्पना नव्हती. त्यांनी काही महिलांना न्यूड फोटो पाठवण्याबाबत मेसेज केल्याची कबुलीही दिली.

यासंबंधी हफिंग्टन पोस्टने एक निवेदन जारी केलं आहे. उत्सव चक्रवर्ती आणि अनुराग वर्मा या दोन माजी कर्मचाऱ्यांवर अनेक महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले होते, असं त्यांचं म्हणणं आहे.

"आम्ही अशा प्रकारच्या कोणत्याही कृत्यांना थारा देत नाही. उत्सव चक्रवर्ती यांनी ऑक्टोबर 2017 मध्ये हफिंग्टन पोस्ट सोडलं. जेव्हापर्यंत हे दोघं आमच्या संस्थेत काम करायचे तेव्हापर्यंत त्यांच्यावर लावलेल्या आरोपांबाबत काहीही कल्पना नव्हती. ते इथे असतांनाही अशा प्रकारचे आरोप लावले होते का, याची चौकशी आम्ही करत आहोत," असं वेबसाईटवर जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

#Metoo काय आहे?

#Me too ही लैंगिक छळवणुकीच्या विरोधातली एक मोहीम आहे. या हॅशटॅगचा आधार घेत लैंगिक छळवणुकीला बळी पडलेले(विशेषत: कामाच्या ठिकाणी) लोके आपली व्यथा मांडत आहेत.

या अभियानामुळे आपल्याबरोबर झालेल्या लैंगिक छळवणुकीविरोधात आवाज उठवण्यासाठी बरीच मदत झाली आहे.

मागच्या वर्षी हॉलिवुड दिग्दर्शक हार्वी वाईनस्टीन यांच्यावर अनेक अभिनेत्रींनी लैंगिक छळवणुकीचा आरोप लावल्यावर या अभियानाने जोर पकडला. त्यात सामान्य लोकांसकट अनेक प्रसिद्ध लोकांची नाव समोर आलं आहे. वाईनस्टीन यांची कंपनी अक्षरशः दिवाळखोरीत निघाली आणि त्यांना चौकशीला सामोरं जावं लागलं.

सुरुवात कशी झाली?

ऑक्टोबर 2017 मध्ये सोशल मीडियावर #Metoo या हॅशटॅगचा आधार घेत कामाच्या ठिकाणी झालेल्या लैंगिक छळवणूक किंवा अत्याचाराच्या कहाण्या सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली होती.

'द गार्डियन' या वृत्तपत्राच्या मते टॅराना बर्क नावाच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने अनेक वर्षांआधी म्हणजे 2006 मध्ये #Metoo शब्दाचा वापर करण्यास सुरुवात केली होती.

मात्र अलिसा मिलानोने ट्विटरवर त्याचा वापर करण्यास सुरुवात केल्यानंतर हा शब्दप्रयोग अधिक लोकप्रिय झाला, तो एक हॅशटॅग आणि पर्यायाने मोहिमेचं नाव झाला.

मिलानो यांनी लैंगिक छळवणुकीला बळी पडलेल्या लोकांना आपल्याबरोबर झालेल्या घटनक्रमाबाबत ट्वीट करण्याचं आवाहन केलं. असं केल्यामुळे ही किती मोठी समस्या आहे, हे लोकांना कळेल, असंही त्या म्हणाल्या.

त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला आणि लोकांनी मोठ्या प्रमाणावर या हॅशटॅगचा वापर केला. काही ठिकाणी लोकांनी अशा प्रकारचे अनुभव कथन करण्यासाठी वेगळ्या हॅशटॅगचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते स्थानिक पातळीवर मर्यादित राहिले.

उदाहरणादाखल सांगायचं झालं तर लोकांनी फ्रान्समध्ये #BalanceTonPorc या नावाचं अभियान सुरू केलं. महिलांबरोबर गैरवर्तणूक करणाऱ्यांना लाज वाटायला हवी. अशाच प्रकारे काही लोकांनी #WomenWhoRoar हा हॅशटॅगसुद्धा सुरू केला. मात्र तो जास्त लोकप्रिय होऊ शकला नाही.

मात्र #Metoo अभियान इंटरनेटवर तर लोकप्रिय झालंच. मात्र बाह्य जगातसुद्धा लैंगिक छळवणुकीविरोधात आवाज उठवण्यासाठी उपयोगी ठरला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)