बाबासाहेबांवरचं पुस्तक वाचताना व्हायरल झालेल्या कचरावेचक तरुणीची गोष्ट

    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी
    • Reporting from, पुणे

"बापमाणूसच आहेत आंबेडकर. आधी पाण्याला वंचित होतो. गळ्यात मडकं बांधून फिरावं लागत होतं. त्यांच्यामुळे मिळालंय हे. जे काही झालंय, ते बाबासाहेब आंबेडकरांमुळेच!"

28 वर्षांच्या प्रीती मोहितेंसाठी या वाक्यांचा अर्थ दुहेरी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेल्या संधीची जाणीव त्यांना आहेच. पण त्याचबरोबर यामुळे वाटणाऱ्या डॉ. आंबेडकरांच्या ओढीनेच गेल्या 15 दिवसांमध्ये त्यांचं आयुष्यही पालटलंय. निमित्त ठरलं पुणे पुस्तक महोत्सवात व्हायरल झालेल्या त्यांच्या एका फोटोचं.

पुण्यातल्या बिबवेवाडीच्या रहिवासी असणाऱ्या प्रीती मोहिते एकल पालक आहेत. बिबवेवाडी गावठाणातल्या एका वस्तीत वन-रुम किचनच्या छोटेखानी घरात त्या त्यांची पाच वर्षांची मुलगी, आई-वडील आणि भाऊ यांच्यासमवेत राहतात.

प्रीती यांची आई हाऊसकिपींगचं काम करायच्या. तीन भावंडं आणि तुटपु्ंजं उत्पन्न, यात प्रीती मोहितेंचं शिक्षण सुटलं. पाचवीपर्यंत शिक्षण झालेल्या प्रीती यांची शिक्षणाची ओढ मात्र कमी होत नव्हती. याच ओढीनं त्यांना पोहोचवलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत.

आपल्या लहान मुलीला करिअर करता यावं, या हेतूने प्रीती वेगवेगळी कामं करुन आपला चरितार्थ चालवतात. पुणे पुस्तक महोत्सव सुरू असताना त्यांच्या आईला तिथे सुपरव्हिजनचं काम मिळालं. त्यांनी पैसे कमावण्यासाठी धडपडणाऱ्या आपल्या मुलीला इथे स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतेस का? असं विचारलं.

काही दिवस सलग उत्पन्न मिळणार असल्याने प्रीतीदेखील आईसोबत कामासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात दाखल झाल्या.

दररोज नेमून दिलेल्या स्टॅालवर काम करण्याचं बंधन त्यांना होतं. तिथला जमा होणारा कचरा साफ करत असताना प्रीती यांचं लक्ष तिथल्या पुस्तकांवर जायचं. शिक्षण पाचवीपर्यंत झालेलं असलं तरी त्यांची वाचनाची ओढ मात्र कमी झालेली नव्हती.

अशात महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी त्यांना थोडी उसंत मिळाली आणि त्या पुस्तक बघत एका स्टॉलसमोर थबकल्या. हा स्टॉल होता डॉ. आंबेडकरांवरच्या 'जग बदलणारा बापमाणूस' या पुस्तकाचा.

प्रीती सांगतात, "मला असं कळालं की तिथं बुक स्टॅाल लागले आहेत. तिथं साफसफाईसाठी बाया-पुरुष लागत होते. मी सांगितलेलं काम करत होते. तिथं हे पुस्तक मला दिसलं."

प्रिती मोहिते काही काळ पुस्तक वाचत त्या तिथेच रेंगाळल्या. त्याच वेळी एका हातात कचरा गोळा करण्यासाठीची पिशवी आणि दुसऱ्या हातात डॉ. आंबेडकरांचा फोटो असलेलं हे पुस्तक वाचण्याची कसरत करत असतानाचा त्यांचा फोटो टिपला गेला आणि हाच फोटो व्हायरल झाला.

हा फोटो व्हायरल झाल्याची कल्पना त्यांना नव्हती. प्रीती सांगतात, "माझ्या आईच्या फोनवर माझा फोटो आला. त्यानंतर आम्ही ज्या कंपनीत काम करत होतो, तिथल्या लोकांनी फोन केला की, असा फोटो व्हायरल झाला आहे म्हणून. मग कळालं."

यानंतर ठिकठिकाणी त्यांचे सत्कार झाले. जे पुस्तक वाचतानाचा हा फोटो होता ते 'बापमाणूस' हे पुस्तकही लेखक जगदीश ओहोळ यांनी त्यांना भेट दिलं. काही ठिकाणी सत्कारात साडी आणि रोख रक्कम मिळाली.

अर्थात, या व्हायरल फोटोने त्यांचे प्रश्न मात्र सुटले नाहीत. मुलीला मोठं करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रिती यांचं शिक्षण अर्धवट सुटल्याने मिळेल ती कामं करत पैसे कमावतात.

सध्या त्या एका केटररकडे कामाला आहेत. तिथंही जेव्हा काम असेल तेव्हाच उत्पन्न. तेही जेव्हा कार्यक्रम किंवा लग्नाचा सिझन असेल तेव्हाच.

त्या सांगतात, "सध्याला 300 ते 400 रुपये हजेरी मिळते. संध्याकाळी कामाला गेले दुसऱ्या दिवशी आले तर 700-800 रुपये मिळतात. लग्नाचा सिझन नसेल तर काम नसतं. तसं म्हटलं तर महिन्यात कधी तीन कधी पंधरा दिवस काम मिळतं."

हा फोटो टिपला तो 'जग बदलणारा बापमाणूस' या पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ यांनीच.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये जगदीश ओहोळ लिहिलं आहे की, "पुणे पुस्तक महोत्सवामध्ये पुस्तक खरेदीसाठी जमलेल्या सुशिक्षित, नोकरदार, अधिकारी वाचकांच्या गर्दीमध्ये कोणतरी एक मुलगी कचरा गोळा करते, याकडे कोणाचं लक्षही नव्हतं. पण त्या कचरा गोळा करणाऱ्या हातांचं लक्ष मात्र आपलं 'जग बदलणाऱ्या बापमाणसा'कडे होतं. आज पुणे पुस्तक महोत्सवाचा शेवटचा दिवस आणि कचरा गोळा करता करता ही ताई स्टॉलवरच्या मुलाला म्हणाली की 'हे बापमाणूस पुस्तक मला पाहिजे, केवढ्याला आहे?' पुस्तक महोत्सवातील सगळा वाचकवर्ग उच्चभ्रू , सुशिक्षित लोकं, पुस्तक खरेदीसाठी उडालेले गर्दी यामध्ये या ताईचे शब्द जेव्हा माझ्या कानावर पडले तेव्हा माझ्या अंगावर शहारे आले."

तसंच, प्रीती मोहिते यांना 'जग बदलणारा बापमाणूस' पुस्तकाच्या 30 व्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात जगदीशब्द फाउंडेशनच्या वतीने फुलेवाडा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई सभागृहात 'बापमाणूस विशेष वाचक पुरस्कार' आणि रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

प्रीती यांना केटररकडे स्वयंपाकाचं काम असलं तरी त्यातून मिळणारं उत्पन्न तुटपुंजं आहे. पण याच उत्पन्नाच्या जीवावर त्या आपल्या मुलीला मोठं करण्याची जिद्द बाळगून आहेत. स्वत: शिकण्याचंही स्वप्न आहे. पण स्वतवर खर्च केला तर मुलीच्या शिक्षणाला अडचण नको, असंही वाटत असल्याचं त्या सांगतात.

त्यांच्यासाठी आता ध्येय आहे ते एकच. "मुलीसाठी एकच इच्छा आहे तिने शिकून स्वतच्या पायावर उभं रहावं. जे मला आज मिळालं नाही शिक्षण नाही मिळालं, फिरायला जावं वाटतं, खायची इच्छा होते, या सगळ्या गोष्टी माझ्या नाही झाल्या. पण त्या तिच्यासाठी करायच्या आहेत. तिने तिच्या पायावर उभं रहावं."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)