इरावती कर्वे : नाझी जर्मनीतील आर्यवंशीय श्रेष्ठत्वाला आव्हान देणारी भारतातील पहिली महिला मानववंशशास्त्रज्ञ

    • Author, शर्लिन मोलान
    • Role, बीबीसी न्यूज

इरावती कर्वे यांचं संपूर्ण आयुष्यच कोणालाही भारावून टाकेल, असं आहे.

ब्रिटिश राजवटीखालील भारतात त्यांचा जन्म झाला. त्या काळात महिलांना कुठलंच स्वातंत्र्य आणि अधिकार नव्हते. अशा परिस्थितीत इरावती कर्वेंनी ते करून दाखवलं ज्याची कल्पनाही कोणी केली नसती.

ज्या काळात मुलींनी शाळेत जाणं वर्ज्य मानलं जायचं त्या काळात इरावती उच्चशिक्षण घेण्यासाठी परदेशात जाऊन आल्या. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून शिकवलं आणि नंतर त्या भारताच्या पहिला मानववंशशास्त्रज्ञ बनल्या.

इरावतींनी लग्नही आपल्या पसंतीच्या पुरुषाशीच केलं. ज्या काळात मुलींना घराबाहेर पडण्यास निर्बंध होते त्या काळात इरावती बेदिंग सूट घालून पोहायला बाहेर पडायच्या आणि स्कूटर चालवायच्या‌.

इतकंच नाही तर जर्मनीत जाऊन तिथल्याच आघाडीच्या मानववंशशास्त्रज्ञाचा वर्णद्वेषी सिद्धांत त्यांनी स्वतःच्या बुद्धीमत्ता आणि धाडसाच्या बळावर खोडून काढला. युजिन फिशर हे त्या काळातलं जर्मनीतील मानववंशशास्त्रातील आघाडीचं नाव होतं.

इरावती कर्वे डॉक्टरेट करत असताना फिशर त्यांचे मार्गदर्शक होते. पण फिशर यांनी आपल्या सिद्धांतांमधून वर्णवर्चस्ववादाचा पुरस्कार केला होता. इरावती कर्वेंनी चिकित्सक वृत्तीच्या बळावर आपल्या गुरूच्याच सिद्धांताला आव्हान दिलं.

सहा भावंडांत एकटी मुलगी

भारताचा इतिहास आणि संस्कृती याविषयी इरावती कर्वेंनी करून ठेवलेलं लिखाण अतिशय मूलभूत आणि क्रांतीकारी स्वरूपाचं आहे. त्यामुळे आजही महाविद्यालयीन अभ्यासक्रमात त्यांच्या लिखाणाचा समावेश होतो.

इतकं सगळं कर्तृत्व असूनही दुर्दैवानं इरावती कर्वे या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये दुर्लक्षित राहिलेल्या आहेत. त्यांच्या क्रांतीकारी आयुष्याची म्हणावी तितकी नोंद इतिहासानं घेतलेली नाही.

याच पार्श्वभूमीवर इरावती कर्वेंचं आयुष्य आणि कर्तृत्वावर प्रकाश पाडणारं नवं चरित्रात्मक पुस्तक अतिशय महत्वाचं ठरतं. विशेष म्हणजे इरावती कर्वे यांची नात उर्मिला देशापांडे या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत.

'इरू : द रिमार्केबल लाईफ ऑफ इरावती कर्वे' हे त्यांच्या आयुष्यावरील चरित्रात्मक पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं असून उर्मिला देशपांडे आणि थिआगो पिंटो बार्बोसा यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

आत्तापर्यंत कधीही समोर न आलेला इरावती कर्वेंचा जीवन प्रवास या पुस्तकातून रेखाटण्यात आला आहे‌. इरावती कर्वेंचं आयुष्य जितकं खडतर होतं तितकंच प्रेरणादायीसुद्धा आहे.

अनेक आव्हानांचा सामना करत त्यांनी क्रांतीकारी म्हणता येईल असं कार्य करून दाखवलं आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी एक आदर्श प्रस्थापित केला.

इरावती कर्वे यांचा जन्म 1905 मध्ये बर्मात (आत्ताचा म्यानमार) झाला. इरावती हे त्यांचं नाव इरावड्डी नदीवरून ठेवलं गेलं होतं‌.

सहा भावंडांमध्ये ती एकटी मुलगी असल्यामुळं घरात ती सगळ्यांची लाडकी होती. त्यामुळं तिचं बालपण अतिशय मजेत गेलं.

पण थोडं वय वाढल्यानंतर इरावती यांच्यासोबत अशा काही घटना घडल्या आणि तिला अशी काही लोकं भेटली की त्यांनी तिचं आयुष्यच बदललं. या घटना आणि लोकांमुळे इरावतींच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळालं‌.

इरावतींचा संपर्क अतिशय संवेदनशील आणि पुरोगामी लोकांसोबत आला. त्यांच्याकडून इरावतीला सगळी पारंपरिक बंधनं झुगारून सुधारणावादी आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळाली. या प्रवासात तिला अनेकांची तितकीच तगडी साथ देखील मिळाली.

जर्मनीतील घटनांचा मनावर परिणाम

सात वर्षांची असतानाचा वडिलांनी इरावतीला शिक्षणासाठी पुण्यामधील एका बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवलं. त्या काळी तिच्या वडिलांनी घेतलेला हा फार धाडसी निर्णय होता. कारण शिक्षण तर दूरची गोष्ट, मुलींचं लहानपणीच लग्न लावून देण्याची त्यावेळी प्रथा होती.

पुण्यात आल्यावर लहानग्या इरावतीची भेट आर. पी. परांजपे नावाच्या गृहस्थांसोबत झाली. परांजपे हे त्यावेळी पुण्यातील मोठं प्रस्थ होतं‌. अतिशय पुरोगामी विचारांचे परांजपे हे पेशाने प्राध्यापक आणि शिक्षणाचे खंदे पुरस्कर्ते होते.

लहानगी इरावती त्यांच्या इतकी लाडाची झाली होती की, परांजपे कुटुंबीयांनी तिला अनधिकृतरित्या दत्तकच घेतलं होतं. परांजपे कुटुंबानं स्वतःची मुलगी असल्याप्रमाणं इरावतीला सांभाळलं.

परांजपेंचं कुटुंब अतिशय पुरोगामी आणि सुधारणावादी विचारांचं होतं‌. या घरात वाढताना इरावतीवर देखील तसेच संस्कार झाले.

त्यामुळेच इरावतीची चिकित्सक वृत्ती आणि परंपरांना छेद देत योग्य तेच करण्याचा धाडसीपणा विकसित झाला. आर. पी. परांजपे हे इरावतीसाठी वडिलांसारखेच होते. म्हणून ती त्यांना अप्पा म्हणून हाक मारत असे. परांजपे यांचे विचार हे काळाच्या फार पुढचे होते. त्यांच्या विचारांचा प्रभाव अर्थातच इरावतीवर पडला.

परांजपे हे महाविद्यालयात प्राध्यापक होते‌. ते शिक्षणाचे विशेषत: महिलांच्या शिक्षणाचे खंदे पुरस्कर्ते होते. तसेच ते नास्तिक विचारसरणीचे देखील होते‌. त्यांच्यामुळं इरावतींना समाजशास्त्रात रस निर्माण झाला आणि पुढे जाऊन त्यांनी या सामाजिक विज्ञानात मूलभूत कार्य केलं.

शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर इरावतींनी जेव्हा जर्मतीत जाऊन मानववंशशास्त्रात डॉक्टरेट करायची ठरवलं तेव्हा त्यांना घरून बराच विरोध झाला. खास करून तिचे वडिल या निर्णयाच्या ठाम विरोधात होते.

पण आर. पी. परांजपे आणि पती दिनकर कर्वे इरावतीच्या बाजूनं खंबीरपणे उभे राहिले‌. दिनकर कर्वे हे स्वतः विज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांच्या पाठिंब्यामुळेच इरावतींनी जर्मनीत जाऊन आपली डॉक्टरेट पूर्ण केली.

अनेक दिवसांचा जहाजातील प्रवास पूर्ण करून इरावती 1927 मध्ये जर्मनीत पोहचल्या. मानववंशशास्त्रात पीएचडी करत असताना युजिन फिशर हे त्यांचे मार्गदर्शक होते.

फिशर हे त्याकाळी मानववंशशास्त्रील अतिशय नावाजलेले वैज्ञानिक होते. त्यांनी युजेनिक्स हा वर्णवर्चस्ववादाचा सिद्धांत मांडला होता.

त्यावेळी जर्मनी अजूनही पहिल्या महायुद्धातील मानहानीकारक पराभवाचे परिणाम भोगत होती. हिटलर अजून सत्तेत यायचा होता. मात्र, नाझी विचारसरणीच्या भस्मासूरानं डोकं वर काढायला सुरुवात केली होती.

ज्यू द्वेषाचा विखार जर्मनीत पसरू लागला होता. या ज्यूद्वेषाचा अनुभव इरावतींनी स्वतः घेतला. विद्यापीठात शिक्षण घेत असताना ज्यूद्वेषातून आपल्याच इमारतीतील एका ज्यू मुलाची झालेली निघृण हत्या इरावतींनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली.

हा घटनेचा मोठा प्रभाव इरावतींच्या आयुष्यावर झाला, असं या पुस्तकात लेखकांनी लिहिलं आहे. आपल्या इमारतीबाहेरील पायरस्त्यावर मारहाणीमुळे रक्ताने ओथंबलेला तो मृतदेह पाहून इरावती एकाच वेळी भयभीत आणि क्रोधित देखील झाल्या‌‌. इरावतींसाठी हा एक मोठा मानसिक आघात होता.

भरीस भर म्हणजे इरावतींना पीएचडीसाठी मार्गदर्शन असणाऱ्या फिशर यांचा सिद्धांत देखील वर्णवर्चस्ववादाचाच पुरस्कार करणारा होता‌.

श्वेतवर्णीय युरोपियन्स हे अश्वेतवर्णीय युरपियन्सपेक्षा अधिक बुद्धिमान आणि सक्षम आहेत, असं फिशर यांना आपल्या सिद्धांतामधून दाखवून द्यायचं होतं. यासाठी 149 मानवी मेंदूच्या कवट्यांचा त्यांंना अभ्यास करायचा होता. फिशर यांची विद्यार्थीनी या नात्यानं या संशोधनात त्यांना सहाय्य करणं इरावतींची जबाबदारी होती.

वर्णद्वेषी सिद्धांताला छेद

इतरांच्या तुलनेत श्वेतवर्णीय युरोपियन वंशाच्या लोकांचा मेंदू असममित (asymmetrical) आहे. गोऱ्या युरोपियन लोकांच्या मेंदूचा उजवा भाग हा डाव्या भागापेक्षा आकाराने जास्त मोठा आहे. मेंदूचा उजवा भाग हा तर्कशील विचार करण्यासाठी कारणीभूत असतो‌‌. त्यामुळे श्वेतवर्णीय युरोपियन वंशाचे लोक जन्मजातच इतरांपेक्षा अधिक तर्कशील, हुशार पर्यायाने श्रेष्ठ असतात, असा सिद्धांत फिशर यांनी मांडला होता.

खरंतर आपल्याला वरिष्ठ असणाऱ्या फिशर यांची हुजरेगिरी करणं संशोधनातील सहाय्यिका या नात्याने इरावतींकडून अपेक्षित होतं. पण स्वतंत्र विचारांच्या बाणेदार इरावतींना हे मान्य नव्हतं.

त्यांनी स्वतः संशोधन करून याची पडताळणी केली आणि फिशर यांचा दावा खोडून काढला. मेंदूचा उजवा भाग डाव्या भागापेक्षा मोठा असणं याचा व्यक्तीच्या बुद्धीमत्तेशी काडीमात्र संबंध नाही, हे इरावतींनी आपल्या संशोधनातून सप्रमाण सिद्ध केलं.

"इरावतींनी आपल्या संशोधनातून फक्त गुरू युजिन फिशर यांचाच सिद्धांत खोडून काढला नाही तर त्याकाळी प्रचलित असलेल्या मुख्यधारातील मानववंशशास्त्राच्या मूलभूत तत्वांनाच आव्हान दिलं," असं या पुस्तकात लेखकांनी लिहिलं आहे.

आपल्या या क्रांतिकारी संशोधनातील पुरावे इरावतींंनी सादर केले तेव्हा एकच खळबळ उडाली‌. कारण युजिन फिशर सारख्या इतक्या प्रतिष्ठित आणि वरिष्ठ शास्त्रज्ञाला त्यांनी तोंडावर पाडलं होतं‌‌. यामुळे अर्थातच इरावतींंनी त्यांची नाराजी ओढावून घेतली. त्याचे साहजिक दुष्परिणाम इरावतींना भोगावे लागले.

प्राध्यापक युजिन फिशर यांनी इरावतींना अगदी कमी गुण दिले. पण इरावती डगमगल्या नाहीत. कारण त्यांनी डॉक्टरकीसाठी केलेल्या या संशोधनाचं महत्व त्यांना मिळालेल्या गुणांपेक्षा कितीतरी पटीनं जास्त होतं.

आजतागायत युजेनिक्स नावाच्या या छद्मविज्ञानाच्या जोरावर वंशाधारित भेदभावाला न्याय्य ठरवण्याचा प्रयत्न केला जात होता, तोच मुळात अवैज्ञानिक असल्याचं इरावतींनी आता सिद्ध करून दाखवलं होतं.

त्यामुळेच वंशाधारित भेदभाव करणं हे फक्त अनैतिकच नाही तर अवैज्ञानिक आणि अनैसर्गिक सुद्धा असल्याचा साक्षात्कार इरावतींमुळे जगाला झाला.

आत्तापर्यंत युजिन फिशर यांच्या खोट्या सिद्धांतालाच प्रमाण मानून वर्णद्वेषाला सैद्धांतिक आधार दिला जात होता. स्वतः हिटलर युजिन यांचं लिखाण वाचून प्रभावित झाला होता.

जर्मन आर्यवंशीय हे जन्मजात श्रेष्ठ आहेत आणि ज्यू हे जन्मजात हीन आहेत, असा आपला राजकीय अजेंडा विज्ञानाच्या नावानं रेटणं हिटलरला फिशरसारख्या वर्णद्वेषी छद्मी वैज्ञानिकांमुळेच शक्य झालं.

पुढे जाऊन हिटलर सत्तेत आल्यानंतर हेच युजिन फिशर नाझी पक्षाचा सदस्य बनले, यात मग काही आश्चर्यसुद्धा वाटत नाही.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर इरावती कर्वे यांनी अशाच धाडसीपणाचं प्रदर्शन केलं. या धाडसाला त्यांच्या बुद्धीमत्ता आणि अभ्यासाची मिळालेली जोड आणखी मजबूत बनवत होती. याबरोबरच समाजातील शोषित - वंचित समूहांप्रती त्यांना असलेली सहवेदना व प्रेम यामुळे इरावती कर्वेचं कार्य खऱ्या अर्थानं क्रांतीकारी ठरलं.

त्या काळात महिला घराबाहेर पडायला कचरत असत. सार्वजनिक आयुष्यात महिलांवर अनेक बंधनं असायची. पण इरावती कर्वे आपल्या संशोधनासाठी देशभरात दुर्गम ठिकाणी फिरत असत. कधी एकट्यानेच तर कधी पुरूष सहकाऱ्यांसोबत त्यांना अशा दौऱ्यावर जावं लागायचं.

अनेकदा तर आपले तरूण विद्यार्थी आणि आपल्या मुलांना सोबत घेऊन त्या संशोधनासाठी बाहेर पडायच्या.

पुरातत्वशास्त्रात त्या इतक्या बुडालेल्या होत्या की पुरातत्व जीवाश्मांचा अभ्यास करायला त्या कुठलेही आढेवेढे न घेता अगदी दुर्गम भागात सहज जायच्या. 15 वर्ष जुने मानवी सांगाडे शोधून त्यांचा अभ्यास इरावती कर्वे यांनी केला.

या आपल्या अभ्यासातून इतिहास व वर्तमानातील दुवा जोडून सामाजिक आणि जीवशास्त्रीय वास्तवाचा नव्याने उलगडा करण्याचा विडा त्यांनी उचलला होता.

या संशोधनासाठी त्या महिनोन्महिने डोंगर, दऱ्याखोऱ्यांत आणि घनादाट जंगलात देखील राहिल्या. अशावेळी कधी जनावरांच्या गोठ्यात तर कधी गाडीतच झोपून त्यांनी दिवस काढले.

बऱ्याचदा तर अशा दौऱ्यांमध्ये पुरेसं अन्नदेखील मिळायचं नाही. पण अशा अनंत अडचणी आल्यानंतरही इरावतींनी आपल्या संशोधनात खंड पडू दिला नाही.

हे कार्य करताना इरावतींचा संपर्क समाजातील वेगवेगळ्या घटकांसोबत आला. अनेक प्रकारचे वेगवेगळ्या समूहातील वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले लोक त्यांना भेटले.

या अनुभवांमुळे त्यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक धारणांना सुद्धा धक्का बसायचा. पण या अनुभवांचा खुल्या मनाने स्वीकार करण्याची त्यांची वृत्ती होती. त्यामुळे अशा अनुभवांनी त्यांना कमजोर नव्हे तर आणखी समृद्ध केलं.

याचं एक उदाहरण म्हणजे या पुस्तकात नमूद केलेला एक प्रसंग. इरावती कर्वे जन्मानं चित्पावन ब्राह्मण होत्या. चित्पावन ब्राह्मण हे अतिशय कट्टर प्रतिगामी आणि शुद्ध शाकाहाराचं पालन करणारे असतात. पण आपल्या संशोधनासाठी एका आदिवासी जमातीच्या पाड्यात गेल्यानंतर इरावतींची भेट तिथल्या आदिवासींच्या प्रमुखाशी झाली.

या आदिवासी प्रमुखानं इरावतींचा पाहुणचार करताना त्यांना मांस खायला दिलं‌. इरावतींनी सुद्धा कुठलाही संकोच न बाळगता हे मांस खाल्लं. मांसाहार हा आदिवासींच्या संस्कृती आणि जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग असल्याची जाणीव इरावतींना होती.

आदिवासींमध्ये राहून त्यांच्या संस्कृती आणि इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर त्यांच्यामधीलच एक होऊन जगणं गरजेचं आहे, हे इरावतींनी ओळखलं होतं‌‌. त्यामुळे कुठलाही आढेवेढे अथवा नाराजी न दाखवता त्यांनी खुल्या मनानं मांसाहाराचं सेवन केलं. परंपरा आणि धर्माचं ओझं बाळगणं त्यांना कधीच मंजूर नव्हतं.

आपल्या या संशोधनामुळे इरावतींचे विचार आणखी सुधारणावादी होत गेले. परंपरा आणि धर्माचा पगडा नाकारून त्या खऱ्या अर्थानं मानवतावादी बनल्या.

यातून त्यांनी सर्वच धर्मांमधील प्रतिगामीपणा आणि कट्टरतावादावर टीका केली. हिंदू धर्मातील जाचक परंपरा आणि प्रथांवर ताशेरे ओढताना त्या कचरल्या नाहीत.

भारताला आपलं मानणाऱ्या प्रत्येकाचा या देशावर समान अधिकार आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळे जाती, वंश आणि वर्णाधारित भेदभावाला त्यांनी कायमच झुगारून लावलं.

जर्मनीत असताना नाझींनी ज्यूंवर केलेले अनन्वित अत्याचार इरावती कर्वे यांनी स्वतः डोळ्यांनी पाहिले होते. याचा खोलवर परिणाम त्यांच्या मनावर झाला.

पुढे त्यांनी आयुष्यभर वर्णद्वेषाचा कडाडून केलेला विरोध आणि मानवतावादाचा केलेला पुरस्कार याचा उगम कुठेतरी याच कटू भयावह अनुभवात झाला असावा, असं त्यांच्या चरित्रात लेखकांनी लिहिलं आहे.

"या सगळ्या अनुभवांनी इरावतींना समृद्ध केलं. मानवातावादावरील त्यांचा विश्वास आणखी दृढ झाला. 'जे काही आहे ते सगळ्यांचं आहे, आपण सगळे एकच आहोत,' ही हिंदू धर्मातील वैश्विक शिकवण त्यांनी आत्मसात केली," असं या पुस्तकात लेखक लिहितात.

1970 साली इरावती कर्वेंचं निधन झालं. पण त्यांनी करून ठेवलेलं कार्य आजही लोकांना प्रेरणा देत राहतं. त्यांच्या क्रांतीकारी विचार आणि कार्याचा वारसा पुढे चालवणं हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.