ब्रिटनच्या भावी पिढ्यांचं संगोपन करताना विस्मरणात गेलेल्या भारतीय महिलांची गोष्ट

    • Author, गगन सभरवाल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, लंडन.

ब्रिटीश साम्राज्याचा सूर्य जेव्हा तळपत होता त्याकाळात भारत आणि आशियातील इतर भागांतील हजारो महिलांना मुलांचं संगोपन करण्यासाठी लंडनमध्ये आणण्यात आलं होतं. पुढे या आयांना त्यांच्या त्यांच्या नशिबावर सोडून दिलं गेलं. या सोडून दिलेल्या आया ज्या ठिकाणी राहायच्या त्या ठिकाणी आता 'ब्लू प्लाक' पासून स्मारक बनवण्यात येत आहे.

'ब्लू प्लाक' योजना युनायटेड किंगडममधील 'इंग्लिश हेरिटेज' या धर्मादाय संस्थेद्वारे चालवली जाते. या योजनेत इतिहासातल्या महत्त्वाच्या व्यक्तींशी संबंध असणाऱ्या इमारतींचे जतन केलं जातं.

महात्मा गांधी आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भीमराव आंबेडकर यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांसह अनेक भारतीयांचं प्लाकमार्फत स्मरण ठेवण्यात आलं आहे. दुसऱ्या विश्वयुद्धातील गुप्तहेर नूर इनायत खान हे 'ब्लू प्लाक' 2020 पुरस्कार मिळवणारा पहिले भारतीय ठरले.

ईस्ट लंडनमधील हॅकनी येथील 26 किंग एडवर्ड्स रोड येथील आयांच्या घराला देण्यात येणारा हा सन्मान फरहाना मामुजी यांनी चालवलेल्या कॅम्पेनमुळे मिळाला आहे. तीस वर्षांच्या फरहाना मूळच्या भारतीय आहेत. त्यांनी बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीमध्ये या जागेबद्दल पहिल्यांदा ऐकलं होत. या डॉक्यूमेंट्रीमध्ये या घराचा ओझरता उल्लेख होता.

ही वास्तू शेकडो निराधार आया आणि आमा यांचा आधारवड होती. चिनी दायीला आमा म्हटलं जायचं.

फरहाना मामुजी आणि या दाईंच्या भूमिकेवर आणि योगदानावर संशोधन करणाऱ्या इतिहासकारांना आशा वाटते की हा सन्मान त्या विस्मरणात गेलेल्या स्त्रियांच्या आठवणींना उजाळा देईल.

या आया कोण होत्या?

या आया भारत, चीन, हाँगकाँग, ब्रिटीश सिलोन (श्रीलंका), बर्मा (म्यानमार) मलेशिया आणि जावा इंडोनेशिया या भागातून आणल्या जायच्या.

'एशियन इन ब्रिटन : 400 इयर्स ऑफ हिस्ट्री' या पुस्तकाच्या लेखिका आणि इतिहासकार रोझिना विसराम म्हणतात, "आया आणि अमा या खरंतर घरगुती काम करणाऱ्या मोलकरणी होत्या. आणि मुख्य म्हणजे भारतातल्या ब्रिटिश कुटुंबांचा भक्कम आधार होत्या. त्या मुलांची काळजी घ्यायच्या, त्यांचं मनोरंजन करायच्या, त्यांना गोष्टी सांगायच्या, पाळणा हलवून झोपवायच्या."

"ही इंग्रजी कुटुंबं, या आयांना परतीच्या प्रवासासाठी स्वखर्चाने तिकीटही काढून द्यायची," असं त्या सांगतात.

पण सर्वचजणी नशीबवान होत्या असं नाही. त्यातल्या बऱ्याच जणींना कामावरून काढून टाकलं जायचं. कधी कधी त्यांचे मालक त्यांना घरी परतण्यासाठी पैसे वा तिकीट न देता निराधार सोडायचे.

परतीच्या प्रवासात त्यांना आधार देण्यासाठी एकही कुटुंब उपलब्ध नसल्याने त्यांच्यापैकी अनेकींना तिथंच राहावं लागलं.

ब्रिस्टल विद्यापीठातील साहित्य आणि स्थलांतरावर अभ्यास करणारे प्राध्यापक फ्लोरियन स्टॅडलर म्हणतात, "या आयांना स्वतःच्या नशिबावर अवलंबून राहावं लागायचं."

फ्लोरिअन स्टॅडलर यांनी या विषयावर विसराम यांच्यासोबत काम केलंय.

ते सांगतात, या स्त्रिया बहुतेकदा स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये घरी जाण्यासाठी मदत हवी म्हणून जाहिराती द्यायच्या. त्यांच्यातल्या बऱ्याच जणींना गलिच्छ ठिकाणी राहायला भाग पाडलं जायचं.

"आणि जेव्हा त्यांच्याकडे पैसे संपायचे, तेव्हा त्यांना या स्वस्त ठिकाणांहुनही हाकलून लावलं जायचं. अनेकींना भारतात परतण्यासाठी भीक मागायला भाग पडायचं."

आया घर

ओपन युनिव्हर्सिटीच्या 'मेकिंग ब्रिटन' संशोधन प्रकल्पानुसार, "1825 मध्ये एल्डगेटमध्ये आया हाऊस बांधण्यात आलं असावं असा अंदाज आहे."

हे घर एलिझाबेथ रॉजर्स नावाच्या महिलेने बांधलं होतं. तिच्या मृत्यूनंतर (कोणत्या वर्षी हे स्पष्ट नाही), हे घर एका जोडप्याने घेतलं. आणि पुढं आयांचं निवासस्थान म्हणून वापरलं गेलं.

हे घर म्हणजे एकप्रकारे दाईंसाठीची कन्सल्टन्सीच होती. बरीच कुटुंब दाईच्या शोधात इथं यायची.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटन साम्राज्याचा उदय होत असताना, इंग्लंड आणि भारत यांच्यात नियमित प्रवास सुरू झाला. त्याचा परिणाम ब्रिटनमध्ये काम करायला येणाऱ्या दाईंची संख्याही वाढली.

डॉ. विसराम यांच्या म्हणण्यानुसार, "दरवर्षी 200 आया ब्रिटन मध्ये यायच्या. त्यातल्या काहीजणी काही दिवसांसाठी तर काही महिन्यांसाठी आलेल्या असायच्या."

आयांना त्यांच्या राहण्याचा खर्च द्यायाला लागत नव्हता. डॉ. विसराम म्हणतात, "स्थानिक चर्चकडून देणग्या मिळायच्या. त्यातल्या काही आया अशा होत्या ज्यांच्याकडे परतीची तिकीट होती पण पैशांअभावी किंवा कोणी सोबत नसल्यामुळे त्या घरी जाऊ शकत नव्हत्या. अशात त्या आया घराची मेट्रॅन ते तिकीट अशा कुटुंबांना विकायची ज्यांना समुद्री प्रवासात आयांची गरज आहे."

पण हे आया घर फक्त वसतिगृह किंवा आश्रयस्थान नव्हतं. डॉ. स्टॅडलर म्हणतात की त्यांचा एक विशेष हेतू होता. तो म्हणजे या आयांच ख्रिश्चन धर्मात परिवर्तन करणं हा त्यांचा प्रयत्न होता.

ते म्हणाले, "पण इंग्लंडमध्ये असलेल्या किती दाईंनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला हे आम्हाला ठाऊक नाही. कारण याची कोणतीही नोंद सापडत नाही. इंग्लंडमध्ये त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आलं होतं असाही कोणता दस्तऐवज उपलब्ध नाही."

सन 1900 मध्ये 'लंडन सिटी मिशन' या ख्रिश्चन समूहाने हे घर घेतलं. त्यांनी ते सुरुवातीला ते 26 किंग एडवर्ड्स रोड, हॅकनी आणि नंतर 1921 मध्ये 4 किंग्स एडवर्ड्स रोड या ठिकाणी हलवलं.

ब्लू प्लाकचा प्रवास

विसाव्या शतकाच्या मध्यात ब्रिटीश साम्राज्याच्या अस्तानंतर आयांची गरज कमी झाली. 4 किंग एडवर्ड्स रोडवरील घराचं खाजगी निवासस्थानात रूपांतर करण्यात आलं.

फरहाना मामुजीने 2018 मध्ये 'ए पॅसेज टू ब्रिटन' नावाच्या बीबीसी डॉक्युमेंट्रीमध्ये आयांच्या घरबद्दल पहिल्यांदा ऐकलं.

हॅकनीमधील त्या भाड्याने दिलेल्या घराचा ओझरता संबंध आला. मामूजी तिथून जवळच राहत होत्या.

"पूर्व लंडनमध्ये राहणारी एक दक्षिण आशियाई महिला या नात्याने, मला या आयांशी एकप्रकारचा ऋणानुबंध वाटला. जगाने न ऐकलेली त्यांची गोष्ट जाणून घ्यायची मला इच्छा झाली." ती इमारत पाहण्याची मी मनोमन इच्छा केली होती असं फरहाना मामुजी सांगतात.

"जगभरातील अनेक आशियाई महिलांसाठी खास असलेल्या ठिकाणाबद्दल काहीच सांगण्यासारखं नाही याचा मला खूप राग आला. तेव्हाच त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं याची जाणीव मला झाली."

म्हणूनच मामुजी यांनी हा आया घर हा प्रोजेक्ट सुरू केला. यात मुलांचं लालन पालन करणाऱ्या दाईंच्या गोष्टी सांगण्यात आल्या. या घरासाठी ब्लु प्लाक दर्जा मिळावा यासाठी मामुजी यांनी अर्जही केला होता.

मार्च 2020 मध्ये त्या 'इंग्लिश हेरिटेज' मधील अर्जाची प्रगती कुठवर आली हे जाणून घेण्यासाठी मामुजी उत्सुक होत्या. दरम्यान त्यांनी ब्रिटीश साम्राज्यातील आयांच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी हॅकनी म्युझियममध्ये एका समारंभाचे आयोजन केलं.

म्युझियमचे कर्मचारीही त्यांच्या वतीने या विषयावर संशोधन करत होते.

या म्युझियमच्या मॅनेजर नीती आचार्य म्हणतात की त्यांनी "या घरात राहणाऱ्या लोकांची ओळख विविध स्रोतांकडून निश्चित करण्याचा प्रयत्न केला. या स्रोतमध्ये 1878 ते 1960 या काळात युनायटेड किंगडममध्ये आलेल्या आणि सोडलेल्या लोकांची यादी, जनगणना नोंदी आणि अभिलेखागारांचे स्त्रोत समाविष्ट करण्यात आले."

त्या म्हणतात, "या सर्व प्रकारच्या स्रोतांकडून मिळालेल्या माहितीने ही गोष्ट विणता आली. ज्यामुळे एक मोठं चित्र समोर आलं."

दाईंबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसल्याने हे तसं आव्हानात्मक काम होतं.

त्या सांगतात, "अर्काइव्हजमध्ये उपलब्ध असलेली माहिती ही मुख्यत: अशा कुटुंबांबद्दल आहे जे आया आणि आमाची सेवा घ्यायचे. ही माहिती आयांची नाहीये. बऱ्याचदा तर ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळे या महिलांची मूळ ओळख पुसली जायची. या आयांना त्या सेवा पुरवत असलेल्या कुटुंबांची नावं दिली जायची. जसं की, आया बर्ड."

फरहाना मामुजी आणि इतरांना आशा आहे की, ब्लु प्लाक मिळाल्यामुळे या विस्मृतीत गेलेल्या महिला पुन्हा चर्चेत येतील.

त्या म्हणतात, "या महिला खरं तर सन्मानास पात्र आहेत."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)