'तुमची होते दिवाळी, पण आमचा जातो जीव,' फटाक्यांचे प्राण्यांवर काय परिणाम होतात?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, डॉ. श्रीरंग गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
‘‘गेल्या दोन दिवसांपासून बधीर झालेली, घाबरलेली, जखमी झालेली पाळीव आणि भटकी कुत्री माझ्याकडं उपचारासाठी आणली जात आहेत. दिवाळीतील फटाक्यांचा सर्वाधिक त्रास या मुक्या प्राण्यांना होतो,’’ नागपुरात मुक्या प्राण्यांची काळजी घेण्यासाठी ‘व्हेटस् फॉर लाइफ’ (Vets For Life) ही संस्था चालवणारे डॉ. आदित्य विक्रम सिंग सांगत होते.
ते पुढे म्हणाले की, ‘‘दिवाळी सुरू होण्यापूर्वी काही दिवस अगोदरच फटाक्यांचे बार सुरू होतात. त्या आवाजांनी घाबरून जातात, ते मुके प्राणी. मग ती कुत्री, मांजरं असोत, की इतर प्राणी आणि पक्षी. गेल्या दिवाळीत फटाक्यांच्या आवाजांनी बधीर होऊन प्रचंड घाबरलेल्या, जखमी झालेल्या 25 तरी कुत्र्यांवर मी उपचार केले. त्यापैकी तीन कुत्रे असे होते, की फटाक्यांच्या आवाजानं दचकून पळताना वाहनाची धडक बसून ते गंभीर जखमी झाले होते,’’
विशेषत: यात भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक असते. मात्र पाळीव कुत्रे, मांजर आणि इतर प्राण्यांनाही फटाक्यांचा त्रास होतो. पण बऱ्याचदा त्यांच्या मालकांना हा त्रास लक्षातच येत नाही.
त्याबाबत सांगताना डॉ. आदित्य म्हणाले, ‘‘फटाक्यांच्या आवाजांनी पाळीव कुत्रे घराच्या कोपऱ्यात, सोफा, पलंगाखाली लपून बसतात. घाबरून खाणंपिणं सोडून देतात. बऱ्याचदा फटाक्याच्या तीव्र आवाजांनी त्यांना कायमचा बहिरेपणाही येतो."
"घरातील माणसं फटाके उडवतायत म्हणजे काही तरी खेळतायत, असं पाळीव प्राण्यांना वाटतं. तेही आपल्यासोबत खेळू पाहतात. पण फटाक्यामुळं त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. अशीच एक केस माझ्याकडं आली होती. पाळीव कुत्र्याला वाटलं सुतळी बॉम्ब म्हणजे खेळण्याचा चेंडूच आहे. त्यानं तो तोंडात पकडला असतानाच त्याचा स्फोट झाला. त्या गंभीर जखमी झालेल्या कुत्र्याला बरा होण्यासाठी बराच कालावधी गेला.’’


पण भोवताली वाजणारे फटाके बंद करणं आपल्या हातात नसतं.
अशा वेळी पाळीव प्राण्यांची काय काळजी घ्यायला हवी, याबाबत डॉ. आदित्य काही टिप्स देतात. ‘‘फटाके प्राण्यांच्या जवळ वाजवू नका. ते दूर जाऊन मोकळ्या मैदानात वाजवा. मोठ्या आवाजाचे फटाके वाजवणं टाळा. कुत्र्या, मांजरांसोबतच गायी, म्हशी अशा प्राण्यांनाही फटाक्यांचा त्रास होतो. ते अस्वस्थ होतात. अतिसतर्क होतात. खाणंपिणं बंद करतात. त्यांचे नैसर्गिक विधी अनियमित होतात. त्यामुळं या त्रासापासून वाचण्यासाठी त्यांच्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानं अगोदरच औषधं वगैरे आणून ठेवा.’’
सर्व मोठ्या शहरांमध्ये दिवाळीच्या अगोदर आणि नंतरही काही दिवस फटाके फोडणं सुरूच असतं.
नागपूरमधील एका सरकारी आणि सुमारे 40 खासगी दवाखान्यांमधून ‘फटाके पीडित’ प्राण्यांवर उपचार होतात.

फोटो स्रोत, Getty Images
‘स्पीचलेस फाउंडेशन’ची माणुसकी
कोरोना काळात रस्त्यारील भटक्या, बेवारस कुत्र्या-मांजरांचे होणारे हाल पाहून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील श्रुती लोणारे यांच्या मनात करुणा निर्माण झाली.
त्यांच्यासाठी घरचं खाणं-पिणं घेऊन त्या गल्लीबोळांत फिरल्या.
त्यांना मग एकमेकांचा एवढा लळा लागला, की श्रुती यांनी पूर्ण वेळ या कुत्र्या-मांजरांचा सांभाळ करायचं ठरवलं. त्यासाठी ‘स्पीचलेस फाउंडेशन’ ही सेवाभावी संस्था सुरू केली.
मुक्या प्राण्यांचा सांभाळ करणाऱ्या श्रुती सांगतात, ‘‘या प्राण्यांना सर्वाधिक त्रास दिवाळीच्या काळात होतो. रस्त्यावरून आणलेले सात कुत्रे मी घरी पाळले आहेत. त्यासोबतच शहरातील इतर 80 कुत्र्यांचा मी सांभाळ करते. त्यांना खाऊपिऊ घालते. आजारी पडल्यावर त्यांना दवाखान्यात घेऊन जाते."
श्रुती म्हणाल्या की, "मला रस्त्यावर एक छोटं कुत्र्याचं पिल्लू सापडलं होतं. त्याला मी घरी आणलं. त्याचं नाव काळू ठेवलं. आमचा काळू आता आठ वर्षांचा झालाय. पण फटाक्यांच्या आवाजाला तो खूप घाबरतो. फटाका फुटला, की थरथर कापत राहतो. त्याला बऱ्याचदा त्या आवाजानं चक्करही येते. मग तो निपचित पडून राहतो. म्हणून दिवाळीच्या काळात घराबाहेर पडायचं असेल, तर मी माझ्या कुत्र्यांना घरातच बंद करून ठेवते. कारण फटाक्यांच्या आवाजानं ते दूर पळून जातात. पुन्हा येत नाहीत. या मुक्या प्राण्यांना आपण जपलं पाहिजे. फटाक्यांपासून वाचवलं पाहिजे.’’

फोटो स्रोत, shrutilonare/facebook
अशा प्रकारे प्राण्यांचा सांभाळ करण्याचा श्रुती यांना कुठलाही अनुभव नव्हता.
त्यामुळं सुरुवातीला त्यांना खूप त्रास झाला. घरी स्वयंपाक बनवून, डबे गाडीला बांधून त्या भटक्या कुत्र्यांना शोधून खाऊ घालत. या कुत्र्यांना ठेवण्यासाठी त्यांनी एक पडकं घर शोधलं.
पण लोकांनी त्याविषयी तक्रारी सुरू केल्या. मग नगरपालिकेनं त्यासाठी मदत केली. काही लोकांनीही मदत देऊ केली.
श्रुती सांगतात, ‘‘ही मदत पुरेशी नाही. माझे पती झेरॉक्सचं दुकान चालवतात. कुत्र्यांना रोज खाऊपिऊ घालण्यासाठीचा खर्च आम्हाला परवडत नाही. पण मला मूलबाळ नाही. आता हीच माझी मुलं आहेत, असं समजून मी त्यांचा सांभाळ करते.’’

प्राण्यांच्या संदर्भातील इतर काही महत्त्वाच्या बातम्या :

पक्ष्यांच्या घरट्यांनाही धोका
मुंबईतील ‘वाइल्ड लाईफ अॅनिमल प्रोटेक्शन अॅन्ड रेस्क्यू असोसिएशन’चे संकेत कांबळे सांगतात, ‘‘सर्वच पाळीव प्राण्यांना दिवाळीतील फटाक्यांचा त्रास होतो. विशेषत: भटकी कुत्री फटाका फुटल्यावर भिऊन सैरावैरा धावत सुटतात. मागे वळूनही पाहत नाहीत. पुन्हा त्या हद्दीत परतत नाहीत. बऱ्याचदा खोडकर मुलं कुत्र्याच्या शेपटाला फटाका बांधून तो पेटवतात. त्यात ते जखमी होतात. अशा कुत्र्यांवर आम्ही उपचार करतो.’’
संकेत कांबळे सांगत होते, ‘‘सर्वच प्राणी, पक्ष्यांना अगदी सापांनासुद्धा फटाक्यांचा त्रास होतो. एकदा एक जळता बाण झाडावरच्या पक्षाच्या घरट्यात पडला लागला. त्यात ते घरटं जळून खाक झालं. आम्ही तिथं पोहोचेपर्यंत घरट्यातील पिल्लं होरपळून मृत पावली होती. मुंबईत किमान 250 प्राणी दिवाळीच्या काळात जखमी होतात. याच काळात नव्या मुंबईत परदेशातून फ्लेमिंगो पक्षी येतात. फटाक्यांच्या वाढत्या आवाजाचा त्यांच्यावरही दुष्परिणाम होऊ लागला आहे.’’

फोटो स्रोत, Getty Images
पुण्यातील प्राणीप्रेमी आणि ‘सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल’च्या हर्षा शहा सांगतात, ‘‘माझ्या घरात 10 पाळीव कुत्रे होते. गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आवाजाला घाबरून त्यातील दोघेजण पळून गेले.
पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके ‘नॉनस्टॉप’ फुटत असतात. सगळा परिसर हादरून जातो. प्राणी, पक्षी भेदरून चिडीचूप बसतात. अनेकदा सगळं शांत झाल्यावर पक्षी मरून पडलेले दिसतात. अगदी मांजरंही मरून पडलेली मी पाहिलेली आहेत. आपला आनंद दुसऱ्या कोणाच्या तरी जीवावर बेततोय, याचा विचार आपण करायला पाहिजे.’’
‘‘प्राण्यांवर असा अन्याय करण्याचा आणि निसर्गाच्या चक्रात विघ्न निर्माण करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला?’’ असा सवालही हर्षा शहा विचारतात.

फोटो स्रोत, Getty Images
भटक्या गायींच्या संगोपनासाठीही काम करणाऱ्या हर्षा शहा सांगतात, ‘‘आपल्याकडं याबाबत कायदे आहेत. पण त्यांची अमलबजावणी नीट होत नाही. परदेशात खूप कडक कायदे आहेत आणि त्यांची अमलबजावणीही कठोरपणानं होते. त्यातून तिथं प्राणी आणि पर्यावरणाची काळजी घेतली जाते.
लक्षात घ्या, प्राणी, पक्ष्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यांचा जगण्याचा अधिकार आपण हिरावून घेऊ शकत नाही. माणूस म्हणून आपण याबाबत संवेदनशील कधी होणार आहोत?’’
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











