लांडग्यांचे हल्ले अचानक का वाढले? लांडगा माणसाचा 'भक्षक' आहे की निसर्गाचा 'रक्षक'?

फोटो स्रोत, Getty Images
उत्तर प्रदेशमधील बहराईच जिल्ह्यात लांडग्याने दहशत निर्माण केलीय. या जिल्ह्यातील जवळपास 35 गावात लांडग्यांनी दहशत पसरवली आहे.
वन विभागाने आतापर्यंत चार लांडग्यांना पकडलं आहे. तरीही वन विभाग दोन लांडग्यांच्या शोधात आहे.
यादरम्यान मंगळवारी (3 सप्टेंबर) पुन्हा एकदा लांडग्याने गावकऱ्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
जुलै महिन्यापासून आतापर्यंत लांडग्याने सहा लोकांचा जीव घेतला आहे. त्यात लहान मुलांचाही समावेश आहे आणि 25 पेक्षा अधिक लोक जखमी आहेत.
सोमवारी (2 सप्टेंबर) संध्याकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बहराईचसह अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आणि वन अधिकाऱ्यांबरोबर व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लांडगा आणि बिबट्याच्या हल्ल्यांचा आढावा घेतला
लांडगा माणसाचा 'भक्षक' आहे की निसर्गाचा 'रक्षक'?
लांडग्यांचे हल्ले अचानक का वाढले, असा प्रश्न आता विचारला जात आहे. लांडग्यांना 'माणसाचा शत्रू' मानलं जातं. मात्र हे किती खरं आहे?
‘बीबीसी अर्थ’च्या एका बातमी या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
या बातमीनुसार, उत्तर अमेरिकेत दीडशे वर्ष आधीपर्यंत विपुल प्रमाणात लांडगे होते.
जेव्हा काही लोक तिथे राहण्याच्या उद्देशाने गेले, तेव्हा लांडग्यांपासून आपल्याला धोका आहे, असं त्यांच्या लक्षात आलं. त्याचप्रमाणे शिकारी प्राणी, मासे ज्यांच्यावर माणसांचं आयुष्य अवलंबून आहे त्यांनाही धोका आहे असं त्यांच्या लक्षात आलं.

फोटो स्रोत, ANI
त्याचवेळी लांडग्यांच्या विरोधात एक आक्रमक मोहीम सुरू करण्यात आली होती.
या शिकारीच्या वेळी ग्रे वुल्फला लक्ष्य केलं आणि शेवटच्या ग्रे वुल्फला येलो स्टॉल राष्ट्रीय उद्यानात 1926 मध्ये मारण्यात आलं.
लोककथा असो किंवा चित्रपट, लांडग्याला एक क्रूर प्राणी किंवा माणसाचा शत्रू म्हणून लोकांसमोर सादर केलं जातं. मात्र, वास्तव त्यापेक्षा वेगळं आहे.
लांडगा माणसांविरुद्ध अतिशय कमी वेळा आक्रमक होतो. लांडग्याने माणसाचा जीव घेतला आहे, असं एकही प्रकरण अमेरिकेत नोंदवलं गेलेलं नाही.
लांडग्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की, संशोधनाच्या वेळी ते लांडग्यांच्या गुहेपर्यंत जाण्यात सुद्धा यशस्वी झाले होते. त्यानंतर लांडगे त्या परिसरातून निघून गेले आणि शास्त्रज्ञ तिथून गेल्यावरच लांडगे परतले.
अमेरिकेतील आकडेवारी काय सांगते?
अमेरिकेतील मोंटांना राज्यात 2009-10 च्या दरम्यान सरकारने काही आकडेवारी गोळा केली होती. या आकडेवारीत कळलं होतं की, लांडग्याबरोबरच इतर रानटी प्राणी म्हणजे अस्वल, कायोटी, वाघ यांच्यामुळे फक्त 0.23 टक्के पाळीव प्राण्यांनी जीव गमावला होता.
या प्राण्यांचा जीव जाण्याची पाच मोठी कारणं समोर आली होती. त्यानुसार पाच लाखाहून अधिक प्राणी पचन संबंधित कारणामुळे, 4 लाख 89 हजार वातावरण बदलल्यामुळे, तर 4 लाख 94 हजार प्राणी प्रजननादरम्यान तर काही अज्ञात कारणामुळे 4 लाख 35 हजार प्राणी मारले गेले होते.
लांडग्यांच्या अंदाधुंद शिकारीमुळे इथल्या परिसंस्थेवरही त्याचा प्रभाव पडला. यामुळे प्राण्यांच्या इतर प्रजातींनासुद्धा अडचणींचा सामना करावा लागला.

फोटो स्रोत, ANI
लांडग्यांचं अस्तित्व संपल्यानंतर एल्क या बारशिंग्यासारख्या एका प्राण्याच्या संख्येत वाढ झाली. मात्र, लांडगे असताना ते एल्कची शिकार करू शकत होते.
एल्क या प्राण्यांची लोकसंख्या वाढल्यामुळे त्यांच्या खाण्याच्या गरजाही अर्थातच वाढल्या. त्यामुळे या प्राण्यांनी विशिष्ट प्रकारचे लाकूड खाण्यास सुरुवात केली.
बीवर (एक प्रकारचा प्राणी) आपल्या रक्षणासाठी लाकडाचा बांध तयार करायचे. बांधासाठी लाकूड उपलब्ध न झाल्यामुळे हिवाळ्यात बिवरच्या लोकसंख्येचं खूप नुकसान झालं.
येलो स्टोनमध्ये 1926 मध्ये लांडग्याच्या शेवटच्या समूहाच्या शिकारीनंतर आजपर्यंत तिथल्या परिसंस्थेचा समतोल बिघडलेला आहे.


यादरम्यान कोल्ह्यांच्या संख्येत वाढ करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यात अमेरिकेतील फिश अँड वाइल्डलाइफ सर्व्हिस, द युएस पार्क सर्व्हिस पर्यावरणीय संघटना, प्राणीसंग्रहालय आणि नागरिकांच्या मदतीने पुन्हा एकदा लांडग्यांची संख्या पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
अमेरिकेत ठिकठिकाणी असलेल्या राष्ट्रीय उद्यानात लांडग्यांचा प्रजननाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. जेणेकरून ग्रे आणि रेड वुल्फ यांना त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात परत आणलं जाऊ शकेल.
लांडग्यांच्या प्रजननासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे परिसंस्थेत सकारात्मक बदल पाहायला मिळत आहेत.
राष्ट्रीय उद्यानात लांडगे त्यांचं जेवण सोडून जातात. त्यामुळे छोट्या प्राण्यांना खायला मिळतं. यामुळे पाणमांजरांच्या संख्येतही वाढ झालेली बघायला मिळते.
लांडग्यांवर झालेल्या हल्ल्याची आकडेवारी काय सांगते?
जगभरात झालेल्या लांडग्यांच्या हल्ल्यात एक महत्त्वपूर्ण बाब समोर आली आहे. ती म्हणजे लांडग्यांच्या हल्ल्यामागे रेबीज हे मुख्य कारण आहे.
नॉर्वेमधील पर्यावरण संशोधन संस्थांच्या एका अहवालानुसार इंटरनॅशनल वुल्फ सेंटरने लिहिलं, "2002 ते 2020 पर्यंत संपूर्ण जगात लांडग्यांवर 489 हल्ले झालेत. त्यातील 78% म्हणजेच 380 हल्ले रेबीजमुळे झाले होते."
याशिवाय 67 हल्ले शिकाऱ्यांनी केले होते. तर 42 हल्ले सुरक्षा किंवा कोणीतरी उकसवल्यामुळे लांडग्यांनीच केले होते.
इंटरनॅशनल वुल्फ सेंटरच्या अहवालानुसार जवळजवळ 400 ते 1100 लांडगे हिमालयाच्या पायथ्याशी राहत आहेत, तर 4000 ते 6000 लांडगे उपखंडात राहत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
उत्तर प्रदेश मध्ये 1996-97 दरम्यान झालेल्या लांडग्यांच्या हल्ल्यावर येथील लाईव्ह जर्नल ने एक अहवाल प्रकाशित केला आहे.
या अहवालानुसार, "1 सप्टेंबर 1996 पर्यंत उत्तर प्रदेशात लांडग्यांच्या हल्ल्यात 33 बालकांचा मृत्यू झाला होता. 20 बालक गंभीर जखमी झाले होते."
यादरम्यान दहा लांडग्यांची हत्या करण्यात आली होती.
या अहवालानुसार, 1996-97 दरम्यान लांडग्यांनी 74 लोकांना लक्ष्य केलं होतं. त्यातील बहुतांश मुलं दहा वर्षाखालील होते.
1878 मध्ये संपूर्ण जगात लांडग्यांच्या हल्ल्यांनी सर्वात जास्त नुकसान झालं होतं. एका वर्षात 624 लोक लांडग्यांच्या हल्ल्याचे शिकार झाले होते असंही या अहवालात सांगितलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











