बर्ड फ्लू : गाईकडून माणसांना या विषाणूची लागण ही चिंतेची गोष्ट का आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, द इन्क्वायरी पॉडकास्ट
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
मार्च 2024 मधली गोष्ट. अमेरिकेच्या टेक्सास राज्यातल्या एका गोशाळेत म्हणजे डेअरी फार्मवर एका गाईला बर्ड फ्लू झाला. या फार्मवर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यालाही याची लागण झाली.
त्यानंतरच्या काही महिन्यांत एक हजार मैल दूर मिशिगन राज्यातही दोन वेगवेगळ्या डेअरी फार्म्सवर असाच प्रकार घडला.
या तिन्ही ठिकाणी कर्मचाऱ्यांना एच5एन1( H5N1) या विषाणूची लागण झाली होती. हा आजार एव्हियन फ्लू किंवा बर्ड फ्लू म्हणूनही ओळखला जातो.
ही अतिशय चिंतेची गोष्ट ठरली आहे, कारण एखाद्या सस्तन प्राण्याकडून माणसाला बर्ड फ्लूची लागण होण्याची ही पहिलीच काही उदाहरणं आहेत.
तसंच पहिल्यांदाच गाईंना या विषाणूचं संक्रमण झाल्याचं दिसलं.
अमेरिकेतले ते कर्मचारी तर बरे झाले आहेत. पण तेव्हापासून बर्ड फ्लूची साथ अमेरिकेच्या अनेक डेअरी फार्म्समध्ये पसरते आहे.
याआधी काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात काही पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं समोर आलं होतं. म्हणजे हा आजार फक्त दूरच्या देशांतच पसरतो असं गृहित धरून चालणार नाही.
मग माणसांसाठी बर्ड फ्लू ही किती मोठी चिंतेची बाब आहे?
डेअरी आणि पोल्ट्री फार्मवर बर्ड फ्लूचा प्रसार
डॉ. एरिन सोरेल अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर आहेत.
त्यांच्या मते सध्या तरी सर्वसामान्य लोकांना बर्ड फ्लूची लागण होण्याचा धोका कमी आहे पण प्राण्यांसोबत काम करणाऱ्यांना यामुळे जास्त धोका आहे.

एरिन सोरेल सांगतात की गाईचं दूध काढताना तिच्या स्तनांतून कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत हे संक्रमण होऊ शकतं. म्हणजे दुधाला स्पर्श केल्यावर या कर्मचाऱ्यांनी डोळ्यांना हात लावला असू शकतो.
“अमेरिकेत आढळलेल्या त्या पहिल्या केसमध्ये रुग्णाला कंजंक्टिवायटिस झाला होता, म्हणजे डोळे आले होते, त्यामुळे तो डॉक्टरांकडे गेला होता.
"मिशिगनमधल्या रुग्णाला कंजंक्टिवायटिससोबतच खोकला आणि श्वास घेताना त्रास होणं अशी लक्षणही दिसली. त्यांनी आणखी शोध घेतला, तेव्हा हा बर्ड फ्लू असल्याचं समोर आलं.”
जनावरांच्या डॉक्टरांनी गुरांना झालेला तो आजार पाहून आश्चर्यच व्यक्त केलं कारण अशा गुरांमध्ये याआधी बर्ड फ्लू दिसला नव्हता. मग यात गाईंना बर्ड फ्लू कसा झाला असावा?
डेअरीमधून येणारं दूध पाश्चराइझ केलं जातं. त्यामुळे दुधातील बॅक्टेरिया आणि फंगस नष्ट होतात.पण अनेक ठिकाणी पाश्चराईझ न करताच दूध विकलं जातं. त्यामुळे काही आजारांचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

फोटो स्रोत, Getty Images
या वर्षी जूनपर्यंत अमेरिकेत जवळपास डझनभर डेअरी फार्म्समध्ये गुरांना बर्ड फ्लू झाल्याच्या किमान शंभर घटना समोर आल्या आहेत.
एरीन सोरेल सांगतात की मिशिगन राज्यानं तपासण्या वाढवल्या आणि कर्मचाऱ्यांमध्ये जागरुकता वाढवण्यासाठी अनेक पावलं उचलली. पण अन्य अमेरिकन राज्यांनी तेवढी तत्परता दाखवलेली नाही.
त्यांच्या मते, “शेतांवर किंवा डेअरी फार्मवर काम करणाऱ्यांना धोका जास्त असतो कारण आजाराची लक्षणं आढळली तरी तपासणी करून घेण्यासाठी त्यांना इतरांसारखी सुट्टी मिळू शकत नाही. त्यामुळेच H5N1 ला आळा घालण्यासाठी जी दुसरी पावलं उचलली जातात ती इथे इथे कदाचित चालणार नाहीत.”

अमेरिकेच्या केंद्रीय रोग नियंत्रण संस्थेच्या आकड्यांनुसार बर्ड फ्लूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
मार्चपासून आतापर्यंत किमान 45 व्यक्तींना या विषाणूचा संसर्ग झाल्याचं सिद्ध झालं आहे. त्याशिवाय जवळपास 550 जणांना विलगीकरणात ठेवलं होतं.
हे आकडे फार मोठे वाटत नाहीत. पण पुरेशा तपासण्या होत नाहीत, तोवर खरी स्थिती काय आहे याचा अंदाज लावता येणंही कठीण आहे, असं एरिन सोरेल सांगतात.
“संसर्ग झालेल्या व्यक्तींची योग्य तपासणी आणि त्यांच्यावर उपचार करणं अतिशय गरजेचं आहे. कारण नंतर हा व्हायरस आणखी बदलू शकतो, म्युटेट होऊ शकतो. त्यामुळे आत्ताच पावलं उचलली नाहीत तर पुढे जाऊन माणसांना माणसांमुळे बर्ड फ्लू होण्याचा धोका वाढतो.”

थोडक्यात, या आजाराला आळा घालायचा असेल तर आत्ताच पावलं उचलायला हवीत.
फिट व्हायरस
वेंडी बार्कले लंडनच्या इंपिरियल कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत आणि त्या विषाणूंचा अभ्यास करतात.
त्या सांगतात की बर्ड फ्लू इन्फ्लूएंझा विषाणूचा एक प्रकार आहे ज्याची लागण साधारणपणे बदक आणि हंसांसारख्या जंगली पक्षी किंवा समुद्री पक्ष्यांना होते.
“पक्ष्यांसाठी हा विषाणू अतिशय धोकादायक असतो, कारण त्यामुळे त्यांचा लवकर मृत्यू होतो. बर्ड फ्लूची लागण जेव्हा कोंबड्यांसारख्या पाळीव प्राण्यांना होते, तेव्हा ते एक मोठं संकट ठरतं. बर्ड फ्लूच्या साथीमुळे अख्खा पोल्ट्री फार्म नष्ट होऊ शकतो.
“हा आजार माणसाच्या श्वसन यंत्रणेवर हल्ला करतो. पण पक्ष्यांच्या बाबतीत तो पूर्ण शरिरात पसरतो, त्यांच्या मेंदू आणि रक्तावर हल्ला करतो ज्यामुळे पक्ष्यांचा मृत्यू होतो.”

फोटो स्रोत, Getty Images
H5N1 हा असा एकटाच एक विषाणू नाही. त्याचे सोळा व्हेरियंट आहेत.
याचाच एक व्हेरियंट H2344B गेल्या काही वर्षांत जगभरातल्या प्राण्यांमध्ये पसरतो आहे आणि अमेरिकेतही सध्या प्रामुख्यानं याच व्हेरियंटची लागण झाली आहे.
वेंडी बार्कले माहिती देतात, “हा एक अतिशय चिवट व्हायरस आहे, तो पक्ष्यांमार्फत दूरवर पोहोचतो आहे. आशियातून हा विषाणू युरोप आणि अटलांटिक महासागर ओलांडून अमेरिकेपर्यंत पोहोचला आहे.
“दक्षिण अमेरिकेत या विषाणूमुळे सामुद्रपक्षीच नाही तर सील सारखे सस्तन प्राणीही आजारी पडत आहेत. सील अनेकदा मेलेल्या रोगग्रस्त पक्ष्यांना खातात, त्यातून सीलना या विषाणूची लागण होते आहे.”
मग माणसांमध्ये या H5N1 विषाणूची लागण झाल्याचं पहिल्यांदा कधी समोर आलं होतं?

फोटो स्रोत, Getty Images
तर 1997 सालीच चीनमधल्या कोंबड्यांच्या बाजारात या आजाराची प्रकरणं समोर आली, अशी माहिती वेंडी बार्कले देतात.
“तेव्हा तिथे माणसांनाही याची लागण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. चीनमध्ये ज्या अठरा जणांना हा आजार झाला, त्यातल्या सहा जणांचा मृत्यू झाला. त्याआधी असं काही घडलं नव्हतं. वर्ष 2000 से 2005 पर्यंत ही स्थिती सुरू राहिली.”
त्यानंतर बर्ड फ्लूचा संसर्ग झालेल्या कोंबड्यांमार्फत इंडोनेशिया आणि व्हिएतनामध्येही या आजाराची साथ पसरली आणि शेकडो लोकांना याची लागण झाली.
वेंडी बार्कले सांगतात की तेव्हा हा विषाणू हवे मार्फत पसरत नव्हता. म्हणजे जे लोक संसर्गग्रस्त कोंबड्यांच्या संपर्कात आले, केवळ त्यांनाच हा आजार झाला.
पण एका आजारी व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तींना याची लागण झाली नही. त्यामुळे या आजाराचं साथीत रुपांतर झालं नाही. आजही परिस्थिती तीच आहे.

दरम्यान, जंगली पक्ष्यांमध्ये या विषाणूचा प्रसार सुरू राहिला आणि हा विषाणू आपलं रूप बदलत राहिला, म्युटेट झाला.
2022 मध्ये पुन्हा एकदा या विषाणूचा प्रसार वेगानं होऊ लागला.
पण पक्ष्यांमधून गाईंना याची लागण कशी झाली असावी, याविषयी अजून पुरेशी माहिती मिळालेली नाही.
प्राण्यांच्या अन्य प्रजातींना बर्ड फ्लूची लागण
डॉ. एड हचीसन व्हायरॉलॉजिस्ट आहेत आणि ग्लासगोच्या एमआरसी विद्यापीठात सीनियर लेक्चरर आहेत. ते सांगतात की प्राण्यांच्या एका प्रजातीपासून दुसऱ्या प्रजातीला विषाणूची लागण होते, तेव्हा त्या विषाणूचं स्वरुप बदलतं.
“अन्य पॅथोजीन्सपेक्षा म्हणजे रोगकारक सूक्ष्मजीवांपेक्षा विषाणू वेगळे असतात. ते दुसऱ्या प्रजातीच्या प्राण्याच्या शरिरात पोहोचतात, तेव्हा तिथल्या पेशींवर ताबा मिळवून नवे विषाणू तयार करू लागतात.
“पण कुठल्या प्राण्यानुसार स्वतःमध्ये बदल करणं विषाणूंसाठीही सोपं नसतं. H5N1 या विषाणूलाही ही गोष्ट लागू होते. विषाणूला नव्या प्रजातीमध्ये जगण्यासाठी स्वतःत बदल करावे लागतात ज्यासाठी काही वर्ष जाऊ शकतात.
“या विषाणूच्या बाबतीतही ते घडलं. पण एकदा नव्या प्रजातीच्या शरिराशी विषाणूनं जुळवून घेतलं, की त्याचं रूप बदलतं आणि मग पुढे आणखी वेगळ्या प्रजातींना आणि माणसांना लागण होण्याचा धोका वाढतो.”

म्हणजे पुढे याचा काय परिणाम होऊ शकतो? डॉ. हचीसन सांगतात की यातून अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि याचा इकॉलॉजी म्हणजे परिसंथेवर प्रभाव पडतो.
“गेल्या दोन वर्षांत समुद्रकिनारी सागरी पक्ष्यांना या विषाणूची मोठ्या प्रमाणात लागण झाली. आता ही साथ अंटार्क्टिकातल्या समुद्रपक्ष्यांमध्येही पसरते आहे.
“त्याच वेळी दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावर सीलसारख्या सस्तन प्राण्यांमध्येही बर्ड फ्लूचा संसर्ग वाढतो आहे. दुसरा प्रश्न गुरांमध्ये या विषाणूच्या संसर्गाचा आहे.”
विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुरांची कत्तल करावी लागू शकते. यात नैतिक बाबींचाही मुद्दा उद्भवू शकतो.
पण मुळात माणसांना या आजाराचा धोका किती मोठा आहे?
डॉ. हचीसन त्याविषयी माहिती देतात, “हा विषाणू सहजपणे माणसाच्या शरिराशी जुळवून घेऊ लागला, तर माणसांवरचं संकट वाढेल. सध्या तरी बर्ड फ्लूची लागण त्याच लोकांना होते आहे, जे या रोगाची लागण झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आले.
“पण या विषाणूनं माणसाच्या शरिरात वाढण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल केले तर एका रुग्णापासून दुसऱ्या माणसाला संसर्ग होऊ लागेल आणि साथ सुरू होईल.”
सध्यातरी स्थिती अशी दिसत नाही. म्हणून या विषाणूवर नियंत्रण आणणं महत्त्वाचं ठरतं. पण असं करता येईल का?

फोटो स्रोत, Getty Images
H5N1 चा संसर्ग बहुतांश वेळा जंगली पक्ष्यांना होतो आणि त्यांच्यात या आजाराला आळा घालणं कठीण आहे. पण त्या पक्ष्यांमधून हा आजार माणसापर्यंत पोहोचणार नाही, यासाठी काही प्रयत्न करता येतील, असं डॉ. हचीसन यांना वाटतं. ते सांगतात,
“अंटार्क्टिकासारख्या प्रदेशात पर्यटनावर मर्यादा घालता येतील. तसंच जिथे या आजाराचा प्रादुर्भाव झालाय, त्या प्रदेशांवर देखरेख ठेवणं आणि तिथून मिळणाऱ्या माहितीचं आदानप्रदान करणं महत्त्वाचं अत्यंत गरजेचं आहे.”
पण अनेक कारणांमुळे हे केलं जात नाही, असंही ते नमूद करातत.
“दुसरी शक्यता म्हणजे, हा विषाणू आपोआप कमजोर होऊन नष्ट होईल. किंवा गुरांमध्ये या विषाणूविरोधात रोगप्रतिकार शक्ती तयार होईल. मात्र माणसांमध्ये याचा प्रादुर्भाव आणि साथीचं संकट टाळण्यासाठी समन्वयाची आणि व्यापक पावलं उचलण्याची गरज आहे.”
फ्लू फायटर्स
ते सांगतात की अमेरिकेत आणि जगाच्या अन्य देशांमध्ये अशा प्रकारच्या संसर्गाला आळा घालणं हे मोठं आव्हान आहे कारण त्यासाठी अनेक गटांना आणि देशांना एकत्र येऊन काम करावं लागतं.
“संसर्गाला आळा घालण्याविषयी आरोग्य संघटनांचं स्वतःचं एक मत असतं. त्याशिवाय प्राण्यांच्या हितासाठी काम करणारे गट आहेत, कृषी उद्योगातील लोकांचे हितसंबंध आहेत.
“सोबतच राजकीय हितसंबंधही या मुद्यासोबत जोडले गेले आहेत. त्यामुळे आता या सगळ्यांना एकत्र आणून काम करावं लागणार आहे.”

फोटो स्रोत, Getty Images
बर्ड फ्लू झाल्यानं कोंबड्यांचा लवकर मृत्यू होतो आणि साथ पसरल्याचं समजतं. पण गुरांमध्ये मात्र या विषाणूच्या संसर्गाचा लवकर थांगपत्ता लागत नही, असं मार्क एलेन विडोसन सांगतात.
कारण बर्डड फ्लूचा संसर्ग झालेल्या गायी थोड्या आजारी, थकल्यासारख्या वाटतात आणि त्यांचं दूध नासतं. पण त्या इतक्याही आजारी नसतात की चिंता वाटावी.
त्यामुळेच शेतकरी किंवा डेअरी कर्मचाऱ्यांना गाईंची नीट तपासणा करावी असं वाटत नाही. पण त्यांनी आता आणखी जागरूक होण्याची गरज आहे.
H5N1 व्हायरसमुळे जगभरात लाखो पक्षीही मारले जातात. पण व्हिएतनाम, चीन आणि इंडोनेशिया असे मोजकेच देश आहेत, जिथे पोल्ट्री फार्म मध्ये कोंबड्यांसह बदकं आणि इतर सर्व पक्ष्यांना लस द्यायला सुरुवात केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मग असा पाळीव पक्ष्यांच्या लसीकरणाचा कार्यक्रम राबवता येईल का?
“हे शक्य असलं तरी सोपं नाही. कारण एका एका कोंबडीला पकडून लस देणं कठीण जातं. तसंच लोकही विचार करू शकतात की संसर्गाला आळा घालण्यासाठी एवढा खर्च करावा, इतका या आजाराचा धोका मोठा आहे का?”
लशी आणि औषधांचा विचार करता एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. सीझनल म्हणजे ऋतूमानानुसार होणाऱ्या फ्लूपासून बचावासाठी जे इंजेक्शन्स (फ्लू शॉट्स) दिले जातात ते बर्ड फ्लूला आळा घालू शकत नाहीत.
पण आता बर्ड फ्लूच्या विषाणूपासून माणसांना वाचवण्यासाठी काही लशी तयार केल्या जात आहेत.
जून 2024 मध्ये फिनलँडनं घोषणा केली की प्राण्यांच्या संपर्कात येणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना ते अशी लस देणार आहेत.
असं पाऊल उचलणारा हा जगातला पहिलाच देश आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मार्क एलेन विडोसन सांगतात की फिनलँडनं हे पाऊल उचललं कारण काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा आजार पसरला होता.
पण आता अमेरिकेत घडलेल्या संसर्गाच्या घटना ही इतर देशांसाठी चिंतेची गोष्ट आहे, असं विडोसन यांना वाटतं.
ते सांगतात, “अन्य देशांसाठीही ही चिंतेची गोष्ट आहे. कारण जर एका गायीकडून दुसऱ्या गायीला संसर्ग वाढत जाईल तसं हा विषाणू विकसित होईल. त्याची लागण झालेल्या सस्तन प्राण्यांना श्वास घेण्यात अडथळा येईल.
“हा आजार मग साथीचं रूप घेईल. अमेरिकेत हा विषाणू जसा पक्ष्यांमार्फत गायींपर्यंत पोहोचला आहे, तसंच युरोपात किंवा इंतर देशांमध्येही घडू शकतं. माणसांना याची लागण होणं चिंताजनक आहे.”

फोटो स्रोत, Getty Images
आपल्या मूळ प्रश्नाकडे वळूयात माणसांसाठी बर्ड फ्लू किती चिंताजनक आहे?
सस्तन प्राण्यांना H51N ची लागण झाल्याच्या घटना याआधीही समोर आल्या होत्या. पण आता संसर्ग झालेल्या गुरांसोबत काम करणाऱ्या माणसांमधेही हा आजार पसरू लागला आहे.
अर्थात अजूनही हा आजार एका माणसापासून दुसऱ्या माणसाला झाल्याच्या घटना घडलेल्या नाहीत. सामान्य लोकांना यातून फारसा धोका सध्यातरी नाही.
पण गुरं आणि पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना यामुळे थेट मोठा धोका आहे.
डेअरी आणि पोल्ट्री फार्ममध्ये सातत्यानं देखरेख ठेवणं आणि तपासण्या घेणं यामुळे या आजाराच्या प्रसाराला आळा घालण्यात मदत होऊ शकते. पण हे काम सोपं नाही.
डॉक्टर मार्क एलेन विडोसन सांगतात की इतक्यात घाबरण्याची गरज नाही, पण काळजी घ्यायलाच हवी.
(संकलन - जान्हवी मुळे, बीबीसी मराठी प्रतिनिधी)











