‘आमची मुलं खेळतात तिथेच मगरी फिरतात, कसं जगायचं?’, विश्वामित्री नदीशी असा आहे संबंध

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, बडोदा, गुजरात
सकाळी उठल्यावर तुम्ही घराचा दरवाजा उघडला आणि अंगणात एक वीस फुट लांब भलीमोठी मगर उन खात बसलेली असेल तर तुम्ही काय कराल?
आधी तर या विचाराने दातखीळ बसेल आणि मग मला म्हणाल, “ह्या, असं कुठे असतं का?”
घराच्या अंगणात साप निघतात, विंचू निघतात.. तेही धोकादायकच असतात, पण मगर म्हणजे अवघडच. पण गुजरातमधल्या बडोदा शहरातल्या शेकडो लोकांसाठी ही भीती नेहमीच खरी ठरते.
त्याचं कारण आहे बडोद्याच्या मधोमध वाहणारी विश्वामित्री नदी. ही नदी अनेक धारांनी बडोदा शहरातून, आणि आसपासच्या गावातून वाहाते.
त्यात ड्रेनज सिस्टीममुळे अनेक नालेही या नदीशी जोडलेले आहेत. या नदीत आहेत शेकडो मगरी.
बडोद्यात विश्वामित्री नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर ही बातमी पुन्हा शेअर करत आहोत.
बडोद्यात फिरताना तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी नदीकिनारी गेलात तर ओळीने भरपूर मगरी ऊन खात पडलेल्या तुम्हाला दिसतात.
या मगरी फक्त नदीतच असत्या तर गोष्ट वेगळी होती, पण नाल्यामुळे त्या शहरभर पसरल्या आहेत, आणि त्या नाल्यांच्या आसपास राहाणाऱ्या लोकांच्या अगदी घरापाशी येऊन थांबतात.
या नाल्यांच्या आसपास सहसा झोपडपट्टी किंवा कमी उत्पन्न गटाच्या लोकांची वस्ती असते, त्यामुळे ती लोक सतत दहशतीत जगतात.

सुनिता मिश्रा अशाच एका वस्तीत राहातात. त्या म्हणतात, “आता परवा इथे भले मोठी मगर निघाली होती. कधीही येतात त्या, सकाळी संध्याकाळी. बाहेर लहान मुलं खेळत असतात. मगर एकतर इतकी शांत, हालचाल न करता पडलेली असते, की अंधारात काही दिसत नाही की काही कळत नाही. इथून बऱ्याचदा कुत्रे, डुक्कर खेचून घेऊन जातात त्या. उद्या लहान मुलंही घेऊन जातील आमची.”
पावसाळ्यात विश्वामित्री नदीचं पाणी वाढलं की या मगरी शहराच्या सगळ्या रहिवासी भागांमध्ये शिरतात. याचे अनेक व्हीडिओही व्हायरल होतात. या मगरी कधी कुठल्या कन्स्ट्रक्शन साईटमध्ये, कोणाच्या पार्किंगमध्ये, नाहीतर सरळ रस्त्यावरून डुलत डुलत चालताना दिसतात.
फक्त बडोदा शहरच नाही, आसपासच्या गावांमध्येही मगरींचं साम्राज्य आहे. बडोदा शहराच्या साधारण 27 किलोमीटरच्या परिघात मगरी सापडतात. शहरांपेक्षा गावाकडे यामुळे जास्त धोका आहे.
अनेकदा माणसंही या मगरींच्या हल्ल्यांना बळी पडतात आणि दुर्गम भागात असल्याने त्यांना वैद्यकीय मदत वेळेवर मिळू शकत नाही. सुखालिया गावाच्या सुमित्राबेनच राठोडियांचा हात अशाच एका मगरीच्या हल्ल्यात निकामी झालाय.
गेल्या वर्षी पावसाळ्यात त्यांच्यावर मगरीने हल्ला केला होता. त्या दिवसाची आठवण सांगताना त्या म्हणतात, “मी म्हशी चारायला गेले होते. थोड्या वेळाने हात धुवायला म्हणून पाण्यात हात घातला तर मगरीने पकडलं आणि ओढून खाली घेऊन गेली.”

तिथे मगर होती हेही त्यांना माहिती नव्हतं. आरडाओरडा ऐकून माणसं जमा झाली, त्यांनी वरून लाठ्या काठ्या, दगडं मारून मगरीला हुसकावून लावलं तेव्हा सुमित्राबेनचा जीव वाचला.
पण हात निकामी झाला तो कायमचा. त्यांचा डावा हात, खांदा, कंबर आणि पार्श्वभाग सगळंच मगरीन जबड्यात पकडलं होतं.
त्यानंतर जवळपास तीन महिने त्या दवाखान्यात अॅडमिट होत्या. त्यांना अजून वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळाली नाही असा त्यांचा दावा आहे.
त्यांना नीट चालता येत नाही, थंडीत हात, खांदा दुखतो आणि सगळी कामं उजव्या हातानेच करवी लागतात. त्या म्हणतात, “ना साडी नेसता येत, ना केस विंचरता येत, ना स्वयंपाक करता येत. घरच्यांकडून साडी नेसून घ्यावी लागते.”
बडोद्यात मगरी आल्या कुठून?
बडोद्यातल्या स्थानिक लोकांच्या मते या मगरी सयाजीराव गायकवाडांनी बडोद्याच्या वरच्या बाजूला असणाऱ्या आजवा सरोवरात सोडल्या होत्या. आजवा धरण सयाजीरावांनी बांधलं होतं. या धरणाचं बॅकवॉटर म्हणजे आजवा सरोवर.
शिकारीसाठी या धरणात सोडलेल्या मगरी कालापरत्वे बडोद्याच्या खालच्या बाजूला आल्या. विशेषतः पावसाळ्यात जेव्हा धरणाचं पाणी नदीत सोडलं जायचं तेव्हा मगरींची लहान लहान पिल्लं पाण्याच्या प्रवाहाने विश्वामित्रीत यायची.
काही दशकांमध्ये या मगरींची संख्या बेसुमार वाढली. त्यांना खायला मुबलक अन्न होतं. नदीतले मासे, लहान प्राणी, पक्षी, कुत्रे, डुकरं हे त्यांचं मुख्य अन्न.

फोटो स्रोत, Getty Images
आज बडोद्यात नैसर्गिक पाण्याचा एकही स्रोत नाही जिथे मगरी सापडत नाहीत. पावसाळ्यात तर भूगर्भात असलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये, विहिरींमध्ये मगरी सापडतात.
पाण्याच्या प्रवाहाबरोबर पावसाळ्यात या मगरी शहराच्या, आणि आसपासच्या गावांमधल्या वेगवेगळ्या जलस्रोतांमध्ये पोहचतात खरं, पण पाणी ओसरल्यावर त्यांना परत जाता येत नाही आणि त्या तिथेच अडकून पडतात. अशा मगरी जास्त धोकादायक असतात.
इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते बडोदा आणि आसपासच्या परिसरात दरवर्षी सहा ते सात मृत्यू मगरींच्या हल्ल्यांमुळे होतात.
राजेश भावसार बडोद्यातले एक पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत आणि मगरींच्या रेस्क्यूचं काम करतात. ते म्हणतात, “मगरी माणसांवर उगाच हल्ले करत नाहीत. त्या जेव्हा त्यांचं घर बनवतात, त्याच्या आसपास 200-500 मीटरच्या एरियात त्या कोणत्याही प्राण्याला किंवा माणसाला येऊ देत नाहीत कारण त्यांना वाटतं की आपल्या पिल्लांना धोका आहे.”
“पावसाळ्याच्या काळात मगरी अंडी देतात, ती उबवून त्यातून पिल्लं बाहेर येईपर्यंत आणि ती पिल्लं मोठी होईपर्यंत त्यांच्या जवळ आलेल्या कोणत्याही प्राण्यावर किंवा माणसावर त्या हल्ला करतात. मगरी माणसांना खात नाहीत. त्या हल्ला करतात, माणसाला पकडून पाण्यात नेतात आणि त्यांना श्वास न घेता आल्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. फार क्वचित एखादी मगर माणसावर भक्ष्य म्हणून हल्ला करते.”

विश्वामित्रीतल्या सगळ्या मगरी काढून दुसरीकडे नेऊन सोडाव्यात अशी कल्पना मध्यंतरी इथल्या राजकीय नेत्यांनी मांडली होती, पण ते इथल्या पर्यावरणासाठी धोक्याचं आहे असं इथल्या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना वाटतं. मगरींसह सहजीवन जगायला इथल्या नागरिकांनी शिकलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे.
“आपण जिना उतरतो तेव्हा खाली बघून उतरतो, सरळ उडी मारत नाही. तसंच आहे हे, मगरींच्या सान्निध्यात राहाताना नीट बघून, काळजीपूर्वक वावरलं पाहिजे. त्यासाठी सरकारी प्रयत्नही आवश्यक आहेत. लोकांना जागरूक केलं पाहिजे, आसपास मगरी असतील तर कसं वागायला हवं हे शिकवलं पाहिजे. सुचना फलक लावायला हवेत. मगर कधी उभ्या माणसावर हल्ला करत नाही. मग आम्ही लोकांना सांगतो मगरी असतील त्या भागात खाली बसू नका. लहान मुलांची विशेष काळजी घ्या,” भावसार म्हणतात.
पण मगरींना पूर्णपणे बडोद्यातून काढलं तर त्याचा इथल्या पर्यावरणावर वाईट परिणाम होईल अशा इशाराही ते देतात.

“निसर्गात प्रत्येक प्राण्याची एक जागा असते. एक चक्र असतं, त्यातून कोणताही प्राणी काढला तर त्याचा निसर्गावर आणि आपल्यावरही वाईट परिणाम होणार हे नक्की.”
पण इथल्या स्थानिक लोकांना, विशेषतः नाल्यांच्या अवतीभोवती राहणाऱ्या गरीब झोपडपट्टीतल्या लोकांना पर्यावरणीय समतोल जपताना आपलं आयुष्य धोक्यात येईल का अशी भीती आहे. मगर-मानव संघर्ष इथे नित्याचाच झालाय आणि त्यावर ठोस उपाय नसल्याने लोक संतापलेत
इथे एका झोपडपट्टीत राहाणाऱ्या पारुलबेन म्हणतात, “काहीतरी करा आमच्यामुलांसाठी, नाहीतर ती अशीच मरतील. त्या मगरींना पकडून घेऊन जा. आसपास संरक्षक जाळ्या उभ्या करा, पूल बांधा.. काहीही करा, पण करा.”
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








